गाफील भाग 5

कथा एका पोलिस अधिकाऱ्याची

दारी तोरणं सजली. मंडप उभारण्यात आले. मुहूर्तमेढ रोवली. हळदीचा कार्यक्रम, साखरपुडाही दणक्यात पार पडला.

गुलबक्षी रंगाचा शालू नेसलेली मधुरा खूपच सुंदर दिसत होती. हलकासा मेकअप, कपाळावर चंद्रकोर, टपोऱ्या डोळ्यात काजळ, नाकात नथ, हातात हिरवा चुडा..नीलिमाताईंनी तिची दृष्ट काढली.

तर हलक्या मोती कलरच्या इंडो -वेस्टर्न सूटमध्ये राघव फारच हँडसम दिसत होता. एरवी वर्दीत  आत्मविश्वासाने वावरणारा राघव आज थोडा बुजल्यासारखा वाटत होता.

इकडे भटजीबुवा गडबड करू लागले. नवरा -नवरी मंडपात आले. मंगलाष्टके म्हंटली. अक्षता पडल्या आणि राघव आणि मधुराचा विवाह सोहळा अगदी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत साधेपणाने पार पडला.

सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे देशमुख आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित नव्हते. हे लग्न होऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले होते. पण त्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न पार पडले, म्हणून देशमुखांचा राघववरचा राग आणखीनच वाढला.

सासरी जाणारी लेक पाहून नीलिमाताईंचे डोळे भरून आले. हे पाहून रमाकाकू त्यांचा हात हातात घेऊन म्हणाल्या, "तुमची लेक आता आमची झाली. आम्ही तिची नीट काळजी घेऊ आणि चार पावलावर तर सासर आहे तिचे. तुम्हाला हवे तेव्हा तिला भेटायला येऊ शकता. पुसा बघू डोळे आधी."

पण कितीही नाही म्हटले तरी सासरी जाणारी लेक पाहून आईचे काळीज गलबलून येतेच. नीलिमाताईंच्या गळ्यात पडून मधुरा खूप रडली. कितीतरी वर्ष या माय - लेकी एकमेकींच्या सोबतीने राहत होत्या. आता नीलिमाताई एकट्या पडल्या. मधुराला काळजी वाटणे साहजिकच होत.

परांजपेंच्या घरी मधुराचे जोरदार स्वागत झाले. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा पार पडली. घरी मोजकेच नातेवाईक होते ते ही आता एक -एक करून पांगले.
नंतर राघव आणि मधुरा एक आठवडा मस्त फिरून, एन्जॉय करून आले.

लग्नकार्य सुरळीत पार पडल्याने रमाकाकू निश्चिंत झाल्या. दोघांचे रूटीन सुरू झाले. राघव आता आणखी बिझी झाला. लग्नाआधी त्याची ड्युटी लांबूनच पाहणारी मधुरा आता ती चांगलीच अनुभवू लागली. त्याच्या वेळा सांभाळताना तिची कसरत होऊ लागली.

राघव म्हणाला होता लग्नाआधी, "माझं पहिलं प्रेम वर्दी.. तुला थोड अडजेस्ट करावं लागेल." हे आठवून तिला हसू आलं. तेव्हा ते सोपं वाटलं सगळं. पण अनुभवताना नाकी नऊ येतात, हे तिच्या लक्षात आले होते.
हळूहळू मधुराने आपले क्लासेस सुरू केले आणि आता ती ही बिझी झाली.
_____________________

"परांजपे, एनी प्रोग्रेस? आणखी किती दिवस चालणार ही केस?" तुमच्या बदलीची ऑर्डर निघण्याची शक्यता आहे. सो, बी फास्ट."

राघव बदलीचे नाव ऐकताच चपापला. ह्या केस मध्ये जरा जास्तच वेळ लागला. या आधी असे झाले नव्हते. आपल्या विचारातच राघव साहेबांच्या केबिनमधून बाहेर आला.

"सर..हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलेले यादव आणि देशमुख साहेबांच्या संभाषणाचे रेकॉर्ड."
"गुड."- राघव.

"आणखी महत्त्वाची माहिती म्हणजे, परबवर हल्ला झाला त्यादिवशी देशमुखांच्या घरातून बाहेर पडलेली गाडी देशमुखांची नव्हतीच. आपल्या माणसांनी त्या गाडीचा पाठलागही केला होता. पण गाडी कधी गायब झाली हे कोणालाच कळलं नाही." कामत भराभर राघवला माहिती देत होते.

इतक्यात फोन वाजला आणि राघवच्या चेहेऱ्यावर चे हावभाव क्षणात पालटले. आता ही नवीन बातमी काय आहे! याकडे त्याच्या सहकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

"यादव सरांच्या गाडीचा अपघात..
कामत, शिंदे आणि मानेंना कळवा. लगेच निघायचं आहे."

पंधरा -वीस मिनिटातच राघव आपल्या सहकाऱ्यांसह हायवे वर येऊन पोहोचला. इथे कुणीच नव्हते. ना कुठली गाडी, ना कसला अपघात!

"सर हा नक्कीच ट्रॅप.. असणार. "

इतक्यात दोघेजण गाडीवरून आले आणि राघववर गोळी झाडून फटक्यात गायब झाले. राघव जरी थोडक्यात वाचला असला तरी, गोळी हाताला घासून गेली होती. त्यामुळे जखम झाल्याने राघवला दवाखान्यात नेले.

ही बातमी कळताच रमाकाकू आणि मधू, दोघी धावत पळत दवाखान्यात आल्या.

_____________________

"काय?? सर मला हे काम जमणार नाही. तुमच्या आदेशानुसार मी परांजपेंवर हल्ला केला पण, त्याला जीवे मारणे हे माझ्या चौकटीत बसत नाही."
हायवे वरून जाणाऱ्या राघवच्या गाडीकडे पाहत, यादव देशमुखांना म्हणाले.

"यादव माझ्या जीवावर मोठा झालास. हे विसरलास की काय?"

"नाही सर. पण परांजपे आता तुमचे जावई आहेत.  याचाही विचार व्हावा. नाहीतर तुमचे भांडे फुटायला फारसा वेळ नाही लागायचा. तुमच्यासोबत आमचाही नंबर आलाच मग. सगळे धंदे बंद करू आणि उरलेली सर्व्हिस मानाने पूर्ण करू. नाहीतर सारे काही कबूल करू सर." यादव काकुळतीने म्हणाले.

क्रमशः

🎭 Series Post

View all