Oct 27, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -20

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग -20

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -20

©®राधिका कुलकर्णी.

 

सुखदा आदिच्या कामात अडकलेली पाहुन तिच्या नकळत वेणूताईंनी गूपचूप सुहासला फोन लावला.त्यांना तो घरी येईपर्यंतही धीर धरवेना.पुन्हा त्याला रजा टाकायची असेल तर वेळेत कळलेले बरे म्हणुन तो ऑफीसमधे असतानाच त्यांनी फोनद्वारे अगदी त्रोटक शब्दात सुखदाचा होकार आहे रजेचा अर्ज टाक असा निरोप देऊन घाईघाईतच फोन बंद केला.

आईकडुन मिळालेली बातमी ऐकुन सुहासही आनंदी झाला.त्याने लगेच रजेसाठीच्या फॉर्मॅलिटीज उरकल्या आणि बॉसला लिव्हसाठी केलेल्या मेल अप्रुव्हलसाठी सांगायला त्याच्या केबीनमधे गेला.

गोव्यामधे त्यांच्या कंपनीचे टायअप असलेले रेसॉर्ट विषयीही कलिग्ज कडुन माहिती मिळवली.तिकडेही आपले दोन दिवसाचे बुकींग अशी सर्व कामे त्याने उत्साहात उरकली.

त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका बोलका होता की सचिनने(त्याचा कलिग आणि खास मित्र) विचारलेच.

"क्यु क्या बात है?चेहरे पे ये अचानक इतना नूर किस वजह से? "

त्यावर सुहासने फक्त स्मित केले आणि आपल्या कामाला लागला.

           ~~~~~~~~~~~~

रात्री सगळी कामे उरकली तसे वेणूताईंनी मुद्दाम सुहास आणि सुखदाला एकत्रच आपल्या खोलीत बोलावले.

सुहासला कल्पना होतीच की आत्ता आईने का बोलावलेय.तर सुखदाला वाटत होते की कोल्हापूर प्लॅन बद्दल सुहासला राजी करण्याकरताच एकत्र बोलावलेय.दोघांचे विचार भिन्न असले तरी धेय्य एकाच मार्गावरून मार्गक्रमण करणार होते.

दोघेही वेणूताईंच्या खोलीत आले तसे त्यांनी मुद्दामच सुहासला हा विषय आत्ताच सांगतोय अशा अविर्भावात पुन्हा एकदा नलुमावशीकडच्या लग्नाविषयी सांगीतले.

लग्नाला त्या दोघांनीच का जायला हवे हे ही सांगुन झाले.लग्नासाठी देण्या घेण्याची काय खरेदी करायची ह्यावर सुखदा आणि त्यांच्यात झालेला सर्व संवाद सुहासला कळवला.अर्थात त्याचाही ह्या बाबतीत कुठलाच आक्षेप नसल्याने तोही विषय मार्गी लागला.आता फक्त कोल्हापूरला देवीचे दर्शन हा मुद्दा शिल्लक राहिला.

वेॆणूताईंनी एक मिनिटभर विश्रांती घेत पुन्हा बोलायला सुरवात केली.

वेणूताई - हे बघ सुहास मला वाटतेय की तुम्ही व्हाया कोल्हापूर सावंतवाडीला जाणार,बरोबर?

त्यावर सुहासने होकारार्थी मान डोलावली.मग लगेच आपला विषय पुढे सरकवत त्या म्हणाल्या..

वेणूताई - मग असं करा, जाता जाता अंबाबाईचे दर्शन घ्या.तिकडे आपल्यात एक मुक्काम असतो तो करा आणि मग दुसऱ्या दिवशी पुढील प्रवासाला लागा..

मी अंबाबाईला नवस बोलले होते.नव्या जोडप्याला दर्शनाला पाठवीन आणि खणा नारळाची ओटी भरेन नव्या सुनेच्या हातुन.आता अनायासे त्याच मार्गाने जात आहात तर हेही उरकुनच पुढे जा.

सुहास ह्यावर काय रिअॅक्ट होईल ही भीती दोघींनाही होतीच.त्या वाट पहात होत्या सुहास काय बोलतो ह्याची.

इकडे सुहासच्या डोक्यात वेगळाच विचार चाललेला होता.

आज आईमुळेच आपला हा प्लॅन सक्सेसफूल झालाय,होतोय,मग तिची ही एवढीशी ईच्छा तर मी नक्कीच पुरी करू शकतो.त्याचा मनाशी विचार पक्का झाला तसा तो बोलला..

सुहास- आईऽऽऽ तुझी ईच्छा आहे नाऽऽऽऽ की आम्ही हे देवदर्शन करून पुढे जावेऽऽ तर तुझ्यासाठी मी हे नक्की करेन.ह्यावेळी मी कोणतेही आढेवेढे घेणार नाहिये…..आता खुष???!!! 

त्याने दिलेला होकार जणु ऐकुच गेला नाही असा वेणूताईंचा चेहरा अजुनही चिंताग्रस्त दिसत होता.ते पाहुन सुहासने चेहऱ्यासमोर टिचकी वाजवुन त्यांना भानावर आणत म्हणाला ..

सुहास - अगंऽ मी हो म्हणालोय...मग आता तरी चेहऱ्यावर हसु दिसु दे की..किती चिंताक्रांत दिसतोय तोऽऽऽ..

खरचच वेणूताईंना चिंता लागली होती की हा आता नन्नाचा पाढा लावू नये म्हणजे मिळवली..पण तो हो बोलला तसे त्यांना हायसे वाटले.त्याच्या सहजगत्या दिलेल्या होकाराने दोघीही रिलॅक्स झाल्या.

 

आता जायला फक्त दोनच दिवस हातात होते.त्यामुळे मनातल्या मनात दोघांनी आपापल्या कामांची यादी वाचुन त्याप्रमाणे ती वेळेत उरकायचे ठरवले.

इकडे सुखदानेही कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांना फोन करून रजा वाढवण्यासंदर्भात विनंती केली.

जसे कॉलेजला जॉबला लागली तेव्हापासुन सुखदाने फारच कमी रजा घेतल्या होत्या.कित्येकवेळा तर तिच्या रजा वर्षसरता वापर न केल्याने लॅप्स व्हायच्या.

पण बदल्यात ती कोणीही कलिग रजेवर जाणार असेल तर त्यांचा सिलॅबस कव्हर करायलाही ही मदत करायची.

तिचे शिकवणे मुलांना इतके आवडायचे की मूले प्रार्थना करायचे की पहिले मूळ लेक्चरर लवकर येऊच नयेत म्हणजे त्यांचा पोर्शन पण सुखदामॅडमच शिकवतील.एकंदर तिचा हा असा सगळ्यांना मदत करायचा स्वभाव आणि चांगल्या शिकवण्यामुळे ती कॉलेजमधे विद्यार्थी आणि लेक्चरर्स स्टाफ अशा दोन्ही ठिकाणी अत्यंत लोकप्रिय होती.तिच्या बाबतीत कधीच कुठल्या कंम्प्लेंट्स कुणालाच नसत उलट विद्यार्थी तिच्या शिकवण्याची तारीफच करत असत प्रिन्सिपल सरांकडे.त्यामुळे आता तिला रजा वाढवुन देताना प्रिन्सिपल सरांनी कुठलीच आडकाठी केली नाही.ती नसली तरी तिचा सिलॅबस गूणे मॅडम,पाटील सर मिळुन कम्प्लिट करायचे आधीच ठरवुन पण घेतले दोघांनी मिळुन.त्यामुळे सुखदा तशी निश्चिंच होती कॉलेज बाबतीत.

         ~~~~~~~~~~~~~~~~

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे सराफ्याकडे मार्केटला जायचे असल्याने दोघींनीही आपापली राेजची कामे वेगात उरकली.जीजाला बघायला भानू आलेली होती त्यामुळे आता त्या निश्चिंतपणे मार्केटींग करू शकणार होत्या.

लग्नानंतर आज पहिल्यांदाच वेणूताई आणि सुखदा दोघीच कुठेतरी एकत्र घराबाहेर पडत होत्या.

साधारण साडेदहा-अकराच्या सुमारास दोघीही बाहेर पडल्या.

वेणूताईंना हवी होती अगदी तशीच मस्त मोराची डिझाईन असलेली मोठ्ठी समई मिळाली.त्यांनी जमवलेली सर्व चांदी मिळून जवळपास किलोभर भरली.त्यामुळे वरती फक्त काही हजार भर रूपये देऊन त्यांची मनासारखी खरेदी झाली.

नंतर नलुताईसाठी साडी,पमाला शर्टपँट,पमाच्या बायकोला साडी अशी आहेराचीही खरेदी झाली.वरूण नव्या पिढिचा पुण्यात जॉब करणारा त्यामुळे त्याला छानसा डिनरसेट द्यावा असे सुखदाला वाटले.तेच ते कपडे आजकाल प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते.उगीच ते कपडे देऊन कपाटाला ओझं करण्यापेक्षा हा विचार तिला जास्त पटला.आणि नविन संसारात डिनरसेट उपयोगी पडेल हा ही भाग होताच.वेणूताईंनीही त्यावर लगेच संम्मत्ती देऊन टाकली तशी ती पण खरेदी झाली.लापोलाचा सुंदर बारीक फ्लोरल नक्षीकाम केलेला डिनरसेट बघताच पहिल्या नजरेतच दोघींच्या पसंतीस पडला.

मनाप्रमाणे सर्व खरेदी झाली तशी दोघीही भवानीशंकरचा फेमस ऊसाचा रस पिऊन जवळपास दोनतीन तासांनी घरी आल्या.

मनासारखी सर्व खरेदी झाल्याने वेणूताई खूपच खुष होत्या.आणि कोणत्याही खरेदीच्या जागी सुखदाने त्यांना पैशाचा बटवा बाहेर काढू दिला नाही.सगळे कार्ड पेमेंट तिने स्वत:च्या क्रेडिटकार्डने केले.नाही म्हणले तरी बरीच खरेदी झाली होती आणि तेही सर्व ब्रँडेड  क्वालिटीचे म्हणजे खर्चाची रक्कम बरीच मोठी होती.तो अंदाज घेऊन वेणूताईंनी सोबत तेवढी रक्कम नेली होती परंतु सुखदाने कुठेही हात अखडता न घेता प्रत्येकासाठी त्यांची गरज,आवड वेणूताईंना विचारून त्याप्रमाणे रंग पोत सगळे बघुन अगदी इंटरेस्ट घेऊन सर्व खरेदी केली.मनोमन वेणूताईंना भरून आलं खूप.

आजकाल सूना कुठे इतक्या आपुलकीने वागतात सासवांशी.त्यात सासूच्या बहिणीच्या नातवाचे लग्न मग त्यांच्यासाठी ती का करेल आपला खिसा रिकामा?

पण सुखदाने मनापासुन ह्या घराला ह्या घरच्या नात्यांना ज्या पद्धतीने मनापासुन स्वीकारले ते पाहुन वेणूताईंना खरचचं आपल्याच भाग्याचा हेवा वाटायला लागला.आज त्यांनी मनोमन पुन्हा एकदा अंबाबाईला साकडे घातले,

"देवा माझ्या ह्या लेकीला तिच्या आयुष्यातली सगळी हक्काची सुखे दे..कुठल्याच सुखापासुन तिची झोळी वंचित ठेवु नको.."

वेणूताईंनी हलकेच डोळ्यात आलेले पाणी टिपत आपल्या खोलीकडे गेल्या.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

आता फक्त आजची रात्र. मग उद्या सकाळीच त्यांचा प्रवास सुरू होणार होता.ते त्यांच्या कारनेच जाणार असल्याने टिकिट बुकींग वेळेत स्टेशन गाठणे असल्या गोष्टींचे टेंशन नव्हते.सुखदाने लग्नकार्य,देवदर्शन आणि त्यात नलुमावशींचे घर तसे पारंपारिक रीति-रिवाज पाळणारे त्यामुळे तिने सर्व साड्याच सोबत घेतल्या.अगदी रात्रीसाठी सुद्धा नाईट गाऊन घेणे टाळले.

तिने वेणूताईंनाही तसे सांगीतले..

बहुतेक सुहासने गोव्याच्या प्लॅनबद्दल तिला आत्ताच सांगणे टाळले असावे हा विचार वेणूताईंच्या चाणाक्ष डोक्यात लगेच चमकला.त्यांनी तशी आघावु कल्पना लगेच सुहासला दिल्यामुळे ऑफीसहून येतानाच त्याने सुखदासाठी मस्त वेस्टर्न आऊटफिट्स खरेदी केले.तिच्या नकळत ते आपल्या गाडीत आधीच नेऊन ठेवले.

त्याच्या मनात गोव्याचा पुर्ण प्लॅन तयार होता.सुखदासाठी हे सरप्राईज राहणार होते.

तिने नकार देऊ नये म्हणुन घेतलेली खबरदारीही म्हणु शकतो.

पण आता आधी दर्शन अंबाबाईचे.आई ही पण देवीचेच रूप आहे नाऽऽ मग आईची ईच्छा तिच देवीची ...ह्यावेळी सर्व पूजा मनोभावे करायची असे सुहासने आधीच मनाशी पक्के केले.

पॅकींग करणे,मुलांच्या काही कामाबाबतीत वेणूताईंना सुचना देणे ह्यात रात्र कशी झाली कळलेच नाही.

सगळे पॅक झालेले सामान रात्रीच सुहासने गाडीच्या बुटमधे व्यवस्थित अरेंज केले.

सगळ्या दिवसभराच्या दगदगीने दोघेही थकले होते.त्यांना पडताक्षणी झोप न लागली तरच नवल होते.

सुहास मनोमन खूप एक्सायटेड तर सुखदा थोडीशी घाबरलेली होती.

जे होईल ते देवाच्या भरोशावर सोडुन आत्तातरी तिने निद्रादेवीचे आवाहन केले. 

 

सकाळची आदिची सगळी जायची तयारी करून त्याला शाळेत सोडून मगच सुखदा प्रवासाला निघण्यासाठी रेडी झाली.दोघेही वेणूताईंच्या आणि देवाच्या पाया पडले.त्यांचा आशीर्वाद आणि निरोप घेऊन प्रवासासाठी निघाले.

सकाळचे साधारण अकरा वगैरे वाजले असतील म्हणजे संध्याकाळ पर्यंत ते कोल्हापूरला पोहोचणे अपेक्षित होते.सुहास आणि सुखदा दोघेही उत्तम गाडी चालवु शकत असल्याने लांबच्या प्रवासाचा शीण होणार नव्हता एकट्या सुहासला.

गाडीत बसल्यावर नेहमी प्रमाणे रेडीओ एफएम सुरू झाले.वेगवेळ्या नव्या जुन्या गाण्यांची मजा घेत गप्पांमधे त्यांचा छान वेळ गेला.मधे एकदा जेवण आणि चहासाठी असे एक दोन ब्रेक घेऊन अखेरीस ते कोल्हापूर पोहोचले.

गाडी त्याने डायरेक्ट मंदिराकडे घेतली.संध्याकाळ टळून आता बराच अंधार झालेला.त्यांनी आधी दर्शन घेतले.

सुहासने पुजाऱ्यांशी बोलुन सकाळच्या पहिल्या पुजेसाठी वेळ फिक्स केला..त्यांनी सकाळी सहा वाजताच अभिषेकपुजेला स्नान करून येण्यास सांगितले.सगळे मनाप्रमाणे घडले तसे सुहासला बरे वाटले.पुजाऱ्यांनाच एखाद्या चांगल्या फॅमिली लॉजविषयी चौकशी करून त्याप्रमाणे ते एका चांगल्याशा लॉजला मुक्कामासाठी उतरले.

जसजसा लॉजचा रस्ता जवळ जवळ येऊ लागला सुखदाच्या पोटात भीतीने गोळा उठला.मनावर अनामिक दडपण जाणवु लागले. सुहासने ह्या एकांताचा फायदा घेऊन माझ्याशी जवळीक साधली तर????

मनात प्रश्न उभा राहीला तसा भीतीने अंगभर सरसरून काटा आला तिला.

आपल्या मनातल्या चिंतेला चेहऱ्यावर दिसु न देण्याची खबरदारी घेत ती सुहासच्या मागोमाग लॉजच्या सिटींग एरीयात पोहोचली.

सुहासने सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट केल्याबरोबर एका मुलाने त्यांचे सामान रूमवर शिफ्ट करण्यासाठी लिफ्टमधे नेले.पाठोपाठ हे दोघेही गेले.

सामान नीट लावुन जेवणाची आॅर्डर देऊन दोघेही जेवण येईपर्यंत फ्रेश झाले.

दिवसभराच्या ताणाने आखडलेले आंबलेले शरीर गरम पाण्याचा शिडकावा अंगावर होताच एकदम रिलॅक्स वाटायला लागले.

दोघेही फ्रेश होईपर्यंत त्यांचे जेवण रूमसर्व्हिसला सर्व्ह झाले.

दोघांनाही सपाटुन भूका लागलेल्या होत्या.त्यांनी मस्त जेवणावर ताव मारला.

जेवण उरकले.सकाळी पाचचा अलार्म लावुन आता झोपायची तयारी सुरू झाली.

सुखदा अजुनही मनातुन प्रचंड अस्वस्थ.

कित्येक दिवसांपासुन ह्या ना त्या कारणांनी  सुहासपासुन जाणीवपुर्वक राखलेला दूरावा आता तिच्याजवळ जीजा किंवा आदिचेही निमित्त नव्हते.

काय करावे ह्या विवंचनेत ती बेडच्या एका कोपऱ्याला उशीला टेकुन बसुन होती.

मनात विचारांनी थैमान घातलेले.तिला पुन्हा त्याच त्या अग्निदिव्यातुन मुळीच जायचे नव्हते.सुहास जवळ येणार,आपल्याला चेतवणार आणि मग पुन्हा दूर लोटणार.आपण मात्र त्या आगीत रात्रभर होरपळतच राहणार..नकोच तेऽऽऽ.त्यापेक्षा मी पुर्वी होते तीच बरी होते.एकटीऽऽ,एकाकीऽऽऽ..ना मनाला फुंकर घालणारे कोणी ना देहालाऽऽऽ..आता तो देहाचा आकांत पुन्हा नको…

विचारांच्या तंद्रित सुहासने मारलेली हाकही तिला ऐकु आली नाही.

तिला तंद्रीतुन जागे करण्याकरता सुहासने तिच्या खांद्याला स्पर्श करून हलवले तसे ती एकदम दचकली.

सुहास - काय गं कसल्या एवढ्या गहन विचारात,मी हाक मारलेलीही तु ऐकली नाहीस..तब्येत बरीय ना?

सुहासने आस्थेने तिची चौकशी केली.

त्यावर 

सुखदा - काही नाही...असचऽऽ..तु बोल नाऽऽ.काय म्हणत होतास…?

आता सुहासने तिचा हात आपल्या हाती घेत शांतपणे तिच्या हातावरून आपला हात हळुवारपणे फिरवत राहीला.

दोन क्षण मौनात गेल्यावर सुहासने पुन्हा सुरवात केली.

सुहास - सुखदाऽऽऽ खूप दिवसांपासुन मला तुला काहीतरी सांगायचेय..तुझ्याशी बोलायचेय.

पण मनासारखा शांत एकांतच मिळत नव्हता.

आज अनायासे आपण एकत्र आहोत तर मनातले सर्व तुझ्याजवळ बोलावेसे वाटतेय..बोलु का गंऽऽ.?

नाही दिवसभराच्या प्रवासाने तु थकली असशील तर तसे सांग मी नाही बोलणार..पण हे बोलणे खूप महत्त्वाचे आहे.

माझ्यासाठी हे सांगणे जितके महत्त्वाचे तितकेच तुझ्यासाठी हे ऐकणेही महत्त्वाचे आहे म्हणुन बोलणे तसे खूप गरजेचे आहे तेही आज, आत्ता..

पुढचा प्रवास सुरू होण्याआधीच जर आपल्या मनातली विचारांची,गैरसमजांची जळमटे दूर झाली तर पुढचा प्रवास जास्त सुखकर आणि आनंदी होईल नाही का??तुला काय वाटते??

.तु सांगऽऽ..Last decision wl be yours... 

Are you tired or I continue to talk?? 

 

सुखदालाही त्याचे सांगणे तरी काय आहे हे ऐकण्यात आता उत्सुकता निर्माण झाली.

आणि मनावरचे हे विचारांचे ओझे तो म्हणतो तसे त्याचे ऐकुन दूर होणार असेल तर ऐकायला काय हरकत आहे..

कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरेही मला ह्याच सांगण्यातुन आपसुक मिळणार नाहीत कशावरून???

तिने सुहासचे म्हणणे ऐकायचा निश्चय मनोमन पक्का होताच ती सुहासला म्हणाली.

सुखदा - जर तुझे सांगणे आपल्या दोघांसाठीही इतके महत्त्वाचे आहे तर मग बोल नाऽऽ..

मी थकलीय हे खरेय पण इतकीही नाही की तुझे बोलणेही ऐकु शकत नाही..तु बोल ऽऽ मी ऐकतेय…

अखेर देवाने त्याचे ऐकले आणि त्याला हवी तशी बोलायची संधी मिळाली.मनोमन देवाचे आभार मानत तो शब्दांची जुळवणी सुरू केला…

थोडावेळ शांततेत गेला.ती दोन क्षणांची शांतता कित्येक युगांप्रमाणे भासत होती सुखदाला.

सुपाचे कान करून ती सुहासचा प्रत्येक शब्द न शब्द झेलायला सरसावुन तयार झाली.

काहीवेळ गेल्यावर सुहासने बोलायला सुरवात केली.

सुहास - सुखदाऽऽ सगळ्यात अगोदर मला दोन गोष्टी बोलायच्या आहेत.पहिले ..थँक्यु आणि दुसरे सॉरीऽऽऽ..

सुखदाच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलेले स्वच्छ दिसत होते.ती काही न बोलता फक्त ऐकण्याची भूमिका निभावत होती.

सुहास - तुला आश्चर्य वाटले असेल ना की मी थँक्युही बोलतोय आणि सॉरीही म्हणतोय.पण तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याकडे..

थँक्यु ह्यासाठी की तु माझ्या आयुष्यात आलीस.संपदा गेल्यावर मला कधी वाटलच नव्हतं की तिची जागा मी माझ्या आयुष्यात ह्या जन्मी तरी कोणाला देऊ शकेन पण लग्न झाले आणि ती जागा माझ्याही नकळत तूला कधी दिली माहित नाही.

खरे तर आपल्याला दोघांनाही मैत्रिपलिकडे काहीच नको होते एकमेकांकडुन.पण लग्न झाल्यावर तु ह्या घरी आलीस,मुलांची तर लाडकी आधीपासुनच होतीस त्यात तुझ्या वागण्याने आईचीही लेक झाली……

पण मी……

सुहासने पुन्हा पॉज घेतला.पुन्हा शब्दांची जुळवणी करत त्याने सुरवात केली.

सुहास- मी मात्र तुला ती जागा देऊ शकत नव्हतो.

मग मी बाथरूममधे पडलो.मला हालचालही करता येत नव्हती.त्यावेळी तु कधी आई कधी मैत्रिण तर कधी पत्नी बनुन माझी मनापासुन सेवा केलीस...त्या सगळ्याकरता थँक्यु…

आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात, माहितीय मला पण काहीवेळा शब्दातुन व्यक्त होणे गरजेचे असते.आणि तेही वेळेत.नाहीतर आपल्या मनात काही गोष्टी राहुन जातात सांगायच्या आणि मग गैरसमजाचे इतके मोठे मोहोळ तयार होते की त्या आतल्या गुणगुणीत मूळ आवाज पोहोचतच नाही मनापर्यंत..

सुखदा खूप कनफ्युज्ड होती.ह्याला नेमके काय सांगायचेय??

तिच्या चेहऱ्यावरचे ते प्रश्नचिन्ह अचुक टिपले सुहासने..

सुहास - Feeling confused… wait…. 

I wl explain.. 

सुखदाऽऽऽ मला तुला खूप महत्त्वाचे सांगायचेय तो भाग आता सुरू होतोय.

गेले काही दिवस आपल्यांत एक अनामिक दूरावा निर्माण झालाय,राईटऽऽऽ???

त्याचे कारण पण मीच आहे मला माहितीय.आणि त्या सगळयामुळे मी तुला, तुझ्या भावनांना खूप दुखावलेय हे ही मला कबुल आहे.

आणि त्या सगळ्यासाठी मी सॉरी बोलतोय तूला आधीच.

पण नुसते सॉरी म्हणुन समस्या संपत नाहीऽऽ .. I know.. 

आता तुला त्याच सगळ्याचे स्पष्टीकरण मी देणार आहे..

मला काही गोष्टी तुझ्यापुढे कन्फेस करायच्या आहेत.

सुखदा तुला आठवतेय माझा अॅक्सिडेट झाला तेव्हा माझी सर्व कामे तु करून द्यायचीस??

त्यातल्या एका स्पंजिंग करतेवेळी मला तुझ्या शरीराचा जवळुन स्पर्श झाला आणि माझ्यातला पुरूष त्यावेळी जागृत झाला हे मी खेदानेच मान्य करतो आज तुझ्यापुढे.मला तुझ्या देहाविषयी झालेली वैषयिक वासना वेडं करून गेली.सतत तेच विचार मनात घोळू लागले.डोळे मिटले तरी जागेपणीही सतत तुझा फक्त देह नजरेपूढे फिरायचा.त्या विचारांनी माझी मलाच लाऽऽऽज वाटायला लागली.मी माझ्याच नजरेतून उतरलो होतो.

माझ्या मनात असंख्य प्रश्न फेर धरून नाचु लागले.मला हेच कळेनासे झाले की मला नेमके काय होतेय.मग मी तुझ्यापासुन अंतर राखून रहायचा निर्णय घेतला आणि ऑफिसच्या एका पेंडींग मिटींगसाठी बॉसला मेल केला.हे तूला नाही माहीत..

सुखदा विस्फारीत नजरेने एेकत होती.

सुहास- मी मुद्दामच तुला न सांगता बेंगलोरला गेलो.कारण मला तुझ्यापासुन दूर राहुन माझ्या सगळ्या प्रश्नांची तपासणी करायची होती त्यांची उत्तरे शोधायची होती.म्हणुनच कटाक्षाने मी तुला त्या चार दिवसात एकदाही संपर्क केला नाही.

तिकडे गेल्यावर पदोपदी मला तुझी आठवण येऊ लागली.आणि ह्यावेळी डोळे मिटले की मला तुझा देह आकर्षित नव्हता करत तर डोळ्यापुढे तुझी शांत,संयत,मायाळु मुर्ती यायची.

तु माझ्यासाठी,मुलांसाठी,ह्या घरासाठी अगदी मनापासुन निरपेक्ष भावनेने जे जे केलीस ते सगळे डोळ्यापुढे यायचे आणि मन वेडं व्हायच की कधी एकदा तुला हे सगळ सांगु..तुझ्याशी बोलु.मला तुझ्याबद्दल फक्त आकर्षण नाही तर मनापासुन काठोकाठ प्रेम भरलेय हा साक्षात्कार ज्याक्षणी झाला माझे मन आनंदाने नाचायला लागले.मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुझ्यापासुन दूर जाऊन मिळाली.

मी हे सगळे सांगायला रादर कन्फेस करायला की का मी अचानक तुला न सांगता असाच बेंगलोरला गेलो?का मी तिकडच्या वास्तव्यात एकदाही तुझ्याशी संपर्क केला नाही?काय होती त्यामागची कारणे?हे सगळ सगळं मला तुला त्याच दिवशी सांगायचे होते पण…………!!

सुहास क्षणभर थांबला बोलताना...पण सुखदाला पुढे काय हे ऐकायची इतकी उत्सुकता लागलेली की तिने लगेच विचारले.

सुखदा - पण काय? बोल ना पुढेऽऽ का थांबलास?

सुहास- पण...मी बोललो नाही त्याचे कारण तु होतीस…

सुखदा(आश्चर्यचकीत होऊन)- काऽऽऽय!! मीऽऽऽ?? ते कसे कायऽऽ?

सुहास(शांतपणे)- मी जेव्हा हे सगळे सांगायला फोन केला तेव्हा तु चिडलीस,आेरडलीस माझ्यावर इतकेच नाही तर रडलीस पण.

व्हिडीओ कॉलमधे तुझ्या चेहऱ्यावरून तुझे माझ्यावरचे प्रेम मला साफ साफ दिसले.तु माझ्या विरहात किती तडफडलीस हे तुझा रडवेला चेहरा स्पष्ट सांगुन गेला.म्हणजे ज्या विरहाग्नीत मी होरपळत होतो त्याच विरहाने तु दग्ध होतीस हे कळल्यावर मला तुला माझ्या मनातील ह्या सगळ्या वादळाची कहाणी ऐकवण्याची ईच्छाच नाही उरली.कधी एकदा तुला भेटतोय असे झालेले.पण माझे हे ही तेव्हाच ठरले होते की जोपर्यंत मी माझ्या मनातले हे सगळे द्वंद्व तुला सांगत नाही तोपर्यंत तुला अंधारात ठेवुन मी तुझा पत्नी म्हणुन स्वीकार करणार नाही.

मला माझ्या,मनाची ही कबुली तूला देऊनच नव्या नात्याची सुरवात करायची होती….हेच कारण होते की प्रत्येकवेळी खूप निकट पोहोचुनही मी तुला मधेच दूर करायचो..

त्यासाठीही सॉरीऽऽऽ.

मला कळत होते की असे वागुन तु पुन्हा आतुन तुटतीएस, पुन्हा स्वत:च्या त्याच कोषात जातीएस जिथे मुलांसाठी सुखाई आहे पण सुहासची सुखदा कुठेच नाहिये…

आणि हे सांगण्याचा एकदोन वेळा मी प्रयत्न केलाही पण तुच मला इतके दूर लोटले होतेस की माझ्याशी साधे बोलायलाही तु उपलब्ध

नसायचीस मग माझ्या मनाचा हा गूंता मी साेडवणार तरी कसा होतो गं सुखीऽऽऽऽऽ…तुझ्या मदती शिवायऽऽ..???

सुहास भावूक झाला होता.त्याचा गळा ऋद्ध झाला होता.शब्द गळ्यातच रूतुन बसले होते.पुढे बोलवेचना त्याला. 

आता सुखदाच्या डोळ्यालाही धारा लागल्या होत्या.तीही पश्चा:त्तापाच्या अग्नीत होरपळुन निघत होती.खरच सुहासने कितीदा बोलायचा,

काहीतरी सांगायचा प्रयत्न केला पण मी उगीच स्वत:च्या गैरसमजाच्या भोवऱ्यात स्वत:लाच असे गुरफटवुन घेतले की त्याचीही काही बाजू असेल हे जाणुन घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही.

मनातल्या विचारांनी ती अस्वस्थ झाली.सुहास विषयी मनात बाळगलेली चुकीची धारणा तिला आता पिळवटून काढत होती आतुन.

दोघांनाही काय बोलावे सुचत नव्हते..

सुखदाने शेवटी आपली हार मान्य करून आवेगाने सुहासच्या कुशीत शिरली.तो बराचवेळ तिचे सांत्वन करत राहीला.

भावनावेग जरासा आवरल्यावर सुहासने पुढे बोलणे सुरू केले.

सुहास - सुखीऽऽऽ मान्य आहे मला की मी तुझ्यावर नकळत अन्याय केला पण त्यामागे माझी ही सगळी कारणे होती.पण तु तरी मला एका शब्दाने विचारलेस का की मी असा का वागतोय तुझ्याबरोबर?

तु मला विचारण्या इतकाही हक्काचा समजली नाहीस??

वर अंतर राखून दूर केलेस मला..

का सुखी का वागलीस इतक्या परकेपणाने?

तु माझ्यावर प्रेम करत नाहीस का गं आताऽऽऽ..??

सुहास रडवेला होऊन प्रश्न विचारत होता.

तसे सुखदाला पुन्हा रडू फुटले.आवंढा गिळतच ती कसेबसे बोलायचा प्रयत्न करू लागली.

सुखदा - काय विचारणार होते मी तुला?आणि कसे?

खरच मला समजत नव्हते की नेमके माझ्याच नशिबात हा त्रास का?

मी तुला नाहीतर माझ्या स्वत:च्या फुटक्या नशिबाला दोष देत होते.

मग जर माझ्या नशिबातच कुणाचा सहवास,प्रेम लिहीलेले नसेल तर नसलेल्या अपेक्षांच्या मृगजळामागे मी का धावू?

जे सुख नशिबानेच माझ्या कपाळी लिहीले नाही त्यासाठी इतर कुणाला जाब तरी का विचारू,सांग नाऽऽऽ…??

म्हणुन मी परिस्थितीशी तडजोड केली.नाहीतरी हे नाते तडजोडीवरच तर जोडले गेलेय मग त्यातुन वेगळे काही निष्पन्न होण्याची खोटी आशा मी माझ्या मनाला तरी का दाखवु सांग नाऽऽऽऽ..?

तुला कळणार नाही सुहाऽऽस आपल्याला अव्हेरण्याचे दु:ख  काय असते..?

कारण पुरूष हा भोगी आहे.त्याला हवे तेव्हा हवे ते प्राप्त होते पण स्त्री ही यज्ञातल्या अग्नीकुंडातील फक्त एक समिधा असते.तिला फक्त जळणे माहित.

संसाररूपी अग्निकुंडातही हवी तेव्हा ती समिधेच्या रूपाने आहूती देत राहते कधी मनाची कधी देहाची,कधी प्राणांची,कधी विश्वासाची..

तिला फक्त त्यागच माहित...फक्त त्यागऽऽ…

 

सुखदाच्या भावना अनावर झाल्या होत्या आता.ती हमसुन हमसुन रडत होती.

सुहास मात्र मूकपणे तिचे सांत्वन करत हळुवार हाताने तिला थोपटत होता.

गैरसमजांचे मळभ दूर होऊन भावनांचा स्वच्छंद पाऊस बरसत राहीला रात्रभर.

आता सर्व काळे ढग दूर होऊन स्वच्छ निरभ्र आकाशात सूर्याची कोवळी किरणे मनभर आपली आभा पसरवू लागले......

         ~~~~~~~~~~~~~~~~

सकाळ झाली तसे दोघेही पटकन आवरून ठरलेल्या वेळी मंदिरात पोहोचले.

पुजारीही त्यांचीच वाट पहात होता.सूर्याच्या पहिल्या किरणाने अबांबाईच्या सोज्वळ मुर्तीला जणु नाहू घातले होते.त्या किरणाभिषेकाने संपुर्ण गाभारा सोनेरी चकाकीने लखलखत होता.वातावरण अतिशय प्रसन्न होते.

अतिशय मनोभावे दोघांनी पूजा केली.सुखदाने सोबत आणलेली नवी काेरी साडी,खणानारळाने देवीची ओटी भरली.

सुहासने आज पहिल्यांदाच त्या मातेपुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला.

सुखदाही डोळे मिटून हात जोडली.तसे गाभाऱ्यातल्या मुर्तीवर नुकताच चढवलेला देवीचा गजरा आेघळुन खाली आला.

पुजाऱ्याने तोच गजरा सुहासला तिच्या ओटीत घालायला देवुन म्हणाला

पूजारी - पोरी देवीनं तुझ मागणं एेकलेले दिसतेय.तिने डोक्याचा गजरा तुला दिलाय प्रसाद म्हणुन.

हाच गजरा डोक्यात घाल..तुझ्या सर्व ईच्छा आई जगदंबेच्या कृपेने पुर्ण होवोत.

पूजाऱ्याने तोंड भरून आशीर्वाद दिला तसे तिला खूप प्रसन्न वाटले.देवीने माझं गाऱ्हाणं खरच ऐकलेय ह्या कल्पनेनेच ती सुखावली.

       ~~~~~~~~~~~~~~~~~

लॉजवर जाऊन आता पटकन सामान पॅक करून पुढच्या प्रवासाला जायचे हा सगळा विचार तिच्या डोक्यात चाललेला.

अजुनही सुहासचा गोवा प्लॅन तिच्यासाठी गुलदस्त्यातच होता.

पटापट सगळे पॅकींग उरकुन नाष्टा करून दोघेही पुढील प्रवासाला लागले.आता सुखदा मोकळेपणाने सुहासबरोबर गप्पा मारत मस्करी करत हसत खेळत मार्गक्रमण करत होती.

आता फक्त अडीच-तीन तासाचा प्रवास की सावंतवाडी असा विचार सुखदाच्या मनात घोळत असतानाच सुहासने अचानक हातखंबारोडवरून गाडी पुढे नेली.तिला काही कळेना.तिने मॅप लोकेशन लावले तर तो सावंतवाडीहून पुढे गेलेला दाखवत होता.कदाचित सुहास कनफ्युज झाला असेल असे वाटुन ती ओरडुनच सुहासला म्हणाली…

सुखदा - अरे सुहास आपण रस्ता चुकलोय.तु पुढे गेला आहेस सावंतवाडी तर मागेच राहिले..

त्यावर सुहासने तिला एक वियर्ड लूक दिला..तिला समजत नव्हते की हा काहीच न बोलता नुसतेच रोखून का पाहतोय..

सुखदा - सुहासऽऽऽ  प्लिज स्टॉप द कार…

सुहासने कार साईडला घेऊन थांबवली.

सुखदा - तुला मी केव्हाची सांगतेय आपण रस्ता चुकलोय पुढे आलोय आणि तु काहीच बोलत नाहीएस..मला कळेल का नेमके तुझे चाललेय तरी काय??

सुहास - सुखदाऽऽ माझ्यावर प्रेम करतेस? ?

माझ्यावर विश्वास आहे ना तुझा??

सुखदा(विस्मयाने)- आता ह्या सगळ्याचा इथे काय संबंध?आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे सोडुन वर मलाच प्रश्न काय विचारतोएस तु?तेही असे ज्याचा अर्थाअर्थी इकडे काहीही संबंध नाही.

सुहास(किंचित स्मित करत) - तु अजुनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस सुखीऽऽ….सांग नाऽऽ 

Do you love me? Do you trust me?? 

सुखदा(जरा वैतागुन) - तुला माझे उत्तर माहितीय सुहासऽऽ…!

सुहास - तरीही मला ते तुझ्या तोंडुन ऐकायचेय..सांग ना प्लिजऽऽऽ…

सुखदा(थोडी लाजुन) - हो,मी खूप मनापासुन प्रेम करते तुझ्यावर..And I trust you more than myself…!!!

बसंऽऽऽ ऐकलेस??? आता मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे..कुठे चाललोय आपण??

सुहास(पुन्हा एकदा स्मित करत) - आता माझ्यावर विश्वास आहे नाऽऽ मग मी नेईन तिकडे चल.एकही प्रश्न विचारायचा नाही..प्रॉमिस मी..

सुखदा ह्यावर निरूत्तर होत मानेनेच त्याला होकार भरत मनात आडाखे बांधत राहीली.

थंड वातावरण आणि सकाळपासुनची दगदग,सुखदाला ग्लानी येऊ लागली.तिचा वाटेतच डोळा लागला.

जाग आली तेव्हा ते गोव्याच्या एका सुंदर रेसॉटला येऊन पोहोचले होते.सुहासच्या कंपनीचे ताज रेसॉर्ट बरोबर टायअप असल्याने त्यांना बुकींगला मुळीच अडचण आली नाही..

सुहासने सगळ्या फॉर्मॅलिटीज पुर्ण करून हॉटेलरूमचा ताबा मिळवला.सुखदा स्तिमित होऊन फक्त बघत राहीली.रूमच्या भव्य काच लावलेल्या खिडकीतुन अथांग पसरलेल्या समुद्राचे दर्शन घडत होते.

सगळे सामान ठेवुन सर्व्हीसमन जसा गेला तसा सुहास सुखदाच्या जवळ येऊन तिला मिठी मारत विचारला..

सुहास - कसे वाटले हे सरप्राईज??

त्यावर खुष होऊन सुखदा जवळ जवळ त्याला बिलगतच म्हणाली

सुखदा - सुहासऽ इट्स माय ड्रीम कम ट्रू ...तुला कसे माहित की मला समुद्र किनारा,बीचेस आवडतात ते???

सुहास(लाडात येऊन) - एखाद्यावर खूऽऽप प्रेम असले नाऽऽ की आपोआप सुचते…

सुखदा - अच्छाऽऽऽ तुझे इतके प्रेम आहे माझ्यावरऽऽऽ….Then prove it.. 

सुहास(नजर तिच्यावर रोखून हळुहळु तिच्या जवळ जात)- ते प्रुव्ह करायलाच तर इथे आणलेय नाऽऽऽ..माझे प्रेम पाहुन नंतर लांब पळु नकोस माझ्यापासुन म्हणजे झाले…

त्यावर सुखदा प्रचंड लाजली.तिच्या अंगावर फक्त कल्पनेनेच शहारा आला.

सुहास तिच्या आता अगदी जवळ येऊन पोहोचला.इतका की त्यांच्यात आता फक्त काही इंचाचेच अंतर होते.सुहास नजर रोखून सुखदाकडे पाहू लागला.त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालुन हलकेच तिची हनुवटी वर केली.सुखदा शहारली त्याच्या त्या भेदक नजरेने.अंगातुन वीजेची लहर दौडली.त्याने जवळे येत आपल्या डाव्या हाताने कमरेत हात घालुन तिला स्वत:कडे ओढले.आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवुन त्या रसरशीत ओठांचे त्याने प्रदीर्घ चुंबन घेतले.सुखदा त्या अचानक स्पर्शाने मोहरून उठली.थोडावेळ झाला तशी ती बाजूला होत म्हणाली…

सुखदा - सुहास आता पूरे नाऽऽऽ..भूक लागलीय. काहीतरी मागवुयात का जेवायला??

सुहासने ओठांवरची पकड पुन्हा मजबुत करत म्हणाला 

सुहास- इतक्यातच पुरेऽऽऽ???ही तर फक्त सुरवात आहे..आणि माझे पोट तर असेच भरणार आहे..मला नकोय दुसरे जेवण..

त्यावर लाजत…

सुखदा - चल चावटऽऽऽ..कुठचा..हो बाजुला..मला भूक लागलीय.प्लिज काहीतरी मागव नाऽऽऽ…

मग सुहासने व्हेजमधल्या काही डिशेस आॅर्डर केल्या.

तोपर्यंत दोघेही फ्रेश झाले.अर्ध्यातासातच गरमागरम जेवण सर्व्ह झाले.

दोघांनीही जेवणे उरकुन प्रवासाचा थकवा घालवायला थोडी विश्रांती घेतली.

सुहासला सुखदाला इकडचा पब दाखवायचा होता.तिकडे वेस्टर्न ड्रेसकोड असतो हे कळल्यावर सुखदा चपापली.तिने सगळ्या साड्याच आणलेल्या मग आता कसे करायचे?विचार करतच ती वॉशरूममधे गेली.

ती वॉशरूममधे गेलीय ही संधी साधुन त्याने एक वनपिस ड्रेसचे पॅकेट बेडवर ठेवले आणि रूम बाहेर गेला.

सुखदा फ्रेश होऊन बाहेर आली आणि बेडवरचे पॅकेट बघुन चकीत झाली.उघडून बघितले तर त्यात स्लिव्हलेस पीच कलरचा सुंदर वनपीस होता.त्यावर ब्राऊन शेडच्या लाईट स्ट्राईप्स होत्या.ते कॉम्बिनेशन तिला प्रचंड आवडले.ती सुहासच्या चॉईसवर फिदा झाली अक्षरश:. 

ती आवरून हलकासा मेकअप करून त्याला साजेशी मॅचिंग लिपस्टीक लावुन तयार झाली.सुहास रूममधे आला आणि तिला त्या वनपीसमधे पाहुन पुन्हा घायाळ झाला..त्याची ती मादक नजर काही न बोलताच सगळे काही सांगत होती.तो पुन्हा जवळ यायचा प्रयत्न करतोय हे बघताच सुखदाने हातानेच त्याला दूर लोटत म्हणाली

सुखदा - आपल्याला बाहेर जायचेय डिअर,विसरलास का,आवर ना पटकन..

आता सुहासही भानावर आला.तोही छानसा कॅज्युअल टिशर्ट आणि मस्त जीन्स घालुन लगेच तयार झाला.तयार होऊन गाडीत बसला की काहीतरी आठवल्या सारखे करत तो पुन्हा गाडीतुन खाली उतरला.

काऊंटरवर काहीतरी चौकशी करून रूम कीज घेऊन पुन्हा रूमवर गेल्याचे सुखदाने पाहिले.काही वेळाचच तो परत आला आणि दोघे हॉटेलच्याच एका पब मधे गेले.

पबमधे वेस्टर्न लाऊड म्युझिकवर गाणे चालू होते.

तरूण जोड्या हातात हात कमरेत हात अडकवुन संगिताच्या तालावर थिरकत होते एकंदरीतच सारा माहोल रोमँटिक होता.काऊंटर बारवर वेगवेगळे मद्य प्रकार ठेवलेले.एका अगदी छोटुशा ग्लासमधे एक चित्तवृत्ती फुलवणारे  ड्रिंक दिले जात होते.त्याला टकीला शॉट्स म्हणत होते.ते घेऊन लोक फ्लोअरवर जावुन वेड्यासारखे भान हरपुन नाचत होते.ते सगळे बघायला गंम्मत वाटत असली तरी सुहासने त्या मोहापासुन स्वत:ला जाणीवपुर्वक रोखले.

कारण………..!?!

अजुन एक सरप्राईज सुखदाची वाट पहात होते…

काय होते ते सरप्राईज……!!!!!

-----------------------(क्रमश:20)----------------------------

(क्रमश: 20)

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी…,

बऱ्याच खाचखळग्यांना पार करत सुहास सुखदाची गाडी आत्ता कुठे मार्गाला लागलीय.त्यांच्यातील गैरसमजही दूर झालेत.आता पुढे काय?

हे पहायला पुढचा भाग नक्की वाचा.

कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.आणि माझ्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..