गार्गीच्या मनात रात्रभर विचार घोळत होते, सावी पुण्यातच आहे मग श्रीधरने तिला भेटायला हवं. श्रीधर आपल्या संसाराशी प्रामाणिक होता, वाटत असलं तरी तो तिच्याशी संपर्क करत नव्हता. कदाचित उद्या आपला पाय घसरला तर संसार चव्हाट्यावर येईल याची त्याला कल्पना होती. त्याचा स्वभाव गार्गी सोडून दुसरं कोणाला माहीत होता?
दुसऱ्या बाजूने ती विचार करत होती, सावीवर श्रीधरने एकेकाळी खूप प्रेम केलं होतं. तिच्या गोड आठवणी तो आयुष्यभर जपत असेल. जर श्रीधरने आयुष्यभर मला जपलं तर मी त्याच्या आठवणींना एक उजाळा द्यायला मदत का करू नये? आयुष्याच्या या टप्प्यावर पाय घसरण्याचा किंवा मन बदलण्याचा तसूभरही चान्स नव्हता, इतकं प्रेम आणि विश्वास त्यांच्या नात्यात निर्माण झालेलं, आणि या विश्वासाची पुढची पायरी म्हणजे ते एकमेकांचे घट्ट मित्र बनले होते. एकमेकांपासून काहीही न लपवणे हे तर नवरा बायको म्हणून ते करतच आलेले पण आता मित्र बनताना मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलेले क्षणही एकमेकांशी वाटून घेण्यात त्यांना रस वाटत होता.
गार्गीने ठरवलं, दोघांची भेट घडवून आणायची. दुसऱ्या दिवशी सकाळी अंथरुणात ती उठून बसली. श्रीधर अजूनही झोपेतच होता. त्याला कधी एकदा सांगते असं त्याला झालं, ती तो उठायची वाट बघू लागली. त्याला जाग येताच ती म्हणाली,
"अरे सावी पुण्यातच आहे"
सकाळी सकाळी तिचं हे वाक्य कानावर पडताच तो ताडकन उठून बसला. जे काही ऐकलं त्याचं आकलन करण्यात काही क्षण गेले. तो म्हणाला,
"मग??"
"मग काय, भेट तिला.."
तो काहीही न बोलता उठून फ्रेश व्हायला गेला. बाहेर आला तर गार्गी तिथेच होती.
"काय हरकत आहे रे??"
"हरकत आहे...बोलायला सगळं चांगलं वाटत असलं तरी याला व्यभिचार म्हणतात"
हे ऐकताच गार्गी हसायला लागली,
"फार मोठमोठे शब्द वापरतोस रे तू, अरे व्यभिचार म्हणजे बायकोला फसवून दुसरीकडे चालवलेले चाळे.. इथे तुझी बायको स्वतः तुला म्हणतेय की सावीला भेट म्हणून. तू आपली मर्यादा सांभाळून राहशील याची मला खात्री आहेच पण तुझ्या आठवणींना मी एक गोड किनार दिली तर मलाही एक समाधान मिळेल"
श्रीधर काहीही न बोलता आपल्या कामाला निघून गेला. इकडे गार्गी सोशल मीडियावर सावीची माहिती मिळवत राहिली. तिच्या प्रोफाइल वर एक कॉमन फ्रेंड तिला दिसली. कविता म्हात्रे नावाची. कविता गार्गीची शाळेतली मैत्रीण. गार्गीने तिला मेसेज करून सावी बद्दल विचारले.
"सावी? माझी क्लाएंट आहे. माझं सलून आहे तिथे ती येत असते कायम.."
"इतक्यात येणार आहे का?"
"हो म्हणजे तिने आज संध्याकाळी अपॉइंटमेंट घेतली आहे.."
"कितीही?"
"7 ची..पण का गं?"
"काही नाही, काम होतं तिच्याकडे"
"बरं.."
चला, सावी कधी आणि कुठे भेटू शकेल याची एक माहिती मिळाली होती. गार्गीला वाटलं श्रीधर तर नाही म्हणतोय पण त्यांची योगायोगाने भेट झाली तर? आपणच हा योग जुळवून आणला तर?
तसं पाहिलं तर कुठलीही साधारण बाई हे असलं काम करणार नाही, पण गार्गी आणि श्रीधरचं आयुष्य इतकं कंटाळवानं झालेलं की किमान तिला तरी आयुष्यात काहीतरी ऍक्शन ड्रामा हवा होता. त्यासाठी हा खटाटोप.
तिने श्रीधरला फोन केला,
"श्रीधर, मी संध्याकाळी 7 वाजता एका मैत्रिणीच्या सलूनमध्ये जाणार आहे, मला घ्यायला ये.."
"तू कधीपासून जायला लागलीस?"
"आजपासून.."
श्रीधर तयार झाला, संध्याकाळी आपलं ऑफिस झाल्यानंतर तो सलूनमध्ये गेला. त्याने गार्गीला फोन केला, गार्गीने मुद्दाम उचलला नाही. त्याला वाटलं की आत असेल अजून थोडी वाट पाहूया म्हणून तो बाहेर बसला. काही वेळाने एक स्त्री बाहेर आली. पांढराशुभ्र ड्रेस, नव्याने केलेला हेयरकट आणि अंगाने थोडी भरलेली अशी सावी त्याला दिसली. दोघांची नजरानजर झाली आणि श्रीधर उठून उभा राहिला. त्याने गार्गीला फोन केला, गार्गीने मुद्दाम उचलला नाही. त्याला वाटलं की आत असेल अजून थोडी वाट पाहूया म्हणून तो बाहेर बसला. काही वेळाने एक स्त्री बाहेर आली. पांढराशुभ्र ड्रेस, नव्याने केलेला हेयरकट आणि अंगाने थोडी भरलेली अशी सावी त्याला दिसली. दोघांची नजरानजर झाली आणि श्रीधर उठून उभा राहिला.
"श्रीधर तू?"
"हो...म..माझी बायको आलीये इथे..आत आहे, येईलच.."
"आत तर कुणी नाहीये.."
तो पटकन गार्गीला सावी समोरच फोन लावतो,
"काय गं कुठेस?"
"अहो माझं लवकर आटोपलं म्हणून मी आले निघून, तुम्ही या लगेच घरी"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा