मागील भागात आपण बघितले…
"चला कामाला लागा आणि ह्या प्रभाला देखील ठिकाणी लावा. आता आपल्याला तिची गरज नाही." सुजित म्हणाला.
तितक्यात लोखंडी दार वाजले सगळे भूतकाळातून वर्तमानात आले. सोसाट्याचा वारा सुटला. बाहेर वादळ उभे होते म्हणजे सुजित उभा होता. आता सुरु होणार होते एक घमासान युद्ध.
आता पुढे…
"तो आला आहे. आज त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही मी." अजितच्या आतील रावण जागा झाला होता.
त्याने शेवटचा श्वास घेतला होता. त्याचे डोळे लाल झाले होते. अजितच्या हातावर आणि पायावर दोरीचे व्रण दिसत होते. अस्मिताच्या शरीरावर सुजितच्या वासनेच्या खुणा दिसत होत्या. त्यातून तिच्यावर काय अत्याचार झाला ह्याची कल्पना ही करवत नव्हती. पिहूच्या कपड्यांवर रक्ताचे ओघळ वाहत होते. निर्दयीपणे चिरलेल्या तिच्या नाजूक गळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. गोड गोबरी लोभस पिहू अचानक भयंकर दिसत होती.
"अजित आम्ही तुमच्या मदतीला आलो आहे. सुजितकडे जे संरक्षण आहे ते तुम्हाला एकट्याला भेदने शक्य नाही." मनोहर बोलला.
"आमच्यामध्ये कोणीही येऊ नका, नाहीतर त्याला देखील प्राणाला मुकावे लागेल." अजित त्याचे लाल डोळे आणखी मोठे करत बोलला.
"अजित माझं नाही ऐकणार का? तुझी मदतच करु आम्ही. तुझ्याकडे अजून इतकी शक्ती नाही की तुला त्याचा सामना करता येईल." मंगेश त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
"ठिक आहे पण पहिला वार आम्हीच करु. जेव्हा मदतीची गरज लागेल तेव्हा तुम्ही मध्ये या." अजितसमोर अंगणाकडे बघत बोलत होता. घराच्या भिंतींच्या आरपार तो सुजितला बघू शकत होता.
अचानक घराच्या खिडक्या वाजायला लागल्या. दिवे चालू बंद होत होते. सुजित चार पाच पाऊल पुढे आला तोच त्याच्या पायाजवळ एक मोठा भडका उडाला. पण तो जरा देखील हलला नाही. सुजित अजून दोन पावलं पुढे आला. परत त्याच्या पायाजवळ अजून एक भडका उडाला. ह्यावेळी तो एक पाऊल मागे सरकला. तरी देखील तो पुढे सरकत होता. त्याच्या जवळील शक्ती त्याचे रक्षण करत होती.
सुजित बंगल्याच्या पायरी जवळ येऊन उभा राहिला. डोळे बंद करुन त्याने काही मंत्र पुटपुटले आणि अजित, अस्मिता, पिहू आपोआप बंगल्याच्या खिडकीतून बाहेर ओढले गेले. आता तिघेही वरांड्यातील त्या तीन दगडांजवळ उभे होते. डोळ्यात आग होती. सुड होता.
सुजितच्या डोळ्यात क्रूरता होती.
सुजितच्या डोळ्यात क्रूरता होती.
त्यांच्या मागोमाग मंगेश, मनोहर आणि कुसुम बाहेर आले. अजित आणि अस्मिताची ताकद कमी पडत आहे, हे लक्षात येताच मनोहरने मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या मंत्रामुळे सुजितने अजितवर केलेला वार चुकला आणि तो चवताळला. त्याने त्याचा मोर्चा आता मनोहरकडे वळवला. त्याच्या खिशात एक बारीक चाकू होता, त्याने मनोहरच्या दिशेने भिरकावला तोच अजितने तो चाकू हवेतच थांबवला आणि परत सुजितकडे फेकला. सुजित जरा बाजूला झाला आणि तो चाकू सुजितच्या कानाला स्पर्शून गेला.
थोडावेळ असाच प्रकार सुरु होता. मनोहर कुसुम आणि मंगेशचे लक्ष भटकवण्यासाठी त्याने मंत्राच्या साहाय्याने आतमध्ये बंद असलेल्या प्रभा मावशीला मुक्त केले. तशी ती वाऱ्याच्या वेगाने बाहेर आली.
"ह्यांनीच तुझा जीव घेतला, हीच ती जिने तुझ्या डोक्यावर वार केला आणि त्यामुळे तू प्राणाला मुकलीस." सुजित प्रभाला बोलला.
अतृप्त दृष्ट आत्म्याची शक्ती जास्त असते त्यामुळे प्रभा अस्मितावर चाल करुन गेली आणि कुसुम, मनोहर, मंगेश तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते.
आता अजित आणि पिहू एकटे होते. अजितला कमजोर करण्यासाठी सुजितने पिहूला मंत्राच्या साहाय्याने बांधून ठेवले. ती जोर जोरात ओरडत होती. तिला असे बघून अजितने सुजितच्या अंगावर उडी घेतली. सुजितला हेच हवे होते. त्याने खिशातून अभिमंत्रित केलेला चाकू काढला आणि तो अजितच्या नसलेल्या शरीरात घालणार तोच मागून कोणीतरी त्याचा हात पकडला. सुजित कळवळला, तसे सगळ्यांनी त्या दिशेने वळून बघितले तर साधू महाराज उभे होते. त्यांनी लगेच त्यांच्या शक्तीने प्रभाला बंदी केले आणि सुजितच्या शक्ती त्याच्याकडून काढून घेतल्या. आता सगळे शांत झाले होते. पण प्रभाचा आत्मा मात्र सुटण्यासाठी तडफडत होता.
मंगेशने लगेच सुजितला एका दोराने बांधले.
"शांत हो. तुझा गुन्हेगार सुजित आहे, अस्मिता नाही." साधू महाराज गरजले
"नाही हिनेच माझ्या डोक्यावर वार केला होता." प्रभा अक्राळ विक्राळ चेहरा करत बोलली.
"नाही, हे घे तूच बघ काय झालं होतं ते." म्हणत साधू महाराजांनी त्या रात्री प्रभा सोबत काय झाले होते हे तिला दाखवले.
त्या रात्री प्रभा बेशुद्ध होती. पण सुजितने तिला जिवंतचं कपाटात बंद केले होते, त्यामुळे तिथेच गुदमरुन तिचा जीव गेला होता.
"आता मी ह्याला सोडणार नाही." प्रभा बोलली
"नाही. तू आता पुढच्या दिशेने वाटचाल सुरु कर. तुला मुक्ती मी देतो." साधू महाराज बोलले.
"महाराज आम्हाला मुक्ती द्या. पण त्या आधी मला सुजितला संपवायचे आहे." म्हणत अजित रागाने सुजितकडे झेपावला.
"थांब अजित. त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेव." मंगेश अजितला रोखत बोलला.
" हो मान्य आहे, त्याने जे केले ते माफीलायक नाही. पण त्याला कायद्याने शिक्षा दिली, तर तुमच्यासोबत काय झाले होते? हे सत्य बाहेर येईल नाहीतर जगाला काहीच कळणार नाही की, तुमच्यासोबत काय झाले होते म्हणून." मनोहर बोलला.
अजित अस्मिताला त्यांचे म्हणणे पटले. ते शांत झाले आणि परत त्यांच्या चांगल्या रुपात आले.
"पण तुम्ही शेजाऱ्यांना त्रास का दिला? इतका त्रास की ते देशपांडे घर विकून निघून गेले." कुसुम बोलली.
"आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नव्हता. आम्ही तर फक्त त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करत होतो. पण ते त्यांना समजले नाही आणि ते घर सोडून निघून गेले. त्या नंतर सुजितच्या सांगण्यावरुन काही लोकं घर बघायला यायची. मग आम्ही ठरवलं की, घरात कोणाला पाय टाकू द्यायचा नाही. हे घर म्हणजे आमचं विश्व होतं. आमच्याकडून कोणी हिरावू शकत नाही. म्हणून मग आम्ही सावल्यांचा खेळ खेळायचे ठरवले. मग आम्हाला घाबरुन कोणी आत यायचा प्रयत्न करत नसे आणि त्यामुळेच त्या लोखंडी दारावर बाहेरुन पाटी लावण्यात आली. पण आम्ही कोणाच्या जीविताची हानी केली नाही, फक्त घाबरवले." अजित बोलला.
"चला आता तुमच्या मुक्तीची वेळ झाली आहे." साधू महाराज बोलले.
"महाराज एक मिनिट फक्त आमच्यासोबत आत या. अजित बोलला.
काय असेल आत? तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अजित अस्मिता पिहू सोबत इतके काही झाले आणि कोणालाच कसे कळले नाही. बघुया पुढील भागात.
क्रमशः