गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ४

एका वृद्ध स्त्रीची कथा
गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ४
मागील भागात आपण बघीतलं की जानकीने आपली कथा सांगितली.आता पुढे काय होईल ते बघू

जानकीची कथा ऐकल्यानंतर मालती म्हणाली.
" तू आता ठरवलं आहेस नं की या वृद्धाश्रमात आनंदाने राहशील."

" हो." जानकी उत्तरली.

" आता इथेच आपलं जग आहे. इथे आपल्याला आनंद मिळावा यासाठी या संस्थेतील लोक झटतात त्यांना आपण मदत करायची. मी करते."

" खरय तुझं. मालती तू माझ्या पेक्षा खंबीर मनाची वाटतेस मग तू इथे कशी आलीस?"

जानकीच्या या प्रश्नावर मालती हसली.

" माझा वाईट काळ सुरू झाला म्हणूनच मला विपरीत बुद्धी होत गेली आणि मी तसंच वागत गेले."

" म्हणजे?" जानकीला काही कळलं नाही.

"माझे मिस्टर माझा विपूल पाच वर्षांचा असताना गेले. त्यांच्या जागेवर मला नोकरी लागली पण लहान वयात आजूबाजूच्या लोकांची नजर मला केविलवाणी करून जायची. पुरूष जात मदत करण्याच्या निमित्ताने वाईट हेतू मनात धरून माझ्याशी बोलायचे. माझे सासू सासरे म्हातारे होते. त्यांचा मला मानसिक पाठींबा होता. पण तो पुरेसा वाटायचा नाही.

कधी कधी पुरषाचा स्पर्श, पुरषाचा सहवास मला हवा हवासा वाटायचा मग मी खूप सैरभैर व्हायचे. माझ्या सासूबाईंना माझी मन:स्थिती कळायची.त्या एकदा मला म्हणाल्या,

"मालती तू का व्याकूळ होते आहेस मला कळतंय. आम्ही पण म्हातारे झालो. नसतो तर यांनीच बाहेर जाऊन पैसे कमावले असते. तुला बाहेर पडू दिलं नसतं. तुझे कष्ट बघून रोज एकदा तरी यांच्या डोळ्यात पाणी येतं. या सैरभैर अवस्थेतून तुला स्वतःला बाहेर काढावं लागेल. विपूलचं भविष्य बघ. आम्ही आहोत तुझ्या बरोबर पण आम्ही पिकली पानं कधी गळून पडू कळणार नाही."

जानकी मी त्याच दिवशी स्वतःला खंबीर केलं.माझ्या सैरभैर होण्याने विपूलवर आणि सासू सास-यांवर परिणाम व्हायला नको हे ठरवलं. प्रत्येक दिवस मी काटेकोरपणे जगत होते. कोणाला माझ्या बद्दल बोलायला कारण मिळून ये म्हणून मी सतर्क राह्यचे. "

" मालती तुझ्या माहेरचे लोक नाही आले मदतीला?"
जानकीने विचारलं.

"माझे भाऊ जास्त शिकले नाही त्यामुळे त्यांना बेताची नोकरी होती. दोन भाऊ असून काही कामाचे नव्हते. काहीतरी कारणं सांगून माझ्यापासून पळ काढायचे. आईवडील काय करणार! तेच बांडगुळासारखे मुलांवर अवलंबून होते."

" अगं मालती आईवडिलांना बांडगूळ काय म्हणतेस? त्यांच्या वयोमानानुसार ते काय ग पैसे कमावणारं? आपल्याला लहानाचं मोठं करताना आपल्या आईवडिलांनी कधी म्हटलं नाही ही मुलं आमच्या वर बांडगूळासारखी अवलंबून आहेत. मग आपण मुलांनी असं म्हणणं योग्य आहे का?"

जानकीच्या आवाजाला धार चढली.

" जानकी हे मी नाही माझे भाऊ म्हणतात. त्यांना आईवडिलांबद्दल काहीही वाटत नाही. दोघांना खूप चुकीच्या वळणावर त्यांच्या मित्रांनी नेलं. त्या दोघांना तीच वाट आवडली. आता त्या वाटेवरून परतता येत नाही."

" म्हणजे क्रिमीनल साईडला वळले का?"

जानकीने घाबरूनच विचारलंं.

" नाही तसं काही घडलं नाही हे आमचं नशीब. कष्ट न करता पैसा मिळाला तर तो त्या दोघांना हवा असतो. दोघांच्या बायका करतात छोटीमोठी कामं. या दोघांना मूड असला की जातात कामाला. जेव्हा खिसा रिकामा होतो तेव्हा पैशाची आठवण होते मग जातात काम शोधायला."

मालतीच्या स्वरात उद्विग्नता दडली होती.

" मालती त्यांच्या नशिबात जे असेल ते होईल. तुला का तुझ्या मुलाने इथे सोडलं? तू नाही नं आलीस स्वतःहून?"
जानकीने विचारलं.

" नाही. आता वाटतं की त्याने इथे सोडण्याऐवजी आपणच इथे आलो असतो तर फार बरं झालं असतं."
मालती म्हणाली.

" का? तुला असं का वाटतं?"

जानकीने विचारलं.

" मला हळू हळू सगळी परिस्थिती कळली होती पण मन मानायला तयार नव्हतं. मनाला जर मी आधीच तयार केलं असतं तर इथे त्याने मला सोडण्यासारखा अपमान मला सहन करावा लागला नसता. वृद्धाश्रमात माझी रवानगी केली हा माझ्या मातृत्वाचा अपमान आहे. माझ्या जवळचे सगळे पैसे संपले मग जे थोडे उरले त्या पैशातून इथे मला आणून सोडलं. घर मात्र माझ्या नावावर आहे तिथेच माझा मुलगा राहतो. हे जग सोडून जाण्यापूर्वी हे घर मी नातवाच्या नावावर करणार आहे."

हे बोलून मालतीने दीर्घ उसासा सोडला.

जानकी मालतीचा हात हातात घेऊन म्हणाली,

" मालती नको फार विचार करू. आपलं ठरलंय नं आपण दोघी चिमण्यांनी इथे आनंदात राह्यचं."

" हो. आजपर्यंत मी एकटी होते. आज मला नवीन मैत्रीण मिळाली तुझ्या रूपाने. मी नाही आता विचार करणार. वाईट वाटून घेणार.आपण इथे आनंदात राहू."

मालती जानकीकडे बघून हसली आणि तिचा हात हातात घेऊन गाणं म्हणू लागली.

" आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या… जोडीच्या."

" पुढे काय…? बोल ?"
जानकीच्या या वाक्यावर मालती खो खो हसत म्हणाली,

" मी नाही ग बाई कवयित्री.मला एवढचं येतं."

मालतीच्या बोलण्यावर जानकीला पण हसू आवरेना.
दोघी चिमण्या कितीतरी वेळ हसत होत्या.
__________________________________
या दोघी चिमण्या पुढे काय करणार आहेत? बघू पुढील भागात.


🎭 Series Post

View all