श्रीकृष्णा सारखा सखा

Answer to my son for his question on rakshabandhan celebration at school

मेघा रोज सारखंच लवकर उठून स्वयंपाकाला भिडली. कणिक मळुन झाकून ठेवली, बटाटा रस्सा बनवून वाफेवर शिजत ठेवला. घड्याळात बघितलं सात वाजून गेलेले पण अयांश अजूनही उठला नाही. खूप थकलेला किंवा ताप असेल तरच अयांश उठत नसे. एरवी आपली आई आपल्याला उशीर होऊ नये म्हणून घेत असलेले कष्ट बघून अलार्म न लावताच साडे सहालाच उठे. आज काय झालं हे बघायला मेघा त्याच्याजवळ गेली. आठवीत असलेला, तिच्या खांद्याच्या वर उंची वाढलेल्या अयांशला बघून तिला लहानगा, तिच्या कडेवर खेळणारा अयांश आठवला. "अजूनही तसाच गोड दिसतोय. शरीर तेवढं वाढलं फक्त." मेघा स्वतःशीच पुटपुटली. तिचं लक्ष परत घड्याळावर गेलं. साडेसात वाजलेले. साडे आठला शाळा!

तिने अयांशच्या कपाळाला, पाठीला हात लावून बघितला. अजिबात ताप नव्हता उलट तो जागीच आहे हे त्याच्या हालचालीवरून तिच्या लक्षात आलं.

"काय हे अयांश साडेसात झालेत अन तु जागी असूनही झोपायचं मिस करतोय." मेघा बोलली.

"हो कारण मला नाही जायचं शाळेत आज."अयांश निश्चयानं बोलला.

"का? कोणी मारलं, काही केलं का सांग मला. मी बघते एकेकाला." टी शर्ट पायजामा घातलेली मेघा पदर खोचल्यासारखं करत उभी झाली.

"ए दुर्गादेवी असं काहीच नाही. बस इच्छा नाही आज जायची शाळेत." अयांश

"इच्छा नाही म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे.आता तर तूझ्यासोबत शाळेत यायलाच हवं मी." मेघा बेडवरून उठून आलमारीतून स्वतःसाठी ड्रेस काढत बोलली.

"नाही ना आई. इतकं काहीच सिरीयस नाही." अयांश

"मग?" मेघा

"अगं आज रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे शाळेत आणि काल यश म्हणत होता कि त्याने ऐकलं कि निरवी मला राखी बांधणार." अयांश खाली मान घालून बोलला.

"मग?" मेघा

"काय मग मग करतेय? तिने मला राखी बांधली तर मी तिचा भाऊ नाही का होणार आणि तुला तर माहित्येय मला आवडते ती म्हणजे माझा क्रश आहे ना तिच्यावर मग राखी कशी बांधून घेऊ तिच्याकडून?" अयांश अगदी नाराजीच्या सुरात बोलला.

मेघाला खूपच गंम्मत वाटली. तिला आठवलं, ती लहान असतांना तीही एका वर्गमित्राला राखी बांधायची. पण इतर मुली म्हणायच्या,
"तु जशी बोलतेस आणि बघतेस त्याला त्यावरून तुला तो भैय्या नाहीतर सैय्या म्हणून जास्त शोभेल."
पुढे शाळा संपली. संपर्क तुटला आणि तीही त्याला विसरली.
"अच्छा म्हणजे तुला राखी बांधण्यापासून काही त्रास नाही तर ती तुला भावाचा दर्जा देईल म्हणून तु नाराज आहेस." मेघा.

"हम्म !" अयांश.

"बरं मला सांग रक्षाबंधनचा अर्थ काय आहे?" मेघा

"रक्षण करायचं बंधन."अयांश

"म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही तिचं आयुष्यभर रक्षण करणार असं वचन देणारे बंधन." मेघा.

"हो." अयांश.

"हे वचन सर्वच आपल्या प्रिय व्यक्तीला देतात रे. 
फक्त बहीणच भावाला राखी बांधत नाही बायको तिच्या नवऱ्याला, आई तिच्या मुलाला, मुलगी आपल्या बाबालाही राखी बांधते." मेघा.

"हो मी बघितलं तुला बाबाला राखी बांधतांना." अयांश आठवून म्हणाला.

"हो पण भाऊ बहिणीचं रक्षण प्रित्यर्थ रक्षाबंधन ही प्रत्येक मुलाला त्याच्यात जाणीव रुजवण्यासाठी असतं कि त्यानं मुलीला आधी बहिणीच्या नजरेनं बघावं. तिला होणारा त्रास समजून घेऊन वागावं. बघ महाभारतात घडलेला द्रौपदी वस्त्रहरणचा प्रसंग. श्रीकृष्ण, दुर्योधन आणि दुःशासन तिघांमधून कोणीच द्रौपदीचा सक्खा भाऊ नव्हता. पण श्रीकृष्णाने तिचं रक्षण केलं तर दुर्योधन, दुःशासनने तिला मरणयातना दिली. तर बाबा यातून मी एकच बोध घ्यायला सांगते कि श्रीकृष्णा सारखा सखा बनावं, दुर्योधन, दुःशासन सारखं त्रासदायक नाही.

बघ काय होतं ना कि शाळेत तुम्ही मुलं मुली सारखी भांडणं करता. म्हणून शिक्षक लोकांनी लढवलेली ही शक्कल कि राखी बांधून मुला मुलींना जाणीव करून द्यायची कि तुम्ही एकमेकांचे भाऊबहीण आहात या अनुषंगाने एकमेकांना बघा, एकमेकांशी वागा. नुसती भांडणं करत बसू नका तर बहीण भावाच्या आपुलकीने एकमेकांना मदतीचा हात द्या.

हेच तु आज 'सुविचार/दिवसाचं महत्व' या ऍक्टिव्हिटीमधे बोल सुद्धा."

"अरे हो आज माझी पाळी आहे 'सुविचार/दिवसाचं महत्व' बोलायची. मी असंच बोलणार." अयांश आनंदून बोलला. पण लगेच कसल्याशा विचाराने त्याचा चेहरा पडला.

"आता काय?" मेघाने विचारलं.

"पण ती राखी बांधायला आली तर मी गपगुमान राखी बांधून घेऊ तिच्याकडून?"अयांश चेहरा पाडून बोलला.

"गपगुमान नाही रे. सरळ बोलायचं कि मी एका भावा सारखं तुझं रक्षण करेल पण हृदयाने एक मित्र म्हणूनच राहणार आणि सोडून द्यायचं बाकी वेळेवर कारण पुढे तु कॉलेजला जाशील, मग ऑफिस किंवा कामानिमित्त परदेशीं तेव्हा क्रश होतीलच तुझे. म्हणून आताच घाई करू नकोस, निराश होऊ नकोस. स्वतःला आयुष्य समजून घ्यायला वेळ तर दे कारण अजून हेच निश्चित नाही कि ती राखी बांधणार कि नाही. दुसरं कोणा बद्दलही कधीच obsessed नाही व्हायचं. त्याला/तिलाही स्वतःचं व्यक्तीमत्व असतं. फक्त..."

"श्रीकृष्णा सारखं सखा बनून चालायचं." अयांशने मेघाचं वाक्य पूर्ण केलं.

मेघा त्याच्या केसांवरून हात फिरवत उठली, "चल धाव मग बाथरूममधे."

"ओके मातोश्री." अयांशनेही स्मित करत बाथरूममधे धाव घेतली.

धन्यवाद !

माझा चौथीत असलेला मुलगा मला प्रश्नांनी भांडावून सोडतो. त्याच्या शाळेत नुकतेच रक्षाबंधन झालं. तेव्हा मला प्रश्न पडला कि पुढे चालून याने मला अयांश सारखं प्रश्नात टाकलं तर मी काय उत्तर द्यावं म्हणून लिहिलेला हा लेख. आवडल्यास कमेंटून सांगा नक्की.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार