फ्लाॅवर्स

How Important Is SELF-LOVE !

12 जानेवारी 2023. प्रसिद्ध हॉलिवूड गायिका 'मायली सायरस' जिला सर्वजण 'हेना मोंटेना' म्हणून ओळखतात. हिने तिचं फ्लॉवर्स हे गाणं ह्यादिवशी लॉन्च केलं. ज्याला आत्ता झालेल्या ग्रॅमी सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळाला.
आता आपण म्हणाल, यात काय नवल आहे, अनेक गायकांना त्यांच्या गाण्यांसाठी ग्रॅमी मिळतातच की ! मग ह्या गाण्यात आणि गायिकेत काय विशेष ?
तर ऐका मंडळी...
'मायली सायरस' हीचं व्यक्तिमत्व म्हणजे एकदम सडेतोड, बोल्ड! दहा वर्षे ऑन-ऑफ रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या आपल्या बॉयफ्रेंड - जो प्रसिद्ध 'हेम्सवर्थ बंधू पैकी एक' असा- 'लायाम हेमस्वर्थ', याच्याशी तिने 2018 साली लग्न केलं.
सगळ्या विश्वाला आनंद झाला की ही जोडी अखेर लग्नबंधनात अडकली. परंतु एक वर्ष संपायच्या आतच, ह्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या. आणि एक दिवस या जोडीने त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
परंतु मायलीच्या रंगीबेरंगी व्यक्तिमत्वामुळे सगळ्या जगाने मायलीचीच काहीतरी चूक असणार, म्हणून तिच्यावर आळ घेतला.
मायली शांत राहिली, पण चार वर्षाने मायलीने असं काही कृत्य केलं, की ज्याच्यामुळे सगळं जग पुरतं हादरून गेलं. 12 जानेवारी म्हणजे 'लायामच्या वाढदिवशी' तिने तिचं 'फ्लॉवर्स' हे गाणं रिलीज केलं. ज्यात तिने सर्व जगासमोर तिच्या नवऱ्यानेच तिचा विश्वासघात केला होता, हे तिच्या गाण्यातुन अप्रत्यक्षपणे जाहीर केलं. एवढंच नव्हे, तर त्याने ज्या अभिनेत्री सोबत तिला फसवलं, त्या अभिनेत्रीने एका पुरस्कारसोहळ्यात घातलेला वेश तिने तिच्या गाण्यात परिधान केला.
पूर्वी लायाम ने मायलीला डेडिकेट केलेलं 'ब्रूनो मार्स' या गायकाच्या गाण्यांच्याच बोलांभोवती तिने तिचे 'फ्लॉवर्स' या गाण्याचे बोल रचले.
सगळे जग 'फ्लॉवर्स' या गाण्याची चर्चा करू लागलं व हे गाणं सलग अनेक आठवडे जागतिक गाण्यांच्या यादीत 'क्रमांक एक' ला राहिलं. अनेक विक्रम या गाण्याने गाजवले.
या गाण्याचे बोल इतके साधे-
(आय कॅन बाय माय सेल्फ फ्लावर्स)
मी स्वतःसाठी फुले विकत घेऊ शकते...

(राईट माय नेम इन द सॅन्ड)
वाळूत स्वतःच नाव स्वतः लिहू शकते...

(टॉक टू माय सेल्फ फॉर अवर्स)
स्वतः सोबत तासंतास गप्पा मारू शकते...

(से थिंग्स, यू डोन्ट अन्डरस्टॅन्ड)
तुला समजणार नाहीत अशा गोष्टीही मी स्वतःशी बोलू शकते...

(आय कॅन टेक माय सेल्फ डान्सिंग)
स्वतः सोबत नाचूही शकते आणि...

(अँड, आय कॅन होल्ड माय ओन हॅन्ड)
स्वतःचा हात स्वतः धरू शकते...

(आय कॅन लव मी बेटर दॅन, यू कॅन !)
मी स्वतःवर ,तू करू शकतो त्याहून कित्येक पटीने
जास्त, प्रेम करू शकते...!!!

या गाण्याने 2023 साली अनेकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत केली, असे अहवालातून प्रसिद्ध झाले आहे.
कारण यातून हे समजले की, आनंदी राहण्यासाठी आपण स्वतः स्वतःसाठी पुरे आहोत.
प्रत्येकाला सोबतीची गरज असते, परंतु स्वतः सोबत वेळ घालवणं, स्वतःसाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं, स्वतःवर प्रेम करणं अत्यावश्यक आहे , मग दुसरा कोणी आपल्यावर प्रेम करू अथवा नाही.
जेव्हा मनुष्याला याची जाणीव होते की प्रेम मिळवण्यासाठी मी दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही, माझ्या स्वतःवर मी खुद्द प्रेम करू शकतो, तेव्हा मनुष्य स्वतःवर लादलेल्या अनेक बंधनातून मुक्त होतो.
स्वतःवर प्रेम करायला कोणत्याही मोठ्या त्यागाची गरज नसते.
स्वतःला एकदा आवडीच्या पार्कमध्ये फिरायला न्या. आपल्या स्वतःच्या आवडीची एखादी डिश बनवून खा. स्वतःचा आवडता चित्रपट पाहायला स्वतःच जा. स्वतःचा छंद जोपासयला वेळ काढा, छोट्या गोष्टींपासूनही या 'स्व-प्रेमाची' सुरुवात करा आणि मग जादू पहा !!!
स्वतःच स्वतःला जेव्हा आरशात पहाल, तेव्हा तुमच्या डोळ्यांमधली ती 'चमक'च तुम्हाला सगळं काही सांगून जाईल...

2024 मधील ग्रॅमी सोहळ्यात हेच गाणं गाताना मायली अजून एक ओळ त्या गाण्यांमध्ये ऍड करते, ज्यामुळे सगळ्यांचे डोळे आनंदाने झगमगू लागतात.
(आय जस्ट वॉन माय फर्स्ट ग्रॅमी!!!)
मी माझ्या आयुष्यातला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकले !!!

जेव्हा आपण स्वतःसाठी कोणतीही छोट्यातील छोटी गोष्ट करतो, तेव्हा असाच कोणतातरी मोठा पुरस्कार जिंकल्याचा आनंदही आपल्या डोळ्यात तरळून जातो, हीच ती 'स्व-प्रेमाची' चमक !!!