प्रेमासाठी ( भाग १)

प्रेमासाठी सर्वकाही


प्रेमासाठी (भाग १)

रितेश नुकताच दहावी पास झाला होता आणि काॅमर्स काढलेला त्याने अॅडमिशन घेतली होती. तो सकाळी चहा पिताना त्याला समोरच्या इमारतीत नवीन कोणी रहायला आलेले दिसले. कोण असेल तो विचार करत होता. त्यांच्या गॅलरीतून खाली बरोबर त्यांची खिडकी होती. कोणी उभे राहिले खिडकीत तर बरोबर दिसायचे. बरोबर एक तरूण मुलगी खिडकीत उभी राहिलेली त्याला दिसली. आठवड्याभरात रितेशच्या आईची आणि त्या घरातल्या नेत्राकाकूंची ओळख झाली. त्यांना दोन मुली नुपूर मोठी आणि नताशा धाकटी. नुपूर फर्स्ट इयर बी. काॅमला होती. रितेश पेक्षा दोन वर्षांनी मोठी. तर नताशा आठवीत शिकत होती. रितेश पेक्षा तीन वर्षांनी लहान. साधारण एकाच वयाचे असल्यामुळे नुपूर आणि रितेश ची चांगली ओळख झाली म्हणण्यापेक्षा मैत्री झाली. रोज संध्याकाळी दोघे एकमेकांशी गप्पा मारत. बहुतेक नुपूर रितेशच्या घरी यायची. दोन्ही घरात यात काहीच वावगे वाटत नव्हते. दोघांची मैत्री अगदी घट्ट होत होती. दोघांची सारखी चेष्टा मस्करी चालू असायची. सतत नवीन पिक्चर वर चर्चा चालू असायची. नुपूरला मारामारी अजिबात आवडायची नाही. पण पिक्चर मधली गाणी मात्र ऐकायला आणि गुणगुणायला आवडायची. ती अकाउंटस् मधे एकदम हुशार तर रितेशला ते अजिबात आवडायचे नाही. तिचे जनरल नाचले खूप चांगले तर रितेशला स्पोर्ट्स मध्ये रुची.
रितेश खूप चांगली बॅडमिंटन खेळायचा, नुपूर खेळ म्हंटले की लांब पळायची. नुपूरने शाळेत असताना अभिनयाची भरपूर बक्षीस मिळवली होती. काव्यवाचन, अभिवाचन याचीही तिला आवड होती. रितेश कधी ह्या प्रांतात फिरकलाच नाही. दोघांमध्ये एकही आवड सारखी नव्हती तरीही दोघांची चांगली मैत्री झाली.

नुपूर ला काॅलेजमध्ये पण भरपूर मित्र मैत्रीणी होते. बोलकी मनमोकळी नुपूर सगळ्यांना आवडायची. हळूहळू रितेश ची सुद्धा नुपूरच्या सगळ्या ग्रुपशी ओळख झाली. त्यांच्या बरोबर तोही छान मिक्स होऊ लागला. नुपूर हुशार तर होतीच पण दुसऱ्या कोणालाही मदत करण्यात ती नेहमी पुढे असे. गरीबांना कोणी पडले की तिला फार राग येत असे. दिवसभर उन्हातान्हात बसून भाजी विकणार्या बायकांशी एक दोन रुपयांसाठी घासाघीस करणार्या बायका पाहिल्या की तिच्या तळपायाची आग मस्तकात जाई. ती मनात म्हणे, " या बायका किमी पार्टी, हाॅटेलमध्ये जेवणासाठी हजारो रुपये उडवतील, तिथल्या वेटरला पन्नास शंभर रुपये टीप देतील पण दिवसभर राबणाऱ्या हातांना दोन रुपये मिळू देणार नाहीत. " अशी तिची अनेक मते ती रितेश बरोबर शेअर करत राही. जातीपातीच्या ती पूर्ण विरोधात होती. माणूस त्याच्यामध्ये असणाऱ्या गुणांवरून ओळखला जावा, त्याच्या जाती वरून नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट माणुसकी असे तिला वाटत असे. हळूहळू तिच्या रोखठोक विचारांचा पगडा रितेशवरही पडू लागला. एकटा अलिप्त राहणारा रितेश चार लोकांना बरोबर घेऊन मेहनतीने थोडी समाजसेवा करू लागला. झोपडीत राहणार्या छोट्या मुलांना गोष्टी सांगणे, त्यांना चार चांगल्या गोष्टी शिकवणे कधीतरी त्यांच्यासाठी काही भेटवस्तू सगळ्यात मिळून वाटणे असे सगळे नुपूरचा ग्रुप करत असे त्यात तोही सामील होऊ लागला. रितेश मध्ये झालेला हा बदल त्याच्या आईवडिलांना सुद्धा आवडत होता.

हळूहळू एकमेकांबरोबर राहता राहता रितेश च्या मनात नुपूर बद्दल साॅफ्ट फिलिंग निर्माण होऊ लागल्या. ती दिसली की त्याचा दिवस छान जातो अस त्याला वाटत असे. पण आपल्या मनातल्या भावना सध्यातरी आपल्या मनातच ठेवायच्या असे त्याने ठरवले.

नुपूर ज्या झोपडपट्टी मधे जात होती तिथली काही मुले तिची टिंगल टवाळी करत तर काही एक दोन मुले तिला अभ्यास करून घ्या म्हणत. त्या मुलांना काही करून दहावी पास व्हायचे होते जेणेकरून त्यांना चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करता येईल. त्यांची इच्छा चांगली होती म्हणून नुपूर च्या बाबांनी परवानगी दिली आणि सेफ्टीसाठी एक मित्र बरोबर घेऊन ती त्या मुलांना शिकवायला जाऊ लागली. दोघे मिळून त्या मुलांचा दहावीचा अभ्यास घेत होते. नुपूरची आठवड्यात भेट न झाल्यामुळे रितेश ला ह्यातले काहीच माहिती नव्हते. त्या अभ्यास करणार्या मुलांपैकी संदीप नावाच्या एका मुलाला रितेशनी नुपूरशी बोलताना पाहिले. त्याचा गैरसमज झाला की तो नुपूरला त्रास देतो आहे. तडक जाऊन रितेशनी त्या संदीपची काॅलर पकडली आणि त्याला एक कानफटात ठेवून दिली. तो आणखी मारू लागला. नुपूर त्याला थांबविण्याचा प्रयत्न करत होती पण तो काहीच ऐकून घेत नव्हता. शेवटी तिने रितेश ला धरुन त्याला एक मारली तेव्हा तो भानावर आला. नुपूर ने रितेशच्या वतीने संदीपची माफी मागितली. व रितेश ला सर्व क्लियर केले. आणि ती तिथून निघून गेली. तिने रितेशशी बोलणे बंद केले. अचानक तो असा का वागला हे मात्र तिला कळत नव्हते. ती रितेशच्या घरी जाऊन त्याच्या आईशी छान बोलून यायची पण रितेशशी अजिबात बोलत नव्हती. एखाद्या गुंडासारखे रितेशचे वागणे, संदीपला भर रस्त्यात मारणे तिला अजिबात आवडले नव्हते. रितेश सारखा तिच्याशी बोलायला धडपडायचा. तिच्या गृपमध्ये जायचा, पण नुपूर बोलत नव्हती त्यामुळे त्याला तिथेही त्याला कंटाळा येऊ लागला. अखेर एक दिवस रितेशनी तिचा हात धरून तिला अडवले आणि तिला त्याचा गैरसमज झालेला सांगितले. " माझा खरचं गैरसमज झाला. मला वाटले तोही तुला त्रास देतो आहे, म्हणून मी त्याला मारले. " रितेश.

" तरीही डायरेक्ट मारामारी. तू मवाली गुंड आहेस का? तुला तर मी चांगला मुलगा समजत होते. " नुपूर.

" खरचं मी गुंड मवाली नाहीये. पण मला तुझ्याशी कुणी असे वागले तर आवडत नाही. तुझ्याशी कुणी उगाच जास्त मैत्री वाढवली तर मला त्याचा राग येतो. मला तू आवडतेस नुपूर. माझ्याही नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. " रितेश.

" कळतंय का तुला तू काय बोलतो आहेस ते? आधी अभ्यास कर. बारावीला आहेस ते चांगल्या मार्कांनी पास होऊन दाखव. स्वतःच्या करिअरचा विचार कर. मग बघू. " नुपूर.

नुपूरने रितेशच्या बोलण्याचा राग मानला नाही आणि काही विचार देखील केला नाही. ती मॅच्युअर होती. ह्या वयात मुले अस वागूच शकतात हे तिला पक्के माहिती होते. तिने परत रितेशशी बोलायला सुरुवात केली, पण थोडे अंतर राखून.

रितेशची बारावीची परीक्षा झाली आणि नुपूरची सेकंड इयरची परीक्षा सुरू झाली. नुपूर अभ्यासात गढून गेली. पूर्ण एकाग्रतेने ती अभ्यास करत होती. तिला चांगले मार्क मिळवायचे होते कारण त्यावरच तिची सी. ए. ची अॅडमिशन मिळेल की नाही हे ठरणार होते. ह्या दिवसात ती रितेशशी बोलायला गेली नाही. त्याला दिसली ही नाही, त्यामुळे रितेश अस्वस्थ झाला. तो नुपूरच्या घरी गेला तर ती दार लावून खोलीत अभ्यास करत बसली होती. त्यामुळे तो तिला भेटू शकला नाही. त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. हे रितेशच्या आईच्या लक्षात आले. आईच्या अनुभवी नजरेने सारे काही जाणले आणि रितेशच्या बाबांशी बोलून त्याला कुठल्यातरी कोर्स साठी अॅडमिशन घ्यायला लावली. त्यानेही पुढे उपयोगी पडेल हे जाणून काॅम्प्यूटरचा कोर्स जाॅईन केला आणि त्याचे रूटीन सुरू झाले. पण त्याची नुपूरची ओढ कमी झाली नाही. तिला बघण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तो तळमळत होता, पण परीक्षा झाल्याशिवाय नुपूर त्याला भेटणार नाही हे पण तो जाणून होता.

क्रमशः

सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज.

🎭 Series Post

View all