कशासाठी? प्रेमासाठी! ( भाग 2 )

About Love

'लग्नानंतर 6 व्या वर्षींच माझे सौभाग्य गेले. अपघाताने हे गेले. तेव्हा जुई 3 वर्षांची व स्वरा 5 महिन्यांचीच होती. माझ्या मुलींचे पितृछत्र हरवले. तारूण्यात माझ्या नशिबी वैधव्य आले. मुलींसाठी मी दुसऱ्या लग्नाचा विचारही मनात आणला नाही. मुलींची आई व बाबा दोन्हीही जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या होत्या. मी माझे स्वतः चे दुःख बाजूला ठेवून मुलींसाठी जगत होती. स्वतःच्या सुखापेक्षा मुलींच्या सुखाचा विचार करत होती.

जुईच्या सुखाचा विचार करूनच तिचे लग्न ठरविले होते. स्वतः हून मुलाकडील लोकांनी जुईला मागणी घातली होती. मुलगा ही इंजिनिअर, दिसायला ही चांगला ,माणसे ही स्वभावाने चांगली होती. जुईला लग्नानंतर शिकवण्यास तयार होते. या सर्व गोष्टींचा विचार करूनच जुईचे लग्न करण्याचे ठरले होते.'


हे सर्व आठवून,रडत असताना स्वरा घरात आली. आईला असे रडताना पाहून तिलाही रडू आले आणि ताईही घरात दिसत नव्हती म्हणून तिला अधिकच भीती वाटली.

स्वराला जुईने काय केले ? हे कोणत्या शब्दांत सांगावे , हे आईला कळत नव्हते. स्वराने आईच्या हातातील चिट्ठी घेतली व वाचली. ते वाचून तिची स्थितीही आईसारखीच झाली होती.ताईने एवढी टोकाची भूमिका घेतली. याचेच तिला आश्चर्य वाटत होते. घरात ताई आईजवळ,माझ्याजवळ सर्व गोष्टी सांगायची . आमच्या तिघांमध्ये मैत्रीचेच नाते होते. मग तिने एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवून ठेवली.

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला आमची मदत लागायची. आईला विचारल्याशिवाय ती काहीही करत नव्हती. आणि आता आयुष्यातील एवढा मोठा निर्णय तिने आम्हांला न सांगता, न विचारता घेतला. एवढे धाडस कसे आले तिच्यात ? तिने फक्त स्वतःचा विचार केलेला दिसतोय. आईच्या मनाचा तरी विचार करायचा ना ? आईने आमच्यासाठी किती त्रास सहन केला . आम्हांला कधीही कशाची उणीव भासू दिली नाही. नेहमी आमच्या सुखाचा विचार करत राहिली. तिने स्वतः दुःख सहन केले पण आमच्या पर्यंत कधीही दुःखाची झळ पोहचू दिली नाही.

आता ताईचे लग्न होणार होते म्हणून किती आनंदी होती आई! एक महत्त्वाची जबाबदारी पूर्ण होतेय असे तिला वाटत होते. पण जुईने असे वागून, तिला सुखाऐवजी दुःख, अपमान दिले. ती तर गेली हर्षल बरोबर , पण आता आईला लोकांचे प्रश्न,टोमणे,टिका या सर्वांचा सामना करावा लागेल तो वेगळाच! आणि माझे काय ? माझी काही चुकी नसतानाही लोक वेगळ्याच नजरेने बघतील ना माझ्याकडे!


आई व स्वरा दोघीही रडत होत्या, असे कसे झाले ? या प्रश्नाच्या उत्तरात एकमेकींना धीरही देत होत्या. पण आता आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय त्यांच्या कडे दुसरा पर्यायही नव्हता.


जवळच्या नातेवाईकांना बोलवून जुईच्या आईने सर्वांना ही बातमी सांगितली. सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले. जुईसारखी मुलगी असे काही करू शकते. यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.. तिच्या वागण्याबोलण्यातून तर ती किती साधी,सरळ,शांत वाटत होती. तिच्या मनात असे काही असेल असे कोणालाही कधी जाणवले नाही.... की तिने जाणवू दिले नाही!

सर्वांना जुईच्या आईची दया, सहानुभूती वाटत होती. तिने तिच्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडल्या होत्या. हे सर्वांना माहित होते. त्यामुळे कोणीही तिला याबाबतीत दोषी ठरवले नाही. उलट, तिचे सात्वन केले. जुई जिथे असेल तिथून समजावून परत आणू असे सांगितले. जुई व हर्षल कुठे गेले हे हर्षलच्या घरातल्यांनाही माहित नव्हते.

जुई व हर्षल सोबत गेले ही बातमी नातेवाईक, मित्रमंडळी व आजूबाजूच्या लोकांना समजायला वेळ लागला नाही.


जुईच्या सासरच्या लोकांनाही ही बातमी सांगितली. व त्यांची माफी मागितली.

आता लग्नाची एवढी तयारी झालेलीच होती,त्यामुळे जुईच्या जागी जुईच्या मावशीच्या मुलीचे लग्न करण्याचे ठरले. तिच्यासाठीही स्थळे शोधत होतेच आणि सासरच्या लोकांनाही मुलगी आवडली होती त्यामुळे ठरलेल्या तारखेला लग्न पार पडले.


क्रमशः


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all