गहिवरला श्वास तू 5

नवरा बायको अन विश्वास

श्रीधर घरी जायला निघाला तोच सावीने त्याला थांबवलं,

"बोल की जरा 2 मिनिट.."

"घरी बायको वाट पाहतेय.."

बायको शब्द ऐकताच सावीच्या मनात खळबळ माजली, तिला कुठेतरी ते लागलं, ती म्हणाली,

"वाट तर मीही बघत होते.."

हे ऐकून श्रीधरचे पाय थबकले. तिने सहज म्हटलं,

"कॉफी घेऊ"

श्रीधरचं मन नको म्हणत होते, पण सावीच्या आग्रहापुढे त्याचं काही चाललं नाही. दोघेही कॉफी शॉपमध्ये गेले, तो तिच्याशी नजर मिळवायला कचरत होता.

"मग, कसं चाललंय तुझं?"

त्याने वर तिच्या डोळ्यात पाहिलं. आधीसारखंच प्रेम दिसत होतं. त्याला जुने दिवस आठवले, तिच्या डोळ्यातूनच ती बरंच काही बोलून जायची. तिचे सर्व भाव त्याला समजायचे. ती भावुक व्हायची तेव्हा तिचे डोळे अर्धवट झुकलेले असायचे, आनंदी असायची तेव्हा डोळ्यांची उघडझाप वेगाने करायची. सगळं सगळं त्याला दिसत होतं. आज तिचे डोळे अर्धवट झुकलेले होते.

तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून तो म्हणाला,

"माझं ठीक चाललंय, तुझं सांग.."

एवढ्यात कॉफी समोर आली. ती विचारात हरवली होती,

"अगं कॉफी तर घे.."

दोघांनी कॉफीचा कप तोंडाशी नेला. त्याने पुन्हा विचारलं,

"तू सांगितलं नाहीस, कसं चाललंय तुझं.."

तिला आता सहन होईना, ती रडायलाच लागली. तो घाबरला, काय झालं हिला अचानक?

तिने आवंढा गिळला आणि म्हणाली,

"नरक बनवून ठेवलंय माझं आयुष्य त्याने.."

"नक्की काय झालंय?"

"मला माणूस म्हणून नाही तर एक शोभेची वस्तू म्हणून तो सोबत घेऊन गेला. माझ्या फक्त दिसण्याला त्याने पसंत केलं आणि मला अमेरिकेत नेलं. तिथे त्याच्या बरोबरीच्या लोकांसमोर मी सुंदरच दिसले पाहिजे म्हणून त्याचा खटाटोप असायचा, जराही वजन वाढलेलं, चेहऱ्यावर पिंपल चालत नसायचे त्याला. महागड्या ट्रीटमेंट आणि सर्जरीसाठीही तो तयार असायचा. पार्टीत कुणी सुंदर मुलगी दिसली की मी तिच्यासारखी दिसावी म्हणून मला नको ते उपाय करायला सांगायचा. मला आई व्हायचं होतं, पण आई झाल्यावर शरीराची ठेवण बदलेल म्हणून त्यालाही तो टाळतोय... मी कसं जगतेय माझं मला माहित.."

हे ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. पण तो मर्यादेत होता, आधीसारखं तिला जवळ घेऊन तिला धीर देणं त्याला शक्य नव्हतं पण शब्दाने तो तिला धीर देऊ बघत होता.

"सावी, यातून मार्ग काढ.. तू धीराची आहेस, अशी निराश होऊ नकोस.."

सावीला अश्या मिळमिळीत धीराची अपेक्षा नव्हती, तिला वाटत होतं त्याने आधीसारखं तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवावा. आज त्याने दुरूनच सांत्वन केले त्याचं तिला जास्त दुःखं झालं. आपण आयुष्यात काय गमावलं आहे याची जाणीव झाली.

एवढं बोलून श्रीधर तिथून उठला. घरी गार्गी त्याची वाटच पहात होती. तो घरी आला ते चिडचिड करतच.

"काय गं तुला घरी यायचंच होतं परस्पर तर मला का बोलावलं?"

"हो हो, चुकलं माझं..पण इतका वेळ कसा लागला तुम्हाला?"

"सावी भेटली होती"

त्याने कसलेही आढेवेढे न घेता डायरेक्ट सांगितलं.

"अय्या हो?काय म्हणाली? कसं वाटलं तिला भेटून?"

श्रीधर तिच्याकडे बघत म्हणाला,

"हेच हवं होतं ना तुला? म्हणून हे सगळं घ्यायला ये वैगेरे नाटक केलंस, आम्हाला भेटवून आणण्यासाठी.."

गार्गीला हे अनपेक्षित होतं, श्रीधरला कसं समजलं सगळं?

"इतक्या वर्षांपासून ओळ्खतोय तुला..तुझी नस अन नस ओळखतो मी"

गार्गी लाजली, पुढे म्हणाली,

"काय बोलली ती ते तरी सांगा."

"आमच्यातलं प्रायव्हेट होतं ते, मी कशाला सांगू?"

श्रीधर असं बोलला आणि तिला आतमध्ये काहीतरी वाटू लागलं. ही भेट तिनेच घडवून आणलेली, पण त्या दोघात काय बोलणं झालं याची तिला उत्सुकता होती.

मनातील उत्सुकता दाबून ती अनिच्छेनेच म्हणाली,

"बरं, नको सांगूस"

हे म्हटल्यावर श्रीधर तिला सगळं सांगेन असं तिला वाटलं पण तो खोलीत निघून गेला.

गार्गीला शांत राहवेना, थोड्या थोड्या वेळाने ती पुन्हा विचारायची पण त्यानेही तिला असं लटकवून बदला घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला जायची तयारी करत होता. समोरच्या फ्लॅटमध्ये गडबड सुरू होती. जुने भाडेकरू सोडून गेलेले आणि आता नवीन कुणीतरी राहायला येणार होतं.

क्रमशः

🎭 Series Post

View all