गहिवरला श्वास तू- 3

नियतीचा खेळ
"काय बोलताय.."

"खरं तेच, एकदा भेट त्याला..नाही म्हटलं तरी एकेकाळी प्रेम होतं तुमचं, खुशाली विचारायला भेटायला काय हरकत आहे?"

"आयडिया तशी वाईट नाही...पण त्याचाही संसार आहे, असं या वयात त्याला भेटणं चांगलं दिसेल का?"

"का नाही? भेटणं म्हणजे गुन्हा नाही..हवं तर बाकीची सेटिंग मी करतो.."

सौरभला पुन्हा भेटण्याचा विषय आला तेव्हा मला काही भावना उरल्या नाहीत असं जरी तिने दाखवलं असलं तरी आतून भेटीची सुप्त ओढ होतीच. कदाचित लांब गेल्यावर माणूस जास्त आठवतो हेच खरं...!

माझं बघू नंतर, तुमची कथा सांगा..सावी आणि तुमची भेट कॉलेजमध्ये झालेली, चार वर्षे तुम्ही सोबत होतात एवढं माहितीये मला..

"सावी कॉलेजमधली सर्वात सुंदर मुलगी, आणि मी कॉलेजचा जी 2. दोघांकडे एकमेकांकडे खेचली जाण्याची कारण होती. तिला बघून इतर मुलं वेडी व्हायची आणि ती माझ्याकडे बघायची. Power कपल होतो आम्ही. सगळे आमच्याकडे बघतच राहायचे. तिला अनेकदा घरी आई वडिलांना भेटवलं होतं मी. आईला तर ती फार आवडायची.."

"अच्छा म्हणून सासूबाई माझा काट करत होय.."

"अगदी ती सून म्हणून आली असती तर तिचाही केला असता, आईचा स्वभाव होता तो.."

"अहो गम्मत केली.."

"बरं..".

"तुम्हीच का नाही भेटत तुमच्या सावीला?"

"हा हा हा...एवढं सोपं आहे का?"

"मी करेन की सोपं.."

"अगं ती दुसऱ्या शहरात, दोन मुलं, नवरा पोलिसात...माझी हिम्मत तरी होईल का??"

"म्हणजे हिम्मत करण्याची ईच्छा तरी आहे मनात, हो ना?"

यावेळी मात्र बायको गंभीरपणे विचारतेय की गमतीने याने श्रीधर बुचकळ्यात पडला. गार्गी टाळी वाजवत हसू लागली तेव्हा तिच्या जीवात जीव आला.

दोघेही नवरा बायको गप्पांमध्ये इतके रंगले की सायंकाळचे 8 केव्हा वाजले कळलंच नाही.

"अरे बापरे, 8 वाजले, अजून स्वयंपाक बाकिये..दोन्ही मुलं गेलेत पार्टीला, आपणच दोघे आहोत..चला पटकन बनवते काहीतरी, नाहीतर तुमची सावी म्हणायची, मी असते तर नवऱ्याला असं उपाशी ठेवलं नसतं."

"हो का? तुझा सौरभही म्हटला असता, बायकोला स्वयंपाकघरात जुंपलं नसतं, राणीसारखं ठेवलं असतं.."

दोघेही खळखळून हसत होते, एकमेकांना चिडवत होते. जेवण झाल्यावर दोघेही फिरायला गेले. फिरताना बागेत काही नवीन लग्न झालेली जोडपी लाजत होती. त्यांना बघून यांना हसू आलं,

"बघा, कशी लाजताय.."

"हो ना, यांना सांगा कुणीतरी, संसाराला सुरवात झाली की ती दुर्गावतार आणि तो रुद्रावतार घेईल म्हणून.."

"आपणही असेच बसायचो ना? तुम्ही एकदा मला बागेतील फुल आणून दिलं होतं, मिळालं नव्हतं चांगलं म्हणून धोतऱ्याचं आणून दिलं.."

तो आठवू लागला, पण काही आठवेना..

"मी? नाही गं... मला आठवत नाही.."

तिने डोक्यावर हात मारला..

"अगं गल्लत केलीस तू...तुझ्या सौरभने केलं असेल असं..धोतऱ्याचं फुल??? हा हा हा, असा कसा गं वेंधळा हा.."

तो पोट धरून हसू लागला, ती गार्गी ओशाळली...

आपल्या जुन्या आठवणींना ताजं करून दोन मित्र थट्टामस्करी करत फिरत होते. रात्री झोपताना दोघेही पाठ करून स्वतःशीच संवाद करू लागले. यावेळी गार्गी सावीची आणि श्रीधर सौरभची सोशल मीडिया प्रोफाइल चाळत होते. सावीकडे बघून गार्गीला वाटलं, इतकी सुंदर मुलगी असूनही हिला विसरून याने माझ्याशी प्रामाणिकपणे संसार केला..त्यालाही वाटलं, सौरभच्या इतक्या गर्भश्रीमंत घरात जाऊ शकत असताना काटकसरीने हिने माझा संसार सांभाळला...

तिने इतक्यात तिचा एक फोटो पाहिला, पुण्यातला होता. तिने तारीख बघितली आणि तिच्या लक्षात आलं की सावी तर याच शहरात आहे? दोघांची भेट घडवून आणली तर??

क्रमशः


🎭 Series Post

View all