"गायत्री पुन्हा एकदा विचार कर आणि नकार दे लग्नाला.."
मायरा आपल्या मैत्रिणीला पोटतिडकीने सांगत होती. गायत्री मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती, तीच मायराला सांगू लागली,
"नकार देण्यासारखं काही कारणच नाहीये.."
"होकार देण्यासारखं तरी काय आहे सांग बरं? एकत्र कुटुंब आहे ते, त्यात जावा, नणंदा, दीर, सासू, सासरे, पुतणे...या सगळ्यात तुझं करियर कुठे जाईल?"
"ईच्छा असेल तर सगळं होतं, आणि हे बघ मी आधीपासूनच एकत्र कुटुंबात वाढलेली आहे त्यामुळे मला असं वेगळं राहणं अवघड होईल.."
"तुला कळत नाहीये गायत्री, तिथे एवढया माणसात ढीगभर कामं, हेवेदावे, ईर्षा तयार होणारच, सून म्हणून तुझ्याकडून भरमसाठ अपेक्षा असणार...त्यात तुझं इंटेरिअरचं काय? कसं करणार पुढे?"
"इच्छा असेल तर सगळं होतं.." एवढं बोलून गायत्रीने त्या विषयावर पूर्णविराम टाकला आणि मायराने सुद्धा माघार घेतली. मायराने जातांना एवढंच सांगितलं,
"ठीक आहे, दहा वर्षांनी पुन्हा भेट...तेव्हा बघू तुझा निर्णय बरोबर आहे की माझा..आज तारीख 2 ऑगस्ट 2012"
एवढं सांगून मायरा तिथून निघून गेली.
गायत्री आणि मायरा, इंटेरिअर डिझाईनच्या कोर्सला एकत्र. कॉलेजमध्ये दोघींची चांगलीच मैत्री होती. एकमेकींशी सगळं शेयर करत, मग त्या वैयक्तिक गोष्टी असो वा इतर काही. कॉलेज झाल्यानंतर दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लागल्या. असं असूनही दोघी एकमेकांच्या संपर्कात असायच्या. दोघीही महत्त्वाकांक्षी होत्या, करियरमध्ये त्यांना खूप पुढे जायचं होतं.
2 वर्ष जॉब केल्यानंतर दोघींच्या घरच्यांनी लग्नाचा विषय काढला. मायराने आई वडिलांना स्पष्ट सांगितलं,
"मी एकत्र कुटुंबात राहणार नाही, माझ्यासाठी वेगळा राहणारा एकटा मुलगा बघा..मला कौटुंबिक जबाबदाऱ्यात अडकून माझं करियर संपवायचं नाहीये.."
मायराचा हेतू वरून स्वार्थी जरी दिसत असला तरी वास्तववादी होता. आजूबाजूला असलेली परिस्थिती पाहता ती आपल्या मतावर ठाम होती.
आपली मुलगी किमान दुसरा मुलगा आणून समोर उभा करत नाहीये यातच आई वडिलांना समाधान होतं. त्यामुळे तिची अट मान्य करत आई वडिलांच्या स्थळ शोधायला सुरवात केली होती. खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांना असा उत्तम पगार असलेला, एकटा राहणारा मुलगा सापडला आणि मायराचं लग्न होऊन ती दुसऱ्या शहरात गेली.
"10 वर्षांनी पुन्हा भेटू.." हे वाक्य मायरा आणि गायत्रीच्या मनात पक्कं बसलेलं.. दोघीही विसरल्या नव्हत्या..आत्ताशी कुठे एक वर्ष होत आलेलं...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा