गहिवरला श्वास तू - भाग 1

प्रेमपलीकडे काहीतरी...

"तुझी ती सावी कुठे असते रे आता? काय करते ती?"

तिच्या या प्रश्नाने तो एकदम चमकलाच. 15 वर्षे संसार केल्यानंतर आपल्या बायकोला सावी आठवावी? कशासाठी?

"मला नाही माहीत.."

नजर चुकवत त्याने उत्तर दिलं. गार्गी हसली, आणि म्हणाली..

"अरे इतकं काय लाजतोय"

"मी कुठे लाजतोय...आणि गार्गी प्लिज, पुन्हा कशाला तो विषय काढतेस? याच सावी वरून आपलं भांडण झालेलं लग्नानंतर.. विसरलीस का?"

"अरे तेव्हा गोष्ट वेगळी होती, नवीन नवीन लग्न झालेलं आपलं..त्यात तू मला आणि मी तुला आपल्या आधीच्या नात्यांबद्दल सगळं सांगितलं होतं..तेव्हा मॅच्युरिटी नसते रे.."

"मग आता जास्त उतू चाललीये का मॅच्युरिटी?"

"तू पण ना श्रीधर...मी गमतीने विचारतेय आणि तू मात्र.."

"बरं काय विचारत होतीस? सावी ना? नाही माहीत मला ती काय करते.."

"खोटं बोलू नकोस, तुझ्या इन्स्टग्राम हिस्ट्री मध्ये तिचं नाव कायम सर्च बॉक्स मध्ये दिसतं.."

आता मात्र त्याला घाम फुटला...

"माझा फोन चेक करतेस तू?"

"ते महत्वाचं नाही, पण तू तिची खबर ठेवतो, खरंय ना?"

तो मौन होता..

"अरे मी पण सौरभची प्रोफाइल बघते अधूनमधून.."

ती असं बोलल्यावर त्याने तिच्याकडे डोळे विस्फारून पाहिले...

दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागले..

गार्गी आणि श्रीधर, सुखी आणि समाधानी जोडपं. संसारात बरेच उन्हाळे पावसाळे बघून स्थिरस्थावर झालेले. मुलं मोठी झालेली, त्यांच्या त्यांच्या विश्वात रममाण झालेली. आता घरात ही दोघेच. हाताशी बऱ्यापैकी पैसा असायचा आणि हाताशी वेळ. ती घरीच असायची आणि त्याचा 9 ते 5 जॉब. घरी आल्यानंतर वेळ कसा घालवावा हा प्रश्न असायचा. गार्गी आणि श्रीधर जेव्हा त्यांच्या एकत्र कुटुंबात होते तेव्हा वेळ मिळता मिळत नसे त्यांना. घरातल्या जबाबदाऱ्या, आई वडिलांचं एकेक दुखणं काढत धावपळीत जीवन जात होतं. एकामागून एक आई वडील गेले आणि हळूहळू दोघेही दुसऱ्या शहरात स्थिरस्थावर झाले. मागचा राहिलेला सगळा आनंद त्यांना आता अनुभवायचा होता. राहिलेले सगळे स्वप्न आता पूर्ण करायचे होते.

दुसऱ्या शहरात आल्यावर दोघांनी मेहनतीने स्वतःचं घर घेतलं, गाडी घेतली..आणि पुरेल एवढी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. हाताशी पैसे असायचे, त्यामुळे दोघेही विकेंडला फिरून यायचे, एखाद्या वेळी फॉरेन ट्रिप करायचे. सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हायचे, छानपैकी फोटो काढायचे, मनसोक्त सोशल मीडिया वापरायचे.

त्यांचं आयुष्य इतकं सुखात चाललेलं की आता या सुखाचाही त्यांना वीट आलेला. आयुष्यात काहीतरी ऍक्शन drama हवा असं गार्गीला आणि हळूहळू श्रीधरलाही वाटू लागलं.

म्हणूनच गार्गीने हा विषय काढला. त्यांची जुनी नाती, ही नाती त्यांनी स्वतः पुरतीच मर्यादित ठेवलेली. एकमेकांशी ते सगळं शेयर करायचे पण ह्या नाजूक गोष्टी एकमेकांना कश्या सांगणार? तिनेच हिम्मत करून हा विषय काढला. ती त्याला म्हणाली,

"हे बघ श्रीधर, आपण वयाच्या अश्या टप्प्यावर आहोत की आपल्याला आपण स्वतः सुदधा वेगळं करू शकणार नाही. आपली जुनी नाती आपण किती काळ मनात घोळवत बसणार? चल, आज आपण तेही विषय एकमेकांना सांगूंयात...अगदी निःसंकोचपणे. मनात कुठलीही सल न बाळगता एक मित्र म्हणून आपण नक्कीच मन मोकळं करू शकतो, हो ना?"

श्रीधरला ते पटलं. कारण तेवढीच एक गोष्ट होती जी मनात सतत खदखदत असायची.

"तू आधी मोकळं होतोस की मी होऊ?"

"तूच सांग चल..."

गार्गीनेच सुरवात केली.

सौरभ आणि मी. आमची ओळख बसमध्ये झाली होती. नेहमीप्रमाणे कॉलेजला जातांना मी बसमध्ये चढले. मी खूप घाईत होते. कंडक्टर जेव्हा पैसे मागायला आला तेव्हा माझ्या लक्षात आलेलं की मी माझी पर्स विसरले. मनात नको नको ते येऊ लागलं, कंडक्टरने मला बसमधून अपमान करत उतरवलं तर? मला कॉलेजला उशीर झाला तर? कंडक्टर जवळ आला, तो दिसायला आधीच फार भयंकर होता आणि त्याच्या भारदस्त आवाजात त्याने म्हटलं.." तिकीट.."

मी घामाघूम झाले, तेवढ्यात मागून एक हात आला..

"हे घ्या.."

सौरभ तिथे होता, त्याने चटकन पैसे पुढे केले. मला कळेना याने असं का केलं. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो फक्त हसत होता. मी त्याच्या त्या सुंदर हसण्याकडे आणि त्याच्याकडे बघतच राहिले. कसला दिसायचा तो, बसमध्ये चढला की अर्धी लोकं त्याच्याकडे बघत. उंचापुरा, सावळा रंग, धारधार नाक आणि तरतरीत नाक. अंगात भारीतले कपडे आणि डोक्यावर गॉगल. अगदी हिरोच होता तो. पाहताक्षणी प्रेमात पडले त्याच्या...

क्रमशः


🎭 Series Post

View all