सासू नव्हे सखी..

दृष्टिकोन बदलणे गरजेचे..
              सासू नव्हे सखी....

                सकाळी लवकरच नेहा ला जाग आली. अलार्म वाजायलाही अजून वेळ होता... आणखी थोडा वेळ झोपूया असा विचार करत पुन्हा झोपायचा विचार केला... पण कसले काय.....झोप जणू काही पळूनच गेली तिची.... बाजूला पाहिले तर पार्थ बाबांच्या कुशीत अगदी आरामात झोपला होता .. दोघांच्या अंगावरचे पांघरूण नीट करून ती बेडवरून उतरली.... आणि किचन मध्ये गेली..
              
             , सकाळची काम आवरता आवरता डोक्यात आजच्या कामांची यादी तयार होत होती,.. हे चार दिवस प्रचंड धावपळ होणार होती नेहाची.... गणेशोत्सव सुरू होत होता चार दिवसांनी... नेहाकडेही गेल्या चार वर्षांपासून  गणपती बाप्पा चे आगमन व्हायचे... दिड दिवस अगत्याचा पाहुणचार घेऊन बाप्पा आपल्या घरी परत जायचे.....

             दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावाहून सासू सासरे येणार होते आदल्या दिवशी.... तोपर्यंत साफसफाई,, खरेदी.. सर्व आवरून घेतले पाहिजे..... थोडासा फराळ करायला हवा... तसा विकत ही आणता येईल दुकानातून.... पण घरची सर नाही त्याला..... डोक्यात विचार आणि हाताने काम सारख्याच गतीने चालू होते.....

                एक दिड तासात अंघोळ... नाष्टा.... पार्थ आणि सुहास चा टिफीन तयार झाला.... तोपर्यंत सुहास उठला आणि बाथरूम मध्ये पळाला..... भरभर आवरून नाष्ट्या साठी टेबल वर आला.... हसत खेळत गप्पा मारता मारता नाश्ता झाला आणि सुहास ऑफिस साठी तयार होऊ लागला....

                नेहानेही तो पर्यंत पार्थ ला उठवलं आणि ती त्याचा ब्रश करून देऊ लागली.... चार वर्षाचा पार्थ अतिशय चुणचुणीत व लाघवी मुलगा होता.... सर्वांचा लाडका.... सकाळची तयारी आईच्या हातून होत असली तरी दुधाचा ग्लास मात्र बाबांच्याच हातून संपवणार....

                 दहापर्यंत  तयारी झाली दोघांची की दोघेही नेहाला बाय करून बाईक वर जात... सुहास आधी पार्थ ला शाळेत सोडायचा व पुढे ऑफिस ला जायचा...... दोन वाजता शाळा सुटली की नेहा पार्थ ला घरी घेऊन यायची..... शाळा तशी जवळच होती.... येता येता भाजी आणणे ही व्हायचे.....

                  हे दोन तीन दिवस मात्र खूपच धावपळीचे होते नेहासाठी... घराची साफसफाई, बाप्पाची खरेदी, थोडासा फराळ हे सारे तीन दिवसात आटपून आज नेहा आणि सुहास बाप्पा साठी सजावट करणार होते.... सकाळीच सर्व कामे नेहाने आवरून घेतली.... आज संध्यकाळपर्यंत सासू सासरे येणार होते.,.. सुहासने ही आज सुट्टी घेतली होती...

               पूर्वेच्या भिंतीला टेबल ठेवून त्यावर नवीन बेडसीट पिनेने लाऊन घेतली सुहासने..... तोपर्यंत नेहाही आली मदतीला..... दोघांनी आर्टिफिशियल फुलांनी छान डेकोरेट केले....वर झिरमिळ्यांचे तोरण लावले..... फुलांच्या माळां वर लायटिंग सोडली....

                 दुपारी पिल्लू ला घरी आणल्या वर तिघांनी दंगा मस्ती करत जेवण करून बाकीची तयारी केली.... पिल्लुची अखंड बडबड सुरू होती...... आज आजी आजोबा येणार.... उद्या बाप्पा येणार म्हणून खूप खुश होता गडी....

                  संध्याकाळी आजी आजोबा आले आणि पार्थ च्या आनंदाला जणू उधाण आले.... त्याच्या साठी आणलेला खाऊ, खेळणी यात तो रमून गेला.......

                    नेहा ने आई बाबांच्या आवडीचा बेत केला होता....... जेवण वगैरे आटपून दोघी सासू सूना हॉल मध्ये गप्पा मारत बसल्या..... आज खूप दिवसांनी नेहा भरभरून बोलत होती... तिचे तिच्या सासुबाईंशी चांगले जमायचे.... तिच्या सासूबाई निमाताई अगदी प्रेमळ होत्या .... लग्न झाल्यापासून त्यांनी नेहाला आपल्या मुलीसारखीच वागणूक दिली होती..... निमाताईंची मुलगी शर्वरी आणि जावई अनिल दोघेही बंगलोर ला होते.. त्यामुळे त्यांचे येणे तसे कमीच होते.... निमा ताई आणि नितीनराव .... (नेहाचे सासरे) दोघं वर्षातून एकदा जाऊन येत बंगलोर ला.....

                  बाकी व्हॉट्स अप आणि व्हिडिओ कॉल तर होतेच....

             सकाळी लवकर उठायचे म्हणून रात्री लवकरच सारे झोपी गेले......... सकाळी चारलाच नेहा उठली..... अंघोळ करून बाप्पाच्या प्रसादाच्या तयारी ला लागली..... निमाताई ही उठल्या आणि आवरून नेहाच्या मदतीला आल्या.... दोघींनी मिळून प्रसाद,मोदक आणि स्वयंपाक केला...... काल बडबडणारी नेहा आज जरा शांत वाटली निमाताईंना...... थकलेली दिसत होती ती फार.....

    निमाताई-- -"काय ग नेहा, बर वाटत नाही का? आज अगदी शांत आहेस..."

    नेहा--" नाही हो आई..... चार दिवस जरा दगदग झाली म्हणून अंग दुखतयं....."

     निमा ताई: "अग चार पाच दिवस राब राब राबली आहेस... अंग तर दुखणारच..... थोड्या वेळाने भटजी येतील... बाप्पाची पूजा झाल्यावर लगेच जेवण आवरून घेऊ.... मग आराम कर थोडा वेळ..... परत संध्याकाळी बाप्पाच्या दर्शनाला येतील नातेवाईक.... मग तू परत बिझी होशील..... चल मी चहा ठेवते आपल्या दोघींसाठी थोडा. फ्रेश वाटेल तुला... बस तू जरा वेळ...."

      नेहा: "मी करते ना आई ... बाबा, पार्थ आणि हे ही येतील आता बाजारातून..."

      निमाताई : "राहू दे ग... करते मी सर्वांसाठी... तसेही आवरलेय ना सर्व आता... भटजी येईपर्यंत काम नाहीय काही.. तू जरा वेळ बस आरामात..."

       आपल्या सासुकडे प्रेमळ दृष्टिक्षेप टाकत मान डोलवत नेहा बाजूच्या सोफ्यावर बसली...

        निमा ताई चहा गाळतच होत्या की बाहेर गेलेले त्रिकुट ही आले..
           
       "आई बघ ना मी काय काय आणल... बाप्पासाठी फुल ड्राय फ्रूट चे मोदक आणि आजोबांनी बॉल पण घेऊन दिला मला... "पार्थची बडबड ऐकतच सगळ्यांनी चहा घेतला... तसा सुहास चा फोन वाजला... मोबाईल कानाला लावतच त्याने बाप्पाच्या तयारीकडे नजर टाकली...

      "नेहा तयारी करायला घे तूझी... भटजी काका निघालेत यायला.... "कानाचा मोबाईल दूर करतच सुहासने सांगितले...
   
        सुहास,पार्थ, आई, बाबा सगळे तयार होऊन भटजींची वाट बघत होते... साडे अकरा चा मुहूर्त होता बाप्पाच्या स्थापनेचा.... पावणे अकरा झाले होते... भटजी दहा बारा मिनिटात पोहचणार होते.. सर्वांची तयारी होऊन अर्धा तास झाला तरी नेहा तयार होऊन रूम बाहेर येत नव्हती...

         "अरे सुहास, बघ जा जरा, केंव्हाची तयारी करतेय नेहा.... " भटजींची वाट बघणाऱ्या निमाताई दरवाज्याकडे पाहत म्हणाल्या...

         " आई...आई ... इकडे ये जरा..." नेहाला बोलवायला गेलेला सुहास रूम मधूनच आईच्या नावाने ओरडत होता...

          त्याच्या हाका ऐकून सगळेच रूम मधे धावत निघाले...

          "नेहा ए नेहा अग काय झाले का रडतेय तू?..."

       रडणाऱ्या नेहाजवळ बसतच निमाताईनी विचारले...

          नेहाने हताश नजरेने त्यांच्याकडे पाहिले... तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्यांना शंका आली... नेहा रडतच नजर चोरत होती...

          "तुम्ही सर्व जण जा बघू बाहेर.... भटजी येतीलच आता.... मी घेऊन येते नेहाला ...."  निमा ताईंनी तिघांना बाहेर काढले...

          "नेहा काय झाले ग... रडतेस का अशी... उठ... भटजी येतीलच आता...." निमाताईंनी तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारले...

          "आई..,.. आई काय चुकले हो माझ्या कडून.... गेल्या काही दिवसांपासून मनापासून बाप्पाच्या आगमनाची तयारी करतेय मी.... आणि आता प्रतिष्ठापनेच्या वेळेस असे..... अजून चार दिवसानंतरची आहे हो तारीख... आणि नेमकी आताच....बाप्पा रागावले का माझ्यावर....." नेहा रडतच निमाताईंच्या कुशीत शिरली...

          "श ssss श.... चूप... एकदम चूप ... काहीही काय बोलतेस नेहा.... एवढी शिकलेली तू.... आणि तू असा विचार करतेस.... अग धावपळीमुळे होते मागे पुढे तारीख..."  मुसमुसणाऱ्या नेहाच्या डोक्यावर हात फिरवत निमा ताई तिला समजावत होत्या...

        "पण आई... आता पूजा... म्हणजे मी कशी.... मी... मी... आई.. तुम्हीं करा ना पूजा ...." नेहा अधिकच स्पुंदत स्पुंदत उपाय सुचवत होती..

         "बाप्पाच्या पूजेची मनोभावे तयारी केली तू... आणि पूजा मी का करावी? इतकी वर्षे गावी मीच करत होते....आता हे सर्व तुझ्याकडे सोपवले आहे ना नेहा... हे बघ बेटा पूजा कोण करणार हा प्रश्न नाही आहे.... तूच म्हणतेस ना नेहमी जुन्या परंपरा तशाच कवटाळून न बसता त्यात नवे बदल करून त्या अंगिकाराव्यात... अग जशी दृष्टी तशी सृष्टी.... तुमच्या नव्या पिढीने जुने ते सोने म्हणतानाच नवे ते हवे हे ही लक्षात ठेवायला हवे..." निमा ताई तिला समजावत होत्या.

         " हे बघ नेहा... सर्व तयारी झाली आहे... भटजी काका ही येतीलच इतक्यात... मनातले सर्व विचार बाजूला सार, आणि तयार होऊन ये..."

         "पण आई... मी कशी करू... म्हणजे काही झालं तर.... देवाला चालत नाही ना.... काही संकट आले तर...भीती वाटते मला... त्यापेक्षा तुम्हीच करा ना...."

         "अग भीती कोणाची वाटते तुला? अग विघ्नहर्ता आहे गणराया... आपल्या प्रत्येक संकटाला निवारण्याचे साकडे घालतो आपण त्याला... तो कस संकटात टाकेल?.... हे बघ बाळा... मी नास्तिक नाही ....मी स्वतः देवधर्म पाळते...पण काही गोष्टींकडे डोळसपणे पाहावे.. पूर्वी एकत्र कुटूंब पध्दती होती.. घरात स्त्रियांची संख्या जास्त होती त्यामूळे एकीला अडचण आली तर दूसरी असायची कामाला... त्यामूळे सर्व नियम पाळले जायचे.. बर या काळात पूजा करू नये की करावी या प्रश्नावर बरेच चांगले वाईट मत आहेत... आपण फक्त आपल्या पुरते पाहायचे... बाईला या काळात विश्रांतीची गरज असते म्हणून आराम करावा पण जर तुला खरच मनापासून पूजा करायची आहे तर बाकी काहीही विचार करू नको... आजपर्यंत मी याच दडपणा खाली वावरली... माझ्या सासूबाई जुन्या वळणाच्या होत्या... माझे विचार प्रगत असले तरी माझे काही चालले नाही कोणासमोर.... पण आता तू तुझ्या मनाविरुध्द जुन्या रूढींना कवटाळत बसायची काही गरज नाही... जे तुला पटत नाही व योग्य नाही असे वागायची सक्ती नाही... कोणालाही काहीही सांगायची, स्पष्टीकरणाची गरज नाही.. मी आहे तुझ्याबरोबर.... प्रसन्न मनाने बाप्पाची प्रतिष्ठापना करा... सुहास आणि सगळे वाट बघतायत बघ... "

     निमा ताई तिला समजावत होत्या आणि ती मात्र थक्क होऊन त्यांचे विचार भारावून ऐकत होती... आपल्या सासूचे हे प्रगत विचार पाहूनच तिच्या मनातील अपराधी पणाच्या विचारांचा गोंधळ कमी झाला...

       "काय पटले का नेहाबाई... करणार ना मग आता पूजा... की अजून काही शंका आहेत मनात..?"

     " नाही आई.... आता काही शंका नाहीत..
तुम्ही अगदी मैत्रिणी प्रमाणे मला समजावले..... आता अगदी निःशंक मनाने बाप्पाची प्रतिष्ठापना करणार.... थँक यु आई!" नेहा गदगदलेल्या स्वरात म्हणाली...

          "अग थँक यू काय?.... चल आता वेळ घालवू नकोस... सगळे कावरे बावरे झालेत बघ तुला अस बघून..भटजी काकाही आले असतील एव्हाना.... "  निमाताई तिच्या डोक्यावर हात फिरवत उठत म्हणाल्या...



        नेहाने अगदी निश्चिंत मनाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली... नकळतपणे झालेल्या चुकांची माफीही मागितली...

   अगदी निर्विघ्न पणे गणेशोत्सव साजरा करण्यात आला... ह्या गणेशोत्सवाने नेहा ला एक नवा दृष्टिकोन दिला... मनापासून केलेली पूजा जणू  काही देवाला मंजूरअसावी....

      जुन्या पिढीने नव्या पिढीला समजून घेण्याची ही गोष्ट नेहाला सकारात्मक रित्या बदलून गेली.... हाच दृष्टीकोन पुढच्या पिढीत रुजवायची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे हे मनापासून स्विकारावेसे वाटले....आणि प्रत्येक गोष्टीचा संबंध देवादिकांशी व पाप पुण्याशी लावण्याची वृत्ती आपले मनोबल नेहमी ढासळवते हे ही तितकेच पटले...



    समाप्त!

      सगळ्यांनाच हे पटेल की नाही हे मला माहीत नाही... पण हे माझ्याबाबतीत मात्र घडलेले आहे... आणि माझ्या सासूबाई जून्या वळणाच्या असून देखील त्यांनी मला पूजा करायला सांगितली होती... या गोष्टीला जवळ जवळ चौदा ते पंधरा वर्षे झाली... पण मी अशा अवस्थेत पूजा केली म्हणून बाप्पा रागावल्याचे माझ्या मनात कधीच आले नाही.......
   

       तुमच्यावरही अशी वेळ कधी आलीय का?.... तुमचे अनुभव ऐकायला आवडतील नक्कीच.....


         चूक की बरोबर हा प्रत्येकाचा वैयक्तिक दृष्टिकोन असतो आणि तो तुम्ही सांगितलेला आवडेल मला....
  

      लेखन आवडले असेल तर कमेंट नक्की करा.....