मनात जपलेली ती शेवटची भेट

Love Story
" मनात जपलेली ती शेवटची भेट"



तो भेटण्या अगोदर जीवन तसं ठीकठाक चालू होत तिचं, ना कसला आनंद ना कुठलं दुःख. तिला असं वाटायचं की या जगात दोन प्रकारचं प्रेम असतं, \"एक ते जे तुम्हाला आयुष्यात मजबूत बनवतं\", आणि दुसरं \"जे तुम्हाला दुबळ बनवतं\". पण जेव्हा ते निघून जातं, तेव्हा मागे उरतो फक्त गमावलेला अभिमान किंवा खूप सारं दुःख!

प्रेमात जेव्हा मन तुटतं तेव्हा माणुस एकतर प्रेमापासुन दूर पळतो किंवा काहीही करुन आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहातो. आणि नाहीच काही जमलं तर कामात गुंतवून स्वतःला तो आयुष्यातून प्रेम नावाच्या आजारातून पळवाटा शोधत राहतो, हे गणित तिच्या डोक्यात घर करुन बसलेलं. 

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ती त्याला एका अशा ठिकाणी भेटली, जिथे ना ती प्रेम शोधत होती ना त्या प्रेमापासून दूर पळत होती. ती तिच्या त्रासलेल्या आयुष्यात व्यस्त होती, पण त्यांचं असं भेटणं म्हणजे तिचं भाग्य होतं, की त्याचं भाग्य होतं, हे तिला आजवर समजलं आहे की नाही, हे तिलाच सांगणं कठीण जाईल.

चर्चगेटपासून थोड्या दूर सुमारे दोन मैलाच्या अंतरावरच तिचं ऑफीस होतं. मुंबईच्या त्या गर्दीत व गजबजाटात, त्या गोंगाटमय, घाम गाळणाऱ्या उकाड्यात बॅकरोड पासून ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा तो संध्याकाळचा चिकचिकाटाने भरलेला कॅबचा प्रवास तिला \"सदींयो से भी लंबा\" वाटायचा. दिवसभराचा तो थकवा, कामाचा व्याप आणि रोजची धावपळ यातून स्वतःसाठी जरासा तरी वेळ काढणं तसं कठीणचं.

सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमधे झाल्यानंतर पहिल्यांदाच ती त्याला एका अशाच एका गजबजाटात संध्याकाळी भेटली, कॅबवाल्याशी भांडता भांडता, फोनवर ऑफिसमधल्या ज्युनियरला झापतं असताना, मनातल्या मनात हजारवेळा शिव्या देतं, मोठमोठ्याने ओरडत व पाय आपटत असलेल्या अवस्थेत त्रस्त होऊन ती शेवटी मरीन ड्राईव्हच्या त्या स्पाॅटवर पोहोचली जिथे तो तिची वाट पहात होता. त्याची आणि तिची पहिली भेट. 

बेधुंद मनाच्या सागरी लाटांना साक्षी ठेवून, कातरवेळीच्या त्या रंगीबेरंगी आसमंताखाली तिने त्या चंद्राची पहिली झलक पाहिली. तो तिच्या कॅबच्या शेजारी आला व तिला म्हणाला,"तू नेहमीच इतकी सुंदर दिसतेस...? की फक्त रागात...?"  त्याच्या ह्या शब्दांनी तिच्या चेहर्‍यावरचा राग मावळला. सर्व वादळ, राग, चिडचिड आणि थकवा दूर झाला आणि ती क्षणार्धात विरघळली. उन्हाच्या तडाख्याने एखादा बर्फ विरघळावा तशी ती विरघळली. त्याच्या त्या शब्दांमध्ये, त्याच्या त्या हसून बोलताना गालावर उमटलेल्या खळीमधे ती हरवून गेली. त्याने तिच्या सर्व तणावाला, रागाला, चिडचिडेपणाला थंडपणे धबधब्याखाली लोटलं असावं. अशा गारव्याची जणू नव्याने तिला ओळख झाली असावी. 

पण त्याचं काय आहे ना...ती बोलायची जरा जास्तच, म्हणून सायंकाळी सुरु झालेली ती डेट, उशीरा रात्र होईपर्यंत संपण्याचं नावचं घेत नव्हती. तिचं ते, न थांबता बोलणं, मनातलं सारं काही त्याच्या त्या गहिर्‍या डोळ्यांत पहात बोलणं, तो शांतपणे ऐकून घेत होता. पण रात्र झाली होती घरी तर दोघांनाही जायचं होतं, तेव्हा तिने घरी जाण्यासाठी कॅब पकडली, आणि जसं तिचं घर जवळ आलं ती त्याला "बाय" म्हणाली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यांनी एकमेकांचा ओलमोस्ट किस घेतलाच होता इतक्यात त्या दोघांनाही वाटलं की, कदाचित समोरच्याला अवघडल्यासारखे वाटेल, म्हणून श्वासांच्या धाग्यात गुंफता गुंफता जसा अलगद एक पदर सुटून मोत्यांची माळ विखूरावी अशी स्थिती झाल्याने...त्यांनी ते टाळलं. पण त्या रात्री नंतर दोघांचा भेटायचा, बोलायचा, हसायचा, तासंतास एकमेकांत गुंतायचा नित्यक्रम सुरू झाला. तिने बोलत जाणं, त्याने तिच्यात हरवत हरवत सारं काही न ऐकूनही मान डोलावत ऐकणं. त्याला ती खूप आवडली होती, पण तो काहीही बोलला नव्हता. 
वेडेपणाचा आणि आणखी गप्पांचा सिलसिला दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला. तो तिच्यासाठी फोनवर आपल्या घोगर्‍या आणि बेसुर सुरतालांच्या आवाजात,
"अगर तुम साथ हो.....,आणि चन्ना मेरेया मेरेया...... " गात असे, तिला हसवण्याचा, नकळतपणे आपलं प्रेम एखाद्या नुकत्याच फुललेल्या फुलाच्या नाजुकश्या ओंजळीत सुगंधाप्रमाणे भरण्याचा प्रयत्न करत होता. 
" मला कोणत्याही नात्यात गुंफायचं आणि गंतायचं नाहीये" हा विचार तिच्या मनाशी भांडत होता. मन त्याच्यात बुडायला सांगत होतं, पण मेंदू ऐकत नव्हता. 

 त्याचा तो मूर्खपणा, तो गोडवा, तो लडिवाळपणा आणि ती प्रेम व्यक्त करण्याची पद्धत या समोर ती हळूहळू हरवत चालली होती. तिला ते सारं काही अगदी मनापासून आवडत होतं, पण....तिचं मन द्वंद्वामधे अडकलं होतं. 

एकदिवस अचानक गाता गाता तो थांबला, आणि म्हणाला,"आय लव्ह यू...!" 
ती घाबरत, चाचपडत हळुच म्हणाली, "असं थोडी असतं..! नाही नाही" आणि अतिशय मजेशीर आवाजात मिश्किलपणे तो म्हणाला, "बसं असतं! कुणी तरी स्वतःहून अधिक आवडणारं, हवहवसं वाटणारं, कुणीतरी आपलं" आणि मग काय त्याच्या त्या भावनिकपणात आणि नाजुकपणात ती पुन्हा विरघळली!

तिला तो आवडत होताच, पण नात्यांची तिला भीती वाटत असे, आतल्या आत तिला नातं, गुंतागुंत सगळं नको वाटायचं, पण आपली हिम्मतं एकवटून तिने विचार केला,\"प्रयत्न करुन पाहूया, असं स्वतःला थांबवून कसं होणार.\"

त्यानंतर ते चांगल्या मित्रांपासून क्लोज फ्रेंड्स झाले आणि बेस्ट फ्रेंड बनण्या आधी प्रेम सुरू झालं...! 

तिच्या रक्तगटाहून अधिक पॉझिटीव्ह जीवनाकडे पहाण्याचा त्याचा दृष्टीकोन पाहून, त्याच सुंदर मोकळं मन जाणून घेऊन, एक दिवस ती ही म्हणाली "आय लव्ह यू टू". 

तो म्हणाला "आय नो" त्याच्यासोबत घालवलेले नंतरचे काही वर्ष तिच्या आयुष्यातले सर्वात सुंदर, आणि विलक्षणीय क्षण होते. त्याच्या सोबत फिरणं, कुठें आयुष्यात खडतर प्रसंगातल्या अंधारात त्याला कडाडून मिठीत घेऊन, ओलावलेली पापण्यांची किनार घेऊन, आतल्या सागराला पाझरवणं तिला मोकळं आणि टवटवीत करुन जायचं. दोघांनी खूप सारे आनंदी क्षण एकमेकांसोबत घालवले, खूप सारे चढ उतार, दुखःद क्षण त्यांनी सोबत घालवले. 

तिने त्याला या काळात तिच्यासारखे मजबूत बनवले. 
त्याने तिला त्याच्यासारखे शांत व संयमी बनवले. प्रेम हेच तर असतं ना! 


पण...हे ,"आय लव्ह यू टू " पासून, "आय लव्ह यू बट्ट....." चं  परिवर्तन कधीकधी वेळे आधीच येऊन उभं रहात. सुटे असणारे धागे अलगद वार्‍याच्या झोताने कसे गुंतत जातात कळतच नाही. तिच्या विचारांचं तसचं होत होतं. आयुष्यातल्या विस्कटलेल्या धाग्यांसोबत ती त्याचं प्रेम पिंजत गेली.

दोन वर्षे एकत्र राहूनही जीवनातील ग्रासलेल्या त्रासांनी आणि घरच्या व वैयक्तिक कारणांनी त्यांच्यात बऱ्यापैकी बिनसू लागले. आयुष्यात चित्रपटाप्रमाणे किंवा पटकथेप्रमाणे सारं जुळून येईलचं असं कोणं म्हणतं? 

नंतर हळुहळू तासनतास ते दोघे त्याच स्पाॅटवर बसून, एकमेकांशी न बोलता, वेळ घालवत असत आणि ती नेहमी तिच्या पहिल्या डेट बद्दल विचार करत असे. त्या उकाडा, चिकचिकाट आणि चिडचिडीमध्ये, ती त्याच्या सोबतचा तो क्षण नीट अनुभवणेच विसरुन गेली होती. एका अशा संध्याकाळी ते दोघे मरीन ड्राईव्हवरच्या रस्त्यावर चालत होते, तेव्हा तिच्या मनात विचार आला की, जर तो क्षण पुन्हा जगता आला तर...कदाचित या वेळेस ती,"आय लव्ह यू..." आधी बोलली असती. ह्या वेळेस ती प्रेमाला आणि कमिटमेंटला घाबरली नसती आणि कदाचित या वेळेला तिने त्याच्यावर बरोबर प्रेम केले असते. ह्या वेळी तिने नात्यांच्या त्या रेशमी धाग्यांना सुटसुटीतपणे पिंजल असतं. तिला अशी हरवलेली, गहिवरलेली पाहून त्याने विचारले,"पुन्हा भेटशील मला...?"

तिच्या काही बोलण्या अगोदरच त्याने तिला कॅब मध्ये बसवलं आणि ड्रायवरला म्हणाला,"हिला शहरात नेऊन फिरवून आण", तिने काही बोलण्या अगोदरच तो तिथून गायब झाला आणि संध्याकाळच्या साडेसातची गर्दी तर आपल्याला माहीतच आहे, ती पुन्हा त्या गरमी, चिपचिप, गोंधळ, गडबड, धावपळ, आणि गर्दीने हैराण होत होत, त्या स्पाॅटवर पोहोचली, जिथे तो सायंकाळपासून तिची वाट पहात होता. तिला त्या कॅबमधून खाली उतरताना प्रेमाच्या रंगीबेरंगी  लाटा किनार्‍यावर आणणार्‍या त्या सागरी किनार्‍यावर, आसमानाशी घट्ट बिलगून अतूट असा नात्यांचा धागा बांधलेला तो हळवा आणि नाजुक वाटणारा सूर्य मावळतीला जाताना तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, "तू ना नेहमीच एवढी सुंदर दिसत होती". मग काय ती पुन्हा पिघळून गेली त्याच्या त्या नाजुकपणात भावनिकपणात. 

त्यांनी त्या दिवशी खूप गप्पा मारल्या, खूप हसले, खूप रडले, 
खूप काही शेअर केलं मग घरी यायची वेळ झाली, तिने त्याला मिठी मारली, त्या मिठीत आयुष्याच्या सगळ्यात सुंदर क्षणाला भरलं. पण आयुष्य आहे, कितीही हवीहवीशी वाटणारी वेळ परततही नाही आणि थांबतही नाही. ती वाऱ्यासारखी वाहत जाते, ज्याने कुठलीही मर्जी न चालवता तिला अनुभवलं त्याने सारं काही जिंकलं.

ती जड मनाने त्याला बाय म्हणाली पण त्यांनी "किस" केलं नाही. कारण त्यांना माहीत होतं ह्यावेळी ते एकमेकांना सोडू नाही शकणार, तिची "दुसरी, पहिली डेट" तिच्या आयुष्यातली सर्वात सुंदर डेट होती. निरपेक्ष प्रेम कसं करावं हे त्याने तिला शिकवलं होतं, त्याच्या डोळ्यातलं पाणी तो लपवू शकत होता, पण थोडसं वळाल्यावर त्यालाही ते जड झालं, त्याने पुन्हा वळून येऊन तिला घट्ट मिठी मारली. आणि भरभरून अश्रू ढाळून घेतले. 

ती रात्र त्यांच्या त्या नात्याला नाही वाचवू शकली, पण तिला एवढं जरुर सांगून गेली की, "जगात एक अजून वेगळ्या प्रकारच प्रेम पहायला मिळतं," ते बसं राहून जातं, अपूर्ण असलं तरी ते एका परीने पूर्ण असतं, तुमच्या आत, तुमच्या सोबत, तुमच्या आठवणीत, तुमच्या स्वभावात, सोबत ती व्यक्ती राहो न राहो, ते प्रेम मात्र रहातचं. निरपेक्षपणे आधार देतं. त्याला कसलीही अपेक्षा नसते, म्हणूनच ते दूर गेलं तरी त्यातला गोडवा कधीही सुटत नाही ना! तितक्याच आल्हादपणे मनाला विसावा देऊन दोन डोळ्यांत नाजुकसे विभिन्न दोन थेंब टेकवून मनाला समाधान देऊन ते आपलं न संपणार अस्तित्त्व मांडून जात असतं, क्षणाक्षणाला आणि कणाकणात दडून.

ती आज पण कधी "चन्ना मेरेया...." ऐकू लागली, की तिला त्याचा आवाज ऐकू येतो. त्याचा गुफीनेस, तो पहिला आय लव्ह यू, तो फ्लर्ट करण्याचा अंदाज, त्याची प्रेम करण्याची पद्धत, त्याचं ते निरपेक्ष प्रेम, आणि प्रत्येक गोष्ट एका गोष्टीचा विश्वास देऊन जाते, की आयुष्यात कधी ना कधी आपल्या आतल्या गर्दीतून हरवून, जरी लेट झालो तरी आपण आयुष्यात, एका अशा प्रेमाला भेटतो, ज्याला आपली ताकत किंवा कमजोरी, स्वाभीमान, किंवा मतलबीपणा, मी पणा, आज उद्या...., पास्ट आणि फ्युचर. .., आय लव्ह यू टू..., आय लव्ह यू बट..., मी व तू..., अशा कशाशी काहीच संबंध नसतो ते बस, "असतं...!" आपल्यासाठी आपलं होऊन कायमचं........... 

ख्वाहिशों की दिल पे मेरे बौछार उसकी रही
अनकहे उसके वादे की साथ, साथ मेरे रही
उसके सपनों की वो राहे, आखों मे बिखरी
अनकहे उसके वादों मे, सुबह शामें मेरी गुज़री

उल्झी हुई मेरी जिंदगी उसके साथ, सुलगती तो रही
पर अनकही उसकी यादें, खाली एहसास बनकर रही
कहानी अधुरी लिखके मेरी, जिंदगी पूरी होती रही
अनकही उसकी यादें कितनी, प्यास बनकर रही

इज़हार ओर तारिफों मे उसकी, पिघलती रही
मासुम सी उसकी मोहोब्बत, शायद अनसुनी ही रही
गुस्सेको भुलाकर खुद के, उस जैसी होती रही
उसकी सुनाई यादों को अपने, दिल मे सजाती रही

मेरी पहली लव्हस्टोरी, किसी खुबसुरत किस सी रही.

©कल्पेश तांबे