फुलांनाही वाजतेय थंडी

थंडी पडल्याने फुलांचा झालेली अवस्था
आज जराशी जास्त होती पडली थंडी
म्हणून झाडांनीही घातली होती बंडी
थोडी थोडी दवात भिजली होती जाई
तिला ऊठायची मुळीच नव्हती घाई
गुरफटून स्वतः ला गुलाब होता गाढ झोपला
उठवू नये म्हणून घेऊन बसला काटेरी शेला
चाफ्याच्या कडा थंडीने झाल्या होत्या लाल
घेऊन बसला तोही जाड पानांची शाल
नाजूकश्या जुईची हालत खुप कठीण झाली
आला रविराज तरी तिला जाग नाही आली
टपोऱ्या मोग-याने तर मनात पक्क ठरवलं
उन्हं वर आल्याशिवाय मुळीच नाही उमलायचं
आजीची मात्र सकाळीच नेहमीची घाई
देवपूजा झाल्याशिवाय तिला चैन नाही
थंडीत जावून भरभर सारी फुलं आणली
तशीच परडी तिनं नळा खाली धरली
थंडगार पाण्यानं फुलांची झोप पार उडली
होवून टवटवीत देवाच्या चरणावर चढली

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार