गैरसमजाचा पडदा

It is the story of two sisters whose relation get spoiled by misunderstanding.

#गैरसमजाचा_पडदा 
©अर्चना बोरावके"मनस्वी
        फोन वाजत होता... निशाने पाहिले बाबांचा फोन...
" हॅलो निशा, मी घरून निघालो आहे... आपल्याला ताईला भेटायला जायचे आहे.... आज मी तुझं काहीही ऐकणार नाही... तुला माझ्याबरोबर यावेच लागेल..."
   इतकं बोलून त्यांनी फोन ठेवला. निशाला तिची नीताताई आजारी आहे हे कळले होते.... पण तरीही तिने अजून फोन केला नव्हता ... बाबा किती वेळा म्हणाले, " सगळे विसरून जा! "
   पण निशा पाच वर्षापूर्वीचा प्रसंग विसरायला तयार नव्हती....उन्हाळ्याच्या सुट्टीला दोघी बहिणी माहेरी आल्या होत्या. यावेळी आईची तब्येत जास्तच खालावलेली दिसली.... दम्याचा आजार खूपच बळावला होता...... दोघी लेकींना बघून मात्र मीनाताई खूप सुखावला होत्या.... दोघी मुली आपापल्या घरी सुखाने नांदताहेत याचं त्यांना खूप समाधान वाटत होतं. एके दिवशी रात्री जेवणे झाल्यावर सगळे बाहेर अंगणात बसले . टिपूर चांदणं पडलं होतं.... सगळ्यांनाच जुने दिवस आठवले.... मुली त्यांच्याजवळ होत्या तोपर्यंत अनेकदा त्यांची अशी रात्री मैफिल जमायची.... गप्पागोष्टी करत कितीतरी सुंदर रात्री त्यांनी एकत्र जागवल्या होत्या.... खूप आनंदी कुटुंब होतं त्यांचं! लोक म्हणायचे "दोन्ही मुलीच आहे म्हातारपणाला काठी नाही."  पण मीनाताई आणि सुरेशरावांना मुलाची कमी कधी वाटलीच नाही..... आपल्या दोन्हीही मुलींना त्यांनी काही कमी पडू दिले नाही..त्यांच्या जवळ खूप पैसा नव्हता... पण चांगले संस्कार आणि शिक्षण त्यांनी मुलींना दिले.... 
स्वतःची हौस-मौज बाजूला ठेवून मुलींसाठी जे जे करता येईल ते सर्व केले.... माफक पगारातही त्यांना आनंद मात्र भरभरून दिला. 
          आज खूप दिवसांनी सगळे असे एकत्र असण्याचा योग आला होता. मीनाताई बोलू लागल्या," नीता, निशा तुम्ही दोघी म्हणजे आमच्या जीव की प्राण आहात..... तुम्हाला बघून मी माझं दुखणंही विसरून गेले आहे.... पण बाळांनो कधी तरी हे दुखणं सहन होत नाही आणि वाटतं आता लवकर सुटका व्हावी यातून! तुम्हा दोघींवर माझा खूप जीव आहे... आपल्याकडे खूप मोठी संपत्ती कधीच नव्हती... आपलं एकमेकांवरील प्रेम हीच आपली खरी संपत्ती! आज हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे माझ्याकडे जे थोडेफार दागिने आहेत ते तुम्हा दोघींना माझी आठवण म्हणुन देण्याची मला खूप इच्छा आहे. "
    असं म्हणुन त्यांनी दागिन्यांचा डबा काढला... एकेक दागिना दाखवताना त्यांच्या डोळ्यांपुढे त्या दागिन्यांबरोबर  जोडलेल्या आठवणीही आपोआप उभ्या राहिल्या....काही दागिने त्यांच्या आईने दिलेले.. काही सासूने लग्नात दिले.... काही छोटे दागिने त्यांनी एक एक पैसा जोडून स्वतः खरेदी केलेले! ..... त्यांनी मोठ्या समाधानाने आपल्या दागिन्यांची दोघींमध्ये वाटणी केली. आणि विचारलेही," मला दोघींच्या आवडी निवडी माहीत आहेत... त्यानुसार दिले दोघींनाही दागिने.... तुम्हाला एकमेकींकडून काही बदलून घ्यायचे असतील तर घ्या हो!" 
      मोठी नीता म्हणाली, " आई, ते तुझे दागिने आहेत, तुझा आशिर्वाद समजून तू जे आम्हाला दिले तेच आम्ही ठेऊ.....सगळेच दागिने छान आहेत... हो ना निशा? "
     निशाने एकदा दागिन्यांवरुन नजर फिरवली.... खरं तर तिला आईने सगळे छोटे आणि वजनाने कमी असलेले दागिने दिले होते आणि नीताताईला  ठसठशीत वजनदार दागिने! तिला मनातून ही वाटणी आवडली नव्हती... पण ती काही बोलली नाही. नीताताईचा खुप राग मात्र आला.
   " ही आई बाबांची कायमच लाडकी होती... कायम तिचंच कौतुक! मी किती हट्टी आहे आणि ती किती समंजस, असं ते कायम बोलून दाखवायचे... अभ्यासात मी तिच्यापेक्षा जास्त हुशार होते पण तरीही आईला तिचंच कौतुक! 'ती  घरात किती मदत करते, ती कशी लहानपणी मला सांभाळायची, तिच्या खेळणी मला देऊन टाकायची... तिचा खाऊ माझ्यासाठी ठेवायची.... कधी कसलाही हट्ट करायची नाही..... माझी कॉलेजची फी कशी नोकरी करून भरली... हे सर्व कायम ऐकून ऐकून निशाला आधीही  नीताताईचा खुप राग यायचा... नातेवाईकांमधेही तीच सर्वाची लाडकी होती....सगळे कायम म्हणायचे, " तुमची नीता म्हणजे लाखात एक आहे, अशी गुणी मुलगी तुमच्या पोटी जन्माला आली हे तुमचे भाग्यच! ..... सगळीकडे तिचेच कौतुक! तीच लाडकी म्हणुन आईने दागिन्यांमध्येही भेदभाव केला.... जास्त सोने तिला आणि कमी मला! मला काही सोन्याचा सोस नाही, पण हा भेदभाव का? " आधीच बहिणीबद्दल असणारी अढी अजूनच वाढली.... पण आईसाठी ती गप्प बसली.......
           काही दिवसातच आई गेली. ते दहा दिवस ती माहेरी राहिली... पण नीताताईशी एक अक्षरही चांगलं बोलली नाही.... उगाचच काहीतरी कारणावरून तिला लागेल असं बोलायची. बहिणीबद्दलचा राग वाढत गेला आणि दुरावाही! जाताना बाबा दोघींना आईच्या नव्या साड्या घेऊन जा म्हणत होते.....तेव्हा निशाचा संयम सुटला आणि ती म्हणाली, " तुम्हाला काय द्यायचे ते तुमच्या लाडक्या लेकीला द्या....मला आता काहीही नको."
      नंतर तिने परत बहिणीला फोनही केला नाही आणि भेटलीही नाही. बाबांनी किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला... पण तिच्या डोक्यातला राग काही गेला नाही.
            
      
      बाबा आले. निशाचे आवरलेले नाही असं बघून रागाने तिला म्हणाले," तुझी इच्छा नसली तरी या म्हातार्‍याची आज्ञा म्हणुन तुला आज यायचेच आहे.... एकदा चल. हवं तर तुझ्या गेलेल्या आईची इच्छा समजून चल..."
         नाईलाजाने निशा निघाली. गाडीत बसल्यावर तिच्या मनात त्या सर्व पूर्वीच्या गोष्टी येत होत्या..... तिला कायम दुय्यम वागणूक मिळाली होती. शेवटी त्या शांततेचा भंग बाबांनी केलाच
" निशा , अगं मोठी बहीण आहे तुझी ती! तुला तिच्याबद्दल जराही प्रेम वाटत नाही? आम्हाला वाटत होतं... आम्ही मुलींना चांगले संस्कार दिले, त्यांना इतर कशाही पेक्षा, प्रेम आणि आपुलकीची संपत्ती आम्ही जास्त दिली.... पण आता वाटतंय काही तरी चुकलंच आमचं....."
          " बाबा, हो! चुकलंच तुमचं, तुम्ही कायम आमच्या दोघीत भेदभाव केला....तिच्यावर जास्त प्रेम केलं, तिचंच कौतुक असायचं तुम्हाला कायम... माझ्या मनाचा कधी विचार केला का? "
       " अगं, काय बोलते तू? दोघी मुली आम्हाला सारख्याच! .... उलट तुझेच हट्ट आम्ही जास्त पुरवले....तुझेच लाड जास्त केले.... कायमच सगळं तुझ्या मनासारखं केलं.... "
        " हो! म्हणून तर आईचे सगळे चांगले, वजनदार दागिने तिला आणि छोटे, हलके दागिने  मला! "
      " निशा, अगं ते जुन्या पद्धतीचे, तुझ्या आजीचे दागिने तुला आवडणार नाही असं तुझ्या आईला वाटलं... तू इंजिनीअर! नोकरीच्या ठिकाणी तू नेहमी, छोटे आणि नाजूक दागिने घालते त्यामुळे आम्ही नंतर केलेले नवे दागिने तुला दिले.... तू हे काय डोक्यात घेऊन बसली बाळा? "
          " पण तुम्ही मला विचारलं का नाही? जास्त वजनाचे दागिने तिलाच मिळाले ना! "
" आम्ही तिला सुद्धा कुठे विचारलं? आणि नंतर तू का बोलली नाही याबद्दल? "
" तुमच्या लाडक्या लेकीने आईला सांगितले ना, आम्हाला काही अडचण नाही या वाटणीत.... माझ्या मताला कुठे किंमत होती? "
     " किती मोठा राग घेऊन बसली आहे तू अजूनही.....लहानपणापासून नीताने तुझा किती लाड केला..... तुझे सगळे हट्ट पुरवता यावे म्हणुन स्वतः किती तरी गोष्टींचा त्याग केला. शिक्षिकेची नोकरी करून तुझी फी भरली.. "
    " कोणी सांगितलं होतं माझी फी भरायला? तिलाच मोठेपणा हवा होता... "
  " तुझे गवर्नमेंट कॉलेजचे अ‍ॅडमिशन थोड्या मार्कांवरून गेले.... पण तुझा हट्ट, तुला इंजीनियरच व्हायचे होते..... खाजगी कॉलेजची फी कशी भरायची? तुझी आई तेव्हा तिचे दागिने विकायला निघाली होती..... पण नीता म्हणाली, " आई तू दागिने विकू नको, पुढे काही अडचण आली तर ते हक्काचं स्त्रीधन हातात राहू दे.... माझे काही साठवलेले पैसे आहेत आणि माझा पगारही आजपासून निशासाठी!...... चार वर्ष कशीही निघून जातील ...."
   त्या वेळी तिला कितीतरी चांगली स्थळं सांगून येत होती..... पण तुझ्यासाठी तिने सर्वांना नकार दिला....तुझं शिक्षण झाल्यावरच लग्न करणार असे तिने ठरवले.... आणि बोलल्याप्रमाणे करुन दाखवले... नोकरी करून आणि शिकवण्या घेऊन तिने पै-पै जमा केली.... तुझं इंजिनीअर बनण्याचं स्वप्न फक्त तिच्यामुळे पूर्ण होऊ शकलं.... किती मोठा त्याग केला तिने...... तोपर्यंत तीचं लग्नाचं वय वाढलं, त्यात आधी अनेक स्थळांना नकार दिल्याने आता चांगली स्थळे सांगून येत नव्हती...... शेवटी इथेही तिने पडती बाजू घेतली.... आमच्या समाधानासाठी आणि आमची चिंता मिटविण्यासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालून खेड्यात राहणार्‍या स्थळाला पसंती दिली....... कारण त्यांना तिची 'हुंडा देणार नाही' ही अट मान्य होती.... लग्नातही कशाचा हट्ट केला नाही..... जे आम्ही दिलं त्यात समाधानी राहिली...... तुला या गोष्टी कळू देऊ नये, नाहीतर तुला कायम वाईट वाटत राहील असं म्हणुन आम्हाला कधी हे तुला सांगूही दिलं नाही......पण आता वेळ आली आहे, तुला हे सर्व कळायला हवं, तुझ्या ताईला, आपल्या नीताला कॅन्सर झाला आहे..... ती हॉस्पिटलमध्ये आहे.....  तुला भेटण्यासाठी तिचा जीव रोज तुटतो आहे..... म्हणुन मला आज हे पाऊल उचलावं लागलं.... "
    बाबांचं हे बोलण ऐकून निशाच्या डोळ्यापुढचा  गैरसमजाचा पडदा एका क्षणात दूर झाला..... पश्चाताप तिच्या डोळ्यांतून ओघळू लागला..... स्वार्थीपणाने विचार केल्याबद्दल तिला स्वतःचीच लाज वाटू लागली..... एवढ्याशा दागिन्यांवरुन आपल्या लाखमोलाच्या बहिणीशी नाराज होऊन बसली होती.... पाच वर्ष ती ताईबरोबर बोलली नव्हती. पण आता, कधी एकदा तिला भेटेल असं तिला होऊन गेलं..... हॉस्पिटल येईपर्यंतही ती आता थांबू शकत नव्हती.....
                 हॉस्पिटलच्या रूमचं दार उघडून ती आत गेली..... अनेक उपकरणांनी घेरलेल्या आणि खंगून गेलेल्या आपल्या ताईला बघून तिला गलबलून आलं..... ती ओक्साबोक्शी रडू लागली. नीताताईच्या डोळ्यातही अश्रूंची गर्दी झाली.... कितीतरी वेळ त्या एकमेकींकडे बघत अश्रू ढाळत बसल्या.... शब्दांपेक्षा एकमेकींचा स्पर्श सगळं बोलून जात होता..... मोठ्या बहिणीचा प्रेमळ स्पर्श होताच, आपण इतके दिवस कशाला मुकलो हे निशाच्या लक्षात आले...... आईप्रमाणे माया करणार्‍या बहिणीला ओळखायला ती चुकली याचं तिला खूप वाईट वाटत होतं.... आज तिला वाटत होतं हा मधला काळ तिच्या आयुष्यातून कुणीतरी पुसून टाकावा.... पुढे निघून गेलेले घड्याळाचे काटे मागे फिरवता आले तर किती बरं होईल...... आई गेल्यावर खरं तर मी ताईबरोबर  मिळून बाबांना साथ द्यायला हवी होती.... आईचे संस्कार जपत प्रेमाने ताईसाठी उभे राहायला हवे होते, तीचं दुःख वाटून घ्यायला हवं होतं..... पण स्वार्थीपणाने मी किती मोठी चूक केली.... माझ्या ताईच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं आणि मी स्वतःचा अहंकार कुरवाळत बसले.... बाबांचेही ऐकले नाही......  पश्चातापाने तिला स्वतःची घृणा वाटू लागली....ही चूक सुधारता येण्यासारखी नाही, हे जरी खरे असले तरी , त्या चुकीचे प्रायश्चित्त घेण्याची हीच वेळ आहे हेही तिला जाणवले.... तिने ताई आणि बाबांची मनापासून क्षमा मागितली..... बाबांना म्हणाली, 
             " बाबा, ताईच्या उपचाराची सर्व जबाबदारी आता माझी..... अगदी उपचारासाठी परदेशात जाण्याची वेळ आली तरी मी ते करणार! भूतकाळ पुसून टाकून, येणारा पुढचा काळ माझ्या ताईबरोबर  मला जगायचा आहे...... मी केलेल्या चुका मला सुधारायच्या आहेत.....गेली पाच वर्ष मी, जी दरी आम्हा दोघींत उभी केली होती ती, मी भरून काढणार आहे.... ताईसाठी आता मी आकाश-पाताळही एक करीन! .... "
         दोघी मुलींना परत एकत्र बघून सुरेशरावांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू उभे राहिले..... शेवटी निशाला तिची चूक कळली ....आता नीता बरी होईल याची त्यांना खात्री पटली.... पण जो मधला काळ होता तो खरंच पुसून टाकता येणं शक्य होतं का? कधी कधी क्षुल्लक गोष्टींची अढी आपण मनात धरून बसतो, आणि जीवनाचे अनमोल क्षण हातातून वाळूसारखे निसटून जातात, ते परत मिळवणं खूप अवघड होऊन बसतं.... तरीही त्यांना आता वाटत होतं, तो भूतकाळ खरंच पुसता यावा.... त्याच आशेवर ते एकमेकींच्या मिठीत सामावलेल्या आपल्या लेकींकडे बघत राहिले.
©अर्चना बोरावके"मनस्वी"
आवडल्यास कृपया नावासहच शेअर करा.