फिरूनी नवी जन्मेन मी भाग-14
©®राधिका कुलकर्णी.
जीजा आणि वेणूताईंना रिक्षात बसवुन ती घरात आली.
आज सुहासच्या आवडीचा बेत करायचे ठरवले होते तिने त्याप्रमाणे ती कामाला लागली.
सपुताईकडुन तिला इतके माहीत होते की त्याला घरी बनवलेल्या गव्हल्यांची खीर खूप आवडते. बाकी गोष्टी वेणूमावशींनी सांगितल्या जसे की कारल्याचे पंचांमृत,बटाट्याची भाजी,पूरी म्हणजे त्याचा जीव की प्राण.स्वत:च्या मनाने त्यात तिने व्हेजीटेबल पुलाव,रायता आणि पापड हे जिन्नसही अॅड केले.बेत तर मस्त फर्मास ठरला होता पण सवाष्ण जेवायला असल्याने आज कुठलाही पदार्थ चाखून पाहता येणार नव्हता.
तिने पटकन सगळा स्वैयंपाक तयार केला.तिकडे आम्ही सगळे पुरणा-वरणाचा स्वैपाक जेवणार आणि हा इकडे नुसता वरणभात खाणार हे काही तिला रूचत नव्हते म्हणुन हा सगळा बेत केला.रूसलेली गाडी रूळावर आणण्याकरता केलेला छोटासा प्रयत्नही म्हणता येईल.बघु हा चंचूप्रवेश आता कितपत यशस्वी होतोय.. मनातल्या मनात हा सगळा विचार करत ती रायत्याला फ्रीजमधे ठेवुन बेडरूममधे आली.
सुहासचा आराम झाला होता.त्याची स्पजिंगची वेळ खरे तर झाली होती पण कालपासुन त्याचे एकंदरीत वागणे बघता हा आज काय पवित्रा घेईल ह्याचा अंदाज लावणे कठिण होते.पण आता त्याच्या कुठल्याच बोलण्याला विरोध करायचा नाही.तो जे म्हणेल ते ऐकुन फक्त मान डोलवायची हे तिने मनोमन ठरवुन टाकले होते.
नाहीतर उगीचच चीडचीड,मनस्ताप आणि वातावरण गढूळ होणार हे काहीही व्हायला नको होते सुखदाला.
काल रात्रीच त्याला बऱ्यापैकी नीट समजुन सांगायचा तिच्या परीने तिचा प्रयत्न करून झाला होता.त्यावर तेव्हाही त्याने कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त करणे हुशारीने टाळले होते.
त्यामुळे आता त्याला काय करायचे ते त्याचे त्याला ठरवु दे.
So….,No more discussion on this topic now…!
असे मनाला बजावुन त्याच्या कुठल्याही उलट-सुलट उत्तराची मानसिक तयारी करूनच ती सुहासकडे आली.
काल जणूकाही घडलेच नाही असे भासवत तिने त्याला विचारले रादर सांगितले
सुखदा -चलऽऽ सुहास स्पजिंगची वेळ झालीय.करून घेऊया का?
त्यावर तिच्या अपेक्षे प्रमाणेच घडले.तो म्हणाला
सुहास- असे कर बाथरूममधे पाणी रेडी कर.मी कमोडवर बसुन स्नानच करतो.
बर म्हणत ठरल्याप्रमाणे कुठलाही विरोध न करता तिने त्याचे पाणी दोन झाकण डेटॉल घालुन रेडी केले.
तो हळुहळू पावले टाकत वॉशरूममधे गेला.दार पुढे करून स्नान करायला सुरवात केली.
ही आपली बेडवर बसुन राहीली.त्याने मागीतली तर मदत करायची अन्यथा उगीचच तो आपली मदत झीडकारणार मग आपण ऊदास होणार नकोच ते.
त्याला ऑकवर्ड वाटत असेल परक्या स्त्रीची मदत घेणे.
होऽऽमी परकीच नाहीये का त्याच्यासाठी!
परकेपणाच्या नुसत्या विचारांनीच तिचे डोळे तरळले.डोळ्यातले पाणी पुसून ती शांत बसुन राहीली.
इकडे बराचवेळ झाला.पाणी पडण्याचा किंवा बकेटचा कसलाच आवाज वॉशरूममधुन येईना.
हा करतोय काय नुसताच बसुन?
पुन्हा पडला बिडला तर नाही ना??
नुसत्या विचारांनीच तिला कापरं भरलं.वॉशरूमच्या दरवाजावर थाप मारत तिने विचारले….
सुखदा- सुहासऽऽ अंघोळ आटोपली का?काय करतोएस आत?
सुहास- जरा आत येऽऽ,मला उठता येत नाहिये..
सुखदा घाबरली.म्हणजे हा इतक्या वेळचा प्रयत्न करत होता मदतीशिवाय उठण्याचा??
पण शेवटी नाईलाज म्हणुन माझी मदत घेतोय??
त्याच्या अशा अचानक फटकुन वागण्याचा त्रास होत होता सुखदाला परंतु ती स्वत:च्या भावनांना आवर घालत बाथरूममधे गेली आणि दुसऱ्या सेकंदाला डोळे मिटुनच बाहेर आली.
सुहासच्या अंगावर कपडे नव्हते आणि बराच वेळचा तसाच तिथे बसुन असल्याने थंडीने कुडकुडत होता तो.तिने पटकन त्याचा टॉवेल घेऊन त्याला आधी समोरून गुंडाळला.मग खांद्याच्या आधाराने उभे करून टॉवेल चहुबाजुने गुंडाळुन मग त्याला बाहेर घेऊन आली.
त्याला स्टुलवर नीट बसते केले.दुसऱ्या एका नॅपकीनने सगळे अंग कोरडे करून दिले.
आता कपडे घालणे राहीले होते.ती विचार करून म्हणाली..
सुखदा - कपडे मी आणुन देते.तुझे तुला जमतील का घालायला बघ?
नाहीतर मग मी मदत करते तुझी इच्छा आणि परवानगी असेल तर……!
तिच्या ह्या वाक्यात दु:ख आणि परकेपणाची बोच दोन्हीही व्यथा सामावल्या होत्या.
तिच्या बोलण्यातला रोख त्याला समजला.
आपण हिला कसेही बोललो वागलो तरी ही आपली मदत करायला तयारच असते.
कोणत्या मातीची बनलीय ही?
हिला राग का येत नाही माझा?तिची काहीच चूक नसताना मी जी परकेपणाची वागणूक देतोय त्याचा जाब का नाही विचारावा वाटत हिला?
तिच्या एका वाक्याने त्याला त्याचीच लाज वाटली.तो हुंदके देऊन फुटुन फुटुन रडायला लागला.रडताना तो गदगदुन हलत होता.
त्याच्या हुंदक्यांच्या आवाजाने तिने चमकुन त्याच्याकडे पाहिले.
तिलाही गहिवरून आले त्याला असे हमसुन हमसुन रडताना बघुन..
त्याचे डोळे आपल्या हाताने पुसत तिने विचारले..
सुखदा- अरेऽऽ काय झाले?रडतोस काय लहान मुलांसारखा?
तुला माझ्या असण्याचा त्रास होतोय का?.
नकोय का मी समोर तुला.?
हवे तर मी जाते बाहेर पण तु शांत हो आधी.
आता तिच्याही डोळ्यात पाणी होते.
तो काहीच बोलत नाही हीच मुक संमती समजुन
ती काही न बोलता तिकडुन जायला लागली.
तोच सुहासने तिचा हात पकडला.अनपेक्षितपणे खेचली गेल्याने ती सुहासवर जवळजवळ येऊन आदळलीच तरी स्वत:ला सावरत ती मागे फिरली आणि त्याच्या पुढ्यात उभी राहीली.तसे सुहासने तिला घट्ट मिठी घातली आणि पुन्हा रडायला लागला.तिला कळतच नव्हते की नेमके ह्याला झालेय तरी काय..!
पण तिने त्याला मनसोक्त रडु दिले.त्याचे मूक सांत्वन करत ती तशीच उभी राहीली त्याला आधार देत.
थोडा बहर ओसरल्यावर तो सावरला.
तिने किंचित स्माईल करत त्याला खुणेनेच विचारले ,"काय झाले?"
सुहास- सुखदा मला माफ कर.
कालपासुन मी तुझ्याशी खूप तुसडेपणाने वागतोय.मुद्दामहुन तुझा अपमान होईल असे वागलो पण तु मात्र मला समजुन घेत राहिलीस.तुझी काहीच चूक नाहीये तरी मी तुलाच त्रास देत राहिलो माझ्या वागण्याने..
दोन मिनीट शांततेत गेली.सुहासने पॉझ घेतला.कदाचित मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत असावा...तो पुन्हा बोलायला लागला..
"सुखदा,I wanna confess something in front of you…
But promise me you will not hate me after listening to it.
सुखदा अजुनही क्लूलेस त्याच्याकडे विस्मयाने बघत म्हणाली....
सुखदा - yes..promise!!
नाही तिरस्कार करणार मी.तु बोलऽऽ.
सुहास- Am sorry dear.I got carried away yesterday.I couldn't control myself…
तु माझी मनापासुन सेवासुश्रुषा करत होतीस आणि माझ्या मनात पाप आले...Am really feeling very guilty about this.
आता तु मला हवी ती शिक्षा दे पण प्लिज मला सोडुन जाऊ नकोस गं कुठे..
तो भडभड बोलत होता.मनातले सर्व कुविचार जखमेतुन पू वहावा तसे वाहुन चालले होते.आता त्याचे मन स्वच्छ नितळ पाणी झाले होते..
तिला काय बोलावे समजत नव्हते.तिच्या मनात सुहासला जी जागा तिने दिली ती किती सार्थ होती हे तिला पुन्हा एकदा पटले.
एखाद्या निरागस लहान मुलागत त्याने सगळे बोलुन व्यक्त झाला.खरेतर हे काहीही न सांगता तो असाच गैरफायदा सहज घेऊ शकला असता पण त्याच्यातल्या पवित्र,संस्कारी मनाने त्याला कुठलेही गैरवर्तन करू दिले नाही.
तिला आज मनापासुन सुहासचा अभिमान वाटत होता.
उशीरा का होईना देवाने योग्य दान पदरात घातले ह्यासाठी ती परमेश्वराचे मनोमन आभार मानत होती.
दोघेही भावुक होऊन तसेच एकमेकांच्या जवळ किती वेळ तरी बसुन राहिले.शेवटी तिला जायचेय हे आठवताच ती भानावर आली.उदास वातावरणाला थोडे सहज करण्याकरता ती सुहासला म्हणाली
सुखदा-आज काय बोलुनच पोट भरायचा विचार आहे का? जेवायचेय की नाहीऽऽऽ?
तुझे आटोपल्या शिवाय मलाही निघता येणार नाही,आवरूयात का पटपट??तिने हसतच विचारले.
त्यालाही आत्ताशी आठवले की तिला आज माहेरी जायचेय.
तसा तोही जरा तिची मस्करी करत खोटे खोटे रुसल्याचे नाटक करत म्हणाला
सुहास- हो,जाऽजाऽऽ मला सोडून मजा करा सगळे मिळुन.मी बसतो इकडे एकटाच घुबडासारखा.
.तुम्ही सगळे तिकडे मस्त गोड-धोड पुरणाचे जेवणार आणि मी खातो वत्सलाबाईंच्या हातचा मिळमिळीत आळणी वरण-भात.
त्यावर तिनेही आजचे सरप्राईज न सांगता म्हणाली
सुखदा(तोंड बारीक करत)- आता तु पेशंट आहेस की नाहीऽऽऽ,मग तुला वरण-भातच खावा लागणार.काय करणार नाईलाजच आहे नाऽऽ…!!
सुहास(उदास तोंड पाडत)- बरंऽऽ..
आलिया भोगासी;
असावे सादर।
आण तो वरणभात.खातो त्यालाच गोड मानुन.
तिने पटकन त्याचे कपडे बदलुन त्याला बेडवर टेकुन बसवले.
आलेच हंऽऽ म्हणत मुद्दाम ताट झाकुन आणले.
जसे वरचे ताट उघडले सुहास नाचायचाच बाकी राहीला.सगळा त्याच्या आवडीचा मेनु.त्याने पटकन चमचाभर खीर अगोदर चाखुन पाहिली आणि तोंडाने मिटकी मारली.
सुहास-अरे वाह्!!आज वत्सलाबाईंनी काय मस्त बेत केलाय.खीर तर लाजवाब!!तोड नाही..
सुखदा-आवडली ना तुला?
सुहास-आवडली का!!!!अगंऽऽ आज तो बनानेवाले के हात चुमने का मन कर रहा है।
त्यावर सुखदाने लगेच आपले हात पुढे करत म्हणाली मग कर तुझी इच्छा पुर्ण…
त्यावर चकीत व्हायची पाळी सुहासची होती.
सुहास - म्हणजे ही खीर तु केलीएस?!
Wow. ! Its just awesome..!!
त्यावर सुखदा- फक्त खीर नाही काही,सगळा स्वैयंपाक आज मी केलाय.खास तुझ्यासाठी.
सुहास- वाह् मग तर मजाच आहे की माझी.थँक्स डिअर.
थांब आता बोलु नकोस.मला मुळीच धीर धरवत नाहिये,आण ते ताट इकडे.मीच माझ्या हाताने पटपट जेवतो..
सुहास(सगळ्याची चव घेत)- वाह्ऽऽ सुखदा! you are excellent cook..!!
एक मॅथेमॅटिक्स सारख्या रूक्ष विषयाची प्रोफेसर इतकी चांगली कूक असु शकते,विश्वास नाही बसत.
Really amazing!!
पदार्थांचे येथेच्छ कौतुक करत,गप्पा गोष्टींमधे,हसत-खेळत मिटक्या मारत तृप्त होत सुहासने जेवण उरकले.
सगळे वातावरण पुर्वीचे मळभ दूर होऊन स्वच्छ पारदर्शक झाले होते.
~~~~~~~~~~~~~~~
सुहासला दुपारचा डोस देऊन ती निघायची तयारी करतच होती की सुहास म्हणाला..
सुहास- मग परत कधी येशील?
सुखदाला सुहासला पिळायची आयतीच संधी चालुन आली...
सुखदा(चिडवतच)- काल तर तु बोललास की तु मॅनेज करशील.मग आता कशाला माझ्या येण्याची चौकशी रे?
सुहास- ते मी घुश्शातच बोललो होतो.जाऊदे ना ते आताऽऽ.
पण प्लिजऽऽऽ लवकर ये.मला करमणार नाही गं तु गेल्यावर..
सुखदा(त्याच्या केसांत हात फिरवत) - हो रेऽ मी लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करेन.तुला फोन करेन तसा.
तु आता निवांत झोप काढ.थर्मासमधे चहा तयार करून ठेवला आहे सोबत कपही आहे.उठल्यावर
वाटलेच तर चहा घेऊन पीशील ना हाताने??
सुहास- होऽऽ गंऽऽ.घेईन मी.नको काळजी करूस.
सुखदा- बरं मग मी निघु आताऽऽ?
त्यावर सुहास(उदासपणे) - नको म्हणलो तर जायची थांबणारेस का??जाऽऽ….
सखदा - तु एकदा थांबवुन तर बघ!!
सुहासला माहित होते आपण म्हणालो तर ही खरच थांबेल म्हणुन तो लगेच हसत म्हणाला
सुहास- मी मस्करी करत होतो..तु जा..आणि लवकर परत या सगळे..
आत्ता ह्या क्षणी तरी तिला सुहासला सोडुन कुठेही जावे वाटत नव्हते खरेतर पण तिचा नाईलाज होता.
सुखदा(अजिजीने)- एवढ्यावेळी जाऊ दे.मग पून्हा तुला सोडुन कुठेऽऽ कुऽऽऽठे जाणार नाही..प्रॉमिस डिअर..!
त्यानेही संमत्ती दर्शक मान हलवली तशी ती घराला लॉक करून बाहेर पडली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सगळा कार्यक्रम उरकायला संध्याकाळचे सात वाजुन गेले.आता सुखदाला सतत सुहासची आठवण येऊ लागली.त्याला काही लागले तर मदतीला कोणीच नव्हते.तिला खूप काळजी वाटायला लागली पण एकंदर वेणूमावशी आणि आईच्या गप्पा बघता त्यांचा इतक्यात घर सोडण्याचा विचार दिसत नव्हता.मुलेही मस्त रमली होती आज्जी-आजोबां सोबत.तिला काय करावे सुचत नव्हते.तगमग वाढत होती सुहासच्या काळजीने.
शेवटी न राहवुन ती सगळ्यांना उद्देशुन बोलली..
"बरं आई,आता आम्हाला निघायला हवे गं.सुहास घरी एकटाच आहे.ऑलरेडी खूप उशीर झालाय,हो नाऽ मावशी,निघुयात ना?"
तिने मुद्दामुन वेणूताईंनाही विचारले.
त्यावर वेणूताई लगेच म्हणाल्या,"असं कर तु हो पुढे.मग मुलांचा मूड बघुन मी मागाहुन येते.किंवा मग राहू इकडेच आजची रात्र काय हो विहीणबाई चालेल ना."
वेणूताईंनी नलिनीताईंनाही संवादात ओढले.त्यावर
नलिनीताई- अहोऽऽ हे काही विचारण झाल..रहा की.मस्त गप्पा मारू.किती दिवसांनी असा योग आलाय..रहाच तुम्ही.सुखदा तु जा.हे सगळे इकडेच राहतील.
नलिनीताईंनी सुखदाला जवळजवळ हाकललेच.
आता ह्यावर बोलण्यासारखे फार काही उरलेच नव्हते.
बरंऽऽ म्हणत ती एकटीच घरी यायला निघाली.
इकडे जसजसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते सुहासलाही रिकामे घर खायला उठु लागले.
लग्नानंतर सुखदा आणि मूले इकडे रहायला लागल्यापासुन घराला एक चैतन्य प्राप्त झाले होते.घर सतत हसरे बोलके असायचे.
आज कितीतरी दिवसांनी संपदा गेल्यावरची तीच भयाण शांतता तो घरात आत्ता अनुभवत होता.
त्याला ह्या क्षणी खूप एकएकटे वाटत होते. सुखदाला तो प्रकर्षाने मिस करत होता.
फक्त काही तासच ती आसपास नाहीये तर आपण इतके बेचैन झालो,तिला मिस करतोय, तर मी घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवताना माझे काय होईल???????
हा विचार आला तसे त्याला उमगले की आततायीपणात एक निर्णय घेऊन आपण काल काय माती खाल्लीय.पण आता तीर कमानीतुन सुटला होता त्यामुळे निर्णय आंमलात आणावाच लागणार होता.
ठिक आहे "जो भी होता है अच्छे के लिए ही होता है।" असे बीरबल म्हणुन गेलाय ना,आता बघु ह्या निर्णयानेही काही चांगले घडतेय का आपल्या आयुष्यात??
आपल्या मनाशीच सगळे विचार करत असतानाच सुखदाच्या गाडीचा हॉर्न वाजला तशी त्याची कळी खुलली.
सगळे घरी आले समजुन तो खुष झाला.
दार उघडून सुखदा आत आली.हातपाय तोंड धुवुन तिने आधी देवघरात सांजवात लावली.उदबत्तीचा मंद सुगंध घरभर दरवळु लागला तसे वातावरण लगेच प्रसन्न झाले.
वेणूमावशी असल्या की हे काम त्याच करत असत पण आज त्या नसल्याने घरात पुर्ण अंधार झाला होता.फक्त सुहासच्या खोलीत दिवा चालू दिसत होता.
तिने हॉलमधला लाईट लावला आणि सुहासच्या खोलीत आली.सुखदा बरोबर मुलांचा किलबिलाट गोंधळ ऐकु न आल्याने त्याने सहजच विचारले,"मुले आणि आई...कुठेत?"
त्यावर सुखदानेही घडलेला सर्व प्रसंग थोडक्यात सांगुन टाकला.
म्हणजे आज घरात फक्त आम्ही दोघेच!!!!!
सुहासला एकीकडे आनंद होत होता की कितीतरी दिवसांनी आपल्याच घरात त्या दोघांना खरा एकांत मिळणार होता तर दुसरीकडे मुलांसोबत झोपायची सवय असल्याने त्यांनाही मिस करत होता.त्याला बाजुला कोणी असेल त्याच्या अंगावर हात टाकुन झोपायची सवय होती पण आज काय होईल.?सुखदाचा काही गैरसमज तर नाही होणार ना..?
तिला असे तर वाटणार नाही ना की मी उगीच सलगी करू पाहतोय?
मनात एकीकडे आनंद तर दुसरीकडे चलबिचल होत होती.मला सुखदाची सवय होत चाललीय.
ही फक्त मैत्रीतली आपुलकी आहे की अजुन काही?
तिने काल माझ्या कपाळाचे चुंबन का घेतले असेल?
तिच्या मनातही माझ्याबद्दल काही भावना जागृत होत आहेत का की मैत्रीतल्या प्रेमापोटी केलेली एक सहज कृती असे समजू मी?
का मला इतके प्रश्न पडताहेत??तिच्या इतके सहज मी का नाही वागू शकत आहे.!!
जसे माझ्या मनात तिच्याबद्दल कल्लोळ उठताहेत तिच्याही मनात होत असेल का…?
ती इतकी निर्विकारपणे कशी काय वावरू शकते.?
का फक्त पुरूषालाच मोहाचा शाप दिलाय सृष्टीनिर्मात्याने?
स्त्रीला नसतील का अशा काही भावभावना ??
असतीलच..का नसेल.
पण मग ती कसे बॅलन्स करते स्वत:ला?
खरच स्त्री हे एक न उलगडणारे कोडेच आहे म्हणतात ते काही खोटे नाही.
एक स्त्री एकावेळी आपल्या नवऱ्याची बायको,सखी,आई,बहिण अशा कितीतरी भूमिका एकाचवेळी एकाच आयुष्यात निभावते.पण पुरूष मात्र कायम पुरूषच राहतो फक्त स्त्री देहाचा भोगी….!
विचारमंथनात तो क्षणभर विसरूनच गेला की सुखदा त्याला काहीतरी विचारतेय..
सुहास(भानावर येत) - काय गं, हाक मारलीस का?
सुखदा- अरे हेच विचारत होते की कधी जेवणारेस?आईने पुरणपोळी दिलीय लाडक्या जावयासाठी..कधी खाणारेत जावईबापूऽऽ!!
तिने चिडवतच विचारले.तिच्या बोलण्याने त्याची तंद्री भंग पावली.
सुहास- अरे वाह्ऽऽ पुरणपोळीऽऽ.माय फेव्हरीट.लगेच दे..
तिने लगेच ताटात पुरणपोळी वाढुन आणली.
ताट त्याच्या समोर धरून ती उभी राहीली तसे तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघायला लागला.
ती मुद्दाम वाट पहात होती की तो स्वत:हुन खाऊ घाल वगैरे काही म्हणतोय का..
तिने मुद्दाम मस्करीत त्याला थोडे ताणायचे ठरवले.
दुपारच्या कन्फेशनमुळे त्याच्या मनात आता कुठलीच अढि शिल्लक उरलेली नव्हती.
तो लहान मुलागत म्हणाला,"नुसतीच काय उभी आहेस?मला खाऊ घाल नाऽऽ.मला भूक लागलीय…"
"अच्छाऽऽ म्हणजे ते आत्मनिर्भर स्वावलंबीचे नारे संपले का आता??
काल तर भले मोठे डायलॉग ऐकवलेस..'करेन मी मॅनेज.किती दिवस तुझ्यावर अवलंबुन राहू' ते सगळे संपले का नाटक.!!
त्यावर स्वत:च्याच वागण्यावर वरमुन तिला म्हणाला,"आता विसर ना डिअर ते..रात गयी बात गयी..मी माफी मागीतलीय ना झाल्या गोष्टींची.आता पाय धरू का माझे आईऽऽ मग तरी माफी मिळणार का ह्या अजाण बालकाला?"
तो नाटकीपणे म्हणाला.
त्यावर सुखदाही खळखळुन हसली.
~~~~~~~~~~~~~~~
रात्र झाली.झोपायची वेळ.आज पहिल्यांदाच त्यांच्यामधे मुले नव्हती. जीजा म्हणजे एक सुरक्षा कवच वाटायचे सुखदाला.सुहासबरोबर पलंगावर एकत्र झोपायचे ह्या विचारांनीच तिला दडपण आले.
सुहासच्या रात्रीच्या गोळ्या देऊन त्याला व्यवस्थित निजते करून तीही आपल्या जागी आक्रसुन झोपली.दोघांच्या मधे तितकेच अंतर होते जितके मुले मधे असताना असे.
दोघेही झोपले…..
~~~~~~~~~~~~~~~~
"सुखी ए सुखी..अग झोपलीस काय.मी आलेय गप्पा मारायला आणि तु झोपतेस होय गंऽऽ??"
त्या आवाजाने सुखदा जागी झाली.
समोर सपुताई म्हणजे संपदाला बघुन ती एकदम आनंदी झाली.
क्षणभर आपण स्वप्नात तर नाही ना असेही वाटले..
आज ती खूप मस्त रीलॅक्स मूडमधे दिसत होती.जणु मनावरचे खूप मोठे ओझे उतरल्यागत,,खूप समाधानी दिसत होती.
पण मनात काहीतरी चलबिचल चाललेली..काहीतरी बोलू पहात होती,पण काहीतरी अडसर यावा तसे काहीसे…
शेवटी सुखदाच म्हणाली,"सपुताईऽऽ बोल नाऽऽ,अशी तोंडाला कुलूप लावुन का आतल्याआत दाबतीएस स्वत:ला. मनात जे असेल ते बोल.
एक दिर्घ सुस्कारा सोडत ती बोलती झाली..
"सुखी तु कधी समुद्र पाहिलाएस?"
सुखदाला कळत नव्हते आता हा समुद्र कुठुन आला मधेच?!?तिच्या बोलण्याचा संदर्भ लावायचा प्रयत्न करत ती शांततेने एेकत होती
संपदा- समुद्र किनाऱ्यावर उसळत फेसाळत येणाऱ्या लाटा म्हणजे जणु खळाळता जीवनप्रवाह.
त्या किनाऱ्यावर उभे राहुनही लाटांचा स्पर्श नको म्हणणाऱ्या व्यक्तीला मी निव्वळ गाढव म्हणेन गाढव...आणि ती गाढव तु आहेस..
सुखदाला काहीच समजत नव्हते,
"मी,गाढवऽऽऽ!!कशी??
हो..कारण जीवनरूपी सागराच्या किनाऱ्यावर उभी असुनही लाटांचा स्पर्श नाकारते आहेस तु.
अगंऽऽआता समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेसच नाऽऽऽ,मग घे ना त्या लाटांच्या फेसाळ स्पर्शाची अनुभूती.घे त्या लाटा अंगावर.
त्या शहारे आणणाऱ्या,रोमांचित करणाऱ्या मोहक स्पर्शाची संवेदना अवर्णनीय आहे ग सुखी..!!
उतर हलकेच त्या समुद्रात. डुंब हळुहळु त्या पाण्यात.
घे जाणून त्या सागराची खोली,उंची आणि अथांगता…
सुखी तुला एक सांगूऽऽऽ,,
समुद्राची अथांगता कशात आहे?
त्याला समर्पित होणाऱ्या सरितेमुळे.
सागराला समर्पित झाल्याखेरीज सरितेचं पुर्णत्व नाही ना,,तसेच सरितेच्या समर्पणाशिवाय सागराला अथांगता नाही.
दोघेही परस्परपुरक आहेत आणि एकमेकांशिवाय अपुर्णही!!
आत्ता ह्या संसाररूपी सागरातील सरिता तु आहेस आणि सुहास तो समुद्र.त्याची अथांगता समजुन घ्यायची असेल ना तर तुला समर्पण करावे लागेल.त्यात खोल डुंबावे लागेल.त्याचा स्पर्श अनुभवावा लागेल.
ह्या परस्पर मिलनानेच सरितेलाही सागराची अथांगता आपोआप प्राप्त होते.
आणि एक गंम्मत सांगू..जितके समर्पण जास्त तितकेच भरभरून पदरात अथांगता - सुखाची,आनंदाची,परीपुर्णतेची.
हा नियम सगळीकडेच लागू आहे हं...कामाचेही तेच.जितके तुम्ही समर्पित होऊन काम कराल तितके चांगले आऊटकम.
तु सगळे केलेस आता समर्पित हो.
समर्पण कर..समर्पण….!
जरा जास्तच फिलॉसाॅफीकल झाले ना?पण माझ्या सगळ्याच जवाबदाऱ्या उत्तम निभावते आहेस तर ही एक बाजू का लंगडी सोडलीएस?
म्हणुन आज जाब विचारायला आणि समजवायला आलेय.
चल आता निघते...माझी निघायची वेळ झाली.
पण मी सांगितलेला गुरूमंत्र लक्षात ठेव हं..विसरू नकोस..
समर्पण..समर्पण..!!!
~~~~~~~~~~~~~~~~
सपुताईऽऽऽ..!! सपुताईऽऽऽ...!!
सुखदाच्या जोरजोरात हाका मारण्याच्या आवाजाने सुहास जागा झाला.
सुखदा एकटक संपदाच्या फोटोकडे पहात होती.
अगदी पुतळ्यागत स्तब्ध.चेहरा भांबावलेला.अंग घामाने भीजलेले.
तिची ही अवस्था पाहुन सुहासने तिचे खांदे गदगदा हलवुन तिला जागे केले तसे ती भानावर आली.
आत्ता जे डोळ्यासमोर घडले ते खरे की आत्ताचे आपण खरे..
तिच्या डोळ्यातुन आश्रु ओघळत होते.सुहासने लाईट ऑन केला तशी सुखदा बभान होऊन आवेगात सुहासच्या कुशीत शिरली.त्याला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट आलिंगन देत ती रडत राहिली.
तिला काय होतेय तेच समजत नव्हते.सुहास तिला विचारत होता,"काय झाले सुखदा,काही वाईट स्वप्न पाहिलेस का?इतकी का घाबरलीएस?"
पण ती काही न बोलता फक्त सुहासच्या आश्वासक मिठीत विसावली होती.
तिची एकंदर अवस्था बघता तिला काहीही प्रश्न न विचारता तो फक्त तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत राहीला.
त्या स्पर्शात आत्ता फक्त आणि फक्त ममत्त्व होते बाकी कोणताही विकार त्या स्पर्शात नव्हता.
त्याने तसेच तिला आपल्या कुशीत निजू दिले कारण आत्ता तिला फक्त एका आश्वासक विश्वासु स्पर्शाची गरज होती.त्याच्या मिठीत तिला तो विश्वास मिळाला.तशी ती शांत होत होत कधी झोपेच्या आधीन झाली तिचे तिलाच कळले नाही.
सकाळी रोजच्यावेळी जाग आली आणि स्वत:ला सुहासच्या मिठीत बघुन ती क्षणभर चमकली पण लगेच तिला पहाटेचा किस्सा आठवला तशी ती रीलॅक्स झाली.
आज आदिच्या शाळेची गडबड नव्हती की जीजाची कामे नव्हती त्यामुळे अजुन काहीवेळ ती तशीच सुहासच्या कुशीत पडुन राहीली.
पण आता मात्र ती पहाटेच्या त्या स्वप्नाचा पुनर्विचार करू लागली..
सपुताई अगदी प्रत्यक्ष भेटल्यागत इथे बसुन बोलत होती माझ्याशी.काय सांगू पहात होती ती मला.??
समर्पित हो हे सांगायला ती इकडे आली असेल का…?
पण हा प्रवास वाटतो तितका सोपा खरच आहे???नाहीयेऽऽऽ.खूप खाचखळगे आहेत वाटेत.आणि प्रवासातील हे दोन सहप्रवासी एकमेकांना पूर्ण अनोळखी अनभिज्ञ..
जोपर्यंत ते एकमेकांना ओळखीचे होणार नाहीत,एकाच वाटेवर हातात हात घालुन चालणार नाहीत,हा प्रवास सुखाचा कसा होणार??
जेव्हा तन मन धनाने दोघे एकमेकांचे होतील तेव्हाच हा प्रवास योग्य ठिकाणी संपुर्ण होईल.त्यासाठी दोन मने जुळावी लागतील आधी.. ..!
त्यातली एक प्रवासी मी कदाचित तयार होईनही.
पण मग त्या दुसऱ्या सहप्रवाशाचे काय…???????????
प्रश्न ही कठीण आणि प्रवासही…………!!
----------------------(क्रमश:14)------------------------------
(क्रमश:14)
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी…
कथा जसजशी पुढे सरकतेय सुहास आणि सुखदाच्या मनोव्यापाराचे असंख्य पैलु आपल्याला वेगवेगळ्या घटना/प्रसंगातुन पहायला मिळत आहेत.
कशी वाटतेय कथा?
सुहासने काय निर्णय घेतलाय?
त्याचा परीणाम काय होणार आहे?
सुखदाला पडलेल्या स्वप्नाप्रमाणे ती आपल्यात काही बदल करेल?
हे सगळे जाणुन घ्यायचे आहे ना….! मग पुढील भाग नक्की वाचा.
हा भाग कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा.आणि कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला नक्की फॉलो करा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहित माझी कथा नक्की शेअर करू शकता..)
धन्यवाद.
@राधिका.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा