Login

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -19

लग्नानंतर फुललेल्या प्रेमाची सुंदर नवी पहाट म्हणजे फिरूनी नवी..... ... कथा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -19 

©®राधिका कुलकर्णी.


 

सकाळी उठल्यासरशी वेणूताईंनी पहिले काम काय केले असेल तर ते वत्सलाबाई ज्या त्यांच्या स्वयंपाकीणमावशी होत्या त्यांना फोन लावला.त्यांची सून भानूला जीजाला संभाळण्यासाठी आजपासुनच यायला सांगितले.

ह्या आधीही बऱ्याचदा ती जीजासाठी येत असे त्यामुळे जीजाला तिची सवय होती.

हे एक काम मार्गी लावुन त्या आपल्या बाकीच्या रोजच्या उद्योगाला लागल्या.सुखदाही आदिच्या तयारीत बिझी होती.सुहासचीही ऑफीसची गडबड.सगळे आपापल्या उद्योगात व्यस्त.

साधारण नऊच्या आसपास सुहास घराबाहेर पडत असे ऑफीसकरता.आजही सगळे आवरून न विसरता तो देवघरापाशी गेला.देवाला नमस्कार उरकुन पूजा करत असलेल्या वेणूताईंना ईशाऱ्यातच आठवण करून दिली सुखदाशी कालच्या विषयावर बोलण्याची.

वेणूताईंनी होकारार्थी मान हलवुन दुजोरा देताच हसतमुख चेहऱ्यानेच तो घराबाहेर पडला.

इकडे सुखदाचीही सकाळची गडबड आटोपुन ती निवांतपणे डायनिंग टेबलवर चहा सोबत न्यूजपेपर वाचत बसली.वेणूताईंनी सकाळीच तिला जीजासाठी भानू येत असल्याचे कळवले होते.ती तिचीच वाट बघत चहाचे सिप घेत होती इतक्यात ती आलीच.

एव्हाना वेणूताईंची पूजाही उरकली तशा त्या देवघरातुन बाहेर आल्या.

त्यांनी भानूची सुखदाशी ओळख करून दिली.दोघींची एकमेकींशी थोडीफार शाब्दिक देवाण-घेवाण झाली.सुखदाने बोलता बोलताच ती किती शिकलीय,काय करते,मुलं बाळं इ.जुजबी माहिती मिळवली.शिक्षण विचारण्या मागचा हेतू इतकाच की अगदीच अडाणी असेल तर बऱ्याच साऱ्या गोष्टी तिला शिकवाव्या लागल्या असत्या.पण ही बऱ्यापैकी कॉलेज अर्ध्यावर शिकलेली होती त्यात दोन मुलांची आई होती त्यामुळे मुलांना संभाळण्याचा अनुभव होता तिला.एकंदरीतच भानूचा हसतमुख चेहरा,शांत स्वभाव आणि स्वच्छ नीटनेटके राहणीमान सुखदाला पहिल्या नजरेतच पसंत पडले.आता जीजाला ती निश्चिंत होऊन तिच्या सुपुर्द करू शकत होती.

तरीही जीजाच्या उठल्यापासुन झोपे पर्यंतचे वेळापत्रक,तिला काय काय लागते त्याची सगळी लिस्ट बनवुन तो पेपर तिने भानूच्या हाती सोपवला जेणेकरून उद्या जेव्हा ती कॉलेज जॉईन करेल तेव्हा ती गेल्यावर तिचे कुठे अडू नये.

भानूने आल्या आल्याच जीजाचा ताबा घेतला.

रोजच्या सवयीने सुखाईच्या जागी दुसऱ्याच कुणालातरी समोर बघुन सुरवातीला जीजा कुरकरली पण भानूने तिच्याशी गप्पा मारत मारत लाडीगोडीतच तिला उठवुन कडेवर घेतले.तिचे रात्रीचे डायपर चेंज केले.तिचे तोंड धुण्याआधी स्वत:चे हात स्वच्छ धुतले.तिचे तोंड धुणे,शी/शू सर्व उरकुन तिला दूध पाजले.

तिच्या सर्व कामाच्या पद्धतीवर सुखदा बारकाईने नजर ठेवुन होती.तिचे काम अतिशय निर्मळ होते ही समाधानाची बाब होती सुखदासाठी.

काही काही गोष्टीत जिथे तिला खटकेल तिकडे त्याप्रमाणे सुचनाही करत होती ती.

पहिलाच दिवस असल्याने भानूही तिचे सर्व नीट ऐकुन त्याप्रमाणे काम करत होती.

एकंदर भानू जीजाचे व्यवस्थित करेल ह्याची मनोमन सुखदाला खात्री पटली तसे तिला हायसे वाटले.जीजाही तासाभरातच तिच्याबरोबर व्यवस्थित रूळली.

इकडे तोपर्यंत तिने वेणूमावशीं बरोबर नेहमीप्रमाणे नाष्टा उरकला आणि ती बेडरूममधे गेली.

हिच संधी साधुन तिला मोकळे पाहुन वेणूताईंनी आपल्या खोलीतुनच सुखदाला आवाज दिला.

सुखदाही मनाशी विचार करतच होती आपले कॉलेज सुरू होणार हे मावशींना स्वत: बोलुन कळवण्याबद्दल.

त्यांनीच हाक मारल्यावर ती घाईनेच त्यांच्या खोलीत गेली.

काल सुहासचे वेणूताईंशी काही बोलणे झालेय ह्याची तिला सुतराम कल्पना नव्हती.ह्या निमित्त आपण आपले कॉलेजचेही बोलु हा साधा विचार डोक्यात घेऊन ती वेणूताईंजवळ येऊन उभी राहीली.

वेणूताईंनी खुणेनेच तिला आपल्या बाजुला बसण्याचा ईशारा केला तशी ती वेणूताईंच्या पलंगाजवळ येऊन बसली.त्या काहीतरी शोधत होत्या.

तिने सहजच विचारले.

सुखदा - काही शोधताय का मावशी?काय हवेय?

वेणूताई (काहीतरी शोधतच) - हो गंऽऽ..हे बघ सापडली.त्यांच्या हातात काल सुहासने दिलेली,कुरीअरद्वारे आलेली तिच नलुताईच्या नातवाची लग्नपत्रिका होती.

सुखदाला अजुनही नीटसे कळत नव्हते की वेणूमावशींचे तिच्याकडे काय काम आहे...तिने हलकेच विचारले..

सुखदा - मावशीऽऽऽ मला कशाला बोलावलेत?

काही काम होते का तुमचे?

वेणूताई (किंचित स्मित करत) - सुखदा माझे एक काम करशील का गंऽऽ?

सुखदा - सांगा नाऽऽ..मला करण्याजोगे असेल तर नक्की करेन..

वेणूताई(हळुच पत्रिका समोर ठेवत) - सध्या चांदिचा भाव काय चाललाय गंऽऽ तुला काही कल्पना आहे का??

एकीकडे पत्रिका वाचायला देऊन दुसरीकडे चांदिचा भाव असे दोन विरूद्ध अर्थाअर्थी साम्य नसलेले विषय का बोलताहेत मावशी ह्याचा विचार करतच ती बोलली...

सुखदा (थोडी आश्चर्यचकीत थोडी प्रश्नांकित मुद्रेने) - काही कल्पना नाही हो मला..कदाचित आईला माहित असेल.ती घेत असते मधुन अधुन काहीबाही..पण अचानक चांदीच्या भावाची चौकशी ती कशाला..??

सुखदाला अजुनही वेणूताई नेमके काय विषय बोलु पहाताहेत हा क्लु लागत नव्हता.

वेणूताई(जरा सरसावुन मुद्द्याकडे वळत)- अचानक काही नाही गं.हे बघ ही पत्रिका वाच.

त्यांनी पत्रिका सुखदाच्या हातात वाचायला देतच पुढे बोलू लागल्या…

वेणूताई - ह्यातला नवरा मुलगा आहे ना वरूण तो माझा नातू….

माझी सगळ्यात मोठी बहिण नाही का नलुताईऽऽ…...सावंतवाडीला असते,तिच्या मुलाचा मुलगा..

आता तु ह्या घरची सून आहेस तुझ्यापासुन काय लपवायचे.

ही माझी बहिण बहिण नसुन माझी आईच आहे म्हणलेस तरी चालेल.आईने तर फक्त जन्म दिला अन् गेली.आम्ही पाच बहिणी.हि नलूताई सगळ्यात मोठी.माझ्या जन्मानंतर माझ्या लहाणपणीच आई वारली.तेव्हा हिनेच मला लहानाचे मोठे केले.हिच्या माझ्यात नाही म्हणले तरी दहा वीस वर्षाचे अंतर असेल. आता तेव्हा काही जन्मतारखा लक्षात ठेवत नसत कोणी पण मी आपले अंदाजपंचे सांगतेय.

नंतर माझ्या लग्नानंतर सुहास दहा वर्षाचा असताना हे गेले.परिस्थिती एकदम खालावली आमची.तेव्हा तिनेच माझ्या संसाराचा भार उचलला.सगळ्या बारीक सारीक गरजा कपडालत्ता,धान्य,झालेच तर सुहासच्या शिक्षणालाही मदत केली.तिचे खूप उपकार आहेत गं ह्या घरावर,माझ्यावर.

नाहीऽऽऽ...तिने ते उपकार म्हणुन नाही केले कधीच.तिचा फार जीव सुहासवर.त्यात तो अभ्यासात तल्लख मग तिनेच मागे लागुन त्याला मराठी शाळेतुन काढुन कॉनव्हेंटमधे घालायला लावले.कॉनव्हेंटची फी मला परवडणारी नव्हती म्हणुन मी आढेवेढे घेऊ लागले तसे तिने मला सांगुन टाकले आजपासुन सुहासच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी करेन मग तर झाले..तुझ्या परिस्थितीपायी तु मुलाचे नुकसान करणारेस का?उद्या शिकुन बॅरीस्टर(तेव्हा कोणीही खूप शिकुन मोठा झाला की बॅरीस्टर झाला हे म्हणायची पद्धत होती..) झाला म्हणजे तुझेच नाव होणार आहे.तेव्हा तुला जसे जमेल तसे परत कर नाहीतर नाही केले तरी हरकत नाही.मला जसा माझा पमा (म्हणजे तिचा एकुलता एक मुलगा) तसा सुहास.आणि त्या दिवसापासुन तिने जवळपास दत्तक घेतल्यागत सुहासच्या सर्व शैक्षणिक गरजांचा भार उचलला.ती पाठिशी होती म्हणुन मी आज हे सुखाचे दिवस बघतेय नाहितर काय झाले असते आमचे देवच जाणे.बोलता बोलताच भावूक झाल्या वेणूताई.

सुखदानेही त्यांच्या पाठीवरून हात फिरवुन त्यांचे सांत्वन केले.त्यांचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच थापटला.ती त्यांना मूकपणे आधार देत होती.

वेणूताईंनी स्वत:ला सावरले आणि पुढे म्हणाल्या…

वेणूताई - तिच्या मुलाच्या लग्नात तर माझी परिस्थिती नव्हती तिला काही चांगला आहेर करायची पण जसा सुहास नौकरीला लागला मी थोडे थोडे करून जसे जमेल तसे सोने-चांदी जमवुन ठेवलीय.त्यातल्याच सोन्याच्या तुला बांगड्या आणि हार केला लग्नात आणि आता चांदी जमा आहे थोडी तर तिच्या नातवाच्या लग्नात एक चांगली देवघरातली मोठी समई द्यावी असे माझ्या मनात आहे.

तिच्या उपकाराची उतराई तर ह्या जन्मी शक्य नाही पण मागल्यावेळी ती सहज बोलता बोलता म्हणाली की वरूणच्या लग्नात मी देवघरातली समई करणार आहे.पहिली खूप लहान आहे आणि झीजलीय पण वापरून वापरून.तर आता तिने करायची तर आपणच तीला भेट देऊयात काय वाटते तुला कशीय माझी कल्पना!!!

वेणूताईंनी मुद्दामच तिला संभाषणात ओढण्या हेतुने तिचे मत विचारले.

सुखदाला ह्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते.ती लगेच म्हणाली..

सुखदा - मस्त कल्पना आहे की मावशी.पण मग ह्यात माझी काय मदत हवीय तुम्हाला?

सुखदाने विचारले.

वेणूताई - माझ्या मनात होते की मी साठवलेली सगळी चांदी देऊन बदल्यात एक समई घ्यावी म्हणजे रोख रक्कम द्यायला लागणार नाही…

सुखदा - हो ऽऽ बरोबर आहे तुमचे.पण समई किती मोठी घ्यायची आणि वजनदार किती ह्यावर त्याच्या किंमतीत फरक पडेल ना...मग तुम्हाला काही अंदाज आहे का की नेमकी नलूमावशींना

(इकडे ती आपसुक नलुमावशींना 'मावशी' म्हणुन संबोधली हे वेणूताईंनी हेरले तशा त्या मनोमन खुष झाल्या.) किती मोठ्या आकाराची समई हवीय त्यांच्या देवघराकरता??

वेणूताई(विचार करत) - तिचे देवघर छान मोठ्ठे आहे.गावातल्या घरातले देवघर बघितलेस का कधी? खूप छान आहे.एक खोलीच म्हण ना.बाजुला लागुन सोवळ्याची खोली.वर्षभराचे सारे सोवळ्यातले जिन्नस तिथे ठवलेले असतात.साधारण आपल्या हाताइतकी थोडी उंचीला जरा त्याहुन कमी पण तितकी मोठी तर हवी.नवरात्रात अखंड दिवा असतो ना त्यांच्यात मग तेवढीच खोल असावी असे वाटते.

वेणूताईंनी साधारण वर्णन केले.

सुखदा - मग तर भरपूर मोठी आहे उंचीला.मावशी आपण असे करूयात का, उद्याच सराफ्याच्या पेढीवर जाऊ.मी लेटेस्ट भाव माहित करून घेते.तुम्हीही नलुमावशींशी बोलुन साधारण अंदाज घ्या.त्या खरेदी करणार असतील तर त्यांना तशी कल्पना द्या म्हणजे मग त्या खरेदी नाही करणार…

मग आपण त्यांच्या आवश्यकतेप्रमाणेच छान समई खरेदी करूनच घरी येऊ.

आता भानू असल्याने जीजाची काळजी नाही.

सगळे बोलुन झाले तसे वेणूताई आता मूळ मुद्द्यावर आल्या.

वेणूताई - बरं अजुन एक गोष्ट बोलायची होती.

सुखदा - बोला नाऽऽ… 

वेणूताई - काही नाही लग्नाला दोन दिवस आधीच या असा आग्रह केलाय पमाने तर मग आपण कसा प्लॅन करायचा…?

सुखदाचा अंदाज घेण्याकरता त्यांनी तिलाच प्रश्न केला.

सुखदा(जरा विचार करत) - मावशी मी पत्रिका पाहिली आत्ताच त्यात ज्या तारखेला लग्न आहे तेव्हा माझे कॉलेज असणार आहे..

अरेऽऽ होऽऽ मी सांगायलाच विसरले कीऽऽ तुम्हाला.

तेच सांगायला आले होते आणि तेच विसरले.

अहो मावशीऽऽ माझी रजा पुढल्या आठवड्यात संपतेय.मी सोमवारपासुन कॉलेज जॉईन करेन म्हणतेय.तर मला वाटते मी मुलांना घेऊन राहते इकडेच तुम्ही आणि सुहास जाऊन या लग्नाला..

तुमचे जाणे गरजेचे आहे...नलूमावशी खुष होतील.असेही तुम्हाला कुठे जायलाच मिळत नाही घर सोडून..जा जाऊन राहुन या चार दिवस आईकडे.मी इकडची सर्व जवाबदारी पाहिन.

सुखदाने अत्यंत हुशारीने सुहास आणि आपल्यातल्या दुराव्याची जराही चाहूल  न लागू देता वेणूताईंना व्यवस्थित पटवायचा प्रयत्न केला.

एरवी जर सुहासने कल्पना दिली नसती तर त्या तयारही झाल्या असत्या खुष होऊन पण सुखदा का त्यांना पाठवायला उत्सुक होती ह्या मागची मेख त्यांना अगोदरच कळली असल्याने त्यांनीही अत्यंत हुशारीने पलटवार केला.

वेणूताई - नलूताईऽऽऽ आणि खूषऽऽ?????

अगंऽऽ ती खुष तर होणारच नाहीऽऽ उलट ह्या वयातही मला पाठीत दोन दणके द्यायला कमी नाही करणार,जर तिला कळले ना की नविन सुनेला घरी ठेवुन मी एकटी सुहासला घेऊन लग्नाला आलेय तर….

ती मला दारातही उभे करणार नाही.

ते काही नाहीऽऽऽ.जायला तर तुम्हा दोघांनाच लागेल.मी इकडे मुलांना संभाळेन.तुझ्या आई-बाबांनाही इकडेच बोलवुन घेईन म्हणजे आम्ही मिळुन संभाळू नातवंडांना.त्यांना तुमच्या शिवाय रहायची सवय आहेच त्यामुळे काही अडणार नाही आणि आता भानूही आहे जीजाची काळजी घ्यायला त्यामुळे तुम्ही दोघेच जा.तिला फार ईच्छा होती सुहास आणि तुला बघायची.आता ह्या निमित्ताने ती ही पुर्ण होईल.फार प्रेमळ आहे बघ ती.तुला बघुन तर खूप खुष होईल ती.

सुखदाला सुचत नव्हते वेणूमावशींना कसे समजवावे.तिने पुन्हा विषय दामटला.

सुखदा - पण मावशी माझी रजा संपली आहे.नेमके कॉलेज सुरू होतेय मग मला कसे जमणार यायला..तुम्ही आणि सुहास जा ना.हवेतर पुढच्या खेपेला आम्ही असेच भेटायला जाऊन येऊ..

तिने काहीतरी समजुत घालायची म्हणुन मावशींना बतावणी केली.

वेणूताई पण काय कच्च्या गुरूच्या चेल्या नव्हत्या.त्या लगेच थोडा इमोशनल ड्रामा करत म्हणाल्या…

वेणूताई - हे बघ सुखदाऽऽऽ आता आम्ही पिकली पानंऽऽ आज आहे तर उद्या नाही.तिचे तर वय आता नाही म्हणले तरी पंच्याऐशीच्या घरात नक्की असेल.मीच पंच्याहत्तरीला आले तर तिची काय कथा.

कसे आहे ना बाळंऽऽऽ वेळ प्रसंग सांगुन येतो का?नंतर कुणी पाहिलाय?जेव्हा वेळ आहे तेव्हाच कार्या प्रसंगानी जावेऽऽ,भेटावेऽऽऽ… तिचा फार जीव गं सुहासवर.तिला तुम्हा नविन जोडप्याला बघायची फार ईच्छा आहे.पण हल्ली प्रवास झेपत नाही म्हणुन ती कुठेही जात नाही.आणि तिने तुझ्या नवऱ्याकरता इतके केले तर तिची इतकी साधी अपेक्षा पुर्ण होऊ नये???? बघ बाईऽऽऽ मला जे योग्य वाटले ते मी सांगितले आता तुमचे तुम्ही ठरवा.मी काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही.माझ्या नात्यांचे ओझे मी तुझ्यावर का टाकु? ठिक आहे ...तुला जे योग्य वाटेल ते कर…

वेणूताईंच्या शेवटच्या वाक्याने तिचे काळिज पिळवटले.

मावशींनी मुद्दामुनच तसे तुटक वाक्य वापरले.तिला ते जिव्हारी लागले.

सुखदा(वरमुन) - मावशी असे का बोलतात? मी तुमची कोणीच नाही का? 

तुमच्या नात्याचं आेझं बीझं ही भाषा कशासाठी? तम्ही आपली लेक मानता ना मला,मग ही अशी परकेपणाची भाषा का??

ठिक आहे.तुमची ईच्छा आहे नाऽऽ आम्ही जोडीने जावे मग जाऊ आम्ही.

मी रजा वाढवते चार दिवस.पण तुम्ही आधी हसा पाहू.असा तोंड पाडलेला तुमचा चेहरा बघवत नाहीये मला..

आपली इमोशनल गोळी कामी आली हे पाहुन वेणूताईंना आकाश ठेंगणे झाले.त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.कधी एकदा सुहासला ही गोड बातमी देते असे झाले होते वेणूताईंना.पण तुर्तास आपल्या भावनांना आवर घालत मनातील भाव चेहऱ्यावर न दिसु देण्याची खबरदारी घेत धीरगंभीर होत त्या म्हणाल्या..

वेणूताई - हे बघ बाळंऽऽ काहीवेळा लोकांच्या ईच्छेखातर आपल्या स्वभावाला,ईच्छेला मुरड घालुन वागावे लागते.

मला माहितीय तुम्ही कोणत्या अटिंवर हे लग्न केलेय पण ह्या अंतस्थ गोष्टी जगाला नाही माहित नाऽऽ!!?

आता परवाचीच गोष्ट घे.

त्या पार्टीला जायची तुझी इच्छा नव्हती तरी तु गेलीसच नाऽऽ?

मग का गेलीस तु तुझ्या मर्जी विरूद्ध?

कारण चार चौघात तुमच्या नात्याविषयी चर्चा होऊ नये म्हणुन,होय नाऽऽ???

मग तसेच ह्या लग्नालाही जाऽऽ.जगाला कशाला आपल्या नात्यांचा तमाशा दाखवायचा.कायऽऽऽ पटतेय की नाही माझे म्हणणे…??

सुखदाला मावशींचा शेवटचा मुद्दा पटला असला तरी त्या पार्टीच्या वेळी तिची मन:स्थिती खूप वेगळी होती हे ती कसे सांगणार होती वेणूमावशींना.त्याच दिवशी तर दोघांनी एकमेकांना मनापासुन पती पत्नी म्हणुन स्वीकारले होते.

पण त्या दिवसात आणि आजच्या दिवसात खूप फरक आहे हे कसे पटवुन देणार होती ती.

पण जगासमोर पती पत्नी असल्याचे नाटक तर तिला आयुष्यभर वठवावे लागणार होते मग त्याची सुरवात ह्या लग्नापासुनच करायला काय हरकत आहे.कोणी नाहीतर निदान ह्या मोठ्या लोकांना जरी ह्या कृतीने आनंद मिळाला तरी आपला उद्देश सफल झाला असे मानायचे..

मनोमन असा सगळा विचार करतच सुखदा म्हणाली….

सुखदा - हो मावशीऽऽऽ.तुम्ही बोललात आणि मला पटले नाही असे कधी झालेय का!!!

तुम्ही म्हणाल तसेच होईल..आता खुष!!!

सुखदाने वेणूमावशींचा पडलेला मूड ठिक करण्या करता बोलली..

त्यावर वेणूताईंनीही मूड नॉर्मलवर आणत उत्साहात म्हणाल्या…

वेणूताई - माझी अजुन एक ईच्छा होती..बोलु का???

सुखदा(अधिरतेने)- अहोऽऽ मग बोला की..परवानगी कसली मागताय.बोलाऽऽऽ..

वेणूताई - मी नवस बोलले होते अंबाबाईला की नव्या जोडप्याला दर्शनाला पाठवेन आणि खणा नारळाने ओटी भरेन नव्या सुनेच्या हातुन..आता कसेही सावंतवाडीला जायचेच आहे तर कोल्हापुर मार्गे गेलात तर हेही काम पुर्ण होईल..

सुखदा(जरा विचार करत) - आधी तुम्ही सुहासशी बोललात का ह्या विषयावर???

तुम्हाला तर माहितीय नाऽऽ त्याला हे असले सोपस्कार आवडत नाहीत.

जर तो तयार असेल तर तुमची ही ईच्छाही नक्की पुर्ण करेन मी…पण आधी त्याच्याशी बोला..

त्यावर वेणूताईंनीही होकारार्थी मान डोलावली.

गप्पांच्या नादात जेवणाची वेळ झाली होती.

ते लक्षात येताच सुखदा म्हणाली

सुखदा - मावशी वेळ कसा गेला कळलेच नाही.जेवायची वेळ झाली..जेवुयात का आपण?

सुखदाने विचारले तसे त्यांनी होकार भरतच दोघी डायनिंगटेबलकडे निघाल्या…….

--------------------------(क्रमश:19)-------------------------

(क्रमश:19)

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार वाचक मित्र/मैत्रिणी,

सुखदाला रजा वाढवण्यासाठी राजी करण्यात वेणूताईंना यश मिळाले आता पुढेही सुहासच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील की कथेला काही वेगळी कलाटणी मिळेल???

हे पहायचे असेल तर पुढील भाग वाचावा लागेल ना….मग नक्की वाचा.

आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.

माझी कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या ब्लॉगला फॉलो करायला मुळीच विसरू नका….

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all