Feb 24, 2024
नारीवादी

नणंद भावजय.......... एक नातं मैत्रीच्या जवळचं.

Read Later
नणंद भावजय.......... एक नातं मैत्रीच्या जवळचं.

नणंद भावजय…... एक नातं परंपरे पलीकडचं मैत्रीच्या जवळचं
आपण भारतीय फारच कुटुंब स्नेही असतो. आपल्या आजूबाजूला नात्यांचे इतके सुंदर रेशमी धागे प्रेमाची, आदराची, काळजीची फुले, माळून विखुरलेले असतात की, कधीकधी त्या आत्मीयतेच्या नाजूक स्पर्शाची आणि समर्पणाची \"अति परिचयात अवज्ञाच\" होते.

              आता हेच पहा ना सीमाचं लग्न ठरलं तेव्हा ती जरा बिचकली होती, कारण तीन भावांचं भरलं घर आणि सासू सासरे शिवाय आजे सासू ही. सीमा - एक सर्वसाधारण शहरातली, मध्यम वर्गीय एकल कुटुंबातली आई-वडिलांचं शेंडेफळ. दिसायला सुंदर , हुशार पण घर कामाचा अनुभव काहीच नाही. लग्न ठरल्यावर स्वयंपाक घरातल्या काही महत्वाच्या, अगदी मुलभूत आणि आवश्यक गोष्टी तिने स्वतःहून शिकून घेतल्या पण माहेरी जसं तीच्या चुकलेल्या रेसिपीज वरही प्रेमाचा आणि समजून सांगण्याचा नियम होता तसं काही सासरी होणार नाही याची जाणीव तिला होतीच.


           सीमाची मोठी बहीण रीमा जेव्हा माहेरी यायची आणि दुपारी निवांत तिच्या आई शेजारी बसून सासरच्या माणसांचे रागवणं, हेवेदावे आणि स्वयंपाकघरातल्या कुरबूरी, वागणं सांगायची, तेव्हा आई तिला म्हणायची ,"अगं हे असं चालायचंच ,आपल्या घरीही असंच होतं, एखाद्या घरी कमी किंवा जास्त तेवढाच काय तो फरक\".  आपणही सासरबद्दल काही सांगितलं तर आई आपल्यालाही अशा चार समजुतीच्या गोष्टी सांगेन अशी सीमाला पक्की खात्री होती, म्हणूनच जरा घाबरत , सावधगिरीने तिने देशमुखांच्या घरचं माप ओलांडलं. गृहप्रवेशाच्या वेळी मोठ्या नंणदेनं दारावर अडवुन तिला म्हटलं ,"तुझी मुलगी मला सून म्हणून देशील?" तेव्हा सीमाच्या गालावर भर डिसेंबरच्या थंडीतही लाल गुलाब फुलले. तिने हळूच नवर्‍याकडे नजरेच्या कोपर्‍यातून पाहिले त्याने ही नजरेनेच \"हो\" म्हटलं पण तिथेही नंणदेनं पकडलंच! "अगं नितुला काय विचारतेस? तो नाही थोडाच म्हणणार आहे!" आता मात्र सीमा लाजून अगदी चूर झाली. शेवटी नितीनच बोलला, "तायडे अगं किती वेळ रस्ता अडवशील? बघ ना थंडीने तिला कापरं भरलं आहे."
सासरे- "जया झालं नाही का तुमचं अजून?"
जया - "हो बाबा झालं! लाडाचा नितीन, अन् लाडाची सुनबाई."


(खरं तर नितीन हा देशमुखांचा मधला मुलगा. सॉफ्टवेअर इंजिनियर,  मोठा विनय, मग जया आणि जवळपास दहा एक वर्षाने नितीनचा जन्म झालेला आणि मग दिनु. गणपतराव देशमुख हे वीस किलोमीटर दूर असलेल्या सिंदी गावचे सरपंच होते. निवडणुकीत सलग पाच वेळा ते आणि त्यांचं पॅनल निवडून आलं होतं.)           लग्नाची घाई संपली, रोजचा व्यवहार सुरू झाला. मोठे भासरे (दीर) सकाळी लवकरच उठून शेतीवर जायचे आणि तिकडून आल्यावर मग लगेच शाळेत. (ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते.) त्यामुळे मोठ्या जाऊ बाईंचा दिवस सकाळी पाचलाच सुरू व्हायचा! (त्याबद्दल त्यांची काही कुरकुर नसायची). मुलांच्या शाळेचे डबे , नवऱ्याचा स्वयंपाक , सासू-सासऱ्यांचा पहिला चहा आणि एखाद वेळी नाश्ता त्याच करायच्या. सुरुवातीला सीमाला लवकर उठायची सवय नव्हती ,पण घरच्यांचं बघून लग्नाच्या एखाद महीन्या नंतर तीही लवकर उठायला लागली, पण लवकर उठून करायचं काय? एक तर माहेरी कामाची सवय नाही , आधी अभ्यास - शिक्षण, मग एका प्रायव्हेट बँकेमध्ये नोकरी त्यामुळे सीमाला कामाचा काहीच अनुभव नव्हता.


लेखिका   राखी भावसार भांडेकर.


***************************************************

          


            


     

           


   

           

          

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//