फिरूनी नवी जन्मेन मी भाग 18

लग्नानंतर फुललेल्या नात्याची सुंदर नवी पहाट म्हणजे फिरूनी नवी ..... .... कथा.

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -18

©®राधिका कुलकर्णी.

गेल्या काही दिवसांपासुन ज्या अवस्थेतुन सुखदा जात होती थोड्याफार फरकाने सुहासचीही काही वेगळी स्थिती नव्हती.फरक फक्त इतकाच होता की सुखदाला सुहासच्या ह्या वागण्या मागचे कारण माहीत नव्हते आणि सुहासला ते माहीत होते.

सुहासच्या अस्वस्थतेचं कारण होता तो स्वत: आणि त्याच्या मनात चाललेली विचारांची घालमेल. 

सुखदावर मनापासुन प्रेम करत असुनही जोपर्यंत मनातली ही सर्व खदखद सुखदा जवळ बोलुन दाखवत नाही तोवर नविन नात्याला सुरवात करणे ही त्याची आणि सुखदाची दोघांचीही केलेली फसवणुक होईल असेच त्याला वाटत होते.

आपल्या मनात कोणकोणती वादळे येऊन गेली.ह्या मानसिक,भावनिक वादळांच्या आंदोलनांमुळेच स्वत:च्याच अंतरंगाची,तिथे चाललेल्या नाट्यमय घडामोडींची उलट फेरतपासणी करण्यासाठी त्याने काय काय केले हे सर्व जोवर सुखदाला सांगत नाही त्याची चलबिचल थांबणार नव्हती.

मनाची पहिली पाटी कोरी नसताना दुसरी नविन अक्षरे त्यावर कशी काय गिरवता येणार होती???

मुद्दा तर खरा होता पण हे सगळे सांगायला,बोलायला हवा तसा एकांत तर मिळायला हवा नाऽऽऽऽ….??

नेमका तोच मिळत नव्हता त्याला.

दिवसा ऑफीस रात्री मुले सोबत.त्यात सुखदाही फटकुन मुद्दाम एक अंतर राखुन वागत होती.

त्यामुळे सुखदाचे झालेले गैरसमज,तिची कोरडी तुटक वागणूक सगळं सगळ दिसत असुनही त्यावर हवा तो तोडगा त्याला सापडत नव्हता. 

मनातल्या अस्वस्थतेला कमी करण्यासाठी नकळतपणे त्याचे पाय देवघराकडे ओढले गेले. विचारांच्या कोलाहलाने अशांत,उद्विग्न झालेल्या मनाला शांती मिळावी म्हणुन तो देवापुढे डोळे मिटुन हात जोडून उभा राहीला.

सुहास काही देवभोळा वगैरे अजिबात नव्हता.देव ह्या संकल्पनेवर त्याची श्रद्धा जरूर होती पण देवाच्या नावावर उगीचच व्रतवैकल्यांचे आणि उपास तापास पूजापाठ आणि साेवळ्या ओवळ्याचे माजवले जाणारे स्तोम त्याला कधीच मान्य नव्हते.असल्या थोतांडापासुन तो दूरच असे पण म्हणुन ते करणाऱ्यालाही तो विरोध करत नव्हता.

त्यामुळे ह्या अखंड सृष्टीचा चालक-पालक अशी जी काही एक शक्ती आहे त्यावर त्याचा नक्कीच विश्वास होता आणि आज त्याच शक्तीपुढे नतमस्तक होऊन त्याच्या आयुष्यात निर्माण झालेले हे पेच सोडवायला थोडी ताकद उधार दे हे मागणे मनोमन मागत होता.

डोळे मिटुन आराधना करत असतानाच खोलीचे 

दार बंद करायला आलेल्या वेणूताईंनी सुहासला देवापुढे उभे बघितले.

सुहास आणि देवापुढे!!!!आश्चर्यच वाटले त्यांना.

पण त्यांना हे ही माहित होते की जेव्हा जेव्हा जीवनात असे काही प्रसंग समोर उभे राहतात जिथे आपली मती कुंठित होते,योग्य काय अयोग्य काय हे कळेनासे होते तेव्हाच तो ही अशी कृती करायचा.

सुहास आज देवापुढे हात जोडून उभा म्हणजे नक्कीच त्याचे मन दोलायमान स्थितीत असणार हे वेणूताईंनी सहज ओळखले.

त्या हळुच पावले टाकत त्याच्या पाठीमागे येऊन उभ्या राहिल्या.हलकेच त्याच्या पाठीवर आपल्या हाताचा स्पर्श केला.कोणाच्यातरी हाताची थाप आपल्या पाठिवर बसताच तो एकदम दचकला.त्याने मागे वळुन बघितले.आई आहे कळताच जीवात जीव आला त्याच्या.

वेणूताईंनी खुणेनेच काय झाले विचारले त्यावर त्याने मानेनेच काही नाही अशी

नकारार्थी मान हलवली.

वेणूताई हलक्या आवाजात त्याला म्हणाल्या..

वेणूताई - ये माझ्या खोलीत बसुन बोलुत.

त्याबरोबर कोणतेही आढेवेढे न घेता तो निमुटपणे वेणूताईंच्या पाठोपाठ त्यांच्या खोलीत गेला.

दोघेही वेणुताईंच्या खोलीत आले.

सुहास अजुनही विचाराधीन कसल्यातरी विचारात गढलेला दिसत होता.

मग वेणूताईंनीच सुरवात केली.

वेणूताई (मिश्कीलपणे)- आज कशी वाट चुकली मी म्हणतेऽऽऽ?

आमचा देव बरा आठवला आज!!!

वातावरणातील ताण हलका करण्याकरता वेणूताईंनी मारलेली कोपरखळी कळुनही एरवीचा हसुन त्यात सामील होणारा सुहास आज मात्र कुठलीच प्रतिक्रीया द्यायच्या मन:स्थितीत नव्हता.तो काही न बोलता शांतपणे

वेणूताईंच्या मांडीवर डोक ठेवुन पडुन राहीला.

कधीकधी शब्दांपेक्षा ही अबोल भाषाच कितीतरी बोलकी वाटते ना!!!

नकळत किती काय काय सांगुन जाते!!!

वेणूताईंनाही न बोलताच त्याच्या मनातली खळबळ जाणवली.त्याला मूकपणे संम्मत्ती देत वेणूताई त्याच्या केसातुन हात फिरवत वाट पाहू लागल्या तो कधी बोलता होतोय ह्याची.

बराचवेळ झाला तसे सुहास हलकेच उठुन बसला.

वेणूताईंनी पुन्हा विचारले

वेणूताई -काय झालेय सुहास?एवढा कसला गहन विचार चाललाय?

सुहासनेही मग घसा खाकरून बोलायची तयारी केली.

सुहास - आईऽऽ गेल्या काही दिवसात माझ्यात आणि सुखदात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.तुला आम्ही सगळेच काही सांगितलेले नाहीये.कदाचित तुला काही जाणवलेय की नाही मला माहीत नाही,पण …….(थोडा पॉझ घेऊन….)

सुखदा आता आवडायला लागलीय मला.

वेणूताई(हसतच) - कुणालाही आवडावी अशीच आहे ती पोरं..अगदी लाघवी..

अरेऽऽ साधं दारात चार दिवस एखादं बेवारशी कुत्र जरी आलं तर सवयीने त्याचा लळा लागतो आपल्याला मग हे तर जीतं जागतं माणुस आहे रेऽऽऽ....

न आवडायला काय झालंऽऽ!!आवडणारच….

वेणूताईंनी आपली बाजू मांडली.

सुहास - हम्मऽऽ बरोबर आहे तुझं.पण मी वेगळ काहीतरी सांगतोय.

म्हणजे संपदाशी लग्न झाल्यानंतर तिची बहीण ह्या नात्याने आणि मैत्रिण म्हणुनही सुखदा तेव्हाही आवडायचीच.पण आताचे आवडणे वेगळेय.मैत्रिण म्हणुन तर ती आजही प्रीय आहेच मला त्यात काही शंकाच नाही.

परंतु आता मला ती एक पत्नी म्हणुन सुद्धा आवडायला लागलीय..तुला समजतेय नाऽऽ मी काय बोलतोय.?

म्हणजे हे फक्त तु म्हणतेस त्याप्रमाणे सवयीतुन लगलेला लळा आहे की कोरडी आपुलकी आहे??

 की स्त्री देहाची आसक्ती...आहे की प्रेम...??? 

हे प्रश्न मला भंडावुन सोडत होते.ह्या सगळ्याची उत्तरे मिळवण्यासाठी काहीकाळ तिच्यापासुन दूर राहुन ह्यावर आत्मपरिक्षण करण्याचा मी निर्णय घेतला.

हेच कारण होते मी न सांगता सवरता अचानक चार दिवस बेंगलोरला मिटिंगसाठी गेलो.

म्हणजे माझी मिटिंग खरचच होती पण मी ती मुद्दाम मागुन घेतली होती.म्हणजेच ठरवले असते तर मी ती अव्डॉइडही करू शकलो असतो पण मग मला माझ्या प्रश्नांची उकल शोधण्यासाठी हवा असलेला एकांत इकडे मिळणे मुश्कील होते.घरात राहुन मी अधिकाधिक कनफ्युज झालो असतो.स्वत:ला अपराधी मानुन मनातल्या मनात कुढत राहीलो असतो.ते सगळे टाळण्यासाठी हे करणे गरजेचे होते आईऽऽ.

तिकडे गेल्यावर त्या चार दिवसात मी मुद्दामच तिच्याशी कुठलाही संपर्क साधला नाही.

आणि जेव्हा मला माझ्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली की हा सवयीतुन निर्माण झालेला लळा किंवा कोरडी आपुलकी नसुन मला तिच्याविषयी खरच मनातुन काहीतरी वाटतेय.

हे फक्त शारीरिक आकर्षण नसुन मला ती मनापासुन आवडायला लागलीय हे जेव्हा पटले तेव्हा मी तिला फोन केला हेच सगळे सांगण्यासाठी…….,पण फोनवर तिच्याशी बोलताना एक नविनच सत्य माझ्या नव्याने समोर आले.

म्हणजे तिच्या विरहात मी जितका तडफडत होतो,तिला मिस करत होतो तिही मला तितकेच किंवा त्याहुनही जास्त मिस करत होती.

हे सत्य कळल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आणि इतक्या आनंदाच्या क्षणी हे सगळे आत्ता बोलण्यापेक्षा घरी जाऊन निवांत ह्यावर समोरासमोर बसुन तिला सगळी कैफियत मांडावी असा मी तात्काळ विचार केला आणि फोनवर सांगणे टाळले.पण आता वाटतेय की मी तिथेच चुक केली.त्यावेळीच मनातलं सगळ बोलुन टाकायला हवं होतं.म्हणजे आज उद्भवलेली परिस्थिती आली नसती……

घरी आल्यावर………….. 

आनंदाच्या नादातऽऽ………. आम्ही... बऱ्यापैकी….जवळ….आलो…..

एकमेकांच्या सहवासातील ते क्षण खरच स्वर्गीय अनुभूती देऊन गेले गं आम्हाला.

त्यानंतर हे सगळे तर घडत राहिले

पण माझ्या अंतरंगातील ही सगळी स्थित्यंतरे सांगायची हवी तशी संधी मात्र अजुनही मिळाली नाही मला त्यानंतर.

आता तुला सांगायला हरकत नाही.तु माझी जन्मदात्री आहेस.तुझ्यापासुन काय लपवु..????

आईऽऽ,आम्ही दोघांनीही एकमेकांना नवरा-बायको म्हणुन स्विकारले असले तरी अजुनही माझे मन तिला पत्नी म्हणुन स्वीकारायला घाबरतेय गंऽऽ.

कारण मला मागच्या भूतकाळाच्या पानांवर माझा येणारा वर्तमान लिहायचा नाहीये.

भूतकाळाला आठवणीच्या गोड कूपीत बंद करून तु म्हणालीस ना 'आठवणी बंद करायच्या, वस्तु नाहीत... ' तसेच भूतकाळ बाजुला सोडुन पुन्हा नव्याने हे नाते जोडायचेय.

मग नवे नाते जोडताना जुने विचार,मनातली जुनी जळमटे ह्यांचे बॅलन्स शीट क्लिअर नको का करायला आधी??

हेच कारण आहे की जोपर्यंत मी तिच्याशी माझ्या मनातली हि खळबळ सांगत नाही तोपर्यंत मी पत्नी म्हणुन तिचा स्वीकार नाही करू शकत.

पण माझ्या अशा दुराव्याने ती तुटलीय.तिचा गैरसमज झालाय काहीतरी.

माझ्या अशा अव्हेरण्याने नकळत मी तिच्या जुन्या जखमांना पुन्हा हिरवे केलेय कदाचित.

ती आता फक्त कर्तव्य म्हणुन घरात वावरतीय पण माझ्यासोबतची मैत्रीही ह्या नादात मी हरवुन बसलोय.सुहास रडवेला झाला होता हे सांगताना..

डोळे टिपतच तो पूढे म्हणाला

 सुहास - ती तर माझ्या जवळही फिरकत नाही आजकाल.खूप दुखावली गेलीय आणि मला समजत नाहीये हा तिढा मी कसा साेडवु???

म्हणुनच तुझ्या देवाकडे ह्या परिस्थितीतुन सुटकेचा मार्ग दाखव हे मागणे मागायला गेलो होतो..

सुहास एकसारखा बोलत होता.शेवटी जरावेळ दम खात त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली.

सुहास - आईऽऽ आता तुच काहीतरी मार्ग सुचव ह्यातुन.

वेणूताई - हम्मऽऽऽ..खरचच गंभीर आहे समस्या..

मला वाटते तुम्ही दोघेच कुठेतरी बाहेर जाऊन का येत नाही?? तेच तेच वातावरण तेच ते चेहरे मग मनातले विचारही तसेच चिकटुन राहतात.

जरा हवाबदल झाला की चीत्तवृत्तीतही फरक पडेल.

सुहास- होऽ मी ही हाच विचार केला.तशी एक संधीही चालुन आलीय.आपल्या वरूणचे म्हणजेच नलुमावशीच्या नातवाचे लग्न आहे पुढल्या आठवड्यात.

(नलुताई म्हणजे वेणूताईंची सगळ्यात मोठ्ठी बहिण.थोरली असल्याने वयातही आई लेकी इतके अंतर.त्यामुळे वेणूताई तिच्यासाठी बहिणीपेक्षा लेकच जास्त होत्या.

त्यात वेणूताईंना अकाली वैधव्य आल्यावर संसाराचा गाडा ओढताना त्यांची बरीच दमछाक व्हायची.घरचे उत्पन्न तुटपुंजे.तेव्हा नलुताईंनी वेणूताईंची सर्वतोपरी मदत करून त्यांच्या संसाराला हातभार लावला होता.सुहासच्या शिक्षणाचाही बराच खर्च त्यांनीच आपणहुन उचलला.फार माया होती त्यांची वेणूताई आणि सुहासवर.पमा नलुताईंचा मुलगा म्हणजे नात्याने तो सुहासचा मावसभाऊ पण वयात बरेच अंतर असल्याने त्यांचा मुलगा वरूण आणि सुहासच भाऊ भाऊ वाटावेत इतके त्यांच्या वयात कमी अंतर होते.सुहास फक्त सहा सात वर्षांनीच मोठा होता वरूणपेक्षा.त्याच वरूणचे लग्न होते पुढल्या आठवड्यात.

नलूमावशींचे वय पंच्याऐशीच्या घरात.जरी जुनं कामाच अंग असलं तरी वयोमानाने त्यांचे प्रवास बंदच झाले होते.आजारपण काही नव्हते पण प्रवास टाळायची ती हल्ली.हेच कारण होते की पमाने सगळ्यांना लग्नाला रितसर दोन दिवस अगोदर येण्याचा आग्रह केला होता.ह्या निमित्त नलुताईंची सगळ्यांशी भेट होईल हाच त्यामागचा उद्देश..)

सुहास - अगंऽऽ पमादादाचा फोन आला होता सकाळीच.तो म्हणतोय की आपण सगळे  दोन दिवस आधी आलेच पाहिजे.आता कारण तर छान मिळालेय पण ते सगळे कसे जुळुन येणार???कठिण वाटतेय मला...

वेणूताई - अरे वाह्..!!हे तर चांगलेच निमित्त आहे.नलुताईची फार इच्छा आहे तुम्हा नविन जोडप्याला बघायची.ह्या निमित्त खरच जाऊन या दोन दिवस सावंतवाडीला.आता तिचे वय झालेय.तिला काही प्रवास झेपत नाही.तुम्हीच भेटुन या.तिला खूप आनंद होईल होऽ तुमची जोडी बघुन.

मी मुलांना संभाळेन इकडे.नलिनीताईं आणि रणजितरावांनाही आपल्याकडेच बोलावुन घेते मुक्कामाला तुम्ही येईपर्यंत.तुम्ही निवांत जाऊन या...

सुहास - अगं आईऽऽ मी ही हाच विचार केला पण त्यातही एक अडचण आहे.

वेणूताई - आता कसली अडचण??

सुहास - अगंऽ सुखदा परवा बोलता बोलता सहज म्हणाली की जीजासाठी कोणीतरी बाई संभाळणारी मिळेल तर बघायला लागेल कारण तिची लिव्ह संपतेय पुढल्या आठवड्यात.ती जॉईन करतेय सोमवार पासुन असे बोलता बोलता म्हणत होती मला.

आणि मी ज्या प्रकारे वागलोय तिच्याशी ते पाहता मला नाही वाटत आता ती माझ्या बरोबर कुठेही यायला तयार होईल…..

वेणूताई - मग आता ह्यातुन मार्ग काय? काही ठरवलेस का तु?

वेणूताईंनी विचारले

सुहास -मी काय ठरवणार? पण जर तु ठरवलेस तर तु माझी मदत नक्की करू शकतेस…

वेणूताई(आश्चर्यचकीत होऊन) - मीऽऽऽ?  मी कशी काय मदत करू शकते??

सुहास - नलुमावशी आपल्याला किती जवळची आहे हे तर तुही जाणतेस त्यामुळे ह्या लग्नाला आमचे जाणे कसे जरूरीचे आहे हे तु तिला पटवुन दे.

ह्याक्षणी ती फक्त तुझेच ऐकेल.कारण आमच्यातले जुळलेले आणि दुरावलेले दोन्हीही नाती तुला माहीत नाही असाच तिचा भ्रम आहे.त्याच भ्रमात ठेवुन तु तिला ह्या लग्नासाठी तयार कर.तु सांगितलेस तर ती तिची लीव्ह नक्की एक्सटेंड करेल असा मला विश्वास वाटतोय.

नेमके तिच्या जॉईनिंगच्या दुसऱ्याच दिवशी लग्न आहे.म्हणजे लग्नाला जायचे तेही दोन दिवस अगोदर तर तिला तिची सुट्टी किमान एक आठवडा तरी वाढवावी लागेल आणि ह्या गोष्टीला मी सांगितले तर ती मुळीच तयार होणार नाही.

हांऽऽऽ फक्त तुझा शब्द ती मोडणार नाही.

मला खात्री आहे.

वेणूताई - कुठेय पत्रिका?मला दाखव की.कधी आली? 

सुहास- आजच कुरीअरने आलीय. तेव्हा पासुन माझ्या डोक्यात हाच प्लॅन घोळतोय.माझा विचार होता आठ दिवस मी ही लिव्ह टाकतो.दोघे मिळुन अगोदर गोव्याला जाऊन येऊ आणि मग तिकडुन डायरेक्ट नलुमावशीकडे सांवतवाडीला.पण हा प्लॅन आता वर्क आऊट कसा होणार हीच चिंता सतावतेय…..

काही सुचत नाहीये.तिच्याशी बोलायला मनातलं सगळ सांगायला तिने मला वेळ तर द्यायला हवा ना????

आजकाल ती फक्त कामापुरतेच बोलते.खेदाची बाब म्हणजे तिला माझे वागणे खटकत असुनही एका शब्दाने तिने मला प्रश्न केला नाही की मी असे का वागतोय तिच्याबरोबर.इतके परके करून टाकलेय तिने मला.

मी खूप थकलोय गं विचार करकरून.माझी बुद्धीच चालेनाशी झालीय.

आता तो तुझा देवच काही मार्ग दाखवला तर काहीतरी घडेल…

सुहास खूप उदास निराश मनाने आपले मन आईजवळ मोकळे करत होता.

मनाची उद्विग्नता आईपुढे बोलुन त्याला खूप बरे वाटत होते.

कधी कधी समस्या सुटलेल्या नसतात तरी ती बोलायला,व्यक्त करायला एखादा हक्काचा कोपरा मिळाला की नुसत्या व्यक्त होण्यानेही मनाला शांतता मिळते.समस्या कमी नाही झाली तरी त्यावर मार्ग शोधायला नवी ऊर्जा मिळते…

सुहासचेही आत्ता अगदी असेच झाले होते...आईशी बोलुन नक्कीच काहीतरी चांगले घडेल अशी आशा मनात डोकावु लागली होती त्याच्या….

एकीकडे सुखदाबद्दल अपराधी वाटत होते.तिला जो मानसिक त्रास आपल्यामुळे झेलावा लागतोय त्याला फक्त आपणच जवाबदार आहोत ही बोच त्याला आतल्या आत वेदना देत होती तर दुसरीकडे सुटकेचे सगळे मार्ग तिनेच बंद केले होते-बोलायची संधी न देऊन…...

पहिल्या वेळच्या आघातातुन सावरायला तिला चार वर्ष लागली आता ह्या धक्क्यातुन ती लवकर सावरेल ना?

सुखदा त्यानंतर आपल्याला पहिल्यासारखीच स्वीकारेल नाऽऽ? 

की तिच्या भूतकाळाला मी पुन्हा तिच्यासमोर आणुन दुधाने पोळलेली सुखदा आता ताकही फुंकुन पीईल? काय होईल…? 

ह्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे आत्तातरी सुहासजवळ नव्हती.

तो अजुनही आपल्याच विचारात गुंग पाहुन वेणूताई त्याला सांत्वन करत म्हणाल्या.

वेणूताई - जास्त विचार नको करूस.विचार करून त्रास संपणार आहे थोडीच??

होईल सगळे नीट.

तो वर बसलेला आहे नाऽऽऽ,त्याच्यावर भरोसा ठेव.

तो जसे दु:ख देतो ना तसाच त्यातुन बाहेर पडायचा मार्गही दाखवतो.अंबाबाई नक्की सदबुद्धी देईल..

मी बोलते तिच्याशी.समजावते तिला.तु निश्चिंत रहा.

तु मनाने प्रामाणिक आहेस हे तिला कळेल तेव्हा ती सगळे विसरून पुन्हा गोडीत येते की नाही बघच तु….

वेणूताई सुहासचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होत्या..

गप्पांच्या ओघात बराच वेळ निघुन गेला तसे वेणूताई म्हणाल्या..

वेणूताई - बरंऽऽऽ पण आता जाऽऽ.जाऊन झोप.किती उशीर झालाय बघ.

सुहासही मान हलवत बाहेर पडला आणि आपल्या खोलीत येऊन बिछान्यावर पडला.

आईच्या बोलण्याने तात्पुरती जरी त्याला उभारी मिळाली असली तरीही जोवर सगळे पुर्ववत होत नाही त्याला दाेघांच्या भविष्यातील नात्याची चिंताच वाटत होती….

विचारांच्या ओघातच कधी झोप लागली त्याचे त्याला कळलेच नाही.

उद्याचा दिवस काय नाट्य घेऊन उगवणार होता हे फक्त त्या नियतीलाच ठाऊक होते जिने ते हुकुमी पान बेमालुमपणे आपल्या हातात दडवुन ठेवले होते…...

बंद मुठ्ठी लाख की ;

खुली तो प्यारे खाँक की।

ह्या उक्तीप्रमाणेच अवस्था झाली होती सुहास-सुखदाच्या सध्याच्या नात्याची…….

-----------------------(क्रमश:18)-----------------------------

(क्रमश:18)

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मित्रहो,

आजच्या भागात सुहासच्या मनाची वैचारिक उलथापालथ ..त्यासाठी तो करत असलेले प्रयत्न आपण बघितले..

काय होईल पुढे?

सुहासचा प्लॅन सक्सेसफुल होईल की नियती वेगळाच डाव मांडेल??

हे सगळे जाणुन घ्यायला पुढील भाग नक्की वाचा.

हा भाग कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all