खेळ सावल्यांचा...भाग ३

"म्हणजे आता पुढील वार परत व्हायच्या आधी आपल्याला तयार राहावे लागेल आणि म्हणून तुम्ही तातडीने निघालात." मंगेश सगळे ऐकून बोलला."पण तो कोण होता? हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात घुमतो आहे." कुसुम विचारात बोलली."तुला काही कल्पना आहे का?" मनोहने मंगेशला विचारले


खेळ सावल्यांचा… भाग ३ (रहस्यकथा)मागील भागात आपण बघितले…


"अजित हे नक्की आहेत तरी कोण? आणि आपल्याला का वाचवले असेल? म्हणजे असं कसं शक्य आहे?" अस्मिता नेनेंच्या घराकडे बघत बोलली.


"मला सुद्धा तोच प्रश्न आहे. आजूबाजूचे कोणीच आपल्याशी बोलत नाहीत आता. आपल्या पिहूशी खेळायला सुद्धा कोणी नाही. मग असं असताना ह्यांनी आपल्याला मदत कशी केली?" अजित विचारांच्या गर्दीत हरवलेला होता.


आता पुढे…


"कुसुम आपल्याला तयारीला लागायला पाहिजे आता. चल बॅग भर आपलं काम करून उद्या सकाळी परत येऊ." मनोहर घाईत कपाटातील एक हॅण्ड बॅग काढत म्हणाले.


"हो. तुम्ही कपडे भरा मी बाकीचं सामान आवरते. पण आधी हे नीट ठेवा बॅगेत." कुसुम लगबगीने पदर सावरत हातातील वस्तू मनोहरला देत बोलली.


"हे कुठे सापडलं तुला?" मनोहर आश्चर्याने कुसुमच्या हातातील छोटी बाहुली घेत म्हणाले.


"अहो, आपण तिथे आत गेलो तेव्हा ही माझ्या पायाला लागली आणि मी हळूच त्यांचे लक्ष नसताना उचलून घेतली आणि साडीच्या पदरात लपवली." कुसुम एक छोटे हास्य ओठांवर आणत म्हणाली.


"हे मात्र छान झालं. आपल्याला कामात येईल हे. चल निघूया आता?" इति मनोहर.

"हो. चला." म्हणत कुसुम आणि मनोहर निघून गेले.


काही अंतर चालून गेल्यावर दोघेही एका दुकानासमोर पोहोचले जिथे त्याचे त्या दुकानदारासोबत काही बोलणे झाले. दुकानदाराने एक फोन केला आणि पुढच्या पंधरा मिनिटात त्यांना घ्यायला एक गाडी आली. दोघे गाडीत बसले.


"काका काकू, असे अचानक बोलावले. काय झालं आहे?" मंगेश म्हणजे मंग्या, मनोहर आणि कुसुमचा दूरच्या नात्यातील पुतण्या. पण अगदी त्यांच्या जवळचा.


"मंग्या आज विचित्र प्रकार घडला." मनोहरने काही वेळा पूर्वीच घडलेला प्रकार सांगितला.


"मंगेश, अरे तो माणूस आणि अजित दोघांना बाजू बाजूला उभे केले तर समजणार नाही की कोण अजित आणि कोण तो? इतकं साम्य आहे दोघांमध्ये." कुसुम बोलली.


"म्हणजे आता पुढील वार परत व्हायच्या आधी आपल्याला तयार राहावे लागेल आणि म्हणून तुम्ही तातडीने निघालात." मंगेश सगळे ऐकून बोलला.


"पण तो कोण होता? हा प्रश्न सतत माझ्या डोक्यात घुमतो आहे." कुसुम विचारात बोलली.


"तुला काही कल्पना आहे का?" मनोहने मंगेशला विचारले.


"मी त्याला बघितले नाही कधी. पण कोण असेल ह्याचा अंदाज आहे आणि जर माझा अंदाज खरा असेल तर प्रकरण दिसतं तितकं सोपं नक्कीच नाही. असे मला वाटते." मंगेश कोड्यात बोलला.


साधारण दोन तासात तिघे एका सूनसान जागी पोहोचले. जिथे एक खूप प्राचीन मंदिर होते. ज्या शेजारी एका कुटीत एक तपस्वी साधू रहात होता. मनोहर, कुसुम आणि मंगेश ह्यांनी त्या कुटीत प्रवेश केला.


"या, तुमचीच वाट बघत होतो. बसा इथे." ध्यानात बसलेल्या साधूने त्यांना आत बसण्यास सांगितले.


तिघांनी साधूला नमस्कार केला आणि समोरील आसनावर बसले.


"मंगेश त्या समोरच्या टोपलीत काही वस्तू ठेवल्या आहेत. ती टोपली इथे घेऊन ये." साधूने इशाऱ्याने ती टोपली दाखवली.

मंगेशने उठून ती टोपली साधू समोर ठेवली.


"महाराज, आज..!" कुसुम बोलत होती तोच साधूने तिचे बोलणे मध्येच तोडत बोलायला सुरुवात केली.


"मला सगळं माहित आहे. तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. पण आता वेळ कमी आहे. तो परत येईल, तुम्ही आजच हे सामान घेऊन परत जा. उद्याची पौर्णिमा आहे. उद्याची रात्र निर्णायक रात्र आहे.

मंगेश तू सुद्धा जा. पण उद्या पर्यंत कोणाच्या नजरेस पडू नकोस. वेळ आली की मग समोर जावं लागेल तुला. तुझी गरज पडेल. अजून एक गोष्ट, तुझा अंदाज बरोबर आहे. त्यामुळे दिसणारी प्रत्येक गोष्ट इतकी साधी सोपी नाही हे लक्षात ठेवा.

सोबतच अजून एक गुपित आहे त्या घरात. तुम्हाला त्याच्याशी सामना करावा लागेल. हे सगळं तो तिथे यायच्या आत सुरू झालं पाहिजे.

वेळ आलीच तर मी स्वतः तिथे येईल. पण मी दिलेल्या वस्तूंनी तुमचे काम होणार हे नक्की.

वस्तू कशा आणि कधी वापरायच्या तुम्हाला चांगल माहीत आहे. त्यामुळे आता निघा आणि वाटेत कुठेही गाडी थांबवायची नाही. गाडी सरळ घराच्या समोर थांबेल." साधूने त्यांच्या कराऱ्या आवाजात सगळ्या सूचना दिल्या.

तपस्या प्रचंड असल्यामुळे कुठे काय घडत हे त्यांना आधीच कळत होते. त्यामुळे काय कसं घडलं हे सांगण्याची गरज नव्हतीच.


साधूच्या आदेशानुसार मनोहर, कुसुम आणि मंगेश जायला निघाले.

"कुसुम ती बाहुली दे इकडे." तिघे कुटीच्या बाहेर निघणार तोच साधूने आवाज दिला.

कुसुमने बॅगेतील बाहुली काढून साधूच्या हातात दिली.
साधूने बाहुली हातात धरून काही मंत्र उच्चार केले आणि ती बाहुली परत कुसुमला दिली.


"हे घे. हिच्या मदतीने तुम्ही सहज आत जाऊ शकता." साधू बाहुली परत देत म्हणाला.


तिघे गुपचूप गाडीत बसले आणि घरी जाण्यास निघाले. तोपर्यंत संध्याकाळचे सात वाजत आले होते. मंगेशने सकाळपासून काहीच खाल्लेले नव्हते, त्यामुळे त्याच्या पोटात उंदरांची लुडबुड सुरू झाली होती. पण रस्त्यात गाडी थांबवायची नाही, ह्या आदेशामुळे काही खाऊन जाऊ असेही करता येत नव्हते. त्याची बेचैनी कुसुमला समजली.


"मंगेश लाडू केले आहेत. घरी गेल्यावर खा आणि मग लगेच जेवायला देते तुला. तो पर्यंत कळ काढ." कुसुम हसत बोलली.


गाडी घराच्या दिशेने जात होती तोच मंगेशला थोड्या अंतरावर रस्त्याच्या मधोमध एक कुत्रा उभा असल्याचे दिसले. गाडी त्याच्या बाजूने काढू म्हणू त्याने गाडी जरा डावीकडे वळवली, तो कुत्रा डावीकडे सरकला. मंगेशने परत गाडी उजवीकडे वळवली आणि कुत्रा सुद्धा उजवीकडे जाऊन उभा राहिला. समोर चाललेला खेळ मनोहर आणि कुसुम बघत होते.

"मंगेश गाडी जशी होती त्याच रेषेत घे आणि स्पीड वाढव. काहीही झालं तरी गाडीचा स्पीड कमी होता कामा नये, जो पर्यंत मी सांगत नाही." मनोहर बोलले.


मंगेशने मनोहरकडे बघितले आणि गाडीचा स्पीड वाढवला. गाडी जोराने कुत्र्याच्या जवळ गेली आता कुत्रा गाडीखाली जाणार असे मंगेशला वाटले. क्षणासाठी मनात विचार आला की गाडी थांबवावी तोच मनोहर जोरात ओरडले.

"मंग्या स्पीड कमी करायचा नाही. अजून स्पीड वाढव जरा."

मंगेशने गाडीचा स्पीड अजून थोडा वाढवला गाडी पुढे गेली खरं पण कुत्रा मागे नव्हता. तो फक्त एक आभास होता. पुढील अर्ध्या तासात दोन तीन वेळा असाच प्रकार घडला. तोपर्यंत घर जवळ आले होते.


"आता गाडीचा स्पीड कमी केला तरी चालेल." मनोहर म्हणाले.


गाडी घरासमोर थांबली.


पुढील भागात बघू हा सगळा प्रकार काय आहे.


क्रमशः


©वर्षाराज

टीम: अहमदनगर

🎭 Series Post

View all