कशासाठी? प्रेमासाठी! ( भाग 3 )

About Love

कशासाठी ? प्रेमासाठी! ( भाग 3 )


"जुई, आपण जे केले ते बरोबर की चूक ? हे मला कळत नाही. पण तुझ्या वर माझे खूप प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही , हे माझ्याइतके तुलाही माहित आहे. आपली मैत्री,आपले प्रेम हे काही आताचे नाही गं, ज्या वयात आपल्याला काही कळतही नव्हते.. तेव्हापासून आपण एकमेकांना ओळखतो, बरोबर खेळलो, बालपणीच्या सर्व गंमतीजमती करत एकत्र वाढलो. तू, मी, माझी ताई आणि आपली इतर मित्रमंडळी सर्व एकत्र किती मजा करायचो? लहानाचे कधी मोठे झालो ..हे ही कळले नाही आणि जेव्हा कळले तेव्हा तुझ्याबद्दल मैत्रीशिवाय अजून वेगळचं फिलिंग वाटत होतं. आणि मला जे वाटत होतं ते तुझ्या डोळ्यातूनही मला जाणवत होतं. आणि निरागस मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. नुसत्या प्रेमाने पोट नाही भरत म्हणून मी कॉलेजचे शिक्षण होताच नोकरीचे पाहणार होतो.माझ्या घरी आपल्या प्रेमाबद्दल सांगणार होतो आणि तुझ्या घरी रीतसर लग्नाची मागणी घालणार होतो. पण तुझ्या घरातल्यांनी तुझ्या लग्नाचा इतक्या लवकर निर्णय घेतला की, मला आपण पळून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच दिसला नाही.अजून तर माझे शिक्षणही पूर्ण झालेले नाही पण आताच आपण काही केले नसते तर तू लग्न करून सासरी गेली असती आणि मी तुझ्या विरहात वेडा झालो असतो. मला सोडून तुही तुझ्या जीवनात सुखी झाली नसती, हे ही मला माहित आहे. म्हणून तर तुझ्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना दुखवून, मागचा ,पुढचा कोणताही विचार न करता, आपण पळून जाऊन लग्न करण्याचा मार्ग निवडला. जे होईल त्याला सामोरे जात राहू एवढेच ठरवले."
हर्षल जुईला म्हणाला.

" हर्षल, हा निर्णय घेतांना मला किती त्रास झाला आहे,हे माहित आहे का तुला ? वडील गेल्यानंतर आईने मला व स्वराला मोठ्या कष्टाने मोठे केले, आमचे सर्व लाड पुरविले. आईचे व वडिलांचे असे दोघांचे प्रेम दिले. आमच्या इच्छा म्हणजे तिच्या इच्छा, आमची स्वप्ने म्हणजे तिचीच स्वप्ने ..अशीच ती जगत राहिली. तिने स्वतः चा कधी विचार केलाच नाही. ती फक्त आमच्या साठी जगत होती. आईबद्दल,स्वराबद्दल मला खूप प्रेम आहे. मलाही एक चांगली मुलगी,एक चांगली बहीण म्हणून त्यांच्यासाठी काही तरी करायचे होते.म्हणून चांगले शिक्षण घेऊन मी नोकरी करणार होते. आणि तू ही तोपर्यंत नोकरीत छान सेटल झाला असता. मग मी तेव्हा आपल्या प्रेमाबद्दल आईला सांगितले असते. पण मला काय माहित होते , आई माझ्या लग्नाची एवढी घाई करणार ते ? आणि आताच मी आपल्याबद्दल घरात विषय काढला असता तर कदाचित आई किंवा काका ,मामा वगैरे मंडळींनी आपल्या प्रेमाला सहजासहजी स्विकारले नसते.त्यांना सर्व सांगूनही त्यांनी माझे लग्न दुसऱ्या कोणाबरोबर लावून दिलेच असते.. मगं मी तेव्हा काही च करू शकले नसते. आणि असे झाले असते तर... आपले प्रेम आणि तू मला कधीही भेटला नसता. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाही जोडीदार म्हणून कधी विचार ही केला नाही. त्यामुळे दुसऱ्या कोणाशी लग्न करून मी सुखी राहिले नसते आणि माझ्याशिवाय तू ही सुखी राहिला नसता. हे मला माहित आहे. म्हणून फक्त तुझ्यासाठी,आपल्या प्रेमासाठी मी आईला,स्वराला दुखवून तुझ्यासोबत येण्यास तयार झाली. माझ्या या वागण्याने , त्यांना खूप त्रास होत असेल हे मला माहित आहे. त्यांच्या दृष्टीने मी स्वार्थी ठरली असेल . पण माझ्या समोर परिस्थितीच अशी होती की, मी घेतलेला एक निर्णय माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण देणार होते. लग्न केले असते तर ... तू मला भेटला नसता. त्यामुळे खूप विचार करून, मनावर दगड ठेवून, आईच्या व स्वराच्या प्रेमाला सोडून मी तुझ्याबरोबर आले.



क्रमशः

🎭 Series Post

View all