डॉक्टरच्या मनातलं....

डॉक्टरांच्या कार्याची एक छोटी झलक


प्रसंग १

मुलाच्या वाढदिवसाला तिची 24 तास ड्युटी होती . मुलगा आधीच नाराज होता पण समजुतीने म्हणाला, संध्याकाळी थोडा वेळ तरी ये. तिने हो म्हंटलं पण खूप पेशंट होते. संपवत आठ वाजले, आता एकच दुसऱ्या खेपेची बाई होती. तिला वाटलं ज्युनिअर्स करतील, पहिली नॉर्मल आहेच. ती निघाली, रस्त्यात का कुणास ठाऊक वाटलं की बाळ जरा मोठं आहे,अंदाजे ३.६किलो वाटत होते पण वाट पुरेशी होती. तरी वाटलं आपण तिथे असावं, मुलाचा फोन आई येतेस ना, औक्षण करायला आजी थांबली आहे. तिने म्हंटलं, हो निघाले आहे पण मन स्वस्थ नव्हतं. अर्ध्या रस्त्यातून गाडी वळवली आणि पेशंटच्या डिलिव्हरी च्या पाच मिनिटे आधी पोहोचली. बाळाचं डोकं आलं पण खांद्यातून बाळ अडकलं, सगळं स्किल पणाला लावून, योग्य ते मॅन्युवर्स करून बाळ सुखरूप सोडवलं.... नाही कुठल्या तरी शक्तीने तिच्याकडून सोडवून घेतलं, कशी त्यांनी सुबुद्धी दिली तिला देव जाणे ?

तिची ज्युनिअर डॉक्टर अक्षरशः रडली, मॅडम तुम्ही आल्या नसत्या तर मी काय केलं असतं म्हणाली, त्यांची पूर्ण टीम अक्षरशः डोळे पुसत होती.

मुलगा रुसला होता पण ती आई हसली होती आणि तिला खात्री होती की हा प्रसंग सांगितल्यावर नेहेमीप्रमाणे घरातील प्रत्येक व्यक्ती तिला समजून घेईल....

प्रसंग २

31 डिसेंम्बर होता पण काहीच स्पेशल प्लॅन नाही , अगदी खाऊ सुद्धा नाही केला. खूप बिझी चाललंय सध्या म्हणून ती जरा नाराज होती.

घरी पोहोचली आणि अजुन पाणीच पीत होती की फोन आला, मॅडम लवकर या, पेशंट ब्लिड होते आहे, ती तशीच पळत गेली. जवळ जवळ दीड लिटर ब्लड already वाहिलं होतं, देव जशी जशी बुद्धी देत गेला, खूप पटापट पुढच्या सगळ्या स्टेप्स केल्या, मनात एकच इच्छा ठेवून की तरुण मुलगी आहे शक्यतो पिशवी काढायला लागायला नको. सगळी OT स्तब्ध , चिंतातुर होती आणि तिचे हात भरभर धावत होते.

अखेर अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर ब्लिडिंग थांबवायला तिला यश आलं आणि ते तिची पिशवी वाचवू शकले.

हे खरं तर नविन नाही पण 31 डिसेंम्बर स्पेशल म्हणून खूप गोड आठवण राहिली तिला आणि वाटलं देव आपल्याला थोडं सुद्धा नाराज करत नाही , हो ना ? प्रत्येक महत्वाच्या दिवसाचं सेलिब्रेशन पेशंटच्या हास्यातून आणि समाधनातून होतं !

असे कितीतरी प्रसंग घडतात, रोज घडतात. कोणाला कधी न सांगता , कुुटुंब आणि स्वतःला बाजूला ठेवत आम्ही काम करत रहातो पण मूठभर वाईट डॉक्टर मुळे सगळेच डॉक्टर बदनाम होतात हीच शोकांतिका !

©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर