खेळ सावल्यांचा... भाग ६

"अरे तू हे काय बोलतो आहेस? कसला बदला? तू गंमत करतो आहेस ना सगळी." अजित बोलला, त्यावर अजून देखील विश्वास बसत नव्हता."गंमत नाही. खरं तेच सांगतो आहे. तू माझ्या पासून माझे स्वप्न हिरावले त्याचा बदला, माझ्या स्वप्नाच्या चितेवर इतका सुंदर बंगला उभारलास म्हणून तुला त्याची किंमत तर मोजवीच लागेल." सुजित एक भुवई उंचावून बोलत होता.
खेळ सावल्यांचा…भाग ६ (रहस्य कथा)


मागील भागात आपण बघितले,

थोडावेळ सगळे शांत झाले. अस्मिता आणि अजित काहीच बोलत नव्हते.
"मग?" शांतता भंग करत मंगेशने विचारले.


"घात झाला घात." अस्मिता एकदम चिडली. तिचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले होते.


आता पुढे…


"अरे सुजित काय झालं? आणि तुझे मित्र आत्ता ह्या वेळी कसे आलेत परत? काही अडचण आली का?" अजितने काळजीने विचारले.

"नाही अडचण नाही मीच बोलावले ह्यांना माझ्या मदतीला." सुजितने बोलता बोलता अजितला एका खुर्चीत बसवले.


"सुजित काम झाले." प्रभा बोलली


" काम कसले काम? अरे कोणी सांगेल का मला काय झाले आहे?" अजित खुर्चीतून उठत बोलला.


"सांगतो पण आधी इथे बस." म्हणत सुजितने अजितला जबरदस्तीने परत खुर्चीत बसवले.


"सोडा मला काय करता आहात तुम्ही? मावशी माझी मदत करा." सुजितचे मित्र अजितला एका दोराने जबरदस्ती त्या खुर्चीत बांधत होते.

"अजितच्या ओरडण्याने मला जाग आली. मी धावत बैठकीत गेले. तोपर्यंत त्या लोकांनी अजितला खुर्चीत बांधले होते. त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. हे सगळं बघून मी जोरात ओरडले पण त्यातील एकाने माझ्या तोंडाला पट्टी बांधली आणि मला देखील बांधून ठेवले. मला काळजी वाटतं होती ती पिहूची. मावशीला खूप मदत मागितली पण नंतर लक्षात आले की, त्या देखील त्यांना सामील होत्या." अस्मिता बोलत होती पण तिच्या डोळ्यात आग पेटली होती.


"थोडावेळ गेल्यावर सुजितने माझ्या तोंडातील बोळा काढला आणि त्याची मनिषा त्याने बोलून दाखवली." अजित बोलला.


"काय?" कुसुमने विचारले.


"तो म्हणाला…" अजित


"अजित तुला काय वाटलं? मी तुझ्या प्रेमासाठी इथे आलो आहे? नाही मुळीच नाही. तू हिच्याशी लग्नं केलं, तेव्हाच तुझा माझा संबंध संपला होता. मी तर इथे तुला बरबाद करायला आलो आहे. बदला घ्यायला आलो आहे मी." सुजित क्रूरपणे हसत बोलला.

"अरे तू हे काय बोलतो आहेस? कसला बदला? तू गंमत करतो आहेस ना सगळी." अजित बोलला, त्यावर अजून देखील विश्वास बसत नव्हता.


"गंमत नाही. खरं तेच सांगतो आहे. तू माझ्या पासून माझे स्वप्न हिरावले त्याचा बदला, माझ्या स्वप्नाच्या चितेवर इतका सुंदर बंगला उभारलास म्हणून तुला त्याची किंमत तर मोजवीच लागेल." सुजित एक भुवई उंचावून बोलत होता.


"मला काही कळत नाहीये कोणतं स्वप्न तुझं? आणि मी का ते हिरावेल? तू भाऊ आहेस माझा." अजित बोलला.


"भाऊ? अरे हट तू फक्त तुझ्या सुखाचा विचार केलास, माझा नाही. खरं मला तर तुझ्याकडे बघावं देखील वाटतं नाही." सुजित त्वेषाने बोलला.


"इतका द्वेष करतोस माझा. सांग तरी काय केलं मी?" अजितने काकुळतीने विचारले.


"काय केलं? गुन्हा केलास गुन्हा. ही अस्मिता जिच्या प्रेमात तू सगळ्यांना सोडून लग्न केलंस ना, तिच्यावर मी जीवापाड प्रेम केलं होत. पण मी तिला सांगणार त्या आधीच तू तिला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि माझी स्वप्न धुळीला मिळाली.
काही दिवस आधी मी माझ्या ह्या मित्राकडे आलो होतो, तेव्हा ही तुझी बायको दिसली मला. मग तिचा पाठलाग करत मी इथे आलो. तेव्हा तुझा हा माया बंगला दिसला आणि त्याच्या प्रेमात पडलो मी. म्हणून इथे आलो. म्हटलं छोकरी तर मिळाली नाही पण त्याच्या बदल्यात तुझा जमलेला बिझनेस जो तू नोकरी व्यतिरिक्त करतोस आणि तुझा हा माया बंगला तुझ्यापासून हिरावून घेऊ. मला माया बंगला हवा आहे. कोणत्याही किमतीवर." सुजित ईर्षेने बोलला.


"ते शक्य नाही. तुला मी हे कधीच देणार नाही. तू प्रेमाने मागितला असता तर हसत हसत तुझ्या नावावर केलं असतं मी सगळं पण तू तर भावाच्या रुपात दुश्मन निघालास. पाठीत खंजीर खुपसला तू." अजित रागात बोलला.


"मी पाठीत खंजीर खुपसला ? आणि तू? तू काय केलंस? तू देखील माझे प्रेम हिरावून माझा केसाने गळा कापलास त्याचे काय? आपल्याकडून आपली प्रिय गोष्ट हिसकावल्यावर कसं वाटतं हे तुला समजलं पाहिजे. त्यामुळे प्रेमाने मागण्यात ती मजा नाही की तुला तडफडताना बघण्यात आहे. मुकाट्याने सांग घराचे आणि बिझनेसचे कागद पत्र कुठे आहेत?" सुजित चवताळून बोलला. एका हाताने त्याने अजितच्या गालाला रागाने पकडले होते.


" नाही सांगणार काहीही झाले तरी नाही सांगणार." अजित बोलला.

सगळ्या संभाषणात अस्मिता त्यांच्या तावडीतून सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.


तितक्यात प्रभाने आतून तीन बॅग्स आणल्या.


"चला आता तुम्ही तिघे चार पाच दिवस गावाला जाणार आहात." सुजित त्या बॅग्सकडे बघत बोलला.


"म्हणजे? आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही." अजित ओरडत होता.


"त्यातील एक मित्र त्या बॅग्स घेऊन बाहेर गेला. बाहेर आधीच एक गाडी उभी होती, त्यात त्याने त्या बॅग्स टाकल्या आणि ती गाडी निघून गेली. त्यात देखील आमच्या सारखे एक कुटुंब बसलेले होते." अस्मिता बोलली.


"सोड मला तू असं करु शकत नाहीस." अजित तळमळत होता.


"सोडू? नाही रे अजून तर तुला बरंच काही बघायचे आहे. परत एकदा विचारतो आहे घराचे आणि बिझनेसचे कागद पत्र दे मला." सुजितने अजितच्या गळ्यावर सुरी ठेवत विचारले.


अजित काही सांगत नाही हे बघून त्याने मित्रांना आणि प्रभाला इशारा केला. सुजितने परत अजितच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. अजित सुटकेचा प्रयत्न करत होता, पण दोरीची पकड पक्की होती.


अजित सांगत होता तितक्यात मनोहरला कसला तर तरी आवाज आला

"अजित तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण आहे इथे?" मनोहर बोलला.

"प्रभा मावशी आहे." अस्मिता डोळे मोठे करत बोलली.


"कुठे आहे?" मंगेशने विचारले.


अस्मिताने एका दाराकडे बोटं करत दाखवले. ते दार वाजत होते. आतून आवाज आला. "मला बाहेर यायचे आहे." मंगेश, कुसुम, मनोहर आवाजाच्या दिशेने त्या दाराकडे बघत होते. साधूने सांगितलेले संकट म्हणजे हेच ते दार हे त्यांच्या लक्षात आले.


"तिला तिथेच राहुद्या. ती बाहेर आली तर आम्हाला आमचे काम करता येणार नाही." अजित बोलला.


पुढील भागात बघू अजित, अस्मिता, पिहू सोबत काय झाले? प्रभाला त्या दारामागे का बंद करण्यात आले होते?


क्रमशः


©वर्षाराज

टीम: अहमदनगर

🎭 Series Post

View all