गहिवरला श्वास तू 10

नवरा बायको अन विश्वास

सावी तावातावाने तिथुन निघून गेली, त्या बायका म्हणाल्या,

"काय बाई आहे ही...पण श्रीधर भाऊजी, मानलं हो तुम्हाला.."

सर्वजण गेल्यावर श्रीधरने दरवाजा लावून घेतला..दाराची बेल बंद करून ठेवली..आणि सावीच्या या वागण्यावर चिडतच झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी श्रीधर उठला आणि गार्गीला आणायला गेला. गार्गी आजारीच होती, तिला आधी दवाखान्यात नेलं आणि मग घरी आणलं. तिचा हात धरून आणताना सावी खिडकीतून बघत होती आणि तिच्या डोळ्यातून संतापात पाणी वाहत होतं.

गार्गी घरी आली, श्रीधरने तिला पाणी दिलं.. आणि आराम करायला सांगितला..तिने श्रीधरचा हात पकडला आणि म्हणाली,

"तुला काहीतरी सांगायचं आहे.."

"तुला कदाचित ऐकून राग येईल पण त्या दिवशी.."

"सौरभ तुझ्या खोलीवर आलेला, हेच ना?"

"तुला समजलं होतं फोनवरून, मग मला पुढे काय झालं विचारलं का नाहीस?"

तो फक्त हसला,

"तू विचारणार नसशील तर मी सांगते.. तो खोलीत आला आणि माझ्याशी बोलू पाहत होता..मी पटकन माझ्या मैत्रिणीला मेसेज केला आणि बोलावून घेतलं..ती खोलीत आली आणि सौरभने तिथून काढता पाय घेतला...कसं वाटतं ते? खोलीत मी एकटी आणि हा सौरभ खोलीत येतो.."

"बरं मग.."

"मग काय..तुला जराही संशय नाही आला आमच्यावर?"

"नाही,मी ओळखतो तुला..तू त्याला काही न काही राजकारण करून हाकललं असणार हे माहितीये मला.."

गार्गीने कौतुकाने त्याच्या पाठीवर मारलं,

"त्या सावीने काय उद्योग केलेला समजला ना?"

"हो मी फोनवर ऐकलं सगळं.."

"ती इकडे आलीये समजल्यावर तुला संशय नाही आला?"

"नाही, मला माहित होतं माझा नवरा काही न काही उद्योग करून तिला पळवून लावेल म्हणून.."

दोघेही हसायला लागले,

आज त्या नवरा बायकोने, त्यांच्या अपपसातल्या विश्वासाने नियतीच्या खेळालाही हरवलं होतं...

दुसऱ्या दिवशी सावी आणि गार्गीची नजरानजर झाली..सावीचा नवरा नुकताच आलेला आणि तिच्या हाताकडे बघून म्हटला..

"काय झालं गं??"

"काही नाही.." असं म्हणत तिने हात झटकला..तिचा नवरा आत निघून गेला...

गार्गी सावीला म्हणाली,

"तू चॅलेंज हरलीस याबद्दल तुला काही बोलणार नाही मी..पण एक सांगते, नवरा बायकोत विश्वास असला ना की जगातील कुठलीही गोष्ट त्यांना एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही...प्रेम हे नशिबाने मिळतं.. पण दैव देतं आणि कर्म नेतं असं माणूस वागायला लागला तर कायमचा एकटा पडतो.."

गार्गी सावीच्या नवऱ्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत म्हणाली...

समाप्त

🎭 Series Post

View all