खेळ सावल्यांचा... भाग १

"पिहू, बघू दे काय आहे हातात तुझ्या?" अस्मिता ओरडतच तिच्या मुलीकडे म्हणजे पिहूकडे गेली."काही नाही ?

खेळ सावल्यांचा...भाग १ ( रहस्यकथा)

'माया' नावाच्या चार पाच खोल्यांच्या घरवजा बंगल्यात एक छोटेसे कुटुंब रहात होते. नवरा बायको आणि पाच वर्षांची चिमुरडी.
बंगला तर खूपच सुंदर होता. अगदी कोणीही बघून मोहात पडेल असा. बंगल्याच्या भोवती उंच भिंतीचे कुंपण होते. आत जायला मोठा लोखंडी दरवाजा होता. दोन वर्षांपूर्वी दरवाज्यावर एक ठळक आणि मोठ्या अक्षरात पाटी लावण्यात आली होती होती.
"कोणासही आत जाण्यास सक्त मनाई आहे."

कुंपणातून आत गेल्यावर मोठी बाग होती. त्या बागेत झुला लावलेला होता, ज्यात तिघे बसून गप्पा मारत होते.
बागेतून घराकडे जायला छोटा विटांचा वळणदार रस्ता होता. समोर एक पायरी चढून वर गेल्यावर एका बाजूला मोकळी जागा होती. ज्याला आपण वऱ्हांडा म्हणतो, तिथे तीन चौकोनी दगड ठेवलेले होते. जिथे ती चिमुरडी तासनतास खेळत असे आणि दुसरीकडे प्रशस्त बैठक. बैठकीनंतर स्वयंपाक घर आणि एक खोली. वरच्या मजल्यावर दोन खोल्या होत्या आणि एक अडगळीची खोली होती.


चला तर मग पाहूया काय लपलं आहे ह्या कथेत?


"पिहू, बघू दे काय आहे हातात तुझ्या?" अस्मिता ओरडतच तिच्या मुलीकडे म्हणजे पिहूकडे गेली.

"काही नाही आई. हे बघ फूल आहे. आहे की नाही छान?" गोल डोळे मिचकवत, पाठीमागे लपवलेले गुलाबाचे फूल पुढे करत पिहू बोलली.


"हो, खूप छान आहे. पण कोणी दिलं तुला हे फुल?" अस्मिता अजूनही जरा रागात होती पण तिच्या बोलण्यात काळजी होती.


"अगं, शेजारी ते आज्जी आजोबा आलेत ना नवीन राहायला. त्या आज्जीने दिलं आणि हे बघ हा लाडू पण दिला." पिहूने निरागसपणे फ्रॉकच्या खिशात लपवलेला बेसनाचा लाडू अस्मिताच्या पुढे केेला.


ते बघून अस्मिता अजूनच चिडली. आईच ती. काळजी वाटणारच ना तिला!

"तुला किती वेळा सांगितलं आहे की,पिहू कोणी काही दिलेलं घ्यायचं नाही. कळत कसं नाही तुला?" असे म्हणत अस्मिताने तो लाडू फेकून दिला.


पिहू मात्र नाराज झाली.
"परत असं नाही करणार ना आई मी." गोबरे गाल फुगवत पिहू म्हणाली.


माय लेकीचा हा संवाद शेजारच्या बंगल्यात नवीन राहायला आलेल्या कुसुम आज्जी खिडकीच्या पडद्याआड लपून बघत होत्या. त्यांनी दिलेला लाडू अस्मिताने फेकून दिल्याचे त्यांना वाईट वाटतं होते, पण आईची काळजी त्या समजू शकत होत्या.


हा सगळा प्रकार सुरु असताना मनोहरराव म्हणजे, ते आजोबा लगबगीने आत आले.

"कुसुम खाल्ला का गं तिने लाडू?" उत्सुकतेने मनोहरराव विचारत होते.


"नाही हो. तिच्या आईने फेकून दिला." कुसुमताई इवलंस तोंड करत म्हणाल्या.


"असू दे. तिला तिच्या मुलीची काळजी असणारच ना. आणि असही तिने कसा खाल्ला असता लाडू? आपण पुन्हा प्रयत्न करु." मनोहरराव कुसुम ताईंना समजावत होते.


"हो. प्रयत्न तर चालूच ठेवावे लागतील. पोर गोड आहे पण खूप. गोरी गोरी, गोल डोळे, कुरळे लांब केस. गोबऱ्या गालावर तो तीळ किती शोभतो ना तिला?" कुसुम ताई पिहूचा चेहरा आठवून बोलत होत्या.

"कुसुम, अगं जीव अडकवून नाही चालणार तिच्यात. आपल्याला आपलं काम करायचं आहे. ते झालं की चाललो आपण इथून. लक्षात आहे ना?" मनोहर अंगातील सदरा काढून भिंतीच्या खिळ्यावर टांगत म्हणाले.

"होय हो. आपलं नशीब इतकं कुठे, की कोणात जीव अडकवू आपण." कुसुम चेहरा पाडत बोलली.


"अगं. आपलं कामचं असं आहे, त्याला कोण काय करणार? आणि तिच्यात जीव अडकवून उपयोग काय सांग मला?" मनोहर.



**********


"अजित मला काळजी वाटते रे पिहूची." अस्मिता संध्याकाळी चहा घेत अजितशी बोलत होती.

"तू ना, उगाच जास्तं काळजी करतेस. अजून पाच वर्षांचीच आहे गं आपली पिहू. लहान आहे अजून." अजित.


"म्हणूनच तर काळजी वाटते ना तिची. कितीदा तिला सांगितलं आहे की, कोणाकडून काही घ्यायचं नाही. तरी ऐकत नाही रे ती." अस्मिता वैतागलेल्या स्वरात बोलत होती.

"आता काय झालं?" अजित चहाचा घोट घेत भुवया उंचावून बोलला.


"अरे, आपल्या बाजूच्या बंगल्यात ते नेने राहायला आलेत ना? ते रे आज्जी आजोबा. मागच्या आठवड्यात आलेत ते." अस्मिता त्या बंगल्याकडे बघून सांगत होती.


"काय झालं त्यांचं?" अजित.


"अरे, ते आत्ताच आलेत आणि नेहमी आपल्या पिहूशी बोलत राहतात. खुणा करुन बोलावत राहतात. आज तर चक्क लाडू दिला खायला तिला." अस्मिता नाक मुरडत बोलत होती.


"अगं त्यांना त्यांच्या नातीसारखी वाटत असेल म्हणून बोलावत असतील." अजित तिला समजावत होता.

"अरे अजून आपली ओळख नाही काही आणि इतर कोणी आता आपल्याशी बोलत नाहीत. मग हे कसे बोलतात? आणि तू काहीही म्हण, माझा अनोळखी लोकांवर विश्वास नाही. ओळखीच्या लोकांवर विश्वास ठेवून काय झालं बघितले ना? मग अनोळखी लोकांवर काय विश्वास ठेवायचा? मला नाही आवडत.
आणि ते जरा विचित्रच वाटतात मला." अस्मिता परत वैतागली.


"मी समजू शकतो आणि तुझं बरोबर आहे. पण ते वयाने मोठे आहेत. तरी तू म्हणतेस तर आता मी सुद्धा लक्ष ठेवेल. मग तर झालं?" अजित.


पुढील दोन दिवस अजित सांगितल्या प्रमाणे नेने आज्जी आजोबांवर लक्ष ठेऊन होता.


"पिहू, इकडे ये. काय बोलत होत्या त्या आज्जी?" अजित ने कुसुमताईंना पिहूशी गुपचूप बोलताना बघितले.


"काही नाही, त्या चिवडा आवडतो का विचारत होत्या." पिहू परत गोल डोळे फिरवत बोलली.

"मग तू काय सांगितलं?" अजित तिचा हात पकडून तिला जवळ घेत बोलला.

"मी सांगितलं, मला चिवडा नाही आवडत. शेव आवडते." पिहू अजितच्या गालावर हात फिरवत बोलत होती.


"बच्चा तुला सांगितलं आहे ना आईने की, अनोळखी लोकांशी बोलायचं नाही." अजित पिहूच्या गालावर आलेली कुरळ्या केसांची एक बट मागे करत बोलला.


"हो बाबा, पण ते आपले शेजारी आहेत ना आता आणि असही आता कोणी बोलत नाही माझ्याशी." पिहू गोल डोळे उंचावत बोलली.


" हो. पण अजून आई बाबा त्यांना ओळखत नाहीत ना, म्हणून." अजित तिला समजावत होता.

तितक्यात पिहूला बॉल दिसला आणि ती खेळायला पळाली.



क्रमशः



© वर्षाराज

टीम: अहमदनगर


ही कथा आहे एका रहस्यमयी जोडप्याची. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात त्यात काही विचित्र असतात. काही माणसं विचित्र असतात. पण त्यांच्या मागे काही ना काही रहस्य असतं. अशा लोकांचे वागणे बोलणे सगळेच एक गूढ असते. काय असेल त्याचे रहस्य? बघू या पुढील भागात काय काय घडेल ते.
 

🎭 Series Post

View all