Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

खेळ सावल्यांचा... भाग ७

Read Later
खेळ सावल्यांचा... भाग ७
खेळ सावल्यांचा… भाग ७ ( रहस्यकथा)


मागील भागात आपण बघितले…अस्मिताने एका दाराकडे बोटं करत दाखवले. ते दार वाजत होते. आतून आवाज आला. "मला बाहेर यायचे आहे." मंगेश, कुसुम, मनोहर आवाजाच्या दिशेने त्या दाराकडे बघत होते. साधूने सांगितलेले संकट म्हणजे हेच ते दार हे त्यांच्या लक्षात आले.


"तिला तिथेच राहुद्या. ती बाहेर आली तर आम्हाला आमचे काम करता येणार नाही." अजित बोलला.आता पुढे…


"पुढे काय झाले?" कुसुमने त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत विचारले.


"सुजितच्या मित्रांनी घरात उलथापालथ करायला सुरुवात केली ते सगळीकडे कागद पत्र शोधत होते पण त्यांना ते कुठेच सापडले नाही." आजितच्या बोलण्यात ह्या वेळी समाधान होते.


"सगळी शोधाशोध झाल्यावर सुजितने प्रभाला काहीतरी खुणावले. तसे सुजितच्या इशाऱ्या नंतर मावशीने मला सोडले. मी धावतच आत पिहूकडे जात होती, तर मावशीने माझ्या हाताला घट्ट पकडून अडवले. मी माझा हात त्यांच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न करत होते." अस्मिता तिचा हात हलवून दाखवत बोलली.


"मावशी का असं करत आहात? तुम्ही आमच्या घरातील सदस्य आणि असं कसं वागू शकता?" अस्मिता मावशीच्या गयावाया करुन म्हणाली.


"माझ्यासाठी पैसाच सगळं काही आहे. त्यामुळे मी कोणाची कोणीच नाही." प्रभा कपटी हसून बोलली.


"सोड मला." म्हणत अस्मिताने दुसऱ्या हाताने बाजूच्या टेबल वरील फ्लॉवर पॉट उचलून प्रभाच्या डोक्यात मारला. तशी प्रभा जमिनीवर जमिनीवर कोसळली, तिच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ती बेशुद्ध झाली.


"अस्मिताने क्षणाचा ही विलंब न करता, पिहूकडे धाव घेत होती तोच सुजितने तिला पकडले." अजित बोलत होता, त्याचे डोळे आग ओकत होते.


"सुजित सोड मला." अस्मिता हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलली.


"आज आली आहेस हातात असा कसा सोडेल तुला? खूप प्रेम केलं तुझ्यावर मी, लपून छपून तुला बघायचो पण तू मला कधीच बघितले नाहीस. एक दिवस ठरवलं तुला माझ्या भावना सांगेल पण त्या आधीच तू ह्याला होकार दिलास." सुजित रागाने अजितकडे बोटं दाखवत बोलला.


"तू अजितच्या आधी तुझ्या भावना व्यक्त केल्या असत्या, तरी तुझ्यासारख्या कपटी माणसाला मी कधीच हो म्हणाले नसते." अस्मिता रागात बोलली.


"तुझ्याशी लग्न करुन तुला खूप प्रेम देईल असं ठरवलं होतं मी. पण तू माझ्या स्वप्नांचा बळी घेतला. त्याची किंमत तर तुला देखील मोजावी लागेल." सुजित अस्मिताला जवळ ओढत बोलला.

अस्मिता त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. अजित हे सगळं बघत होता, तळमळत होता, सुटण्यासाठी प्रयत्न करता होता. पण त्याचे हात पाय खुर्चीला बांधलेले होते.


सुजित क्रूरपणे हसत अस्मिताला आत ओढत नेत होता.


" सुजित सोड मला. अरे मी तुझ्या भावाची बायको आहे. त्याचा अंश माझ्या पोटात आहे. थोडी तरी मनाची लाज बाळग. कुठे फेडशील हे पाप." अस्मिताने भिंतीच्या एका कडेला घट्ट धरुन ठेवले होते.


"पाप तर पाप पण आज माझी इच्छा मी पूर्ण करणार. तुला आज कोणीही वाचवू शकत नाही. तुझा अजित देखील नाही." म्हणत सुजितने अस्मिताच्या हातावर एक जोरदार वार केला आणि तिची भिंतीला असलेली पकड सुटली.


सुजित तिला फरफटत बेडरुम मध्ये घेऊन गेला.


"इथेच तुमचे प्रेम फुलले ना आता इथेच मी तुला तुझ्या कर्माची शिक्षा देणार." सुजित अस्मिताला बेडवर फेकत बोलला.

सगळ्या मर्यादांचे भान विसरुन तो अस्मितावर तुटून पडला. अस्मिता जीवाच्या आकांताने ओरडण्याचा प्रयत्न करत होती,पण त्याने तिचे तोंड दाबून ठेवले होते जेणेकरुन शेजारी कोणाला आवाज जाऊ नये. सुजितने त्याच्या बळाचा वापर करुन अस्मिताच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली. ती बिचारी असह्य होऊन सुटण्याचा प्रयत्न करत होती. अजित देखील बाहेर तळमळत होता. त्याच्यासमोर त्याची अस्मिता बेअब्रू होत होती आणि तो काहीच करु शकला नाही. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. वासनापूर्ती करुन सुजित बऱ्याच वेळाने बाहेर आला. अस्मिताचा आवाज देखील बंद झाला होता. अजितला तिची काळजी वाटत होती. तो तिला बघण्याचा प्रयत्न करत होता.


"बायकोला बघायचं आहे ना तुला? जा बघ." म्हणत सुजितने अजितला बांधलेला दोर सोडला.


"मी धावतच आत गेलो. माझी अस्मिता बेड वर पडलेली होती. तिच्या सोबत झालेली क्रूरता तिची अवस्था सांगत होती. मी तिच्याजवळ गेलो, तिला जवळ घेत उठवण्याचा प्रयत्न करत होतो. उठ अस्मिता उठ." अजितचे डोळे वाहत होते.


"नाही उठणार ती. तुझ्याच उशीने जीव घेतला मी तिचा." सुजित त्या खोलीच्या दारात उभा राहून बोलला. तो क्रूर हसत होता.

अजित अस्मिताला मिठीत घेऊन रडत होता. अजितला असे रडताना पाहून सुजित असुरी हसत होता. तोच अजितला पिहूची आठवण झाली आणि धावत तिच्या खोलीत गेला. सुजित देखील त्याच्या मागोमाग गेला.


"पिहू उठ बाळा." तिच्या खोलीचा लाईट बंद होता. तसाच अजित तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता.

मागे सुजित हसत होता, त्यानेच खोलीचा लाईट लावला आणि अजित जागीच थिजला.


"तू विचारले होते ना? मावशी कसलं काम झालं? ते हेच. आता तू विचार करत असशील की, तिचा आवाज का नाही आला?
अरे कसा येईल आवाज? तिला जे चॉकलेट दिले होते त्यात झोपेच्या गोळ्या होत्या. म्हणून तर सोपं झालं ना मावशीला तिचा गळा कापायला. आधीच नाजूक ती त्यामुळे जास्त कष्ट झाले नाहीत त्यांना." सुजित अतिशय निर्दय होऊन बोलला.


अजित मात्र शांत झाला होता. डोळ्यात फक्त पाणी होते. आधी अस्मिता आणि आता त्याची लाडकी परी ह्या जगात नव्हत्या. तो पिहूच्या निश्चल देहाला बघत होता. रक्ताच्या थारोळ्यात ती चिमुरडी पडलेली होती.


"अरे किती लहान होती ती. कमीत कमी तिला तर सोडले असते. काहीच कसं वाटलं नाही तुला तिचा जीव घेताना." अजित एकदम उठून सुजितची कॉलर पकडत बोलला.


"तिलाच तर सर्वात आधी मारायचे होते, कारण ती तुझ्या आणि अस्मिताच्या प्रेमाची निशाणी होती. तिला बघूनच माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली." सुजित अजितचा हात झटकत बोलला.

तितक्यात सुजितचे मित्र अजितला ओढत बैठक खोलीत घेऊन गेले. तिथे असलेल्या रॉकिंग चेअर वर त्याला बसवून त्याचे हात पकडून ठेवले.

"आता तू पण जा तुझ्या बायको आणि मुलीकडे." म्हणत सुजितने सोफ्यातील उशीने अजितचा जीव घेतला.

दोन चार मिनिटांची तडफड आणि मग सगळं शांत झाले.


"चला कामाला लागा आणि ह्या प्रभाला देखील ठिकाणी लावा. आता आपल्याला तिची गरज नाही." सुजित म्हणाला.


तितक्यात लोखंडी दार वाजले सगळे भूतकाळातून वर्तमानात आले. सोसाट्याचा वारा सुटला. बाहेर वादळ उभे होते. म्हणजे सुजित उभा होता. आता सुरु होणार होते एक घमासान युद्ध.


पुढे बघू काय होईल कोण जिंकेल? मंगेश, मनोहर, कुसुम खरंच मदत करतील का अस्मिता आणि अजितची?


क्रमशः


©वर्षाराज

टीम: अहमदनगर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//