गाफील भाग 6

कथा एका पोलिस अधिकाऱ्याची

"यादव बाहेर पडण्याचे सारे मार्ग आता बंद झालेत. आपण 'पेरलेली 'माणसे फारच इमानदार आहेत यादव. ती राघवच्या हाती लागायची नाहीत आणि लागलीच तर तोंडही उघडायची नाहीत. आता यातून सुटका नाही.
नाहीतर तुझीही गत परबसारखी व्हायला वेळ लागणार नाही यादव. हे लक्षात असुदे.

अरे, यातून मिळणारी कमाई कितीतरी पटीने अधिक आहे. सारं जग पैशांवर चालत यादव आणि पैशांसाठी सारं काही माफ असतं!

असंही त्या राघवला जास्त माज आलाय. काय तो रुबाब, अंगातली रग..साला स्वतः काही खात नाही आणि खाऊही देत नाही.

कमी वयात यश पदरात पडलं की जास्तच माज येतो...काय!" देशमुखांनी आपली सिगारेट पायाखाली तुडवली आणि रागारागाने ते तिथून निघून गेले.

यादव मात्र 'यातून बाहेर कसे पडायचे?' याचा विचार करत बराच वेळ तिथेच थांबले.

वर्दी म्हणजे आमचा अभिमान. हा अभिमान मिरवत गुन्हेगारी ठेचायची, जिरवायची. इतकी वर्षे इमाने -इतबारे नोकरी केली. पण गेल्या पाच वर्षात अनेक बदल घडतं गेले, मध्येच राघवची एंट्री झाली आणि आधीपासूनच करप्ट असलेले इन्स्पेक्टर देशमुख गोंधळून गेले. इतक्या वर्षात फारशी चमकदार कामगिरी बजावली नसल्याने डिपार्टमेंटमध्ये देशमुखांना फारसा वाव नव्हता. तरीही त्यांना मान मिळत होता.

पण नव्याने आलेल्या तरुण, तडफदार राघवची प्रसिध्दी, दबदबा वाढत गेला आणि देशमुखांचे महत्व कमी झाले. त्यामुळे ते राघववर नाराज होत गेले. इतकी वर्ष वर्दीच्या पांघरुणाखाली चालणारे त्यांचे धंदे बंद पडायच्या मार्गावर आले.
त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांच्या देशमुखांच्या विरोधी कितीतरी तक्रारी होत्या. पण त्यांचे हात फार लांब वर पोहोचले असल्याकारणाने कोण काहीच करू शकत नव्हते.

त्यांनी यादव, परब यांसारख्या इमानदार पोलिसांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. जेणे करुन आपले विश्वासू सहकारी असल्यास पुढे काही अडचण नको यायला!

देशमुखांच्या सांगण्यावरून परबवर हल्ल्याचा 'आदेश' यादवांनीच दिला. त्याला मारायचा हेतू नव्हता. मात्र गडबडीत गोळ्या वर्मी बसल्या आणि परब अत्यवस्थ झाला.

राघवच्या देखरेखीखाली त्याची तब्येत सुधारत होती. पण डॉक्टरला हाताशी धरून देशमुखांनी परबचा काटा काढला. कारण परबने सगळं सांगितलं असतं तर देशमुख केव्हाच राघवच्या हाती सापडले असते.

आता वेळ होती राघवची! त्यातच राघवचे लग्न मधुराशी झाले. त्यामुळे देशमुखांची अधिकच चिडचिड झाली. पुन्हा त्यांच्या सांगण्यावरून राघववर हल्ला यादवांनीच केला.

पण यानंतर मात्र त्यांच्या मनात खळबळ माजली. "हे आपण काय करतो आहे? रिटायरमेंटसाठी अवघी काही वर्षच शिल्लक राहिली असता गर्वाने रिटायर व्हायचे, की देशमुखांसारख्या व्यक्तीची साथ देऊन आपल्याच माणसांच्या विरोधात जायचे?
पोलिसी बळाचा वापर करून गुन्हेगारीला आळा घालायचा की, त्यांचीच साथ देऊन गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस न्यायची?"

यादवांनी ठरवले. "पुढे आपले जे होईल ते होईल, पण राघव सारख्या कर्तबगार ऑफिसर्सची समाजाला आज खूप गरज आहे. त्यांना संधी मिळायलाच हवी. वयानुसार कर्तबगारी वाढली असती तर आज आपण कुठे पोहोचलो असतो! आता या वयात आपल्याच माणसांवर इतका राग बरा नाही.
आपण त्याच्यासमोर सगळं कबुल करू आणि जी मिळेल ती शिक्षा भोगू. आता देशमुखांचा आणि माझा संबंध संपला अगदी कायमचा."

आणि यादवांनी कामतला फोन लावला.

___________________

राघव हळूहळू ठीक होत होता. सक्तीची विश्रांती  असल्याने घरीच होता. मधू त्याच्या काळजीने फार हळवी झाली होती. राघवच्या अशा अवस्थेला कुठेतरी आपले वडील जबाबदार आहेत, हे ही ती जाणून होती. पण 'भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ' म्हणून ती गप्प होती. शिवाय देशमुखांच्या बरोबर एक वडील म्हणून तिचे जिव्हाळ्याचे नाते कधीच नव्हते.
____________________

"बोला यादव, काय काम काढलात या पामराकडे?"

"कामत, मस्करी नको. खूप महत्वाचं बोलायचं आहे. भेटून बोललो तर फार बरं होईल. रिस्क ही तितकीच आहे. पण मी मॅनेज करतो आणि पुन्हा फोन करतो." असे म्हणून यादवांनी फोन ठेवला.

इकडे देशमुख सावध झाले होते. यादवांनी राघव समोर सारे काही कबूल केले तर ते नक्कीच अडकणार होते.

त्यांनीही फोन लावला कामतला.... यादवांचा काटा काढण्यासाठी!

"शिरीष, ऑल ओके?"

"येस सर. यादवांचा फोन आला..."

"मला कल्पना होतीच. पण यादव माझ्या अपेक्षप्रमाणे त्या तुझ्या साहेबाला, राघवला फोन करेल असे वाटले होते.
पण त्यांनी डायरेक्ट शिकाऱ्यालाच फोन केला तर.. " देशमुख गडगडाटी हसत म्हणाले.

"सर, आपल्या कृपेनेच साहेब सध्या तात्पुरते जायबंदी झाले आहेत. तुमची आज्ञा असेल, तर आत्ता लगेच कायमचे जायबंदी करू शकतो!
पण आम्हाला आमच्या वहिनींची काळजी करावी लागते. त्यांचा खूप जीव आहे साहेबांवर. नाहीतर निकाल परवाच लागला असता. नाही काय?"
असे म्हणत कामतनी देशमुखांच्या हास्यात आपले हास्य मिसळले.

"शिरीष तुझ्यासारखा साथीदार शोधूनही सापडायचा नाही रे. हे कळेल तेव्हा, तुझ्या साहेबाला, राघवला फार दुःख होईल रे याचे! असे नाटकी बोलत देशमुख पुन्हा हसले.

क्रमशः

🎭 Series Post

View all