Login

फुलवंती - चित्रपट अनुभव

मराठी चित्रपट 'फुलवंती' यावर मांडलेले विचार.
फुलवंती - मराठी चित्रपट

लेखन - अपर्णा परदेशी.

मला माझ्या दैनंदिन आयुष्यात थोडासा बदल हवा होता. मागच्या शनिवारी रात्री जेवता जेवता सहज एक विचार मनात डोकावला. निमित्त होते टीव्हीवर सुरु असणाऱ्या हास्यजत्रेचे. आमच्याकडे रात्री जेवताना हास्यजत्रा पाहणे हे नित्याचे आहे. टीव्हीवर प्राजक्ता माळी दिसली आणि मनात आले की तिचा 'फुलवंती' चित्रपट एकटीने मोठ्या पडद्यावर बघून यावा. लगोलग घरात मी माझे प्रयोजन मांडले. परंतु यांनी आणि माझ्या लेकीने माझ्यावर किंचित कटाक्ष टाकून पुन्हा टीव्हीवर लक्ष केंद्रित केले. जसे काही मी उगाचच काहीतरी सांगत आहे आणि त्या दोघांशिवाय चित्रपट बघायला जाऊच शकणार नाही.

मी मात्र 'आली लहर आणि केला कहर' म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करणारच असे मनोमन ठरवून टाकले होते. थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी माझा निर्णय घरात सांगितला. त्या दोघांनीही "तू एकटीच जा, आमचे जमणार नाही." असे सांगितले. खरे तर मला एकटीलाच जायचे असल्याने मी त्यांना आग्रह करणार नव्हती. बरं झालं, सुंठीवाचून खोकला गेला. नुसत्या कल्पनेने दिवाळीआधीच मनातल्या मनात मोठमोठे लाडू फुटायला लागले. मग काय, मनातला आनंद मनातल्या मनात दडवत लगेचच 'बुक माय शो' वर सकाळच्या शोचे तिकीट बुक करून टाकले. तेव्हापासून उत्साह जरा जास्तच ओसंडून वाहत होता.

दुसऱ्या दिवशी मी अर्धा तास आधीच चित्रपटगृहात जाऊन पोहोचली. तो माझा दिवस होता. त्यामुळे माझा थाट तर बघायलाच नको. मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. चित्रपटगृहात जाताच सुरुवातीला फारशी गर्दी नसल्याने मस्त आठ-दहा सेल्फी घेऊन टाकल्या. त्यातला एक फोटो छानशा कॅप्शन्स सहित व्हाट्सअप वर गेला. आपण एकटे किती धमाल करणार आहोत हे सर्वाँना आवर्जून सांगायचे असते. त्याचे पडसाद नंतर उमटतात, ती धमाल वेगळी असते. चित्रपटाची वेळ झाल्याने आतमध्ये माझे सेल्फी पुराण सुरू असताना हळूहळू गर्दी व्हायला लागली. आता खरी पिक्चरला सुरुवात होणार होती. त्यामुळे मी फोन बंद करून निवांत बसली.

आणि बघता बघता फुलवंती अवतरली. अहाहा...काय ती एन्ट्री, काय ते गाणे आणि काय ती अप्सरेप्रमाणे लयबद्ध पद्धतीने तालासुरात नाचणारी प्राजक्ता माळी. बहारदार नृत्य करणारी फुलवंती पाहून चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा गोंधळ सुरू झाला. अचूक संवाद फेक आणि अभिनयाची उत्तम जाण असलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी या चित्रपटात खूप छान वाटली. चित्रपट पाहताना ती आपल्याला तिच्या विश्वात सहज घेऊन जाते. तिच्या नृत्याविषयी कितीही बोलले तरी कमीच वाटेल. प्रत्येक गाण्यात तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांच्या हालचाली आणि त्यावर थिरकणारे पाय यात आपल्याच नजरेची जुगलबंदी सुरू होऊन जाते. आपसूक आपले पाय तिच्या तालावर ठेका धरायला सुरुवात करून देतात. तिच्या नृत्यासोबतच प्राजक्ता तिच्या भरजरी साड्या आणि दागदागिने यात भाव खाऊन गेली आहे. त्यामुळे तिच्यावरून नजर हटत नाही हेही तितकेच खरे. एक अभिमानी नृत्यांगना, भर दरबारात तिचा होणारा अपमान आणि त्यातून पेटून उठलेली एक सुडाची भावना अशी फुलवंतीची भूमिका प्राजक्ता माळीने पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे.

नायक म्हणून गश्मीर महाजनी एका उच्चविभूषित विद्वान अशा प्रकांड पंडिताच्या भूमिकेत आहे. ज्याच्या विद्वत्तेसमोर पेशवे देखील नतमस्तक होतात असा शास्त्री म्हणून गश्मीरचे व्यक्तिमत्व उजळून निघते. पेशव्यांच्या दरबारात फुलवंतीचे नृत्य झाल्यानंतर तिचा अभिमान घुंगरू रूपाने पायदळी तुडवून जाताना तो अजून जास्त भारदस्त वाटतो. तिच्याशी संवाद साधताना तिच्याकडे बघत देखील नाही. त्याच्यावर आरोप होत असताना तिच्यातल्या अहंकारी स्त्रीला तो अतिशय नम्रपणे आव्हान देतो. अशा अनेक छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्याची व्यक्तिरेखा फारच प्रभावी वाटली. गश्मीर एक कसलेला अभिनेता आहे यात मुळीच शंका नाही.

बाकी इतर कलाकार आणि हास्यजत्रेच्या मोजक्या लोकांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेत प्राण ओतले आहे. वैभव मांगलेच्या तोंडी असलेले संवाद हास्याचे कारंजे फुलवतात. पुण्यातील पेशवेकालीन लोकांच्या सवयी, त्यांच्या बोलण्याच्या पद्धती, त्यांचे राहणीमान फार बारकाईने दाखवले आहे. त्यामुळे आपल्याला पण त्या पेशवेकालीन पुण्यात वावरल्यासारखे वाटायला लागते.

चित्रपटाच्या मुख्य कथानकात पुण्याच्या पेशवे दरबारात फुलवंतीचे नृत्य सुरू असताना "बेताल वेश्या" म्हणून पंडित व्यंकट शास्त्री तिचा अपमान करतो. तिच्या सारख्या हिंदुस्तानात प्रसिद्ध असलेल्या नर्तिकेचा आणि तिच्या कलेचा अपमान शास्त्रात पारंगत असलेला पंडित करतो हे तिला सहन होत नाही. ती पेशवे दरबारात न्याय मागते. झालेल्या अपमानाचा बदला म्हणून ती तिच्या नृत्यात चूक शोधून काढण्याची पैज लावते. शास्त्री देखील सर्व आरोप मान्य करून तिच्या नृत्यावर पखवाज वाजवण्याचे आव्हान स्वीकारतो. इथून सुरू होते दोघांमधली एकमेकांना हरवण्याची जिद्द. त्या जिद्दीचे रूपांतर पुढे त्यागात होते. शास्त्रीय संगीत व नृत्याची आवड असणाऱ्यांना हा संगीतमय प्रवास बघायला नक्कीच आवडेल.

चित्रपटातील मुख्य कलाकार आणि चित्रपट निर्माती प्राजक्ता माळी असल्यामुळे तिने चित्रपट बनवताना कुठलीही काटकसर केलेली दिसत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भव्य दिव्य आणि अनुभव संपन्न कलाकारांची फौज या चित्रपटात बघायला मिळते.

बाबासाहेब पुरंदरे लिखित फुलवंती नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आवर्जून बघण्यासारखा आहे. चित्रपट संपेपर्यंत आपणही फुलवंतीमय होऊन जातो. एक आठवडा झाला तरी फुलवंतीचा प्रभाव माझ्यावर तसूभरही कमी झालेला नाहीये. हे काही चित्रपट परिक्षण नाही. अगदी मोजक्या शब्दात चित्रपट कथानक फारसे उघडकीस न आणता मी माझा अनुभव थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदी चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून बघताना आपण फारसा विचार करत नाही. काही हिंदी चित्रपटांमधली दृश्य आणि गाणी आपण बघू देखील शकत नाही. तरीही त्यांना प्रतिसाद मिळतो. मग मराठी चित्रपटांमध्ये गुणदोष शोधून मराठी माणूस मराठी चित्रपटांकडे पाठ का फिरवतो?  वास्तविक पाहता मराठी चित्रपट आपण सहकुटुंब सहपरिवार बिनदिक्कत पाहू शकतो. म्हणून मराठी चित्रपटातल्या काही त्रुटी बाजूला ठेवायला काय हरकत आहे? मराठी रसिक चोखंदळ असले तरी काही गोष्टीत कानाडोळा करावा, उगाच टीकेची झोड उठवली जाऊ नये. मराठी माणसाने मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायला जाताना मोठ्या मनाने जावे असे मला वाटते.

समाप्त.

🎭 Series Post

View all