गाफील अंतिम

कथा एका पोलिस अधिकाऱ्याची

लपत छपत कामतकडे आलेल्या यादवांच्या कानावर कामतचे बोलणे पडले आणि ते सावध झाले.
म्हणजे राघवचा विश्वासू साथीदारच यात सामील..! यादवना धक्का बसणं साहजिकच होतं.
_______________________

" सर इतकी वर्षे प्रामाणिकपणे नोकरी केली. आता मानाने रिटायर व्हायचे..पण देशमुखांच्या साथीने..."

" पुढे बोला यादव." राघव किंचित हसत म्हणाला.

"सर, देशमुखांची कामगिरी पहिल्यापासूनच कधीच समाधानकारक नव्हती. त्यांना खास अशी कामगिरी पार पाडणे कधी जमलेच नाही. स्वतः च्या घरच्या लोकांशीही त्यांचे कधी जमलेच नाही. त्यांचा स्वभाव तापट, हट्टी आणि जेलेस. त्यांना वरून खूपदा आदेश मिळाले होते, स्वभावाचा उपयोग आपल्या कामात होऊ द्या.
पण त्यांनी तो वेगळ्या पद्धतीने केला. बऱ्याच छोट्या मोठ्या गुंडांसोबत त्यांचे लागेबांधे होते, नंतर त्याची व्याप्ती वाढली. त्यांचा काळ्या धंद्यात असणारा सहभाग सर्वांना ठाऊक होता, पण त्यांचे हात फार वरपर्यंत पोहोचेलेले होते. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना सूट दिली गेली.

सर तुम्ही आलात आणि थोडी जरब निर्माण झाली. देशमुखांनी आपल्या हाताशी आमच्यासारखे सहकारी नेमले आणि यात आम्हीही सामील झालो. तुम्ही येताच आम्हाला डोईजड झालात. त्यातच तुमचे लग्न मधुराशी झाले आणि देशमुख जास्तच चिडले.
आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे परबचा खून..."

"या कामत. आपलीच वाट पाहत होतो आम्ही." दरवाज्याकडे पाहत राघव आपल्या जागेवरून उठून बाहेर आला.

तर कामतला पाहताच यादव चपापले.

"सर फक्त पाचच मिनिट.. मला बोलायचे आहे."

"बोला यादव. कामत आपलेच आहेत."- राघव.

"सॉरी सर..पण मला एकांतात.."

हे ऐकून राघवने कामतला खूण केली आणि कामत चरफडत बाहेर जाऊन थांबला.

"सर, परबचा खून कामतने केला आहे. मीच
देशमुखांच्या सांगण्यावरून कामतला फोन केला होता. पण मला माहित नव्हते की, मी ज्याला आदेश दिला, तो माणूस म्हणजे कामतच आहे! हे माझ्यापासून लपवले गेले होते.
पण मी तर फक्त आदेश देण्याचे काम केले. आता तुमच्या आणि माझ्या जीवाला धोका आहे सर." यादव भराभरा बोलत होते.

"यादव हे शक्यच नाही. कामत माझा विश्वासू साथीदार.. शक्यच नाही. तुमची पापं झाकायला कोणाला पुढं करताय यादव?" राघवचा आवाज चढत होता.

"सर प्लीज..विश्वास ठेवा माझ्यावर. तुमच्यावर परवा झालेला हल्ला मीच केला होता."

"बस् यादव. माझ्या जीवाची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. रीतसर अटक होईलच तुम्हाला. आता तुम्ही यातून पळ काढणार नाही याची खात्री आहे मला."

इतक्यात कामत देशमुखांसह आत आले.

"कामत!" राघव आश्चर्याने दोघांकडे पाहत होता.

"सर सांभाळून." यादव पुढे होत म्हणाले.

कामतनी सावकाश आपली बंदूक बाहेर काढली. हे पाहून यादव राघवच्या आणखी जवळ सरकले.
राघवच्या डोळ्यात भीती चमकली.. पण क्षणभरच.

"सर प्रत्येक बाबतीत असं विश्वास ठेऊन आणि  गाफील राहून चालत नाही. तुमच्या इतक्या जवळ असूनही तुम्ही मला ओळखू शकला नाहीत. आश्चर्य वाटते आम्हाला. अर्थात मी ही तशी काळजी घेतली होतीच.

परबला मीच मारले. देशमुखांच्या घरातून बाहेर पडलेली गाडीही माझीच होती. मात्र तिचा पाठलाग कधी झालाच नव्हता. यादवांना यातले काहीच माहीत नव्हते. कारण मी पडद्यामागच्या सूत्रधार होतो. तुमच्या सानिध्यात राहून तुमचे सारे.. प्लॅन्स मला कळत होते. मग आणि काय बाकी होत? इन्स्पेक्टर राघव?!!

"कामत. सोबत राहून पाठीत खंजीर खुपसलास! विश्वासघात केलास. मी सोडणार नाही तुला. राघवने एका हाताने कामतचा गळा आवळला.

"तरुण, तडफदार, रांगडा गडी..एक जबाबदार पोलीस ऑफिसर. फसला..आमच्या जाळ्यात."
देशमुख कसेतरीच हसले.

"तुमची सर्वात मोठी चूक, तुम्ही मधुराशी लग्न करून केलीत. त्याची शिक्षा तुम्हाला होईलच." असे म्हणत काही समजायच्या आतच कामतने स्वतः ला सोडवून घेत, आधी यादवांवर आणि मग राघववर गोळ्या झाडल्या. दोघेही अगदी निपचित पडले, क्षणात सारं काही संपल.
 

"सर 'गाफीलपणाचा ' आणखी एक बळी.
पण फारच उमदा, जबरी माणूस होता. हो ना!!

फारच कमी वयात सोडून..गेला. आता वाईट वाटेल, ते फक्त वहिनींसाठी. नाही का? उद्याची हेडलाईन.. हायवेवर झालेल्या गोळीबारात इन्स्पेक्टर' राघव परांजपे 'यांचा दुर्दैवी मृत्यु...
सर चला लवकर. आता आपली वाट पुन्हा मोकळी झाली."
अचानक कामतच्या डोळ्यात असुरी आनंद झळकला आणि ते दोघे तिथून झपाट्याने बाहेर पडले.

गोळी झाडण्याचा आवाज ऐकून रमाकाकू आणि मधू धावतच बाहेर आल्या. पण आता खूपच उशीर झाला होता.

समाप्त.

🎭 Series Post

View all