फिरुनी पुन्हा नवी जन्मेन मी ( भाग २ )

ही एक कौटुंबिक कथा आहे


रात्री स्वप्नील आल्यावर सुचेताने त्याला सगळं सांगितलं निवाबद्दल.. हे असं इतकं टोकाचं वागणं ऐकून त्यालाही धक्का बसला. इतक्यात प्रियव्रतच्या मोबाईल वर निवाच्या मैत्रिणीचा मेसेज आला की निवा तिच्या फ्लॅट वर राहायला आलीये.. तिने निवाच्या नकळत प्रियव्रतचा नंबर घेऊन त्याला मेसेज केलेला. ते ऐकून सुचेता-स्वप्नील दोघांच्या जीवात जीव आला.

"त्यावेळी माझं चुकलंच का ग चेता?, मी तुला तो निर्णय घ्यायला लावला आणि आज जरी निवाला आपण नीट समजावलं तरी तिला कळेल का?" स्वप्नील सुचतेला विचारत होता

"नाही रे स्वप्निल आपण तेव्हा तो निर्णय राधताईंच्या सुखासाठीच घेतला ना..?? मग?? तेव्हा कुठे माहीत होतं पुढे हे असलं काही होईल. असो.. तु फ्रेश हो जेऊन घेऊ आपण.."

दुसऱ्या दिवशी दुपारी प्रियव्रत सुचेताला हाका मारतच घरी आला... "आई.. आई"

"अरे काय झालं??" प्रियव्रतच्या हाका ऐकुन सुचेता धावतच हॉल मध्ये आली.. पण समोर बघुन तिला घेरीच आली..

थोड्यावेळाने तिला शुद्ध आली.. शुद्धीवर आल्या आल्या सुचेताने प्रियव्रतला विचारलं "कशी आहे रे निवा??" अगं आई.. बरी आहे ती.. पाय फ्रॅक्चर झालाय फक्त..

निवाचा ऑफीसला जाताना तिचा अपघात झाला होता.. तिच्या मैत्रिणीने प्रियव्रतला फोन लाऊन बोलावलेलं.. आता ४०-४५ दिवस निवाला घरीच आराम करावा लागणार होता.

या दिवसांत सुचेताने सगळं केलं निवाचं. तिला काय हवं नको सगळंच पाहावं लागत होतं. पण यामुळे निवाच्या वागण्यात काहीही फरक पडत नव्हता. तिला कळत होतं मामी प्रेमाने आपलं.. सगळं कळत तर होतं पण वळत नव्हतं.

काही दिवसांनी निवाला बरं वाटलं. प्लॅस्टर निघालं.. ती हिंडू फिरु लागली. आता खरंतर तिला आपल्या घर सोडण्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत होता.. पण ती तसं दाखवत नव्हती.. मात्र आता एवढे दिवस घरात आणि माणसांत काढल्यामुळे तिला आता थोडा एकांत हवा होता.. त्यात ही एवढे दिवस ती आपल्या बाबांना भेटली नव्हती आणि इतकं आजारी असताना बाबा ही तिला भेटायलाही आले नव्हते की साधा फोन केला नव्हता.

त्यामुळे ती आज स्वतः त्यांना भेटायला खरंतर ते असे का वागले ह्याचा जाब विचारायलाच जाणार होती. आणि गावात तिला थोडा एकांतही मिळाला असता.. म्हणून ती गावातल्या घरी आली.

गावात तिच्या वडिलांचं छोट कौलारू घर होतं..
छान आजूबाजूला झाडं-झुडुपं आणि हवाहवासा एकांत..

घराजवळ गाडी लाऊन ती आली.. तिचे बाबा बाहेरच पेपर वाचत बसलेले.. पण तिला पाहताच उठून आत गेले.. तेवढ्यात अंजली ताई आतुन आली..

"अरे निवा.. बस हा तु.. आलेच मी" असं म्हणतच ती निवाच्या बाबांशी बोलायला आतल्या खोलीत गेली.. निवाही तिच्या मागोमाग आत गेली.. पण त्यांचं बोलणं चालु होतं म्हणुन दारातच थांबली..

"अहो तीने एवढा घोळ घातला तिथे.. घर सोडुन गेली.. नंतर ती पडली, पाय फ्रॅक्चर झालेला.. पण तुम्ही साधं बघायलाही गेला नाहीत.. कसं वाटलं असेल तिला.. माझी नाही पण तुमची तरी पोटची मुलगी आहे निवा. खरंतर मला तिला इथून कधी जाऊ द्यायचंच नव्हतं पण सुचेता वहिनी न्यायला आल्या आणि तुम्ही अडवलं ही नाही म्हणून मी गप्प राहिले. त्यापेक्षा महत्वाचं तुम्हीही तिच्याशी कधी प्रेमाने वागत नव्हता."

"मी कितीही जुळवून घ्यायचं म्हटलं तरी तिला ते सहज शक्य नव्हतंच.. पण हळूहळू जुळलं असतं आमचं.. पण शेवटी सावत्र आईकडे समाज सावत्र म्हणूनच पाहतो ना.. त्यामुळे तिच्या ही मनावर नकळत परिणाम होतंच होता.. म्हणुन मी तेव्हा जाऊ दिलं तेव्हा.. पण नंतर वाटलं ते चुकलंच माझं.. ती गेली आणि घर सुनंसुनं झालं आणि नंतर माझी ही कूस कधी उजवली नाही ती नाहीच..."

शंतनुराव गरजले, "आज इतकी वर्षं झाली पण.. पण अंजली तु नेहमी तिचा विषय या घरात का काढतेस?? इतकं जाणून घ्यायचंच आहे तर ऐकच आज. निवा.. निवा आमची मुलगी नाही."

अंजली : "म्हणजे??" अंजलीला आपण काय ऐकतोय त्यावर विश्वासच बसत नव्हता.. निवावर तर अजुन एक आघात झाला होता.. दारातच उभं राहुन ती बाबांचं पुढचं बोलणं लक्षपुर्वक ऐकु लागली..

शंतनुराव : "म्हणजे.. निवा माझी आणि राधाची मुलगीच नव्हती. अंजली.. लग्नानंतर बरीच वर्षं आम्हाला मुल होत नव्हतं. शेवटी सात वर्षांनी राधाला दिवस गेले.. पण ते ही मुल दगावलं.. तेव्हा राधा पार खचली.. स्वप्नील ने तिला माहेरीच ठेऊन घेतलं होतं.. महिन्याभरातच सुचेताला जुळी मुलं झाली.. एक मुलगा आणि एक मुलगी.. आणि राधा त्या दोन्ही मुलांसोबत रमली.."

"अंजली.. राधा जेव्हा गरोदर होती तेव्हा सारखी म्हणायची की आपल्याला मुलगीच होणार.. तिला मुलीची जास्त ओढ होती.. त्यामुळेच सुचेताच्या मुलीला तीच सांभाळत होती.."

"सुचेता आणि स्वप्नीलने तिला कधी विरोध केला नाही कारण त्याने तिची मानसिक स्थिती सुधारत होती. डॉक्टरच्या उपचारांना ती प्रतिसाद देऊ लागली होती. त्यानंतरच जवळजवळ वर्षभर ती माहेरीच होती.. तिथून सगळ्या वैद्यकीय सेवा जवळ आहेत त्यामुळे मी ही तिला बरं वाटेपर्यंत तिकडेच ठेवलं. आणि जेव्हा राधा पुर्ण बरी झाली तेव्हा मी तिला इकडे आणायला गेलो."

"पण अगं ती यायलाच तयार होईना.. सुचेताच्या मुलीला सोडुन ती येतच नव्हती.. पण तिला खुप समजावलं मी आणि बळेबळेच घेऊन आलो.. पण त्याचा लवकरच पश्चाताप झाला मला.. इकडे आल्यावर ती परत आपल्या कोशात गेली.. वेड्यासारखी वागू लागली.. कुठलंच काम न करता फक्त रडत बसायची... बाहुली घेऊन तिला आंजारात-गोंजारत बसायची.. काही दिवसानी अगदीच वेड्यासारखी वागू लागली... तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.. शेवटी न राहवून मी सुचेता आणि स्वप्नीलला हे सगळं कळवलं."

"आम्ही तिला परत डॉक्टर कडे घेऊन गेलो. त्यांच्यामते आता सुचेताची मुलगी हा एकच उपाय तिला बरं करु शकत होता. औषध घेऊन ती नॉर्मल झाली असती पण आनंदी नाही. तिच्या मनाने तेव्हा सुचेताच्या मुलीला स्वतःच मुल मानलं होतं. आणि ..

"आणि स्वप्नीलसाठी राधा म्हणजे त्याचा प्राण होता.. त्याने दुसऱ्याच दिवशी कसलाही विचार न करता राधा आणि त्याच्या मुलीला इकडे आणून सोडलं. आणि निवा या घरात आली"

"मी हरतऱ्हेने स्वप्नीलला समजावण्याचा प्रयत्न केला.. पण त्याच्यासाठी त्याच्या सुखापेक्षा राधाचं.. त्याच्या ताईचं सुख जास्त महत्वाचं होतं.."

"पण मला सारखं एकच टोचत होतं.. जुळी मुलं झाली म्हणून काय? आईला सगळी सारखीच.. सुचेताने कुठला दगड तिच्या हृदयावर ठेवला की स्वप्नीलने हा निर्णय तिच्यावर लादला? मला काहीच समजत नव्हतं.. आणि या सगळ्यामुळेच की काय मी निवाला आपली "मुलगी" नाही मानू शकलो अंजली.."

"काही का असेना आमच्या सुखासाठी आम्ही तिचं मुल आणलं... कसं वाटत असेल तिला... आणि म्हणूनच सुचेता जेव्हा निवाला न्यायला आली तेव्हा मी अडवू शकलो नाही.. किंबहुना मला ते करायचं नव्हतं..!!"

हे सगळं ऐकुन निवाला जबरदस्त धक्का बसला.. निवा मोठमोठ्याने रडू लागली.. त्या आवाजाने ते दोघे बाहेर आले.. निवाला रडताना पाहून ते दोघे समजुन चुकले हिने सगळं ऐकलंय.

निवाला आता प्रचंड अपराधी वाटत होतं... ती रडता रडताच बोलत होती.. "काय करत होते मी बाबा हे?? जी माझीच आई आहे.. तिलाच सतत बोल लावत होते.. तिलाच त्रास देत होते.. आई म्हणुन नाही.. पण मामी म्हणुन पण कधी तिच्यावर प्रेम नाही केलं मी. पण.."

"पण त्यांनी मला कधीच हे सत्य का सांगितल नाही..?? का केलं असं त्यांनी...? बरं त्यांनी नाही सांगितलं.. पण माझी वागणुक बघुन तुम्हीही आधी का नाही सांगितलं??"

"अगं तुला कळल्यावर तु म्हणाली असतीस कदाचित.. यांनी मलाच का दिलं? प्रियव्रतला का नाही दिलं? मी मुलगी म्हणून नको होते का???"

अंजली : "निवा.. एकदा मनाने ठरवलं ना बेटा की गैरसमज करून घ्यायचे की सरळ रस्तासुद्धा वळणा-वळणाचा वाटतो. राधाच्या अतिलाडाने तु हटवादी झालीस.. पण आता तुला खरं कळल आहे.. आता बघ तुला सुचेताशी.. तुझ्या आईशी.. नीट वागता येतं का..?? तिला प्रेम देता येतं का??"

शंतनुराव : "निवा.. तिने या घरपासून तुला तोडलं नाही तर उलट अजून एक हक्काचं घर दिलं.. "

अंजली : "हो निवा.. बघ.. आज प्रियव्रतकडे फक्त एकच आई-बाबा आणि एकच हक्काचं घर आहे.. पण तुझ्याकडे दोन-दोन आई बाबा आणि दोन हक्काची घरं आहेत.. आणि निवा.. राधा जरी आता नसली तरी ती पाहत असेलच.."

निवा रडतच अंजलीच्या कुशीत शिरली.. "दोन नाही गं आता माझ्या तीन आई आहेत... लहानपणी मी तुला ताई न म्हणता आईच म्हटलं असतं तर कदाचित मामी मला इकडुन घेऊन गेलीच नसती.. आई... मी तर कृष्णापेक्षाही भाग्यवान आहे गं...!"

निवा दोन दिवस तिथेच थांबली... अंजलीने तिच्या आवडीचं सगळं केलं होतं... तिसऱ्या दिवशी शंतनुराव आणि अंजली निवाला सुचेता-स्वप्नीलकडे सोडायला गेले.. त्यांनी घडलेली सारी गोष्ट त्यांना कथन केली...

सुचेता निवाकडे पहात होती.. निवाला झालेली तिच्या चुकांची जाणीव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

निवाला तर रडू आवरतच नव्हतं.. निवा सुचेताला म्हणाली..

"आतापर्यंत तुझ्याशी फक्त फटकूनच वागले गं.. तुझा कधी मामी म्हणूनही मी मान ठेवला नाही.. प्रेम केलं नाही.."

"पण आता नाही.. आता तुझ्या या मुलीचा नव्याने जन्म झाला आहे.. एवढ्या वर्षांत जे जे तु त्यागलं आहेस त्याची सगळी कसर भरून काढायची आहे मला...
आई...!!!"

समाप्त