Login

'ग... गणवेशाचा ' भाग १ला

एका मुलीची कथा
कथा... ग…गणवेशाचा.


शहराच्या थोड्या बाहेरच्या अंगाला ठिगळ लावल्यासारखी वसलेली ती झोपडपट्टी. अस्वच्छता आहेच त्याचबरोबर या झोपडपट्टीला मिळणारं पाणी सुद्धा तसंच अस्वच्छ आहे. तरीही ही झोपडपट्टी त्या घाणेरड्या पाण्यावर पोसुन टणकपणे ताठ उभी आहे. शहरातील इमारतींसारखी ती नाजूक नाही. आजार तर तिच्या पाचवीला पुजलेले होते. औषधं तिनं कधी बघीतली का अशी शंका येण्याइतपत या झोपडपट्टीची प्रकृती दिसायची.

खायला कधी मिळेल कधी नाही. खायला मिळालं तर तेही शिळपाकं असायचं ज्यात जीवनसत्व नावाची गोष्टं नसायची तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे. अरूंद खोलीत अनेक जण राहतात ऑक्सीजन मिळतो तोही बेताचाच तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना जगवते.

शिक्षण म्हणजे काय त्यांना माहित नाही. पाटी पेन्सील त्यांना माहित नाही पण अनुभवांनी त्यांना शिक्षण मिळतं. त्यांच्या आयुष्यात हे महत्वाचं वाटतं म्हणून ते पाटी पेन्सीलचा विचार करत नाहीत.


याच चाळीत आपल्या कथेतीली पात्रं राहतात. घरचा कर्ता लख्या तोही अशिक्षीत आहे.त्यामुळे चार पैसे मिळवण्यासाठी तो मिळेल ते काम करतो.थोडे पैसे मिळतात त्यातच मोठं कुटुंब पोसतो त्याची बायको रखमा ती दहा घरची कामं करते.मोठी मुलगी दहा वर्षांचीच आहे.नाव तिचं मुन्नी. तिच्याहुन लहान भावंडांना मुन्नीवर सोपवून तिची आई रखमा कामाला जाते.त्यामुळे दोनवेळचं जेवण तरी मिळतं. मुन्नी या वयातच तीन मुलांची आई झाली.


मुन्नी आईच्या प्रेमाने आपल्या भावंडांना सांभाळते. या परीस्थीतीत ती शिक्षण कसं घेणार? मुलांचे आजोबा सत्तर वर्षाचं जून खोड आहे पण टिकून आहे. त्यानेही तरूण वयात असेच कष्ट केले होते. त्यालाही चार-पाच मुलं होती. शिक्षणाचा त्यालाही गंध नव्हता. नातवंडांना शिक्षण मिळावं असं त्याला वाटणार तरी कसं?


लख्याच्या घरातील लोक जमेल त्यादिवशी आंघोळ करायची. केसांना तेलाचा स्पर्श कधी झालाच नाही. त्यामुळे सगळ्यांचे केस भिस्स आणि राठ झाले होते. त्याची कोणाला पर्वा नव्हती. तेल पावडर या चैनी त्यांना परवडणा-या नव्हत्या. तेल पावडर ही चैन फक्त नाजूक साजूक इमारतींसाठी असते हे ही झोपडपट्टी ओळखते.

मुन्नी दहा वर्षांची असली तरी आईच्या मायेनं आपल्या भावंडांना आपली मुलं म्हणून सांभाळणारी. आजही ती आपल्या लहान भावंडांना वरण भात भरवत होती. ‌तेवढ्यात खूप जोरात बडबडण्याचा, हसण्याचा आणि पळण्याचा आवाज आला तशी मुन्नी कुतुहलानी झोपडी बाहेर आली.

तिला दिसलं आठ दहा मुलं मुली शाळेचा गणवेश घालून दप्तर खांद्याला अडकवून पाण्याची बाटली हाताने हलवत हलवत हसत नाचत चालली आहे.त्यांच्या दप्तराचे,पाण्याच्या बाटलीचे रंग आकार सगळंच मुन्नीला आवडलं.तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली.सगळी मुलं मुली बहुतेक तिच्याच वयाची होती.

मुन्नीच्या मनात आलं ही सगळी मुलं किती आनंदात जातात आहे. आपल्यासारखं या मुलांना पण आपल्या पाठच्या भावंडांना सांभाळावं लागत असेल का?ती मुलं निघून गेली तरी मुन्नी त्यांच्यातच अडकून पडली होती. तिच्या सगळ्यात लहान बहिणीने तिच्या हाताला झटका दिला म्हणून ती भानावर आली.

****

आता रोजच त्या मुलांच्या येण्याची मुन्नी वाट बघत असे. ही मुलं पुर्वी या रस्त्यांनी जात नव्हती. पलीकडचा रस्ता खोदल्या मुळे इकडंन जाऊ लागली. मुलं नाचत बागडत तिच्या घरासमोरून जात तेव्हा त्यांचं उड्या मारणं, उड्या मारल्यामुळे हिंदकळणारी त्यांची पाण्याची बाटली, मध्येच कुणाचं तरी दप्तर खाली पडायचं त्यावरही विनोद व्हायचा आणि सगळे हसायचे. हे सगळं तिचे डोळे अधाशीपणे टिपून घ्यायचे.

मुन्नीच्या डोळ्यांना हे दृश्य नवीन होतं. तिच्या डोळ्यांना त्या दृश्याने एक वेगळीच चमक आणली.

त्या मुलांचं आजूबाजूला कोणाकडेही लक्ष नसायचं.ते आपल्याच धुंदीत चालायचे.ते काय बोलतात यातलं काहीही मुन्नीला ऐकू येत नसे.पण त्यांचं हसणं,नाचणं तिच्या मनात रूतून बसलं होतं.तिचा चेहरा त्या मुलांना बघतांना आश्चर्यानी भारलेला असायचा. हळुहळू ती स्वप्नं बघू लागली.‌जागेपणी स्वप्नात ती तिला त्या मुलांबरोबर नाचतांना दिसू लागली.

****

हल्ली तिचं कशात लक्ष्य नसायचं हे तिच्या आईच्या आणि आजाच्या लक्षात आलं होतं.बाप शुद्धीवर नसायचाच तर त्याला मुन्नीत झालेला बदल कसा कळणार?

मुन्नीला आता त्या दप्तरात काय आहे याची उत्सुकता लागली होती. एक दिवस त्यातील एका मुलाचं दप्तर खाली पडलं. त्याने ऊचलण्या आधी ते दप्तर ऊघडल्या गेलं. दप्तरातील पुस्तकं वह्या खाली पडली.ती पुस्तकं त्या मुलाने पुन्हा आत ठेवली. मुन्नीची इच्छा पूर्ण झाली. दप्तरात वह्या पुस्तकं असतात हे कळलं. लांबुन प्रत्येक पुस्तकाचा रंग नाही कळला पण जे कळलं त्यामुळे तिचे डोळे चमकले.भान हरपून ती दप्तराकडे बघत होती. एवढ्यात कोणीतरी तिचा दंड धरल्यामुळे ती भानावर आली.

तिच्या आजाने तिचा दंड धरला होता.खोकत खोकत तो बोलला.

"ए भयताडवाणी काऊन करत हाय? तुले पानी आन म्हनलं न.चाल अंदर "

तिच्या आज्यानी तिला जबरदस्ती आत नेले.ती वारंवार मागं वळून बघू लागली.

" थांब नं मले मारतो काहून?"

"भाईर का व्हय? तीनं टाईम आवाज दिला तुले तर ऐकू येत नाय का? भहिरी झाली?"

मुन्नी ने कंटाळलेल्या सारखं आज्याकडे बघीतलं. धावत जाऊन पाणी पेल्यात घेऊन आज्याला दिलं आणि धावतच झोपडीच्या बाहेरच्या दाराशी आली.

"ए भयताड पेल्यात अर्धच पानी देल्ल.ए मुन्नी…"

आज्या ओरडतच बसला मुन्नी केव्हाच झोपडीबाहेर गेली होती पण त्यावेळी तिला ती सगळी मुलं खूप लांब गेलेली दिसली. तिला मनातून फारच वाईट वाटलं. तिच्या चेहे-यावर ती खंत दिसत होती.


"मुन्नी का झालं? तू वळकते त्यायले?"

मुन्नीच्या लहान बहिणीने निरागसपणे मुन्नीला विचारलं.

मुन्नी तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या मन: स्थितीत कुठे होती? तिचे डोळे अधाशीपणे त्या मुलांना पाठमोर बघण्यात गुंतली होती.

****

ती रंगीत पुस्तकं वह्या आता मुन्नी च्या स्वप्नात रोजच येऊ लागली. तिला तो गणवेश स्वतः घातल्याचे दिसून लागले. पुस्तकं, वह्या ती दप्तरात ठेवतांना दिसू लागली. या स्वप्नांनी आणि शाळेत जायच्या इच्छेनी तिला पछाडून टाकलं होतं. शाळेत जायला खूप म्हणजे किती पैसे लागतात हे अजूनतरी मून्नीला कळत नव्हतं.

मुन्नीला पैशाची ओळख शाळेत गेली नसली तरी झाली होती कारण ती अशीक्षीत असली तरी झोपडपट्टीत राहत असल्याने फार लहान वयात तिला पैशाचा व्यवहार समजू लागला होता.

आपल्या कथेतील ही चिमुरडी सगळ्यांच्या घरात असलेल्या चिमुरडीच्या वयाची. तिचेही डोळे आनंदाने चमकतात. तिच्याही डोळ्यात काहीतरी तिला हवं आहे असं दिसतं पण ती राहते ती झोपडपट्टी तिला अशी स्वप्नं बघायला परवानगीच देत नाही. ही झोपडपट्टी तिच्या खांद्यावर लहानपणापासून जबाबदारीचं ओझं देते.

मुन्नीच्या भवतालचं जग निरक्षर असल्याने मुन्नीचे खांदे लहान वयात नको त्या ओझ्याने थकतात आहे हे त्यांच्या लक्षात येतंच नाही.येणार तरी कसं त्यांना त्यांचं एक मूल खाणारं एक तोंड असलं तरी काम करणारे दोन हात त्यांना मिळतात.हे झोपडपट्टीतलं कटू सत्य आहे.

मुन्नी ही प्रातिनिधिक मुलगी आहे.तिच्यासारख्या अनेक मुन्नी आपल्या डोळ्यात स्वप्नं बघायची विसरून जातात. जबाबदारीच्या ओझ्याची निरगाठ त्यांच्या मनाला बसते ती कायमची.

अश्या वसाहतीमध्ये मुन्नी कशी आपल्या डोळ्यात स्वप्नं बघते.त्याच्या मागे कशी धावते. हे आपण मुन्नीचं रोजचं जगणं बघीतलं तरच कळेल.

आपण आपल्या कथेची नायिका मुन्नी हिचं भावविश्व प्रत्येक भागात जवळून बघू.

____________________________


क्रमशः \" ग…गणवेशाचा \"
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all