तुझ्यासाठी तुलाच

letter to husband to express feelings and unconditional love

प्रिय गौतम,

आज फिर तुमपे प्यार आया है...
बेहद और बेशुमार आया है.....

तुझ्यातील तुला या बायकोकडून खूप लक्ष लक्ष सलाम.तुला वाटेल हे काय भलतंच?? पण घडलयच तसं..आपल्या संसारात नवरा म्हणून तू स्वतःला सिद्ध करतच आहेस.पण खरं सांगू?? एक माणूस म्हणून मनाने मोठा आहेस आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो की मी तुझी भार्या आहे. आजच्या प्रसंगावर मी काय व्यक्त होऊ?आणि कशी? आपण कित्येकदा एकमेकांना मनातील गोष्टी सांगून मन मोकळे करतो. पण आज त्याही पलीकडे जाऊन मला व्यक्त व्हायचंय.ते मला या पत्रातून बोलायचं आहे. कदाचित तू समोर असताना मी बोलू शकेल न शकेल म्हणून तर हा पत्र प्रपंच. हसू आलं ना??? हो आहे मी खुळी. पण या पत्रातून तुझ्याबद्दल प्रेम,आदर आणि भावना मला व्यक्त करावेसे वाटतात. कदाचित तुझ्या डोळ्यात बघून मी बोलू शकणार नाही, व्यक्त होऊ शकणार नाही म्हणूनच लिहिते हे मी पत्र तुझ्यासाठी तुला.

आज आपल्याकडे मदतीला येणाऱ्या मावशी ढसाढसा रडत आल्या. नवरा खूप त्रास देतो पैशांसाठी म्हणे."आता कसं करू? मुलांचे शिक्षण पाणी कसं सांभाळू ? घर भाडे कसे देऊ?" अशी त्यांची व्यथा त्या सांगत होत्या. इतक्यात दारावरची बेल वाजली, दारात मावशींचा नवरा उभा होता.. तो त्यांना जोरजोराने आवाज देत होता. काही भलताच प्रसंग होता तो.. पण तू ढाल बनून पुढे आलास. त्यांच्या नवऱ्याशी बोललास, तो काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता.. शेवटी तू तुझ्या भाषेत त्याला समजावलं." अहो तुमच्या बायकोची कदर करा.. काही वाटेल ते कसं बोलू शकता तुम्ही? त्या एकट्या संसाराचा गाढा ओढत आहेत.. त्यांना मदत करायची सोडून तुम्ही त्रास कसा देताय? वाटेल ते बोलून त्यांचा अपमान करू नका. एक बायको म्हणून त्यांना योग्य तो मान द्या... त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा.." तुझं हे बोलणं ऐकून मला फार अभिमान वाटला तुझा. माहित नाही तुझ्या बोलण्याचा त्यांच्या नवऱ्यावर कितपत परिणाम झाला. पण त्याने हात जोडून माफी मागितली.परिस्थितीला वैतागून हे तो वागतोय असं बोलला आणि निमूटपणे निघून गेला.
सुरुवातीला या प्रसंगाने मी धास्तावले होते. पण तुझ्या बोलण्याने आज एक माणूस त्याच्या बायकोची कदर करायला शिकला. मावशी तर शंभर वेळा आभार मानून गेल्या तुझे. त्यानंतर तुझ्या छातीवर डोकं ठेवून मी ढसाढसा रडले... खरं सांगू? ते अश्रू अभिमानाचे होते.. अभिमानाने ऊर भरून आला होता माझा. तुझे विचार ऐकून तू माझा नवरा आहेस या गोष्टीचा फार अभिमान वाटला मला.
सहा वर्ष झाली आपल्या संसाराला. या संसार वेलीवर एक नाजूक कळी पण उमलली. बाबा म्हणून तू तिचं सगळं किती प्रेमाने करतोस ना.. यातही तू पहिला नंबर पटकावला. मी ना.. अशी थोडीशी अबोल... पण  तुझ्या स्वभावाने, तुझ्या विचारांनी  मला बोलकी अबोली केली.
जसजशी वर्ष पुढे जात होती तसं मला समजलं अहंकार आणि भावना यात एक सूक्ष्म रेषा असते. तू कधीही तुझा पुरुषी अहंकार नात्याच्या आड येऊ दिला नाहीस. कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या क्षणांचा विचार केल्यावर वाटतं  भावना दुखावल्या गेल्या म्हणून मी उगाचच अहंकाराला कवटाळून बसते. पण खरं तर स्वतःची चूक झालीये हे लक्षात येऊन  कमीत कमी चूक मी स्वतःशीच मान्य केली पाहिजे आणि याचीच कबूली मी आज या पत्राद्वारे देतीये.
कितीतरी आनंदाचे क्षण आपण एकत्र घालवले आणि त्यासोबत दुःखही वाटून घेतलय आपण. आपण एकत्र सहजीवन जगतोय. जगणं हे फक्त श्वास घेणं नसतं रे.. माझ्या जगण्याला तुझं रूप आणि माझं अस्तित्व दिलस तू. मी अर्धांगिनी आहे तुझी पण खरंतर सप्तपदीचा खरा अर्थ जपतोयस तू माझा अर्धांगी बनून. कधीतरी गैरसमजुतीमुळे दुरावतो आपण पण तुझं माझ्या आयुष्यात असणं हे किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे याची जाणीव मला झाली की मी लगेच येते तुझ्याकडे. बर्‍याचदा तुझ्या वागण्याचा मी माझ्या मतानुसार अर्थ काढत असते. तुझ्या मनातही नसतं तसं तू तर अगदी सहज वागत असतोस. माझं वागणं तुला पटलं नाही तरीही अबोला धरून तुला हे संसाराचं गणित चुकवायचं नसतं. आणि मग "राग मनात ठेवून कोणाचं भलं झालंय का?"असं तू मलाच ऐकवतोस. खरच माझ्यासारख्या खळखळणाऱ्या या झर्‍याला तुझ्यासारखी शांत नदीच सामावून घेऊ शकते.
शेवटी एवढंच म्हणेन प्रत्येक क्षेत्रात व्यक्त होण्याचं माझं व्यासपीठ तूच आहेस. शेवटी काय आणि किती बोलू? शब्दालाही मर्यादा आहेत. आज मावशींचा प्रसंग घडला आणि तुझ्याबद्दल लिहिण्याचा योग जुळून आला. प्रेमाच्या या अथांग सागरात तुझ्या माझ्या संसाराची नाव कधीतरी हेलकावे खाईल पण एक दिवस नक्कीच आपण किनाऱ्यावर पोहोचू.. आणि  तुझ्यासाठी शिवाय  हे शक्य नाही...

शब्दावाचुन सारे कळले,शब्दांच्या पलीकडले....
तुझ्यात मी हरवून स्वतःला,जग सारे जिंकले....
                                                    तुझी प्रिय,
                                                       सिद्धी