Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

गजरा

Read Later
गजरा
माळ सख्या , गजरा आणून
वेणीत माझ्या , तुझ्या हाताने ....!
हिरेमोती ,धनदौलत , काही नको
आनंदून जाते मी, तुझ्या सहवासाने...!!!

पाणावलेल्या डोळ्यांनी श्वेता , मनातलं कागदावर उतरवत होती. तेवढ्यात "हॅपी बर्थडे टू यू ! हॅपी बर्थडे माय डियर ताईडे ! " म्हणत श्वेताची बहीण नीशा आली . तिच्या हातातील डायरी हिसकावत, "हे काय? ताईडे तुझ्या डोळ्यात पाणी ? काय लिहितेस एवढी भावूक होवून ? बघू जरा ".

माळ सख्या गजरा आणून
वेणीत माझ्या....... नीशा एक एक ओळ वाचत होती . वाचता वाचता श्वेताचा चेहरा न्याहाळत
होती .वाचून झाल्यावर, निशा श्वेताला मीठी मारत म्हणाली ,"आठवतयं ना ताईडे . आई तुझ्यासाठी दररोज गजरा बनवायची . तुझ्या वेणीत माळायची .कधी जाईचा ; कधी मोगऱ्याचा ; तर कधी निशिगंधाचा; आणि अबोलीचा गजरा तर तुला फारच आवडायचा ".

तुझं लग्न जमल्यानंतर शेजारच्या पाटील काकू तुझी गंमतही करायच्या . "श्वेता जावईबापू कडून माळून घ्यायचा हा गजरा लग्नानंतर . फारच आवड बाई तुला गजऱ्याची . सांगावं लागेल जावईबापूंना अंगणात
जाई ;जुई ; मोगरा ; अबोली ; निशिगंध नसतील तर लावून घ्यायला ."

ताईडे , किती बदललीस गं तू ! नोकरी व घर यातून नटण्या - मुरडण्याला थोडाही वेळ काढत नाहीस . निशीगंध ;मोगरा ;जाई ; जुई अंगणात बहरलेली असताना, कधी गजरा माळत नाहीस. चल आज मी तुला गजरा बनवून देते. छान साडी नेसून अंबाडा
टाक सुंदर मोगऱ्याचा गजरा माळ. बघ अख्खा दिवस मोगऱ्याचा सुगंध तुझ्याभोवती दरवळत राहील . तुझा वाढदिवस सुगंधित होईल .नको ग निशा. मी गजरा माळणं सोडलंय .नाही आवडत आजकाल गजरा माळायला .पण का ? तुझ्या लिहिलेल्या ओळी सांगतात गजरा न माळण्याचं व्यस्तता नसून दुसरंच काही कारण आहे .

एवढं बदलतं का गं कुणी लग्नानंतर ? असं जर असेल तर मी लग्नच करणार नाही .लग्नाआधीची ती खळखळून हसणारी ; उत्साहाचा झरा ; रमतगमत क्षणक्षण आनंदाने जगणारी ; नव्हे मनामनात आनंद पेरणारी ; तरीही तेवढीच जबाबदार ;एकावेळी कित्येक कामं कुशलतेने करणारी ; हरहुन्नरी ; प्रतिभासंपन्न ; कवी मनाची ती , माझी ताई हरवलीच जणू .

लग्नानंतर सगळ्याच बायका घरदार
सांभाळतांना अशा यांत्रिक होतात का गं ? तसं काही नाही नीशा . सांग तुला काय खायला देवू ? ताईडे विषय बदलवू नकोस . गजरा न माळण्याचं कारण सांगावंच लागेल .अगं कारण तसं काही नाही .स्त्रीमन फार भावूक असतं . स्त्रीचा आनंद , लग्नानंतर नवऱ्याभोवती फिरत असतो . लग्नानंतर तिचं जग बदलतं . पुरुषांचं तसं नसतं . त्यांच्या विचारांना केवळ तर्काचा आधार असतो.स्त्रियांच्या विचारांना भावनांचा गफलत इथेच होते .

लग्नानंतरची पहिली वटसावित्री आठवतेय अजूनही . छान नटले - सजले होते मी . सुंदर
हिरवीकंच नऊवारी नेसून ; नाकात मोत्याची नथ ;हातात
हिरवाकंच चुडा ;गळ्यात कोल्हापुरी साज ; भरदार
मंगळसूत्र ; कपाळावर ठळक लाल कुंकू; कमी होती ती एका गजऱ्याची . त्यावेळी आम्ही जिल्ह्याच्या बाहेर नोकरीला होतो .घरापासून मार्केट थोडं लांबच .मी यांना म्हटलं , "मला तुमच्या हातून गजरा माळायचाय . तोही तुम्ही आणलेला .आणून द्या ना गजरा प्लीज ." " काय
ग , तुझा हा वेडेपणा ! बाईला पाठव, नाहीतर ड्रायव्हरला घेऊन स्वतः जा ." "अहो बाईने आणलेल्या गजऱ्याला ,
तुम्ही आणलेल्या गजऱ्याचा फील येईल का ? "गजरा हा गजराच राहणार . मी आणला काय नी , बाईने आणला काय .तुम्ही स्त्रियां कितीही शिकल्या तरी
वेड्याच . भावनांमध्ये गुंतलेल्या."त्यावर मी त्यांना
बोलले ,"माझी पहिली वटसावित्री . तुम्ही आणलेला गजरा, तुमच्या हाताने माळण्यात अविस्मरणीय होईल माझं पहिलं व्रत . वेगळाच आनंदही मिळेल .
तो आनंद दरवर्षी येणाऱ्या वटसावित्री व्रताला माझ्या मनी पिंगा घालेल ." त्यावर ते बोलले , "मूर्खपणा ! हे वेडेपण मला न परवडणार . " हे प्रत्युत्तर ऐकून त्या गजऱ्यात काय रस वाटणार ?


कोणालाही आवडेल असा आहे , तुझ्या जिजूंचा स्वभाव. शांत, नम्र . ते सर्वांशी प्रेमाने वागतात .सर्वांची काळजीही घेतात . तशीच माझी घेतात . कधी नवरा बायकोच्या नात्यात स्पेशल फील नको का वाटायला ?कधीतरी आपल्याला जोडीदाराने स्पेशल वागणूक
द्यावी . वाटतं गं कधीकधी . पती-पत्नीचे नातं भ बहरतं त्यानी .त्यातच स्त्री तिचं जगणं शोधत असते .अशा नात्यातच आनंदाचा दरवळ असतो .हे तुझ्या जिजूंना आजवर कळलंच नाही बघ . त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे वादाला कारण ;
वादानी संवाद संपतो .त्यापेक्षा त्यांना जसं जगणं आवडतं , तसं स्वीकारलेलं बरं .

पाठवणीच्या वेळी आईने मला एक कानमंत्र दिला होता .तोच पाळत आहे आजवर .
कोणता कानमंत्र ताई ?

" पती-पत्नीत घडावा नेहमीच
मतांची देवाणघेवाण करणारा संवाद
आपली मतं एकतर्फीपणे मांडणारा
टाळायलाच हवा वाद ."

नवऱ्याच्या रंगात रंगून आदर्श गृहिणी सारखा संसार करतेस ; म्हणून इतर मुलींना , नातेवाईक तुझं उदाहरण देतात .\"ज्या घरी दिलं त्या घराच्या रंगात रंगावं \" हा पुरुषप्रधान संस्कृतीचा आदर्शवाद . या आदर्शवादातून समाजमन तुझं मूल्यमापन करून तुला एक आदर्श पत्नी; आदर्श गृहिणी असा किताब बहाल करतं . तेव्हा तुझ्यात झालेल्या बदलाचं अन्य कारणही असू शकतं का ? हा प्रश्न आपल्या माहेरच्यानाही पडू नये .

जाऊ दे गं निशू स्त्रीयांच्या मनाला महत्त्वच नाही या पुरुषप्रधान समाजात .पुरुषांसारख्या बायकाही झाल्यास पुरुषी मानसिकतेच्या . त्यांच्याही मनावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा पक्का आहे ; म्हणूनच आनंदासाठी जगणाऱ्या स्त्रीला वाया गेलेली व स्वतःचा आनंद त्यागणारी स्त्री आदर्श . अशी लेबलं पुरुषांकडूनच नव्हे तर स्त्रियांकडून स्त्रियांनाच लावली जातात .


" स्त्रियांना समजून घेणं फार कठीण ".ह्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या नाऱ्याचा समाजमनावर इतका पगडा आहे ; की त्यामुळे स्त्रीला सुद्धा मन असतं . तिच्याही काही अपेक्षा असतात . हे जोडीदाराच्या मनातच येत नाही . स्त्रीला प्रत्येक गोष्टीत गृहीत धरलं जातं .

धनदौलत , दागदागिने याहीपेक्षा स्त्रीला हवा असतो तिच्या जोडीदाराचा सहवास .एखादा प्रेमाने आणलेला गजरा , त्यात जर का नवऱ्याने त्याच्या हाताने माळून दिला तर स्त्रीला स्वर्गीय सुख मिळतं . हे सांगूनही कळू नये नवऱ्याला . वरून म्हणतात कसे , "तुम्हा स्त्रियांना समजणच कठीण ! " हा डायलॉग म्हणजे , एक सबबच . पुरुषांना सारं कळतं फक्त समजून न समजल्याचा आव आणतात . त्यांचं जगणं त्यांच्या सोयीनुसार असतं . त्यांच्या सोयीने जगतात पुरुष . कळतं पण वळत नाही असं वागणं ह्या
पुरुषांचं .पुरुषांच्या ह्या स्वभावामुळे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या आणि त्यातच जगणं शोधणाऱ्या कित्येक स्त्रिया वरवर पाहता सुखी दिसत असल्या तरी आतून मात्र खिन्न असतात .

याचा अर्थ ताईडे, स्त्रीमन रहस्यमय असतं .
हे काही खरं नसतं . स्त्री मन समजून घेण्यासाठी गरज आहे ती पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा सैल होण्याची नाही का ?

हो गं नीशा अगदी खरं .

स्त्री मनाला समजून घेणे ,
अगदी सोपं व्हावं ...!
त्यासाठी पुरुषांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या ,
पगड्याला फक्त जरा सैल करावं...!!


श्वेताला शुभेच्छा देऊन निशा जीजूंच्या ऑफिसमध्ये गजरा घेऊन जाते .तो गजरा वाढदिवसाच्या दिवशी जीजूंनी तिच्या ताईला भेट द्यावा अशी कळकळची विनंती करते .

जीजू ,एक सांगायचं राहिलं, " प्लीज हा गजरा ताईच्या वेणीत तुमच्या हाताने माळायला विसरू
नका .मला माझी खळखळून असणारी ताई हवी . ती कमाल हा गजराचं करू शकतो ."


हो गं बाई . नक्की, घरी जाऊन श्वेताच्या वेणीत गजरा माळतो . तुमची ताईडी आज सुट्टीवर आहे
वाटते . हो जीजू ताईडी घरीच आहे तुम्ही जरा लवकर घरी जा ना आज . प्लीज ! ताईला फार आनंद होईल .

काय ग नीशा , तू पण तुझ्या ताईसारखीच भावनांच्या दुनियेत जगतेस की काय ?

जीजू , आम्ही स्त्रिया असतोच भावनिक .तो आमचा दोष नसून गुण आहे. तुम्ही पुरुषांनीही कधीकधी स्त्रियांच्या भावनांशी समानुभूती साधून , थोडं भावनिक होऊन , स्त्रीमनाला समजून घ्यायला काय हरकत आहे ? बाई , लेक्चर नको देवूस .

प्रणव घरी चोर पावलांनी येतो पाठमोऱ्या श्वेताच्या वेणीत हळूच प्रेमाने गजरा माळतो . तिला प्रेमाने मिठीत घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो .

श्वेताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात . चेहरा फुलासारखा टवटवीत , आनंदाने फुलून दिसतो . एक विलक्षण समाधान सुख प्रणवला श्वेताच्या चेहऱ्यावर दिसतं .

प्रणव श्वेताची माफी मागत म्हणतो , " तुझा गजऱ्याचा हट्ट आज कळला मला .हा गजरा म्हणजे तुझं खरं वैभव . तुझं जगणं . किती सोपं असतं ना स्त्रीला आनंदी ठेवणे . तिला समजून घेणे . मी वेडाच ! महामूर्ख ! कसं कळलं नाही मला . मी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही . श्वेता मला माफ कर ."

" उगीच म्हणतात लोक . स्त्रीला समजून घेणे फार कठीण असतं . अगदी खोटं आहे . पुरुषांनी थोडं समजून घेतलं की , स्त्रीच्या मनातलं जाणायला वेळ नाही लागत ." प्रणव बोलत असताना , श्वेता त्याच्या तोंडावर बोट ठेवते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात व प्रेमाच्या डोहात बुडून जातात .

अर्रर्र....तुम्ही इथे काय करताय ? संपली की
कथा . कबाब मे हड्डी मत बनो रे बाबा .

चला पटकन कथा आवडल्यास लाईक करा . न आवडल्यास माफ करा . स्त्रीला समजून घेणं खरचं कठीण असतं का हो ? या प्रश्नाचं उत्तर कमेंन्ट मध्ये
दयायला विसरू नका .


धन्यवाद !
©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे . अमरावती .

कथेचं नाव- गजरा
कॅटेगरी- राज्यस्तरीय लघुकथा
सब कॅटेगरी- स्त्रीला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो ?
टीम- अमरावती


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv Nita Kachave

Advocate

सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून एकविस वर्षे नोकरी करून स्वेच्छा सेवानिवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करते . मी लेखीका नाही परंतु शालेय जीवनापासून भावलेलं, रुजलेलं, अनुभवलेलं शब्दांत उतरवायचा एक छंद . वाचनाचा व्यासंग . शब्दांच्या दुनियेत रमायला आवडणारी मी एक शब्दवेडी .

//