Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

फ्रण्टसीट

Read Later
फ्रण्टसीट

कथेचे नाव- फ्रण्टसीट

विषय- ....आणि ती हसली

फेरी- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा


"आईऽ अगं लवकर बाहेर ये." आपली नवी कोरी ऑरा दारासमोर उभी करत श्रेयश ओरडला.

त्याची पत्नी आभा आणि लेक श्रेया गाडीतून उतरल्या.

"मी आजीला घेऊन येते." म्हणत पाच वर्षांची लेक श्रेया आत धावली.

श्रेयशचा आवाज ऐकून त्याची आई माधवीताई आरतीचं ताट घेण्यासाठी देवघराकडे वळल्या.लेकाने कष्ट करून घेतलेली गाडी पाहून दाटून आलेल्या भावना आनंदाश्रू बनून कोसळत होत्या. देव्हाऱ्यातील गणरायाच्या मुर्तीला नमस्कार करत त्यांनी डोळे टिपले. नकळत मन गतकाळाच्या आठवणींत हरवले.

"माधवी, एक दिवस आपणसुद्धा चारचाकी गाडी घेऊ. फ्रण्टसीटला बसवून माझ्या राणीला दूरवर फिरवून आणेन." श्रेयशचे बाबा माधवीताईंना म्हणायचे.

"तुमचं आपलं काहीही. आधी आपल्या श्रेयशला शिकवा मग आपल्या सुखसोयींच पाहू." त्या समजावत म्हणायच्या.

"त्याचं टेन्शन तू नको घेऊस. मी आहे ना. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी." म्हणत ते त्यांचे आश्वासक सोबती बनायचे.

पण सुखाने सजलेल्या या घराला अचानक नियतीची नजर लागली. एका अपघातात श्रेयशचे बाबा कायमचे त्यांना सोडून गेले. श्रेयश जेमतेम नऊ दहा वर्षांचा असेल. माधवीताई आतून कोलमडल्या पण निरागस लेकराला पाहून त्यांनी स्वतःला सावरले. आलेल्या परिस्थितीचा निडरपणे सामना करत त्या उभ्या राहिल्या. स्वप्नांच्या दुनियेत रममाण करून त्यांच्या आयुष्याचा राजकुमार त्यांना अर्ध्यावरच सोडून गेला. नशिबाने अशी काही हुलकावणी दिली की चेहऱ्यावरचं मनमोकळं हसू कायमचं रुसून बसलं. श्रेयशचं भविष्य घडवायचं या एकच उद्देशाने त्यांनी जीवनाची विस्कटलेली घडी सावरायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्या यशस्वीही झाल्या. परिस्थितीची जाणीव ठेवून श्रेयश शिकला. आईने केलेल्या कष्टाचं चीज करत त्याने चांगली नोकरी मिळवली. 

"आई हेच माझे दैवत. तिला सुखात ठेवण्यासाठी मला साथ देशील?" म्हणत श्रेयशने आभाला लग्नासाठी मागणी घातली.

"तुझ्यासाठी काहीपण.." म्हणत तिनेही त्याच्या मागणीचा स्विकार केला.

आभा लक्ष्मीच्या रुपात घरात आली आणि त्यांच्या घराला घरपण आले. माधवीताईंनी तिच्यात लेकीला पाहिले आणि तिनेही सुखाने त्यांची ओंजळ ओतप्रोत भरली. श्रेयाचा जन्म झाला आणि घराचं गोकुळ झालं. माधवीताई नातीच्या विश्वात चांगल्याच रमल्या.

पुन्हा एकदा सुखाचा सोहळा सजला आणि त्याचं जगणं सुसह्य झालं.

आज तर पतींनी त्यांच्यासाठी पाहिलेल्या स्वप्नाची लेकाने पूर्ती केली होती. आनंदाचा सोहळा डोळ्यांनाही सहन झाला नाही आणि ते गालावर ओघळले. घरात धावत आलेल्या श्रेयाने आपल्या नाजूक हातांनी ते अलवारपणे टिपले.

"आजी, तू का रडते आहेस?" ती त्यांना बिलगत म्हणाली.

तिच्या येण्याने त्या भानावर आल्या.

"माझी जिलेबी, मी काही रडत नाही. हे आनंदाश्रू आहेत." डोळे टिपत त्या म्हणाल्या.

"म्हणजे ते आनंदात असतांना येतात तेच ना ?" तिने निरागसपणे विचारले.होकारार्थी मान हलवित त्यांनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तोच पुन्हा आभाने हाक मारली. तश्या दोघीही आरतीचं ताट घेत बाहेर आल्या. नवी कोरी चारचाकी गाडी दारात पाहून त्यांना पुन्हा एकदा श्रेयशच्या बाबांची आठवण आली.

"आई, आरती करा गाडीची. तुमच्या लेकाने तुमचं स्वप्न पूर्ण केलं." आभा त्यांना स्पर्शत म्हणाली.

त्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या.

"मला सगळं सांगितलं आहे श्रेयशने." म्हणतांना तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.

"गाडीची पूजा मात्र तू कर. तूही कष्ट केलेत या स्वप्नपूर्तीसाठी." आरतीचं ताट तिच्याकडे करत त्या म्हणाल्या.

"नाही आई हा मान तुमचा." तिने पुन्हा एकदा त्यांना समजावले.

"मी सांगू का? त्यापेक्षा तुम्ही तिघीही एकत्रच आरती करा. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं." म्हणत श्रेयशने तोडगा काढला.

शेवटी तिघींनी मिळून गाडीची पूजा केली. श्रेयाच्या कुंकवाने भरलेल्या हातांचा गाडीवर ठसा उमटवला.


"आता फिरायला जायचं ना बाबा ?" छोटी श्रेया लाडाने म्हणाली.

"घेऊन जा तिला आणि मस्त निवांत फिरून या." नातीच्या हट्टामध्ये होकार भरत माधवीताई म्हणाल्या.

"फिरायला तर जायचं आणि तेही सगळ्यांनी. आणा ते आरतीचं ताट मी ठेवून येते देवघरात. तुम्ही गाडीत बसा." आभाही हट्ट करत म्हणाली.

"अगं माझ्या म्हातारीचं काय काम.." त्या बोलतच होत्या की श्रेयशने त्यांना शांत केले.

"आई, या स्वप्नाच्या पूर्ततेत तुझा वाटा मोलाचा आहे. तुझ्या गाडीत बसण्याने माझ्या कष्टाचे चीज होईल." म्हणत श्रेयश हळवा झाला. तसा त्यांनीही डोळ्यांना पदर लावला.


"आजी, तुला परत रडू आले. मघाशी पण बाप्पासमोर अशीच रडत होती." म्हणत छोटी श्रेया त्यांना बिलगली.

"हे पण आनंदाश्रूच आहेत मगाचसारखे." म्हणत त्यांनी तिला जवळ घेतले. गाडीचा मागच्या सीटचा दरवाजा उघडत त्या आत बसल्या तोच आभा तिथे येऊन पोहचली.

"आई, थांबा. गाडीतून बाहेर या पाहू." आभा गंभीर होत म्हणाली.

"काय गं? काय झाले ?" त्या स्वतःला सावरत म्हणाल्या. श्रेयशलाही तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले.

"तुम्ही आधी बाहेर या मग सांगते." दरवाजा उघडत ती म्हणाली. माधवीताई गाडीतून खाली उतरल्या तसा आभाने फ्रण्टसीटचा दरवाजा उघडला.

"तुम्ही इथे बसायचं. आजच नाही यापुढे आपण जेव्हा एकत्र बाहेर जाऊ तेव्हा या सीटवर तुम्हीच बसायचं." ती हक्काने म्हणाली.

"आभा, आता हे काय नवीन? मी पुढे बसून काय करणार? नवऱ्यासोबत फ्रण्टसीटवर बसायचा मान तुझा. तूही कष्ट घेतलेस यासाठी." त्या तिला समजावत म्हणाल्या.

"आई नाही बसू शकत का मुलासोबत फ्रण्टसीटवर? तुमचे कष्ट माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत आई. श्रेयश आज जो काही आहे तो फक्त तुमच्यामुळे." ती उत्तरली.

"पण तरीही फ्रण्टसीटवर..." त्या बोलतच होत्या की श्रेयशने त्यांना अडवले.

"आई, बस ना. बाबांची इच्छा होती तुला फ्रण्टसीटवर बसवून फिरवायची. मग ही इच्छा त्यांचा लेक नाही का पूर्ण करू शकत ? एरवी आभा बसेलच गं माझ्या शेजारी पण जेव्हा तू सोबत असशील तेव्हा हा मान तुझा." म्हणत श्रेयशनेही पुढाकार घेतला.

"आजी बस ना गं." श्रेयाही लडिवाळपणे म्हणाली.

माधवीताईंना त्यांना टाळणे अशक्य होते. नवऱ्याने दाखवलेलं स्वप्न आज लेकाने पूर्ण केलं आणि त्यांना फ्रण्टसीटवर बसण्याची विनंती करून सुनेने त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण केली. सुख म्हणजे आणखी वेगळं ते काय ?


त्या फ्रण्टसीटवर बसल्या. आभाने त्यांना सीटबेल्ट लावून दिला. गाडी सुरु झाली आणि पुन्हा एकदा भूतकाळाने डोकं वर काढलं. क्षणभर श्रेयशच्या जागी त्यांना त्याचे बाबा दिसले. त्यांना पाहून त्या गोड हसल्या. आभालाही त्यांना आनंदात पाहून भरून आले. गाडीबाहेर बघत तिने डोळे टिपले. श्रेयाच्या नजरेतून मात्र ते सुटलं नाही.

"आई, तू पण आनंदात रडतेस ना ?" ती भाबडेपणाने म्हणाली.

तसे आभाने होकार देत तिला कुशीत घेतले.

"आई, आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा फ्रण्टसीटवर बसण्याचा हट्ट मी करणार नाही. तूच बाबांजवळ बसायचं." म्हणत ती आभाला बिलगली.

लेकीचं अजाणत्या वयातील शहाणपण ऐकून आभाच्या गालावर आनंदाची खळी पडली आणि ती हसली.


समाप्त

©® आर्या पाटील

जिल्हा- पालघर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Aarya Amol Patil

Teacher

निसर्ग सौंदर्याला लेखणीत उतरवायला आवडतं

//