Feb 28, 2024
प्रेम

कशासाठी? प्रेमासाठी! ( भाग 4 )

Read Later
कशासाठी? प्रेमासाठी! ( भाग 4 )

कशासाठी? प्रेमासाठी! ( भाग 4 ) अंतिम भाग


"आई, तुझ्या डोळ्यात पाणी ? माझे लग्न होते आहे म्हणून की ताईची आठवण येते आहे ? "

आईला रडताना पाहून स्वराने आईला विचारले.

"मलाही कळत नाही ,आज मला एवढे रडू का येत आहे ...यांच्या जाण्याने तर मी खूप खचून गेली होती. मला जगावेसेच वाटत नव्हते. पण तुमच्या दोघींकडे पाहून वाईट वाटत होते. वडील तर गेले आणि आईनेही काही केले असते तर ,तुमचे काय झाले असते ? या विचाराने तुमच्यासाठी जगत राहिली. कर्तव्यात कुठे कमी पडली नाही. पण जुईच्या पळून जाण्याच्या निर्णयाने मला वाईट वाटले. आपण कुठेतरी चुकलो ..ही बोचणी कायम मनाला टोचत राहीली.
ती घर सोडून गेल्यानंतर आपले जीवन थांबून राहिले नाही. पण मी पण एक आई आहे ना... तिच्यासाठी माझे मन किती रडत असते. तिची नेहमी आठवण येत असते. आता तुझ्या लग्नात ती आली असती तर किती बरे वाटले असते... तिलाही आणि तुलाही आनंद झाला असता. आज या सुखाच्या प्रसंगी तिच्या आठवणीने मन व्याकूळ झाले गं.
ती तर गेलीच पण आता तू लग्न करून सासरी जाणार ...मला कसे वाटेल गं? माझ्या आयुष्याला काय अर्थ उरेल गं ?
तुझा, जुईचा , माझा असा सर्व विचार करून मला रडू आले गं."

आई स्वराला म्हणाली.

" आई, तू जास्त काळजी करू नकोस , होईल सर्व बरोबर. "
स्वरा आईला धीर देत म्हणाली.


हर्षलच्या घरीही त्याच्या ताईचे लग्न झाले होते. तिला नवरा ही समजूतदार भेटला होता. हर्षलबद्दल सर्व सांगूनही तो लग्नास कोणतीही आडकाठी न ठेवता तयार झाला होता.
हर्षलच्या ताईचे व हर्षल चे छान बॉंडिंग होते. आणि जुईही ताईला लहानपणापासून आवडायची , तिची चांगली मैत्रीण होती. त्यामुळे ताईने आपल्या आईवडिलांना हर्षलला माफ करून घरी येण्याची परवानगी देण्यास समजावून सांगितले. तिच्या आईवडिलांनाही हर्षलची खूप आठवण येत होती आणि आता त्याच्याशिवाय आपले आहे तरी कोण ? आणि जुईला तर ते लहाणपणापासून ओळखतच होते त्यामुळे तिच्याबद्दलही त्यांचे वाईट मत नव्हते.
हर्षल आनंदाने आपल्या घरी जुईला घेऊन आला.
हर्षल दुसऱ्या गावी नोकरी करत होता , आता घरी आल्यानंतर त्याने नवीन नोकरी शोधली व नोकरी करता करता राहिलेले शिक्षण ही पूर्ण करणार होता. जुईनेही आपले पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला.
आता तिला फक्त आईला व स्वराला भेटण्याची उत्सुकता ,ओढ मनाला लागली होती.

स्वराचा नवराही तिला साजेसा, तिला समजून घेणारा भेटला. स्वराच्या आईबद्दल त्यांना आदर व आपुलकी वाटत होती. त्यांच्या मनातले दुःख स्वरा व तिच्या नवऱ्याने जाणले होते. त्यामुळे त्यांनी जुईला माफ करून तिच्यासाठी त्यांना माहेरची दार उघडे करण्याचे सांगितले. त्यांना स्वराच्या लग्नाची चिंता होती ,त्यामुळे इतकी वर्षे जुईची आठवण येऊनही तिच्याशी संपर्क ठेवला नव्हता. लोक काय म्हणतील ? समाज आपल्याला नावे ठेवणार? अशी भीती त्यांच्या मनात होती. पण आता स्वराचे सर्व व्यवस्थित पाहून त्यांनी लोकांचा विचार न करता जुईला माहेरी येण्यासाठी परवानगी दिली.

जुई तर या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होती...आईच्या घरी येताच तिला खूप रडू आले. आईची,स्वराची तिने माफी मागितली. इतक्या वर्षांनी जुईला पाहून आईला, स्वराला आनंद झाला होता.
जुईने आईला तू आजी होणार असल्याचे सांगताच आईला खूपचं आनंद झाला आणि बाळंतपणासाठी जुईला माहेरीच पाठवायचे असे जावईबापूंना सासूच्या अधिकाराने सांगितले. दोघी मुली, दोघं जावई घर कसे भरल्यासारखे वाटत होते.आपण आयुष्यात केलेल्या संघर्षाचे फळ मिळाले होते. असेच त्यांना वाटत होते.

जुईने आईला,बहीणीला सोडून हर्षल सोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला ..तो कशासाठी ? हर्षलवरील प्रेमासाठी!

हर्षलच्या ताईने आईवडिलांना हर्षलला माफ करून घरात येण्यास सांगितले ते कशासाठी? भावावरील प्रेमासाठी!

हर्षलच्या आईवडिलांनी हर्षलला माफ करून घरात घेतले ...कशासाठी? पुत्रप्रेमासाठी?

स्वराने आईला जुईला माफ करुन घरी येऊ देण्यासाठी सांगितले ...कशासाठी? बहीणीच्या प्रेमासाठी !

आणि आईने जुईला माफ केले ते कशासाठी ? आईच्या मुलीवरील मायेसाठी,प्रेमासाठी!


समाप्त..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//