ग गणपतीचा..

तो दुखहर्ता आहे.


ग गणपतीचा..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

"गणपती बाप्पा मोरया.." जोरात आवाज आला. सुमेधा बाहेर गॅलरीत येईपर्यंत मिरवणूक गेली होती. ती नाराज होऊन आत जायला निघाली. कंटाळून तिने आईला फोन लावला. आईनेही फोन उचलला नाही. ती सैरभैर झाली होती. वैतागून तिने टिव्ही लावला. टिव्हीवर ठिकठिकाणी उत्साहात चाललेला गणेशोत्सव दाखवला जात होता.. तिच्या घरात कणभरही उत्साह नव्हता. तिचे सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई आत पूजा करत होत्या. तिचा नवरा राघव आत घोरत पडला होता. आणि ही नवीनच लग्न होऊन आलेली नवरी सैरभैर झाली होती. तिला रडायला येत होते. तिच्या माहेरी प्रत्येक सण जल्लोषात साजरा व्हायचा. गणपती म्हणजे विचारायचेच नाही. महिनाभर आधी काढलेल्या वर्गणी, मग ती सजावट आणि काय काय.. दर दोन मिनिटांवर असलेले सार्वजनिक गणपती. तिथे वाजत असलेली गाणी. गणपती आणण्याचा उत्साह. सोसायटीत दर एका घराआड असलेला गणपती. चाललेल्या आरत्या, टाळ मृदुंगाचा आवाज, तो धूपदीपाचा वास. तिला ते सगळे हवे होते. ती टिव्ही बंद करून बेडरूममध्ये गेली. तिला खूप रडू यायला लागले. ती हमसून हमसून रडायला लागली. तिच्या रडण्याने राघव जागा झाला..
" काय ग? काय झाले रडायला? कोणी काही बोलले का?" तिने डोळे पुसत नकारार्थी मान हलवली.
" मग?"
" मला बाप्पाची आठवण आली."
" तुला पप्पांची म्हणायचे आहे का?" त्याने जोक करायचा प्रयत्न केला.
" तुला हसायला येते का?" प्रकरण गंभीर आहे हे राघवने ओळखले.
" नाही हसायला येत नाही. पण काय झाले हे सांगितले तरच मला कळेल ना."
" आमच्या इथे गणपती किती जोरात असतात. नुसता आवाज आणि उत्साह. प्रसादाची गडबड, लोकांची येजा. इथे काही काही नाही तसे. मी ते खूप मिस करते आहे."
" अग पण आपण नंतर जाणार आहोतच ना आत्याकडे गणपतीला." त्याने चक्रावून विचारले.
"हो पण ते नंतर. मला आमच्या बाप्पाची आठवण येते आहे."
" जाऊ हं आपण उद्या", असे म्हणत त्याने तिची समजूत काढली. तिनेही पटल्यासारखे दाखवले पण बाप्पाशिवाय घर ही संकल्पनाच तिला रूचत नव्हती. ती पडली नवी नवरी विषय तरी कसा काढणार? या गणपतीत कसेतरी तिने परक्यासारखे सगळीकडच्या गणपतीचे दर्शन घेतले. कुठेतरी आत सगळे हरवल्यासारखे वाटत होते. ना आरतीचा थाट ना प्रसादाची लगबग ना शेजारच्यांकडे असणारी दर्शनाची ओढ. बाप्पा गेल्यावर न राहवून तिने सासूबाईंकडे विषय काढला.
" आपल्याकडे गणपती नाही का बसवत?"
" नाही अग. खूप म्हणजे खूप वर्षांपूर्वी गणपतीत यांच्याकडची अख्खी कर्ती पिढी आजारात नष्ट झाली. एक माहेरी गेलेली बाळंतीण तेवढी वाचली. तेव्हापासून म्हणे गणपती बसवत नाही यांच्याकडे."
" तुम्ही मानता हे सगळे?"
" तसे नाही ग.. पण ज्यांनी ज्यांनी परत प्रयत्न केला त्यांच्यासोबत काहीतरी वाईटच घडले."
" म्हणजे?"
" यांच्या आजोबांनी बसवायचे ठरवले पण त्यांच्यावर किटाळ आले. नोकरी सोडून व्यवसाय करावा लागला. नंतर आम्ही ठरवले , पण माझे राघवनंतर झालेले बाळच गेले. त्यानंतर परत कधीच बाळ होऊ शकले नाही मला. विषयच सोडला आम्ही तो. आणि आम्हालाच असे नाही आपल्या घराण्याच्या अनेकांना असा अनुभव आला आहे."
" आई पण."
" नको ग बाई मोहात पाडू या सगळ्याच्या. खूप त्रास होतो. देव्हार्यातल्या देवाला नमस्कार केला की पोहोचतो त्याच्यापर्यंत." सासूबाई सुस्कारा सोडून उठल्या. वर्ष पटापट उलटले. घरातल्या लोकांना सुमेधा थोडे थोडे ओळखायला लागली होती. गणपतीचे वेध लागले. सुमेधाने राघवकडे विषय काढला.
" राघव मी यावर्षी गणपतीची मूर्ती आणायचा विचार करते आहे."
" तू बरी आहेस ना? आपल्याकडे गणपती बसवत नाहीत माहित आहे ना तुला."
" अरे मी फक्त एक धातूची मूर्ती आणणार आहे. त्यात काय एवढे?"
" आईबाबांना आवडणार नाही." एवढेच बोलून राघव बाहेर निघून गेला. घरी सगळ्यांची तोंडे फुगली होती. सुमेधाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची पूजा केली. मोदकांचा नेवैद्य दाखवला. राघवच्या बाबांना ते अजिबात आवडले नव्हते हे त्यांच्या चेहर्‍यावरून दिसत होते. काही वाईट होऊ नये म्हणून सासूबाई हातात जपमाळ घेऊन बसल्या होत्या. कोणी आरतीमध्ये सुद्धा रस दाखवला नाही. उगाच एकदोन आरत्या करून कशीबशी आरती संपवली. सुमेधाला फार वाईट वाटत होते. पण तरिही पाच दिवस तिने हे सगळे एकटीने केले. रोज नवा नेवैद्य, नवीन आरास.
गणपती गेल्यावर घरातल्यांचे चेहरे पूर्ववत झाले. काही महिन्यांनंतर सासूबाई स्वतःच बोलल्या.
" बरं झालं बाई काही अशुभ नाही झाले. नुस्ती धाकधूक मनात."
" आई, कसे काही वाईट होईल? तो सुखकर्ता आहे. दुखहर्ता आहे. तो कसा आपल्या वाईटावर असेल? उलट तो तर आपल्या आगमनाने सगळे प्रसन्न करतो. मला सांगा आधी जे झाले ते फक्त याच घरासोबत झाले का? आधीच्या काळी रोगाच्या साथीत अख्खीच्या अख्खी कुटुंबे संपून जायची. आणि मला सांगा, आजोबांनी नोकरी सोडली नसती तर हा भलामोठा व्यवसाय उभा राहिला असता का? तुमच्या बाबतीत म्हणाल तर झाले ते वाईटच.. पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला असेही झाले असू शकते ना?" सासूबाई काही न बोलताच निघून गेल्या.
परत गणपतीचे वेध लागले. यावेळेस सुमेधाने छोटे मखर वगैरे करायला सुरुवात केली. सुरूवातीला तरी कोणी काही बोलले नाही. पण आठच दिवस आधी एक मोठी ऑर्डर कॅन्सल झाली. मोठे नुकसान होणार होते. राघव खूप चिडला होता. कधी नव्हे ते सासरे बोलत होते.
" मोठ्यांचे बोलणे ऐकायचेच नाही ना? नवीन पिढी. आम्ही काय जुनी खोडे? आम्हाला काही अक्कलच नाही. सांगत होते सगळे, नका बसवू गणपती.. पण नाही. आपलेच खरे करायचे. घ्या.. भोगा कर्माची फळे. रस्त्यावर आलो नाही म्हणजे मिळवले." सुमेधाच्या डोळ्यांना धार लागली होती. ती मनातल्यामनात देवाला विनवत होती.
" आतापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितले नाही. यावेळेस माझ्यासाठी नाही पण तुझ्यासाठी तरी या संकटातून मला सोडव. तुला कोणी बोललेले नाही रे चालणार मला." शेवटी सासूबाईंना तिची दया आली. त्या तिला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. सुमेधा आपल्या बाप्पाजवळ बसली आणि तिने अथर्वशीर्षाला सुरुवात केली. राघव आत आला. तिच्याकडे न बघताच झोपी गेला. जागचे न हलता तिची आवर्तने चालूच होती जोडीला अश्रूंचा अभिषेक.. दुसर्‍या दिवशी सगळे ऑफिसला जायच्या तयारीत होते. ही मात्र तशीच देवाजवळ बसली होती. राघवचा फोन वाजला..
" आई, बाबा.. "
" काय रे? आता काय झाले?"
" बाबा, आपल्याला एका नवीन कंपनीची ऑर्डर मिळते आहे. आणि ती आपल्याला या आठ दिवसात द्यायची आहे. बरीचशी कॅन्सल झालेल्या ऑर्डरसारखीच आहे.. काही छोट्यामोठ्या गोष्टी बदलायला लागतील. पण ते मी करू शकतो..आणि अजून एक गोष्ट, एवढ्या कमी अवधीत देत असल्यामुळे ते जास्त भाव द्यायलाही तयार आहेत..
" सांगतोस काय? देवापुढे साखर ठेवते. त्या सुमेधाच्या प्रार्थनेला यश आले हो."
" सुमेधा ऐकलेस.. आपल्याला ऑर्डर मिळाली.." राघव तिला हलवत म्हणाला. सुमेधाने आवर्तनात संपवले. गणेशाला नमस्कार केला.
" आता पटले, माझा बाप्पा हा विघ्नहर्ता आहे ते.."
" हो.. अगदी खात्री पटली.." बाबा देवाला नमस्कार करत म्हणाले..

काही वर्षांनी..

सुमेधाचे घर पाहुण्यांनी गजबजले होते. सासरे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होते. सासूबाई प्रसादाची तयारी करत होत्या. राघव आणि छोटा वरद कद नेसून गुरूजींच्या सांगण्यानुसार पूजा करत होते. आणि प्रत्येकाला हवे नको बघणारी सुमेधा मध्येच मखरात बसलेल्या बाप्पाकडे बघून त्याचे आभार मानत होती. आणि तो सगळ्यांना आपल्या नेहमीच्याच तृप्त भावाने आशीर्वाद देत होता..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई