खेळ सावल्यांचा... भाग २

कुसुम आणि मनोहर बोलत होते तितक्यात त्यांना 'माया' बंगल्यातून म्हणजे पिहूच्या घरातून जोरात काह?


खेळ सावल्यांचा…भाग २ ( रहस्यकथा )



मागील भागात आपण बघितले …


"हो बाबा, पण ते आपले शेजारी आहेत ना आता आणि असही आता कोणी बोलत नाही माझ्याशी." पिहू गोल डोळे उंचावत बोलली.


" हो. पण अजून आई बाबा त्यांना ओळखत नाहीत ना, म्हणून." अजित तिला समजावत होता.

तितक्यात पिहूला बॉल दिसला आणि ती खेळायला पळाली.



आता पुढे…


"अस्मिता तू खरं बोलते आहेस. ते नेने आजी आजोबा जरा विचित्रच वाटतात." अजितने किचनमध्ये जाऊन अस्मिताला सांगितले.

"बघ मी. बोलले ना तुला?" अस्मिता एकदम वळून बोलली.

"मी बघत होतो त्यांच्याकडे तर डोळे चोरत होते ते आणि पिहूशी आपण कोणी समोर नसताना बोलण्याचा प्रयत्न करतात. आपण बघितलं की पटकन तिथून निघून जातात. आणि हातात सतत काही तरी असतं त्यांच्या." अजित शंकेच्या नजरेने बोलला.


"हो, मी पण बघितले आहे. काहीतरी असतं त्यांच्या हातात आणि सोबत काहीतरी बडबडत असतात ते. लक्ष ठेवावं लागेल. कोणाच्या मनात काय असतं आपल्याला काय माहित रे." अस्मिता जरा धास्तावली.


"हो ना, कोणावर विश्वास तर आता ठेऊच शकत नाही मी." अजित

"अजित मला खूप भीती वाटते आहे. परत तसं काही झालं तर? " अस्मिता अजितचा हात पकडत म्हणाली.


"अस्मिता खरं सांगू भीती तर मलाही वाटते त्या प्रसंगा नंतर." अजित अस्मिताचा हात अजूनच घट्ट पकडत म्हणाला.


"शांततेने जगू द्या म्हणावं आता तरी आम्हाला." अस्मिताचे डोळे पाणावले.




दुसरीकडे…



"कुसुम त्या देशपांडेंच्या नातीला भेटलो आज. पिहूची मैत्रीण ना ती." मनोहर घरात येत म्हणाले.


"ते कुठे भेटले तुम्हाला? त्यांनी तर त्यांचा बंगला विकला आणि दुसरी कडे गेले ना राहायला?" कुसुम हातातील विणकाम करत म्हणाली.


"अगं इथे येताना आपल्या मंग्याने मला पत्ता दिला होता." मनोहर म्हणाले.


"असं होय. मग काय म्हणाली ती?" कुसुम हातातील कपड्याला साखळी टाका टाकत बोलली.


"पिहूची आठवण येते तिला." मनोहर बोलताना जरा खिन्न झाले.

"काही मिळालं का?" कुसुम चष्म्यातून वर बघत बोलली.


"नाही ना तिच्याकडे काही नाहीये. " मनोहर उदास होत बोलले.


"म्हणजे आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही." कुसुम परत चष्म्यातून वर बघत बोलली.


" हो. पण आपल्याला खूप सावधपणे हे करावं लागणार आहे. आपल्याला त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल." इति मनोहर.


कुसुम आणि मनोहर बोलत होते तितक्यात त्यांना \"माया\" बंगल्यातून म्हणजे पिहूच्या घरातून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. कुसुम आणि मनोहर धावतच बाहेर गेले. पिहूच्या घराच्या आणि नेनेंच्या घराच्या कुंपणाची भिंत एकच होती त्यामुळे बाहेर आल्यावर त्यांना संपूर्ण माया बंगला स्पष्ट दिसत असे.


कुसुम आणि मनोहर बाहेर आले तसे त्यांनी एकमेकांकडे बघितले. असं काही ह्या वेळी होईल ह्याची कल्पना त्यांना नव्हती.

भर दुपारी बाराची वेळ होती. पिहूच्या अंगणात सोसाट्याचा वारा सुटला होता. वाऱ्यासोबत झाडांची वाळलेली पाने उडत होती. अंगणात लावलेला झुला देखील आपोआप हलत होता. पिहू, अस्मिता आणि अजित वऱ्हांड्यात एकमेकांना घट्टा पकडून उभे होते. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती होती. त्या भेदरलेल्या नजरेने ते समोर उभ्या असलेल्या आकृतीकडे बघत होते. आणि ती आकृती म्हणजे तो, त्या लोखंडी दरवाज्यातून आत येऊन उभा होता. उंच धिप्पाड बांध्याचा. डोक्यावर दाट केस, लाल बुंद डोळ्यांमधे भरलेल्या कृद्ध नजरेने तो त्यांच्याकडे बघत होता. त्याच्या ओठांवर एक असुरी हास्य होते.
म्हणजे तो त्यांना आणि ते त्याला बघू शकतात हे कुसुम आणि मनोहरच्या लक्षात आले. पण कुसुम आणि मनोहर मात्र दुरूनच दोनही बाजू बघत होते, ह्याची कल्पना त्यांना नव्हती.


" तूऽऽ, तू पुन्हा का आला आहेस इथे?" अस्मिता जीवाच्या आकांताने ओरडून बोलली.


" तुम्हाला ह्या घरातून बाहेर काढायला आलो आहे मी. आणि ह्यावेळेस मला कोणी रोखू शकणार नाही. हे घर माझं आहे. ह्यावर माझे अधिपत्य आहे. तुम्हाला ह्या घरात राहण्याचा अधिकार नाही." तो त्याच्या कराऱ्या आवाजात बोलला.


" चालता हो इथून, हे आमचं घर आहे. आम्ही इथून कुठेच जाणार नाही." अजित त्याला प्रतिउत्तर देत म्हणाला.


" मी तुम्हाला बंदी बनवून ठेवणार. मग बघू कसे निघत नाही घरातून बाहेर तुम्ही." असं म्हणत तो दोन पावलं पुढे सरकला आणि वारा अजूनच वेगाने वाहू लागला. कुंपणाचा लोखंडी दरवाजा जोर जोरात उघड बंद होत होता.


" तिथेच थांब, आणखी एक पाऊल पुढे आलास तर इथून जिवंत बाहेर जाणार नाहीस तू." अजित कडाडला


" तू , तू मला मारणार? माझं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही." असे म्हणत त्याने खिशात हात घातला.


तो खिशातून काहीतरी बाहेर काढून अस्मिता, अजित आणि पिहूच्या दिशेने फेकणार ह्याची कल्पना मनोहर आणि कुसुमला आली आणि ह्याच संधीचा फायदा घेत मनोहर ने त्याच्या जवळील एक पुरचुंडी त्याच्या जवळ फेकली आणि दोन क्षणासाठी त्याच्या समोर आगीचा भडका उडाला. ज्यामुळे त्याच्या हातातील ती वस्तू खाली पडून नाहीशी झाली.

तो रागाने अजूनच लाल झाला.

"बघून घेईल सगळ्यांना, मी परत येईल लवकरच." म्हणत तिथून निघून गेला.

तो बाहेर गेला आणि वादळ देखील शांत झाले.


मनोहर आणि कुसुम लगेच माया बंगल्यात शिरले. ते अशाच संधीच्या शोधात होते. जेणे करून ते माया बंगल्यात निर्विरोध शिरकाव करू शकतील. आणि त्यांना ती संधी आयतीच सापडली.


"तुम्ही ठिक आहात ना सगळे?" कुसुम आपुलकीने विचारले.


"हो. तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला वाचवले." अजित हात जोडत बोलला.


"पण तुम्ही कोण? आणि आम्हाला का वाचवले?" अस्मिताने साशंक नजरेने अजितकडे बघत कुसुम आणि मनोहरला विचारले.


"सांगू नंतर कधी. तुम्ही आता आराम करा. भेटू आपण परत." असे म्हणून मनोहर कुसुमला घेऊन घरी निघून गेले.


"अजित हे नक्की आहेत तरी कोण? आणि आपल्याला का वाचवले असेल? म्हणजे असं कसं शक्य आहे?" अस्मिता नेनेंच्या घराकडे बघत बोलली.


"मला सुद्धा तोच प्रश्न आहे. आजूबाजूचे कोणीच आपल्याशी बोलत नाहीत आता. आपल्या पिहूशी खेळायला सुद्धा कोणी नाही. मग असं असताना ह्यांनी आपल्याला मदत कशी केली?" अजित विचारांच्या गर्दीत हरवलेला होता.


क्रमशः


© वर्षाराज


टीम: अहमदनगर



मला माहित आहेत तुमच्या मनात असंख्य प्रश्नांची गर्दी झाली आहे. तो कोण होता? का आला होता? त्याचं घर का म्हणत होता? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या भागांमधून मिळतील. वाचत राहा खेळ सावल्यांचा.

🎭 Series Post

View all