खेळ सावल्यांचा…भाग ४ (रहस्यकथा)
मागील भागात आपण बघितले…
मंगेशने गाडीचा स्पीड अजून थोडा वाढवला गाडी पुढे गेली खरं पण कुत्रा मागे नव्हता. तो फक्त एक आभास होता. पुढील अर्ध्या तासात दोन तीन वेळा असाच प्रकार घडला. तोपर्यंत घर जवळ आले होते.
"आता गाडीचा स्पीड कमी केला तरी चालेल." मनोहर म्हणाले.
गाडी घरासमोर थांबली.
आता पुढे…
गाडी थांबली तिघे गाडीतून उतरून घरात गेले. जाताना मंगेशने एक नजर अजितच्या घराकडे म्हणजे माया बंगल्याकडे बघितले. दिवसा मोहक दिसणारा तो बंगला रात्रीच्या अंधारात शांत झोपलेला दिसत होता. घरातील सगळे दिवे बंद होते.
कोणाची नजर मंगेशवर पडू नये म्हणून तिघे पटकन घरात शिरले. मनोहरनी साधूने दिलेले सामान व्यवस्थित ठेवले. दरम्यान मंगेश आणि कुसुम फ्रेश झाले. मंगेश सोफ्यात जाऊन बसला तोच कुसुमने त्याच्या समोर लाडूचा डब्बा ठेवला आणि स्वयंपाकासाठी किचन मध्ये गेली. सगळ्यांचे जेवण होईपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते.
"काका मघाशी घडलेला प्रकार काय होता?" मंगेशने मनोहरला विचारले.
"आपल्या मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या शक्ती होत्या त्या." मनोहरने सांगितले.
"मी हे फक्त ऐकले होते. आज पहिल्यांदाच याचा अनुभव आला." मंगेश.
"तू अजून नवीन आहेस. असे बरेच विचित्र अनुभव येतील तुला." कुसुम म्हणाली.
"चला आता झोपू उद्या बरंच काम आहे." मंगेश कुसुम आणि मनोहरला बोलला.
कुसुम आणि मनोहर, मंगेशच्या बोलण्यावर नुसतेच हसले. कारण आजचा खेळ अजून संपला नव्हता. आता तर खरा खेळ सुरू होणार होता. मंगेश मात्र पुढे घडणाऱ्या घटनांपासून अनभिज्ञ होता. पण कुसुम आणि मनोहरच्या अशा वागण्यातून काहीतरी गूढ नक्की घडणार ह्याचा अंदाज त्याने बांधला आणि झाले ही तसेच.
"मी इथेच झोपतो सोफ्यावर." म्हणत मंगेश सोफ्यातच आडवा झाला.
कुसुम आणि मनोहर सोफ्यातच बसले होते. लाईट सुरू होता त्यामुळे मंगेशला झोप लागत नव्हती. अंधार व्हावा म्हणून त्याने सोफ्यातील एक उशी तोंडावर ठेवली आणि एका मिनिटातच तो तडफडून उठून बसला. त्याने खूप प्रयत्नाने तोंडावरील उशी बाजूला फेकली. घामाने चिंब भिजलेला तो जोर जोरात श्वास घेत होता. तितक्यात कुसुमने त्याच्या समोर पाण्याचा पेला धरला. मंगेश गटागट ते पाणी पीत होता.
"आता बरं वाटतं आहे का?" कुसुमने मंगेशच्या डोक्यावर हात फिरवत विचारले.
"हो. आता बरं आहे. पण मला असं वाटल की, कोणीतरी माझ्या तोंडावरील उशी दाबत आहे. माझा श्वास गुदमरत होता. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला कोणीतरी. पण इथे असं कोण करेल?" मंगेश अजून देखील थरथरत बोलला.
"घाबरु नकोस इथे आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही. जे तुला जाणवलं ते तुझ्या बाबतीत घडत नव्हते. ते इतर कोणासोबत घडले असेल जो तुला सांगण्याचा प्रयत्न करत होता." मनोहर बोलले.
"म्हणजे?" मंगेश प्रश्नार्थक नजरेने बघत बोलला.
"म्हणजे साधू महाराजांनी ह्या ज्या वस्तू दिल्या आहेत त्यातील एक वस्तू अशी आहे ज्यामुळे भूतकाळातील घटना कशा घडल्या ह्याची प्रचिती आपल्याला येईल. पण सगळ्यांनाच नाही. आम्ही हेच बघत होतो की ह्यावेळेस कोणाला जाणवेल हे.
काळजी करू नकोस हा दोरा बांध त्यामुळे तुला त्रास होणार नाही फक्त दिसेल." मनोहरने मंगेशच्या मनगटाला एक दोरा बांधला.
"पण मीच का?" मंगेशने विचारले.
"कारण तू त्यांना जवळचा वाटतं असावा." कुसुम बोलली
"जवळचा तर तो आहेच ना!" मनोहर बोलले.
तितक्यात बाहेर काही हलचाल जाणवली. मनोहरने खिडकीच्या पडद्याआडून हळूच बाहेर डोकावले. \" माया \" बंगल्याचे दिवे चालू बंद होत होते. पिहूचे कुटुंब परत बाहेर एकमेकांना पकडून उभे होते. थोडावेळ असाच खेळ चालला आणि मग सगळे शांत झाले. बंगल्याचे दिवे देखील बंद झाले.
"चला आता झोपू. उद्या कामाला लागायचे आहे. मंगेश तुला काही त्रास होणार नाही आता. निवांत झोप." मनोहर बोलले आणि आत झोपायला निघून गेले.
त्या रात्री मंगेशला मात्र शांत झोप लागत नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम मनोहर नेहमीप्रमाणे उठले. पिहू बाहेर खेळत होती. त्यांनी तिला घरातूनच बघितले आता त्यांना वाट बघायची होती ती रात्रीची.
दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम मनोहर नेहमीप्रमाणे उठले. पिहू बाहेर खेळत होती. त्यांनी तिला घरातूनच बघितले आता त्यांना वाट बघायची होती ती रात्रीची.
संध्याकाळ झाली आणि पिहूच्या घरात कसलीतरी लगबग दिसत होती. पिहू छान तयार झाली होती. अस्मिता आणि अजित देखील तयार झाले होते.
"अजित अरे आवर लवकर येतीलच दादा इतक्यात." अस्मिता बोलली.
"अगं हो. भाऊ माझा आहे आणि तुलाच जास्तं घाई झाली आहे आणि हो जरा सावकाश उठत बसत जा तू आता." अजित बोलला.
अजीतच्या या बोलण्याने अस्मितने आपसूकच पोटावर हात ठेवला आणि तिचे डोळे पाणावले.
"हो पण ह्यावेळी पहिल्यांदाच ते येत आहेत आणि ते पण रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी. म्हणून मी खुश आहे." अस्मिता बोलली. तसे तिच्या चेहेऱ्यावर हसू पसरले.
कुसुम, मनोहर, मंगेश आतून सगळं बघत होते.
"काय हो हे काय आहे सगळं?" कुसुम विचारात पडली.
"इतिहासाची पुनरावृत्ती. मंगेश तो यायच्या आत तू तिथे जा. नको थांब आधी आम्ही जातो, मग तू ये थोड्यावेळाने. कुसुम ती बाहुली घे आणि चल." मनोहर बोलले.
कुसुमने बाहुली घेतली आणि सोबत साधू महाराजांनी दिलेले सामान घेऊन दोघे \" माया \" बंगल्यात जायला निघाले.
मनोहरने लोखंडी दार उघडताच जोरात हवा सुटली. अजित आणि अस्मिता दोघे दाराच्या दिशेने बघत होते. कुसुम आणि मनोहरला बघून दोघांनी त्यांना हसत आत यायला सांगितले. कुसुम व मनोहर आत गेले आणि बंगल्याच्या पायरीवर बसले. अस्मिता आणि अजित देखील तिथेच बसले.
"पिहू, ही घे तुझी बाहुली. बाहेर पडली होती तीच द्यायला आलो आम्ही." म्हणत कुसुमने पिहूला बाहुली दिली.
" अजित, तुमच्या दोघांच्या मनात खूप प्रश्न आहेत हे मला माहीत आहे. पण आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुमची मदत करायला आलो आहोत." मनोहर बोलले.
"आम्हाला आता कोणाच्या मदतीची गरज नाही. आज तर आमची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोतच." अस्मिता बोलली.
"अस्मिता ऐक आमचे. तुम्ही समजता तितकं ते सोपं नाही. तुम्ही जर आम्हाला सगळं सांगितलं तर आम्ही तुमची मदत योग्य प्रकारे करू शकतो." कुसुम बोलली.
"तुमच्यावर कसा विश्वास ठेऊ आम्ही? तुमच्या मनात काय आहे? हे आम्हाला ठाऊक नाही." आता अजित जरा रागावला होता.
तितक्यात पुन्हा लोखंडी दरवाजा उघडला गेला. पुन्हा जोरात वारा वाहू लागला. अजित आणि अस्मिता दोघे एकदम उभे राहिले. दरवाजा बंद करून तो वळला त्याला बघून अजितच्या डोळ्यात पाणी वाहत होते. तो होता मंगेश. मंगेश आत गेला. अजित त्याला बघतच राहिला.
"तू इथे कसा?" अजितने विचारले.
"तुझी आठवण इथे घेऊन आली मला." मंगेश देखील डोळ्यातील पाणी पुसत बोलला.
"मित्रा इथे सगळं बदलले आहे आता. पूर्वी सारखे काही राहिले नाही. तू मला जे समजतो आहेस तसा मी नाही रे आता." अजित भावूक होत बोलला.
"मला माहित आहे आणि म्हणून मीच काका काकूला इथे पाठवले होते." मंगेश बोलला.
"म्हणजे हे तुझे काका काकू आहेत?" अजित कुसुम आणि मनोहरकडे बघत बोलला.
" मंगेश आपल्या हातात वेळ कमी आहे." मनोहर बोलले.
"अजित काय झालं होतं? सांग आम्ही तुझ्या मदतीसाठी आलो आहे." मंगेश अजितला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
"सांगतो. त्या दिवशी मी खूप खुश होतो. रक्षाबंधनाचा दिवस होता. तब्बल सहा वर्षांनी माझा भाऊ मला भेटणार होता. सुजित माझा जुळा भाऊ. तुला माहित आहे की अस्मिता आणि मी पळून जाऊन लग्न केले होते, त्यामुळे घरच्यांनी आमच्याशी संबंध तोडले.
एक दिवस अचानक सुजितचा फोन मला आला. \"रक्षाबंधनाच्या दिवशी येतो आणि सगळ्यांची भेट घेतो\" असं सांगितले. मी खूप खूष झालो. नारळी पौर्णिमेला अजून दोन दिवस होते तरी मी त्या दिवशी ऑफिक मधून चार दिवसाची सुट्टी घेऊन निघालो. घरी आल्यावर अस्मिताला सुजित येणार हे सांगितले. ती पण खूप खुश झाली." अजित बोलला.
"सहा वर्षांनी पहिल्यांदाच घरचं कोणी येणार होतं आमच्याकडे, त्यामुळे त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले होते मला." अस्मिता बोलली.
अजित आणि अस्मिता बोलत होते आणि घडलेल्या घटना समोर दिसत होत्या एखाद्या पिक्चरसारख्या.
"पुढे?" मंगेश बोलला.
"सुजितला आवडणारे सगळे पदार्थ मी अस्मिताला बनवण्यास सांगितले. पिहू देखील खूप खुश होती." अजित बोलला.
काय झालं असेल बघुया पुढील भागात.
क्रमशः
©वर्षाराज
टीम: अहमदनगर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा