खेळ सावल्यांचा...भाग ५

"आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत केले. चहा झाला आणि गप्पा रंगल्या. आम्हीच आग्रहाने त्यांना जेवणास

खेळ सावल्यांचा…भाग ५( रहस्य कथा)



मागील भागात आपण बघितले …

"सहा वर्षांनी पहिल्यांदाच घरचं कोणी येणार होतं, आमच्याकडे त्यामुळे त्यांच्यासाठी काय करु आणि काय नको असे झाले होते मला." अस्मिता बोलली.

अजित आणि अस्मिता बोलत होते आणि घडलेल्या घटना समोर दिसत होत्या एखाद्या पिक्चरसारख्या.
"पुढे?" मंगेश बोलला.
"सुजितला आवडणारे सगळे पदार्थ मी अस्मिताला बनवण्यास सांगितले. पिहू देखील खूप खुश होती." अजित बोलला



आता पुढे…



" तुला माहित आहे ना मंगेश माझा भाऊ?" अजितने विचारले.


"हो तुझ्याकडून बऱ्याचदा ऐकलं होतं त्याच्या बद्दल. पण भेट झाली नाही कधी. तो बिलकुल तुझ्यासारखा दिसतो बरोबर ना?" मंगेश बोलला.

"हो तोच." अस्मिताच्या डोळ्यात एक आग होती.


"रक्षाबंधनाचा दिवस उजाडला. मी खूप अधिरतेने त्याची वाट बघत होतो. सकाळचे दहा वाजले असतील, तो असाच दार उघडून आत आला. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याने देखील तितक्याच प्रेमाने मिठी मारली. घरात आल्यावर मी, अस्मिता आणि पिहूची ओळख करुन दिली. पिहू आणि त्याची तर खूप छान गट्टी जमली होती. जेवणं झाली आम्ही गप्पा मारत बसलो. आई बाबा शेजारचे सगळ्यांची चौकशी करुन झाली होती. सुजित अस्मिताला आमच्या लहानपणाचे किस्से सांगत होता. सगळं कसं स्वप्नवत वाटत होतं. अनेक आठवणींची उजळणी होत होती. घरात एकदम उत्साह संचारला होता. इतक्या वर्षांनी घराला घरपण असल्यासारखे वाटतं होते." अजित बोलता बोलता घरात गेला. तसे बाकी सगळे त्याच्यामागे आत गेले.

सगळं दृश्य समोर दिसत होते. अजित अस्मिताच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहताना सगळे बघत होते.
वातावरण अगदी प्रसन्न होते.


"अजितने त्याला तू पुन्हा काका होणार आहेस ही बातमी सांगितली. मी तेव्हा चार महिन्यांची प्रेग्नंट होते." अस्मिता पोटावर हात ठेवत बोलली. तिच्या डोळ्यात एक वेदना होती.

"पुन्हा काका होणार म्हणून खूप खुश झाला होता तो. काय म्हणत होता माहितीये? \"वहिनी आता ह्या वेळेस मी आहे तुमची काळजी घ्यायला. सगळे लाड पुरवणार मी आता तुमचे. पिहूच्या वेळेस राहिलेली सगळी हाऊस आता पूर्ण करु आपण. तुमच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम दणक्यात करु आपण. इथे बाहेर मस्त बंगई लाऊ. फुलांनी सजवू, मोठा कार्यक्रम करु.\" असं बोलला." अजितने सांगितले.


बोलता बोलता संध्याकाळ होत आली होती. अस्मिता चहा करायला म्हणून आत जात होती. तितक्यात सुजितने तिला आवाज दिला.


"वहिनी, चहा आपल्या तिघांचा नाही पाच जणांचा करा. सॉरी मी पहिल्यांदाच इथे आलो आणि तुम्हाला न विचारता माझ्या दोन मित्रांना इथे बोलावून घेतले. ते सुद्धा इथे जवळच राहतात, भेट आम्हाला म्हणून खूप मागे लागले होते. पण मी सांगितलं की, \" मी खूप वर्षांनी माझ्या भावाला भेटणार आहे. तर मी तुमच्याकडे काही येणार नाही. तुम्हीच या त्याच्याकडे मला भेटायला.\" त्यामुळे ते येतील म्हणून त्यांचा चहा बनवा फक्त." सुजित बोलला.

"काहीही काय भाऊजी. सॉरी काय म्हणताय? अहो तुमच्या भावाचं घर आहे. तुमच्या हक्काचं घर आहे. काळजी करु नका. बनवते मी चहा." अस्मिता असे बोलून आत निघून गेली.


तितक्यात दाराची घंटी वाजली. सुजितचे मित्र आले होते. दिसायला अतिशय सभ्य.


"आम्ही त्यांचे आनंदाने स्वागत केले. चहा झाला आणि गप्पा रंगल्या. आम्हीच आग्रहाने त्यांना जेवणासाठी थांबवले. अस्मिता लवकरच स्वयंपाकाला लागली. सुजित खूप छान स्वयंपाक करायचा त्यामुळे तो तिच्या मदतीला स्वयंपाक घरात गेला. दिर आणि वहिनी मिळून स्वयंपाक करत होते. मी आणि त्याचे मित्र गप्पा मारत होती. पिहू खेळत होती. स्वयंपाक झाला. जेवणं झाली. सुजितने पिहूला एक चॉकलेट दिले. पिहू खुश झाली. त्याला एक मिठी मारुन तिने ते चॉकलेट खाल्ले. दिवसभर खेळून खूप थकली होती ती. त्यामुळे रात्री दहा वाजेर्यंत झोपी गेली. मग आम्हीच सगळे मोठे गप्पा मारत बसलो होतो. मंगेश हे बघ, इथे मी बसलो होतो. त्या सोफ्यात सुजित बसलेला होता. त्याच्या बाजूच्या दोन सीटच्या सोफ्यात त्याचे मित्र बसले होते आणि अस्मिता इथे ह्या खुर्चीत बसलेली होती आणि मावशी त्या तिथे, त्या खुर्चीत बसल्या होत्या." अजित सगळे ज्या जागी बसले होते त्यांच्या सगळ्यांच्या जागा दाखवत होता.


बैठक खोली छान लावलेली आणि सजवलेली होती. पण तिथल्या वस्तूंवर आता धूळ बसली होती. खूप दिवसांपासून स्वच्छ केलेले नव्हते.


"मावशी? तू आधी बोलला नाहीस त्यांच्या बद्दल. कोण मावशी होत्या?" मनोहर बोलले.


"प्रभा मावशी, त्या माझ्या दूरच्या नात्यातील होत्या. अस्मिताला मदतीला म्हणून आणि पिहूला सांभाळत होत्या त्या. एक दिवस आधीच त्यांच्या घरी गेल्या होत्या रक्षाबंधनासाठी. त्यामुळे रात्री उशिरा परत आल्या होत्या." अजित बोलला.


"मग काय झाले?" कुसुम बोलली.

"खरं तर त्या, त्यादिवशी येणार नव्हत्याचं पण अचानकच आल्या." अस्मिता परत भूतकाळात गेली.


"मी पिहूला झोपायला नेणार तितक्यात दाराची घंटी वाजली. समोर मावशी होत्या. \"अचानक कशा आलात?\" म्हणून मी विचारले देखील त्यांना." अस्मिता बोलली.


"अगं सगळा कार्यक्रम आवरला. जो तो आपआपल्या घरी गेला त्यामुळे मग मी तिथे थांबून काय करणार? आणि मला पिहूची खूप आठवण येत होती. म्हणून मग थांबवेनाच मला तिथे. म्हणून आले मग." प्रभा पिहूला कडेवर घेत म्हणाली.


"हे मात्र बरं झालं, तुमची आणि माझ्या दिरांची भेट तरी झाली त्यामुळे. बरं मावशी तुम्ही बसा मी पिहूला झोपवून येते." अस्मिता बोलली.


" नको गं. बोल तू. मी तिला नीट गाढ झोपवून येते." असे म्हणत प्रभा मावशी पिहूला आत झोपायला घेऊन गेली.


"थोड्यावेळाने सुजितचे मित्र निघून गेले आणि आम्ही देखील झोपायला गेलो. खूप थकल्यामुळे लगेच झोप लागली. झोपून साधारण एक तास झाला असेल म्हणजे सुमारे 1 वाजता मला कोणाच्यातरी बोलण्याच्या आवाजाने जाग आली. म्हणून मी उठून बैठक खोलीत गेलो. तर सुजित आणि त्याचे मित्र बाहेर बसलेले होते. त्यांना असे बघून मला आश्चर्य वाटले. तितक्यात प्रभा मावशी पिहूच्या खोलीतून बाहेर आल्या." अजित बोलला.


थोडावेळ सगळे शांत झाले. अस्मिता आणि अजित काहीच बोलत नव्हते.
"मग?" शांतता भंग करत मंगेश बोलला.


"घात झाला घात." अस्मिता एकदम चिडली. तिचे डोळे लाल झाले होते. चेहऱ्यावरील भाव एकदम बदलले होते.


अस्मिता का चिडली? काय झालं होतं त्या रात्री? बघूया पुढील भागात...


क्रमशः


©वर्षाराज

टीम: अहमदनगर

🎭 Series Post

View all