फिरूनी नवी जन्मेन मी भाग-9
©®राधिका कुलकर्णी.
दोघांची मते शांतपणे एेकुन घेतल्यानंतर तिन्ही सिनियर्स एकमेकांकडे सुचक नजरेने बघु लागले जणु त्यांना हे दोघे असे काही बोलतील हे अपेक्षितच होते.त्यांचे असे एकमेकांकडे बघणे दोघांनाही आश्चर्यात टाकत होते.त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दोन्ही आया मिळुन चीडचीड, वैताग करतील आणि प्रस्ताव अमान्य करतील असे वाटत होते परंतु झाले उलटेच.तिघांनी हलकेसे स्माईल करत हा प्रस्ताव लगेच मान्य केला.पण नंतर ते जे बोलले ते ऐकुन दोघांची बोलतीच बंद झाली.
वेणूताई आणि नलिनीताईंनी फोनवर बोलुन आजची बैठक फळद्रृप झाली तर लगेच वाङ् निश्चय उरकुन घ्यायचे ठरवले होते.
दोघांनाही कुठलेच सोपस्कार नको असल्याने ही गोष्ट पटवणे जरासे अवघड जाईल तरीही त्याची तयारी ठेऊन ते सर्व तयारीनिशी सज्ज होते.पण दोघांनी लग्नासंबंधात घातलेल्या अटिमुळे ती मान्य करून बदल्यात वाङ् निश्चयासाठी दोघांना राजी करणे त्यांना सहज सोपे होईल असा त्यांचा कयास.त्यादृष्टीने आपली पावले उचलत
त्यांनी हळुच हा प्रस्ताव मांडला तसे दोघेही एकमेकांकडे साशंक नजरेने बघु लागले.
सुहास वेणूताईंना बाजुच्या खोलीत बोलायला घेऊन गेला.काय होणार हे उघडच होते.परंतु वेणूताईही तयारीतच होत्या.चार पावसाळे जास्त पाहिलेत ते काय उगीच.!!!
पण हा ही त्यांचा भ्रमच ठरला.
इकडे बैठक खोलीतच सुखदा हळु आवाजात आई बाबांना विचारत होती,"हे सगळे काय आहे आई?ह्या सगळ्याची खरच गरज आहे का?"
"तुम्ही काढलेल्या मुहूर्तानुसार पुढल्याच आठवड्यात लग्न ह्यावर आम्ही होकार दिलाय ना मग हे काय आहे पुन्हा?तुम्हाला का कळत नाहीये आमची मानसिक स्थिती?"
त्यावर नलिनीताई बोलल्या," हे बघ सुखदाऽऽ कार्य म्हणले की लहान असो की मोठ्या प्रमाणात पण विधीवत सगळे करावे लागते आणि इथे आपण आपल्या घरचेच तर आहोत कोण आहेत दुसरे.तुमच्या म्हणण्यानुसार घरगुती पद्धतीनेच तर करतोय ना मग तुम्हाला कसली हरकत आहे?हे बघ आता आम्ही ठरवतोय तसे घडु दे. एकदा का लग्न लागले की तुम्ही आणि तुमचे नियम,आम्ही काही तुम्हा नवराबायकोच्या मधे येणार नाही.पण आता जे ठरवलेय तसे घडु दे.."
सुखदा निरूत्तर झाली आईच्या बोलण्यावर.ठिक आहे म्हणुन तिने माघार घेत संमत्ती दिली.पण तिकडे खोलीतुन सुहासचा तावातावात बोलण्याचा आवाज एेकुन सगळेच चपापले.
"आई तुझी हनुमानाची शेपटी लांबतच चाललीय!!"
सुहास वेणूताईंना हे वाक्य बोलतच खोलीबाहेर पडला.
नलिनीताईंनी खुणेनेच सुखदाला जाऊन बघ काय चाललेय असे सुचवले.
ती खोलीपर्यंत गेली तोवर सुहास रागातच बाहेर पडला आणि त्याच्या बेडरूममधे गेला.कदाचित आपलं भडकलेल माथं शांत करायला गेला असावा.
वेणूताई पण उदास चेहऱ्याने बाहेर येत असताना दाराशी अचानक सुखदाला बघुन चपापल्या.काही न बोलताच त्या जाऊ लागल्या तसे सुखदाने त्यांना अडवले,"मावशी, डोळे पुसा,मी बघते सुहासकडे,बोलते त्याच्याशी.तुम्ही चिंता नका करू.शांत व्हा बघु आधी.
तिच्या सांत्वनाने त्यांना धीर आला.
"आता तुच बघ बाई निदान तुझे तरी ऐकले म्हणजे मिळवली.."
असे बोलतच वेणूताई पुन्हा बैठकीत आल्या.
सुखदा हळुच अंदाज घेत सुहासच्या बेडरूममधे गेली.दरवाजा किलकीला उघडा होता.दरवाजाकडे पाठ करून बेडच्या विरूद्ध दिशेने डोक्यावर हात ठेवुन डोळे मिटुन तो बसला होता.सुखदा हळु पावलांनी त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला अतिशय मृदु स्वरात हाक मारली,"सुहासऽऽऽ...ए सुहास..काय झाले. इतका का चिडलास वेणूमावशींवर?"
सुहासने डोळ्यावरचा अापला हात बाजुला करून हलकेच सुखदाकडे पाहीले.
एक सुस्कारा सोडत तो म्हणाला,"आई काय म्हणतेय ऐकलेस का?ती म्हणतेय आता रींग सेरेमनी उरकुन घेऊ.काय वेळ काय,प्रसंग काय आणि ह्यांना काय काय सुचतेय.एकतर ह्या लग्नालाच मी किती मुश्कीलीने तयार केलेय स्वत:ला माझे मलाच माहित आणि ह्यात ह्यांची हनुमानाची शेपटी वाढतच चाललीय..माझा प्रचंड संताप झालाय.ह्यांनी असे परस्पर कसे काय ठरवले आपल्याला न विचारता???
एऽऽक..,एक मिनीट..म्हणजे तुला हे सगळे माहिती होतेऽऽऽ???"आश्चर्यमिश्रीत कुतुहलाने त्याने रागानेच सुखदावर वार केला.ज्याअर्थी ती इतकी कूऽऽल राहुन त्याची समजुत काढायला आली त्या अर्थी तिची सहमती आहे हा त्याचा गैरसमज होणे स्वाभाविकच होते ना.
सुखदाने त्याचे सर्व शांततेने ऐकुन घेतले.आता आज तिची टर्न होती सुहासचा गैरसमज दूर करण्याची.तिने हे चॅलेंज स्वीकारले होते.
ती त्याला शांतपणे म्हणाली,"सुहास आज ना तु माझ्या भुमिकेत शिरला आहेस आणि मी तुझ्या.
सुहासला तिचे असे कोड्यातले बोलणे समजत नव्हते.आधीच डोकं काम करत नव्हते त्यात ही असे कोड्यात बोलत होती.तो वैतागुनच म्हणाला,"काय ते स्पष्ट बोल बरं.हे असले गोल गोल बोलणे मला समजत नाहीये.कसली बाजू कोणती भुमिका?"
सुखदाने बोलायला सुरवात केली,"तुला आठवते आपण कॅफेत भेटलो तेव्हा मीही एका गैरसमजापोटी तुझ्यावर चिडले होते आणि तु एकदम शांतपणे मला मी कसा चुकीचा समज करून घेतला होता हे पटवुन दिले होतेस,आज सेम तीच सिच्युएशन आहे आणि आज तु माझ्या जागी बसला आहेस.गैरसमज करून घेऊन."
एकदा आपण चुकीचा विचार डोक्यात ठेवुन विचार करू लागलो की सगळे अवतिभोवती चुकीचेच चाललेय असे वाटायला लागते पण तसे नसते.आता जास्त कोड्यात न टाकता मी तुला तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देते.बघ पटले तर…
प्रश्न क्रमांक एक- मला हे आधी माहीत होते का?
तर उत्तर आहे नाही.जेव्हा वेणूमावशी तुझ्याशी खोलीत जाऊन बोलत होत्या तेव्हाच इकडे आई बाबा माझ्याशी बोलले.
आणि क्रमांक दोन- मी कशी काय तयार झाले?
तर मी एक विचार करून त्यांना कोणताही विरोध न दर्शवता होकार भरला तेच लॉजिक तुलाही सांगते.बघ पटले तर…
"मला एका प्रश्नाचे उत्तर दे सुहास...हे लग्न आपण कुणासाठी करतोय?"
सुहास चकित होऊन बघत होता… "offcourse for the sake of kids...you know it.."
"Right..absolutely correct..मग ह्याचाच दुसरा अर्थ हा की आपली मनापासुन इच्छा नसतानाही आपण तयार आहोत..करेक्ट??"
मग मी हा विचार केला निदान कुणाच्या एकाची तरी इच्छा पुर्ण होऊ दे ना.
आपण तर नाईलाज म्हणुन करतोय सगळ्या गोष्टी मग निदान त्यांना तरी हे सगळे करून निखळ आनंद मिळत असेल तर करू दे ना त्यांना त्यांच्या मनासारखे.
शेवटी त्यांच्या इच्छेखातरच आपण ह्या सगळ्या सोपस्कारात अडकलोय ना मग त्यांचा आनंद तरी त्यांना मिळु दे की…
बस हा एवढा साधा विचार करून मी तयार झाले.जर तुला माझे हे लॉजिक पटले असेल तर फ्रेश होऊन पटकन बाहेर ये ऑलरेडी खूप लेट झालाय."
सुखदा सगळे बोलुन तिकडुन निघाली पण सुहास मात्र खजील होऊन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत राहीला.जे हिला सुचले ते मला का नाही सुचले??
किती त्रागा केला मी उगाचच…..
चला निदान एक समंजस पार्टनर मला मिळतेय ह्याहुन भाग्य ते काय…"
"लव्ह यु सुखदा..!!तु खरच किती बॅलन्स्ड आहेस विचारांनी…!!"
मनातल्या मनात संवाद करत तोंडावर पाणी मारून चेहरा फ्रेश करून सुहास पाचच मिनटात बाहेर आला जणु काही घडलेच नाही.
वेणूताईंना आश्चर्यच वाटले.एकदा एखादी गोष्ट पटली नाही की मग ती तो करणार नाही म्हणजे नाहीच पण आज सुखदामुळे हा चमत्कार घडला होता.त्यांनी मनोमन सुखदाचे आणि देवाचे आभार मानले.सुखदा सारखी समंजस,विचारी मुलगी लक्ष्मी बनुन ह्या घरात येतेय ह्याचेही देवाजवळ आभार मानले.
आता त्यांना खरच आपल्या मुलाची चिंता नव्हती कारण सुखदा त्याला हर परिस्थितीत नीट संभाळुन घेईल हा विश्वास त्यांना आत्ताच्या ताज्या घटनेतुन निर्माण झाला होता.
अखेर सर्वांच्या मनाप्रमाणे वाङ् निश्चय म्हणजेच रींग सेरेमनीही लगेच उरकला.सुखदाची ओटी भरून तिला साडी वगैरे आहेर केला.सुहासलाही तसेच सगळे सांग्रसंगीत कार्यक्रम पार पडला.दोघे मिळुन आधी देवाच्या आणि मग सगळ्यांच्या पाया पडले.व्यवस्थित जेवणे उरकुन सुखदा मुले आईबाबांसहीत आपल्या घरी परतले.
~~~~~~~~~~~~~~
आता फक्त आठवड्या भरानेच दोघांचा विवाह संपन्न होणार होता.सुहासने रजिस्ट्रार आॅफीसला जाऊन तशी नोंद करून आला.बाकीही तयारीची लगबग दोन्ही घरात सुरू झाली.
सुखदाने महिनाभराची लिव्ह कॉलेजला अॅप्लाय केली.
नविन घरात रूळेपर्यंत आणि रूटीन व्यवस्थित सेट होईपर्यंत तिला एवढा वेळ तर हवाच होता.त्यात मुलांची सगळी घडी तिकडे नीट बसे पर्यत तिला कॉलेज जाणे अशक्यच होते.
आता तिला जवाबदारीची खरी जाणीव होत होती.इतके दिवस तीच्या गैरहजेरीत नलिनीताईंमुळे ती निश्चिंतपणे आपले इतर छंद नाईट स्कुलची ड्युटी सगळे निभावु शकायची.घरी आले की आयते जेवण ताटात मिळायचे.पण आता हे सगळे बदलणार होते.नाही म्हणले तरी सुन म्हणुन तिला घरातल्या सगळ्यांच्या गरजा, काय हवं नको ते बघायला लागणार होते.
ह्या सगळ्यासाठी स्वत:ला ती तयार करत होती तरीही मनात थोडी धाकधुक होतीच….
म्हणता म्हणता तो दिवस उजाडला.आज सुहास सुखदा लग्न बंधनात अडकणार होते.दोन्ही घरात लगबग चाललेली.नलिनीताईंनी घरापुढेच छाेटा शकुनाचा मांडव घातला.
पुरोहित काकांच्या सांगण्यानुसार सर्व तयारी करून ठेवली.आधी घरातले सर्व विधी, मंगलाष्टक,सप्तपदी,होम इ.उरकुन मग ते रजिस्ट्रार ऑफीसला जाणार असे ठरलेले.
ठरल्याप्रमाणे सर्व विधी उरकुन रजिस्टर पद्धतीने लग्न लावुन आता सुहास सुखदा खऱ्या अर्थाने कायदेशीर पती-पत्नी झाले होते.
सगळी सामानाची बांधाबांध काही राहीले तर नाही अशी शेवटची गडबड उरकत अखेरीस मुलीला निरोप द्यायची वेळ आली तसे नलिनीताईंच्या डोळ्याला धारा लागल्या पाण्याच्या.सासर अगदी गावात असले तरीही मुलगी एकदा परक्याची झाली की तिच्यावरचा हक्क कमीच होतो म्हणतात.ठरवुनही भेटी दुरापास्त होतात हे त्यांनी संपदाच्या बाबतीत ह्या आधीही अनुभवलेच होते की.गेल्या काही वर्षात सुखदाच्या सहवासाची,सोबतीची लागलेली सवय अशी एकाएकी तिच्या दूर जाण्याने तोडावी लागणार ह्या कल्पनेनेच त्यांना भरून आले.अखेर साश्रृनयनांनी निरोप देत सुखदा सुहास मुलांसह आपल्या घरी परतले.
ह्या घरात सुन म्हणुन तिचा पहिला प्रवेश.
उंबऱ्यातले माप ओलांडुन सुखदा मुजुमदारांच्या घरात तिच्या हक्काच्या घरात प्रवेशली.सगळे जुने असुनही आज सारे कसे अनोळखी नवे भासत होते.थोडीशी लाजरी थोडीशी बुजलेली सुखदा एका कोपऱ्यात पुढील आदेशाप्रमाणे काय करायचे हे कळे पर्यंत बसुन राहीली.
वेणूताईचा एक भाऊ म्हणजे मामा,एक मावशी आणि सुहासची आत्या असे मोजुन तिन पाहुणे घरात होते.वेणूताई त्यांच्या सांगण्याप्रमाणे एक एक गोष्टीची पुर्तता करत होत्या.जीजाला संभाळण्याकरता मुद्दाम सखुला पुर्णवेळ ठेवुन घेतले होते वेणूताईंनी.तिची रोजची झोपायची वेळ होत आली होती.पण ती सखुच्या हाती झोपायला जाम तयार नव्हती.शेवटी सुखदानेच तिला आपल्या जवळ घेऊन थापटुन थापटुन झोपवले.
झोपताना सुखदाच्या छातीला हात लावुन झोपायची सवय होती जीजाला.इनमिन दिड वर्षाचं लेकरू,आईचे दूध अजुन पुरते सुटलेही नव्हते की संपदा गेली.तिला दिवसभर नाही तरी रात्री मात्र आईचे दूध पिल्याखेरीज झोप यायची नाही.तिची ही सवय बदलायला किती वेळ लागला पुढे तरीही ती सुखदाच्या छातीला हात लावुन झोपायची सवयीने.आता सगळ्यांसमोर तिचे छातीला चाचपडणे सुखदाला खूपच ऑड वाटत होतं.तिला वरमल्यासारखे होत होते.ते बघुन वेणूताईंनी तिला आपल्या खोलीत जाऊन निजवायला सांगीतले तसे तिच्या डोक्यावरचे ओझे उतरले.पटकन तिकडे जाऊन तिने जीजीला झोपवले आणि परत आली.
नंतर बाकीचे विधी,लक्ष्मीपुजन उरकुन जेवणे आणि मग तिला वेणूताईंनी जीजाच्याच खोलीत झोपायला सांगितले.
तिला हुश्श वाटले.आजचा दिवस तरी पार पडला होता..
आता पुढे काय……????ही चिंता येणाऱ्या प्रत्येक क्षणागणिक तिच्या मनात निर्माण होत होती.सुखदाचे विश्व आजपासुन खरोखर बदलले होते.
ह्यापुढील दोघांचा प्रवास कशी वळणे घेईल...हे फक्त विधात्यलाच माहित होते..
---------------------(क्रमश:)--------------------
(क्रमश:-9)
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी,
शेवटी एकदाचे साखरपुडा आणि लग्न उरकले.
आता पुढचा प्रवास कसा कसा घडतोय?
दोन मित्र एकमेकांचा पती पत्नी म्हणुन स्वीकार करतील का…?
काय काय घडामोडी घडणार हे वाचायचे असेल तर पुढचे भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला तेही जरूर कळवा.
(लेखन/वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा