प्रेमासाठी ( भाग ७)

प्रेमासाठी काही पण


प्रेमासाठी (भाग ७)


दोघांची जोडी चेहर्यावर आनंद घेऊन घरी परतली. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून आईबाबांना देखील खूप आनंद झाला. नंतर चार दिवस नुपूर माहेरी जाऊन आली. एकच दिवस सुट्टीचा उरला होता, तर तिने सहज रितेशला विचारले, " आज काय करू स्पेशल? "
" गुलाबजाम " रितेश
" ते आधीच करावे लागतात. आणि खवा पण नाहीये घरी. " नुपूर.
" मला खव्याचे नाही, तुझ्या ओठांचे गुलाबजाम हवेत. " रितेश.
" चावट झालायेस हं फार. " नुपूर लाजत.
" चावट काय? माझे हक्काचे आहेत. " तिच्या ओठांवर हक्क सांगत रितेश म्हणाला. तेवढ्यात रितेशची आई आत आली. अर्धवट ऐकून म्हणाली, " गुलाबजाम होय, करु की एवढे काय त्यात. पण तुला कसे आवडायला लागले रे रितेश, तुला तर कधीच आवडत नव्हते. "
" नाही, उगाच खावेसे वाचता येत, पण नको करू, मी एखादा दुसरा खाणार, कशाला तेवढ्यासाठी. " रितेश हसू आवरत म्हणाला. पण नुपूरला हसू अवहेलना म्हणून ती बाहेर पळाली.

नुपूर सकाळी उठून नेहमी प्रमाणे साधा स्वयंपाक करायला लागणार होती, तितक्यात रितेशची आई म्हणाली, " आज माझा उपास आहे. तुमच्या डाळभाता बरोबर माझ्यासाठी बटाटे लाव. तू करणार आहेस का उपास? "
" आज काय आहे आई. कसला उपास? " नुपूर.
" अग वटपौर्णिमा आहे. " आई
" मग मी पण करू का? " नुपूर
" अग तुला पटत असेल हे सगळे तर कर. माझ्या सासूबाईंनी करायला लावले म्हणून मी करते. मला पटत नव्हते, यांनाही नाही पटत. तुझी श्रद्धा असेल तर माझी काही हरकत नाही. तुला पुजा वगैरे करायची मी काही जबरदस्ती करणार नाही. देवाला मनापासून केलेला नमस्कार ही पुरतो. देव भक्तीचा भुकेला आहे, अस मला वाटते. तू हरतालिका करत होतीस का आधी? " आई
" नाही आई. माझ्या आईबाबांनीही माझ्यावर कधीच अशी काही जबरदस्ती केली नाही. आणि मला वाटते ह्या सगळ्या परंपरा हे सण सगळे सांकेतिक आहेत. जे त्या काळाप्रमाणे ठीक होते. पण आजच्या काळात देखील ती पाळावेत असे नाही. " नुपूर
" मग प्रश्नच मिटला. आणि मलाही असेच वाटते. वटपौर्णिमा पुजली म्हणजेच नवर् याविषयी प्रेम असते, त्याला निरोगी उदंड आयुष्य मिळते असे थोडीच असते. त्यासाठी नवराबायको मध्ये खरोखरच मनापासून प्रेम असावे लागते. मला वाटते आपण आपल्या कामाला महत्व द्यावे. कर्म हाच देव. तुझे तू आवर आणि जा. " आई
रितेशने पण नुपूरला वटपौर्णिमा वगैरे पुजा उपास कर, पुजा कर असे काही सांगितले नाही. तसही तो आणि त्याचे बाबा नास्तिक होते. माणसातील देवावर त्यांचा विश्वास होता.

पहिल्या दिवाळीला दोघांनी मिळून नवीन कार घेतली. दोन्हीकडचे आईबाबा एकदम खूश झाले. रितेशच्या आई वडीलांनी दोघांच्या नावाने एफ. डी. केली. जी त्यांना पुढे उपयोगी पडेल. रितेश नुपूरला चांगली लागल्यापासून नुपूरने बाबांचे पेन्शन रोजच्या खर्चासाठी वापरायचे नाही असे ठरवले. ती घरात खर्च करत होतीच, पण आईबाबांना पण देऊ करत होती. पण आईबाबानी स्पष्ट नाकारले. तरीही ती त्यांच्या नावाने बॅकेत ठेवत होती. नताशासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली होती. नताशा इंजिनिअर होती. तिला तसाच इंजिनिअर किंवा एम. बी. ए. झालेला मुलगा हवा होता. पण तिला भारताबाहेर देखील जायचे नव्हते त्यामुळे जरा वेळ लागत होता.

छान सुखात दिवस चालले होते. बघता बघता वर्ष दिड वर्ष होऊन गेले. नुपूरचे सी. ए. पूर्ण होऊन तिला एका मल्टी नॅशनल कंपनीत चांगला जाॅब मिळाला. तिचे व्यवस्थीत रूटीन सुरू होते. अचानक एक दिवस ऑफिसमध्ये भोवळ आली. तिच्या लेडीज कलीगने बघितले म्हणून, नाहीतर जोरात पडली असती. तिला ऑफिसच्या कारने घरी सोडण्यात आले. रितेश घरी नव्हता नाहीतर त्याने घर डोक्यावर घेतले असते. रितेशची आईही घाबरली. पण नुपूरनेच सांगितले, " नका घाबरू आई, संध्याकाळी जाऊन येऊ दवाखान्यात. एवढे काही नाही झाले. "
" तुझी डेट उलटून गेली का? " रितेशची आई
" हो. नुपूर लाजून म्हणाली.
संध्याकाळी आई आणि नुपूर त्यांच्या गायनीककडे जाउन आल्या. नुपूरची न्यूज कन्फर्म झाली. दोन्ही कडचे आईबाबा अगदी खुश झाले. रितेशला यायला आज नेमका उशीर झाला. तरीही नुपूर जागीच होती. तिने आल्यावर रितेशला जेवण दिले. जेवताना तिने रितेशला दुपारी भोवळ आल्याचे सांगितले. त्याने लगेच घाबरून विचारले, " कशाने आली भोवळ? पित्त वाढेल असे खाल्लेस का काही? "
" नाही. मी आणि आई जाऊन आलो दवाखान्यात. "नुपूर
" मग काय? " रितेश
" काही विशेष नाही म्हणाल्या डाॅक्टर. असे होणारच आता थोडे दिवस. " नुपूर
" म्हणजे? " रितेश
" जे खाली वाटेल ते सगळे खा म्हणाल्या. तीन महिने पूर्ण होईपर्यंत पूर्ण काळजी म्हणाल्या. " नुपूर.
" म्हणजे तुम्ही कोणत्या डाॅक्टर कडे गेला होतात? आपल्या नेहमीच्या डाॅक्टरकडे नाही का जायचे. " रितेशला काही समजले नाही.
शेवटी नुपूरच म्हणाली, " बुद्धू तू बाबा होणार आहेस. " नुपूर
" काय? रितेशला कळायला सेकंद लागला. नंतर तो आनंदाने नुपूरला उचलून फिरवू लागला. " नको रे, परत भोवळ येईल. " नुपूर
" ओह, साॅरी साॅरी. पण किती दिवस झाले? " रितेश
" दोन महिने झालेत. " नुपूर
" तू बोलली नाहीस मग" रितेश
" हूम" नुपूरने लाजून मान खाली घातली. तिसऱ्या महिन्यात सोनोग्राफी झाली, सगळे व्यवस्थित होते. बाळाची चाहूल लागली आणि नुपूरला प्रमोशन मिळून असिस्टंट मॅनेजर झाली. बाळाचा पायगुण झाला. दिवस भराभर पुढे सरकत होते. सातव्या महिन्यात रितेशच्या आईने डोहाळजेवण केले. नुपूरचा चेहरा गर्भ तेजाने उजळला होता. त्यात हिरवीकंच पैठणी, वर फुलांचे दागिने, या सगळ्यामुळे नुपूरच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यावर नुपूरला वाटी खालचा पदार्थ बघण्यासाठी वाटी उचलायला लावली. नुपूरने उचललेल्या वाटी खाली पेढा होता. " मुलगा" सगळे आनंदाने म्हणाले. " हे खरेच असे असते का? " रितेशने आईला विचारले.
" नाही रे, ही आपली पारंपरिक पद्धत म्हणून करायचे. जराशी मजा, आणि डोहाळतुलीचे लाड करायचे इतकेच. " रितेशची आई म्हणाली.
" डोहाळतुली म्हणजे? " रितेश
" जिला डोहाळे लागले आहेत ना तिला डोहाळतुली म्हणतात. " रितेशची आई.
नुपूरचे चंद्रावर, झोपाळ्यावर फोटो सेशन झाले. सगळा कार्यक्रम झाल्यावर नुपूर खोलीत आली. रितेशने तिला जवळ घेत विचारले, " तुला मुलगा हवाय का? "
" असे काही नाही. काहीही झाले तरी ते मला प्रिय असेल. फक्त ते सुदृढ व्हावे, निरोगी व्हावे इतकेच. " नुपूर
" पण मला मुलगी हवीय. "रितेश
" ते आपल्या हातात कुठे असते. जे नैसर्गिक आहे ते आहे. ते आधीच ठरले आहे. " नुपूर
" मुलगी झाली तर नाव काय ठेवायचे. "रितेश.
" तू सांग. " नुपूर
" मुलगी झाली तर मानसी ठेऊ. मानू मनासारखी, आपल्या दोघांची मानसी, तिच्या मनासारखे तिला घडवू. मनासारखे जगू देऊ. खूप शिकवू खूप मोठी करू. " रितेश
" आणि मुलगा झाला तर? " नुपूर

" मुलगा, मुलगा झाला तर त्याचे नाव मानव. त्याला माणूस म्हणून जागायला शिकवू. त्यालाही त्याच्या मनासारखे जगू देऊ. काही झाले तरी आपण मुलावर आपली मते लादायची नाही. " रितेश
"हूम, सगळे तर ठरवून ठेवले होतेस. मग सांगितले का नाहीस? आणि मी दुसरे नाव ठेऊ म्हंटले तर? " नुपूर
" तुला आवडेल ते ठेऊ. त्यात काय एवढे. " रितेश
" नको. छान निवडली आहेस तू. " नुपूर म्हणाली आणि त्याच्या कुशीत झोपून गेली.


क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all