गडद झाल्या तिन्हीसांजा भाग २

वृद्ध स्त्री ची कथा
गडद झाल्या तिन्हीसांजा भाग २

मागील भागात आपण बघीतलं की विनय जानकीबाईंना वृद्धाश्रमात सोडतो. त्यामुळे जानकीबाई गोंधळल्या आहेत.बघू पुढे काय होईल ते.


जानकी बाई अजूनही अस्वस्थ आणि गोंधळलेल्या होत्या.त्या खिडकीतून एकटक बाहेर बघत होत्या. त्यांना मालतीबाई म्हणाल्या,

" खिडकीतून जी वाट दिसतेय ती वृद्धाश्रमाच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जाते आणि मग गेटमधून बाहेर जाते.पण तुम्हाला कदाचित माहित नसेल ही वाट फक्त बाहेरून येणा-यांसाठी आहे. आत आलेली व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही."

" काहीतरी काय बोलताय! जी वाट बाहेरून आत येते त्याच वाटेने आतून आपण बाहेर जाणार नं?"

जानकीबाईंच्या या बोलण्यावर मालतीबाई हसल्या आणि म्हणाल्या,

" जानकीबाई वास्तवात या. वृद्धाश्रमाच्या वाटेवरून फक्त एकेरी वाहतूक होते. तुम्हाला इथे आणून सोडायला वाट होती पण इथून जाणार कशा?"

" कशा म्हणजे? आले त्याच वाटेने."

जानकीबाईंच्या चेहे-यावर मालतीबाई बावळट आहेत का असा भाव आला.

" जानकीबाईं तुम्ही तुमच्या मुलाची वाट बघू नका.तो येणार नाही तुम्हाला परत न्यायला."

" नाही असं नाही होणार. तो मला इथे सोडून गेला आहे पण घरी गेल्यावर त्याला माझी उणीव भासेल. तो नक्की येईल."

" तुमची उणीव त्याला आधीच जाणवली असती तर त्याने तुम्हाला इथे सोडलंच नसतं."

मालतीबाई जानकीबाईंना समजावण्याचा सुरात बोलल्या.

" अहो आजपर्यंत मी कधी घरापासून लांब राहिलेच नाही तर विनयला माझी उणीव जाणवेल अशी?"

जानकीबाई आपल्या म्हणण्याचं समर्थन करत बोलल्या.

" आपली प्रिय व्यक्ती आपल्या पासून लांब गेली तर… हा विचार मनात येताच तो आपण सहन करू शकत नाही कारण आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीपासून लांब राहण्याची कल्पनाही संहन होत नसते. इथे तुम्हाला तुमचा मुलगा सोडून गेला आहे. म्हणजे त्याला तुम्ही जवळ नसण्याने काही फरक पडणार नाही.लक्षात घ्या तो लहान मुलगा नाही."

हे बोलताना मालतीबाईंचा चेहरा जरा कठोर झाला. जानकीबाईं मालतीबाईंच्या चेह-याकडे सुन्न मनाने बघत होत्या.

" तुम्हाला तुमच्या मुलाने इथे का आणून सोडलं हे मी तुम्हाला विचारणार नाही. कारण मी हे विचारलं तर तुम्ही दु:खी व्हाल. आता आपण दोघी रूममेट आहोत. आपणच एकमेकांना जापायचं. मला तुम्ही ए मालती म्हणा. मला आवडेल."

मालती हळूच पलंगावरून उठली आणि आपल्या खुर्चीतकडे जाऊ लागली. मालतीच्या पायांनाही शिणवटा आला. जडपणे ती खुर्चीवर येऊन बसली.

" खरच तुम्हाला वाटतं माझा मुलगा मला घ्यायला येणार नाही.
जानकी बाईंनी काप-या आवाजात विचारलं.

" या वृद्धाश्रमात जितके वृद्ध आहेत त्या सगळ्यांना सुरवातीला असंच वाटायचं की आपली मुलं आपल्याला आपल्या घरी परत नेतील पण असं कोणाच्याच बाबतीत घडलं नाही. म्हणून तुम्हाला म्हणतेय नका वाट बघू मुलाची आणि उरलेलं आयुष्य दु:खात घालवू नका. मला मालती म्हणा .या वयात हक्काचं माणूस हवं असं वाटतं. जानकी तू होशील माझी हक्काची मैत्रीण?"

मालतीने आर्त स्वरात जानकीला विचारलं.

मालतीच्या आर्त स्वर ऐकून जानकीला भडभडून आलं. ती थरथरत्या पावलांनी उठली आणि मालतीजवळ गेली. मालतीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,

" मी कोणाची हक्काची होऊ शकते ही जाणीव हे गेल्यानंतर विरून गेली होती . हक्काचा विनय होता पण आता तर त्यानेच नातं तोडलं. मालती आपण होऊ ग सख्ख्या, जीवलग मैत्रीणी. मी आले मघाशी तेव्हा खूप गोंधळले होते पण तुझं बोलणं ऐकल्यावर मला धीर आला. मी आता परतीच्या वाटेची आंस धरणार नाही."

"जानकी खूप लवकर समजलं हे बरं झालं. तुला बघितल्यावर मला माझा या वृद्धाश्रमातील पहिला दिवस आठवला. मीही तुझ्यासारखीच भांबावले होते. मला कुणी समजावणारं नव्हतं. तुला बघीतलं आणि ठरवलं तुला जितक्या लवकर वास्तवाची जाणीव करून देता येईल तितक्या लवकर करून द्यायची."

थकलेल्या सुरात जानकी म्हणाली,

" मालती मला बरेच दिवसांपासून असं काही तरी होऊ शकतं असं मला वाटत होतं पण जेव्हा प्रत्यक्षात घडलं तेव्हा मी हादरले. मुलांवर आंधळं प्रेम असतं आईवडलांचं. विनय मला इथे सोडणार आहे हे माझ्या मुलीला मेघनाला माहिती होतं. पण तिचा तर साधा फोन आला नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. माझी उणीव विनयला आणि मेघनाला पण जाणवणार नाही म्हणूनच तो मला इथे आणून सोडण्याची हिम्मत करून शकला. मी नाही आता विनयच्या आठवणीने व्याकुळ होणार."

"शाब्बास." असं म्हणून मालतीने जानकीला मिठी मारली.

कितीतरी वेळ त्या दोन वृद्ध चिमण्या एकमेकींच्या मिठीत आपला आधार शोधत होत्या.
________________________________
जानकी बरोबर मालतीची काय कहाणी असेल? बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all