Login

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 13

लग्नानंतर फुललेल्या प्रेमाची सुंदर नवी पहाट म्हणजे फिरूनी नवी...... .... कथा.

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-13

©®राधिका कुलकर्णी.

सुखदा बाहेर जाऊन फोन घेते.डॉक्टरांचाच फोन असतो.त्यांनी रिपोर्ट्स वाचुन सांगितलेली माहिती समाधानकारक होती.फ्रॅक्चर वगैरे काही नव्हते सुहासला. 

"Ahh..!!!Just a sigh of relief !!"

"Thank God !!"

मनातल्या मनात देवाचे आभार मानत ती घाईनेच बेडरूममधे आली.

सुहास त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी मेल टाईप करत होता.सुखदाच्या हाका मारण्याने तो भानावर आला.

मेलवर शेवटचा फुलस्टॉप मारून सेंड क्लिक करून त्याने प्रश्नार्थक नजरेने सुखदाकडे पाहीले

सुखदा(आनंदात) - सुहास… सुहासऽऽऽ अरे गुड न्यूज आहे.

सुहास(प्रश्नांकीत नजरेने)- कसली न्यूज??

सुखदा- अरे डॉक्टरांचा फोन होता.तुझे रिपोर्ट्स पुर्णपणे नॉर्मल आहेत.No fracture,nothing.

आहे ना गुड न्यूज!!! तिने आनंदुन विचारले.

बातमी ऐकुन त्याच्या चेहऱ्यावरही हास्य पसरले.

एक स्मित करत तो म्हणाला-म्हणजे मी लवकर पुर्ण बरा होणार तर..आत्मनिर्भर मी..! 

सुखदा-हम्मऽऽ!मग एका जागी बसायची शिक्षा संपणार तुझी.

सुहास- आणि एक प्रॉमिस पण कोणीतरी पुर्ण करणार आहे….! 

त्याने मिश्कीलपणे तिला सकाळच्या संवादाची आठवण देत चेष्टेतच बोलला.

सुहास जरी चेष्टेत बोलत होता तरी सुखदा मनातल्या मनात धास्तावली होती.ह्याने जर काही विपरीत गोष्ट मागीतली तर…?? मनात उठलेल्या प्रश्नाने ती क्षणभर चिंतेत बुडाली.तिच्या बोलक्या चेहऱ्यावर ती साफ दिसत होती.आपल्या मस्करीला हिने जास्तच सिरीयसली घेतलेय हे लक्षात येताच सुहासने पवित्रा बदलत लगेच बोलला…..

सुहास- मी काहीतरी ठरवलेय हं सुखदा..आणि तु प्रॉमिस पाळायचे कबूल केलेस लक्षात आहे ना तुझ्या??"

सुखदा लगेच डिफेंसिव्ह मोडमधे येत म्हणाली….

सुखदा- हो आहे की लक्षात...पण आधी तु बरा तर हो मग बघु.

हा फक्त फ्रॅक्चर नसल्याचा रिपोर्ट आहे.बाकी मुकामार बरा व्हायला अजुन दोन-चार दिवस तरी लागतील असे डॉक्टर म्हणालेत.सोऽऽ आत्ताच पुढचे मांडे नको रचुस..

तिनेही चिडवतच त्याला सांगितले.

सुहास-हो,मग बरेच झाले की..मलाही विचार करायला वेळ मिळेल अजुन..It's blessings in disguise you know..!! 

तोही तिची खेचत तिला टीझ करत बोलला.

सुखदा(हसुन सहजपणे)- हम्म्….खरेय बाबा..!!

बरं चल जेवुन घेतोस का?

म्हणजे मग जीजालाही जेवु घालता येईल.

त्यावर विचार करून …..

सुहास- तु असं कर जीजाला जेवू घाल.तिचे काय ते बघ‍.आईची पूजा उरकली असेल ना आता,ती जेवू घालेल मला कालसारखे.

सुखदाला त्याच्या ह्या अनपेक्षित यु टर्नचे आश्चर्य वाटले.

एवढ्यात तिलाही जाणवत होते की तो छोट्या छोट्या गोष्टींसाठीही उगीचच तिला हाक मारून ती कामे तिच्याकरवी करवुन घ्यायचा.त्याला पाणी पटकन स्वत:चे स्वत: घेऊन पीता यावे म्हणुन ती मुद्दाम त्याच्या हाताच्या अंतरावर पाण्याचा जग ठेवत असे.पण बऱ्याचदा कसा कोण जाणे तो जग त्याच्या हातापासुन लांब झालेला असायचा.मग पाणी द्यायलाही तो तिलाच हाक मारायचा.अगोदर तिला वाटायचे की आदि,वेणूताई किंवा सखू झाड पुस करताना जागा हलवत असतील पण घरात कोणाचा वावर नसतानाही हे घडले तेव्हा ती समजुन चुकली की हे कोण करतेय.पण तिलाही त्याचा सहवास आवडायचा.त्याचे काम करण्यात तिलाही आनंद मिळायचा आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणालातरी आपली कंपनी,आपले आसपास असणे,आपला सहवास आवडतोय ही  कल्पनाच किती सुखावह होती.तो बोलुन दाखवत नसला तरी त्याच्या नजरेतुन तिला ह्या सर्व गोष्टी आपोआप कळायच्या.

खरे तर त्याला हाताला कुठलीही जखम नव्हती.तो हातांच्या सर्व हालचाली सहज करू शकत असे पण तरीही जेवताना हात वऴवायला त्रास होतोय ही सबब सांगुन तो तिच्या हातुन जेवायचा.हे सगळे तिला कळत असुनही ती त्याचे सर्व काम आनंदाने करत होती.

त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचे त्याचे वागणे तिला न समजणारे होते.सुहास आपल्याला टाळतोय का????

एक प्रश्न तिच्या मन:पटलावर जाऊन आदळला.

पण आपल्या मनातले विचार चेहऱ्यावर न दिसण्याची काळजी घेत ती बरं म्हणाली.

तिने त्याचे ताट वाढुन वेणूमावशींना दिले आणि सांगितले 

सुखदा(विषयाला सहज करत)- मावशी तुमच्या लेकाला आज तुमच्या हाताने जेवायची लहर आलीय …!

सुखदाने जरी मस्करीच्या सुरात सांगितले असले तरी वेणूताईंना ही गोष्ट जराशी खटकली.

कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींकरता सुखदा सुखदाचा जप करणारा आज ती समोर असुनही माझ्याकडुन का काम करवुन घेतोय.???

शंकेची घंटा डोक्यात वाजली तसे विचारचक्रही वेगाने सुरू झाले.हातात ताट घेऊन त्या त्याला जेवु घालत होत्या.

जेवण संपले तरीही मनातले विचार संपले नव्हते.

त्याचे तोंड पुसुन त्या ताट घेऊन बाहेर येत असतानाच त्यांनी पाहिले की सुखदा जीजाला जेवु घालता घालता कोणाशीतरी फोनवर बोलत होती.

"नको गंऽऽआत्ता तरी शक्य नाही वाटत " असे फोन बंद होता होता कानावर पडलेल्या संवादावरून त्या अंदाज बांधत होत्या की नक्की कोणाचा फोन असेल….!

अखेर त्यांनी कुतुहलाने विचारलेच…

वेणूताई- काय गंऽ कुणाचा फोन?

सुखदा- अहोऽऽ आईचा होता.

वेणूताई- काय म्हणताएत विहीणबाई,सगळे ठिक ना?

सुखदा- होऽ सगळे ठिक आहे.पण ती म्हणत होती उद्या शुक्रवारची सवाष्ण म्हणुन जेवायला आणि हळदीकुंकवाला ये.

वेणूताई- मगऽऽऽ तु काय म्हणालीस?

सुखदा- काय म्हणणार मी..?इथली परिस्थिती बघताच आहात की तुम्ही. मी नाही जमणार म्हणुन सांगितले तिला.

त्यावर वेणूताईंच्या डोक्यात एक विचार आला तशा त्या लगेच म्हणाल्या

वेणूताई- अगंऽऽ असे सवाष्णीच्या आमंत्रणाला नाही म्हणु नये.तो सवाष्णीचा मान असतो गं.

आता तुम्ही नविन विचारांच्या मुली.तुम्हाला आमचे हे विचार बुरसटलेले वाटतील पण मी आपलं सांगितलं.आता ऐकायचे की सोडुन द्यायचे तुझे तु ठरव….

वेणूताईंनी एक विषय तिच्या डोक्यात सोडून दिला.

त्यावर सुखदा- हो मावशी मला पटतेय तुमचे.पण दुपारी जेवण आणि संध्याकाळी हळदीकुंकू म्हणजे अख्खा दिवस जाणार.आणि तिकडे गेले की जीजा आदि तर तुम्हाला माहितीय ना कसा तिकडे रहायचा हट्ट करतात. एरवीचे तरी शक्य होतं पण आता मुलांनी हट्ट केला तर कसं करू?त्यापेक्षा जाणंच नको असा विचार करून मी नाही सांगितले.

वेणूताई- हात्तिच्याऽऽऽ एवढेच नाऽऽ.मग मी सांगते काय करूयात.उद्या मी जीजाला घेऊन पुढे जाते थोडे आधी.आदिला तुझे बाबा शाळेतुन परस्पर तिकडे घेऊन येतील.तु सुहासचे सकाळचे जेवण वगैरे उरकुन मागुन ये सावकाश.निघताना आपण सगळे सोबतच येऊ आणि जर मुलांनी हट्ट केलाच तर राहीन मी त्यांच्यासोबत एक रात्र तुझ्या माहेरी.आमच्या विहीणींच्या गप्पा होतील आणि मुलांनाही तिकडे रहायला मिळेल आणि तु ये सुहासकरता घरी.कसा वाटतोय प्लॅन?हवेतर मी बोलु का नलिनीताईंशी??

सुखदा- अहोऽ नाही.त्याची गरज नाही.तिने आपल्या सगळ्यांनाच आमंत्रण दिलेय.ती तुम्हालाही फोन करणारच आहे.मी सहज फोन केला म्हणुन मला कळले.

वेणूताई (आनंदून)- मग ठरले तर.तु आईला हो कळवुन टाक पटकन.म्हणजे त्यांची तयारी करायला त्यांना वेळ मिळेल.

आपल्या मनातली चिंता दूर व्हायला ही एक संधी थोडीफार का होईना उपयोगी पडेल ह्या विचाराने त्या क्षणभर सुखावल्या.

तेवढ्यात काहीतरी आठवण येवुन ती म्हणाली..

सुखदा- हे सगळे ठिक आहे पण मग आदिला सॅटर्डे हाफ-डे स्कूल असते त्याचे कसे करायचे?

शाळा बुडायला नको त्याची.कारण सोमवार पासुन त्याच्या युनिट टेस्ट्स सुरू होणारेत.

वेणूताई- बरं झाल सांगितलेस.आम्ही पोहोचवु  त्याला शाळेत तिकडून.येताना तो बसने इकडे येईल आपल्या घरी चालेल ना..!

आता वेणूताईंनी तिच्या सगळ्याच शंकांना निकालात काढल्यामुळे तिला आईला होकार कळवण्यावाचून पर्यायच उरला नाही.

तिने लगेच फोन करून तसे कळवुन टाकले.

आत्ताच घडलेली ही ताजी घडामोड सुहासच्याही कानावर घालणे गरजेचे होते.

पण नुकतेच तो ज्या पद्धतीने रिअॅक्ट झाला होता ते पाहता तो काय बोलेल ह्याचा अंदाज लावणे कठिण होते.

जेवण उरकुन जीजा वेणूताईंच्या मांडीत पेंगुळलेली पाहुन त्यांनी तिला आपल्याच खोलीत झोपवले.दोघींनी दुपारची जेवणे उरकली.आदि यायला अजुन तास दिडतास होता.तोपर्यंत सुहास बरोबर बोलता येईल हा विचार करून ती खोलीत आली.जेवणानंतरच्या गोळ्यांमुळे सुहासला गाढ झोप लागली होती.

त्याला डिस्टर्ब न करता तीही  बेडच्या दुसऱ्या कोपऱ्याला थोडी अवघडुनच लवंडली.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

रात्री झोपण्या अगोदरचा गोळीचा डोस देताना संधी पाहुन सुहासशी बोलायचे ठरवुन ती त्याच्याजवळ आली.गोळ्या व पाण्याचा ग्लास त्याच्या हाती देत ती बोलली

सुखदा- सुहासऽऽ,आज आईचा फोन आला होता दुपारी.

सुहास- बरं मगऽऽ?

सुखदा(थोडी चाचरत)- काही नाही तिने उद्या कसले तरी पारणे केलेय त्याची सवाष्ण म्हणुन मला आमंत्रण दिलेय.म्हणजे सगळ्यांनाच जेवायला बोलावलेय.त्यानिमित्त भेट होईल म्हणत होती.

सुहासला अजुनही क्लु लागत नव्हता नेमके तिला काय सांगायचेय.

सुहास- बरं मगऽऽ?

सुखदा- मग काही नाही.मी नाहीच म्हणत होते जायला पणऽऽ…..

सुहास- पण...काय?

सुखदा- पण मावशीच म्हणाल्या की जाऊयात म्हणुन. मग उद्या तिकडे जावे लागणार आहे.

सुहास(मनातली नाराजी लपवत)- ठिक आहे..जा की मग.त्यात एवढे चाचरायला काय झाले.मी नाही म्हणेल वाटले का तुला?

सुखदा- अरे तसे नाही रेऽऽ.तुला सोडुन जायचे मन होत नाहीये.

सुहास- त्यात काय? माझे सकाळचे उरकुन जा तु.म्हणजे मी दोन तीन तास तसेही झोपतोच.

आणि काही लागलेच तर मी मॅनेज करेन.आता जरा पेन्स कमी आहेत माझ्या.मलाही थोडीफार हालचाल करायलाच हवी ना..किती दिवस तुझ्यावर अवलंबुन राहु मी…

तु आरामात जाऽऽ.माझी चिंता नको करूस.

त्याचे असे रूक्ष तोडुन बोलणे तिला जरासे लागले.

आज दूपारपासुनच सुहासच्या वागण्यात तिने हा बदल नोटीस केला होता.तिच्यापासुन त्याचे असे अलिप्त वागणे का कुणास ठाऊक तिला सहन होत नव्हते.दूपारचा स्पजिंग करतानाचा प्रसंग नकळत तिच्या डोळ्यापुढे तरळला.माझे त्याच्यापासून अचानक दूर जाणे त्याला अपमानकारक तर वाटले नसेल?

तो हर्ट झाला असेल का?

पण मी तरी काय करू?कसे समजावू माझ्या मनाला?

जरी लग्न झाले असले तरी आपण आपल्या मर्यादेत बद्ध आहोत हे कसे समजत नाही ह्याला.?

मी सपूताईला धोका नाही देऊ शकत.सुहास फक्त सपूताईचाच आहे हे मी मान्यही केलेय.बजावलेय मनाला नाही गुंतायचेय मला ह्या गुंत्यात.आणि त्यालाही हेच हवे होते ना माझ्याकडून??मग माझ्या त्या वागण्याचा असा राग करायचा काय संबंध?

आम्ही मित्र राहुन हे नाते निभावु शकतोच की..मग हा का असा तुटक वागतोय?का मला वेदना देतोय? मनात पडलेले असंख्य प्रश्न मात्र त्याची उत्तरे तिच्याकडे नव्हती.ती तशीच शांतपणे बेडवर पहुडली.

रात्री अचानक कसल्यातरी खडबड आवाजाने ती जागी झाली.बेडलँपच्या उजेडात वॉशरूमजवळ एक आकृती उभी पाहुन ती क्षणभर दचकली पण मग लाईट लावुन बघितले तर सुहास दरवाजाचा आधार घेऊन ऊभा होता.त्याची पाठ सुखदाकडे होती म्हणजे तो वॉशरूम युज करायला उठला होता. एकटाच…..

 पण त्रास होत असावा म्हणुन तिकडेच थांबला असावा.तिने मनातल्या मनात अंदाज बांधला आणि चटकन उठुन त्याच्या मदतीला गेली.

सुखदा- काय हे सुहास.तुला बाथरूम जायचे होते तर मला उठवायचे नाही का? पडला बिडला असतास म्हणजे?एकटाच का उठुन आलास?

त्याला हाताने आधार देतच बडबडत राहीली.

तिने आधाराला दिलेला हात तसाच घाईने  झटकुन सुहास म्हणाला

सुहास-आता मला काल पेक्षा बराच फरक वाटतोय आणि माझी मला सवय नको का करायला?तुझी मदत किती दिवस घेऊ मी?

तुला इतरही बरीच कामे असतात त्यात माझा आणखी भार कशाला?

मी जाईन माझा मी.तु झोप जा जाऊन..

त्याचे ते कडवट रूक्ष बोलणे तिच्या ह्रदयाला घर्रे पाडत होते.हा का अचानक इतका बदललाय? पण आत्ता हा सगळा विचार करण्याची वेळ नव्हती.त्याच्या हट्टापायी उगीच आणखी काही नविन त्रास नको उद्भवायला म्हणुन समजुतीने घेत ती म्हणाली ठिक आहे तु जा आत मी इकडेच नुसती उभी राहते.तुला वाटलेच तर मी आहे.

तो हलकेच पावले टाकत आत गेला.त्याला बसता-उठताना प्रचंड वेदना होत होत्या.

आधाराशिवाय कमोडवरून उठणे अशक्य वाटत होते परंतु आता सुखदापासुन शक्यतो अंतर राखुन रहायचे हे त्याने सकाळच्या प्रसंगानंतर स्वत:शीच ठरवुन टाकले होते.त्यामुळे उठताना होत असलेल्या वेदना सहन करतच तो कसाबसा दरवाजाशी आला.तेवढ्याच हालचालीने तो घामेघुम झाला होता.अंगात शक्ती नसल्यागत नित्राण अवस्थेत तो दरवाजाला टेकुन उभा राहिला.

त्याचा घामेघुम वेदनेने झाकोळलेला चेहरा बघुन सुखदा कासावीस झाली.' काय उगीच लहान मुलांसारखा हट्ट चालवलाय ह्याने 'असे मनाशीच बडबडत तिने त्याला आधार देऊन बेडपर्यंत आणले.(ह्यावेळी नाईलाजाने का होईना त्याने तिची मदत स्वीकारली.)

बेडवर नीट बसवले.त्याला प्यायला पाणी दिले.

नंतर काही विचार करून ती शांततेने म्हणाली…

सुखदा- आता कसे वाटतेय?बरे वाटतेय का? 

सुहासने मान हलवुन होकार दिला.

"किती थकलेला दिसतोय बघ चेहरा नुसत्या एवढ्याच एक्झर्शनने?" ती त्याचा घामेजलेला चेहरा पुसतच बोलली.

त्यावर तो काही न बोलता इतकेच म्हणाला…...

सुहास - मी घाईत फ्लश ऑन करायला विसरलो जरा फ्लश बटन दाबुन ये ना…

ती पटकन फ्लश करून पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली.

सुखदा- हे बघ सुहासऽऽ अजुन तुझ्या अंगातली कणकण गेली नाहीये.औषधांचा मारा चालुय म्हणुन तुला बरेय असे वाटतेय पण ओव्हर एक्झर्शनने पुन्हा काहीतरी नविन त्रास नको व्हायला.म्हणुन सांगतेय,नीट ऐक..मला तुझे काम करताना मुळीच त्रास होत नाहीये.त्यामुळे तु उगीच भलतेसलते विचार करून जीवाला त्रास करून घेऊ नकोस.आणि आपण एकमेकांचे मित्र आहोत ना चांगले मग एकमेकांच्या अडीअडचणीला उपयोगी नाही पडायचे तर केव्हा पडायचे??आणि परवा माझे पिरियड्स चालु होते तेव्हा तुही माणुसकीच्या नात्याने माझी मदत केलीसच नाऽऽ मग तेव्हा मीही असाच विचार करायचा होता का?म्हणजे तु मदत केलेली बरोबर आणि माझी मदत घेताना तु लगेच असा परक्यासारखा विचार करणारेस होय रेऽऽ?

तिने ह्या मुद्द्यावर बरोब्बर त्याला कात्रीत पकडले होते.त्याच्याजवळ वरीलपैकी कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते.

सुखदा पुढे म्हणाली...

"आणि आणखी एक गोष्ट तु विसरतो आहेस,नवरा बायकोचे नाते तर आत्ता आलेय आपल्यात पण एकमेकांचे हितचिंतक,मित्र किती आधीपासुन आहोत आपण सांग पाहु?

मग तु असा अडचणीत असताना मी तुझी मदत केली तर त्यात एवढे वाईट वाटुन घेण्याजोगे काय आहे?

आणि काय वाटेल सपुताईला जर मी तुझी जवाबदारी नीट पार पाडत नाहीये हे तिने पाहिले तर?

सपुताई मस्करीत नेहमी म्हणायची सुहास माझं तिसरं बाळचं आहे...त्यायोगे मी तुझीही वेळ आली तर जीजा आदिची करते तेवढी सेवा करूच शकते ना…!!!कारण तिच्या मुलांकरताच तर हे लग्न केलेय ना आपण…???

पटतेय की नाही मी काय बोलतेय?????

सुहास तिचे बोलणे शांतपणे ऐकुन घेत होता. तिच्या कुठल्याच प्रश्नावर त्याच्याकडे कोणतेही समर्पक उत्तर नव्हते.

तीने मांडलेले सर्व मुद्दे अगदी वकिली पॉईंट्स प्रमाणे पुर्ण बरोबर,मनाला पटत असुनही आपल्याच कसोटीवर स्वत:ला पारखण्याच्या निर्णयाने तो बांधला गेलेला होता.कळतय पण वळत नाही अशी त्याची अवस्था होती.ह्या सगळ्यात नकळत तो सुखदाला कारण नसताना दुखावतोय हे कळत असुनही त्याचा नाईलाज होता.

दोन क्षण शांततेत गेले.ह्या सगळ्यावर सुखदाला एखादा तरी सहमती दर्शवणारा सुचक शब्द अपेक्षित होता पण ह्या विपरीत तो तिला फक्त एवढेच बाेलला...…

सुहास-रात्र खूप झालीय.आता झोप.ह्या विषयावर उद्या सवडीने बोलू.मला खूप झोप येतेय.लाईट बंद कर आणि तुही झोप..

त्याने अशाप्रकारे विषय तिकडेच कट करत शिताफीने बोलणे टाळले आणि एका कुशीवर विरूद्ध दिशेला तोंड करून निजला.

सुखदाला त्याच्या ह्याही वागण्याचा अर्थ लागत नव्हता.विचार करत करत ती आपल्या जागी सुहासकडे पाठ करून दुसऱ्या कुशीवर निजली.

तिच्या मनात आले काल ह्याने दवाखान्यात असताना बाथरूमसाठी फोन केला मला आणि मग काही तासातच अचानक असे काय घडले की हा इतका बदललाय???

ते काही नाही उद्या तरी ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच.उद्या कसेही घरी कुणी नसणार आहेत.हिच संधी आहे मोकळेपणी सगळे बोलण्याची...विचारांच्या नादात तिलाही कधी झोप लागली कळलेच नाही.

सकाळी उठताना तीच पुनरावृत्ती झालेली.आज सकाळी पुन्हा अंगावर हात टाकुन झोपलेला.तिला प्रचंड हसु आले.

झोपेत ह्याला हा काय करतो हेही कळत नाही पण जागेपणी मात्र नखरे करतो, काय तर म्हणे तुझी मदत किती दिवस घेऊ.

झोपेत अंगावर हात टाकुन झोपलास हे जर त्याला सांगितले तर हा काय करेल देवच जाणे.

त्याच्या चमत्कारिक वागण्याचे हसु येत होते.

सपुताई म्हणते ते अगदी बरोबर आहे हट्टी वेडं बाळंच आहे हे!!! 

मनातल्या मनात हा विचार येताच तिच्या चेहऱ्यावर हसु पसरले.तिला अगदी काल सारखेच त्याचे चुंबन घ्यावे वाटले पण स्वत:ला आवरत तिने अलगद त्याचा हात जीजावर लपेटला आणि ती अंथरूणावरून उठली.

त्याच्या बाजुने जाऊन कपाळावर हात लावुन त्याचे टेंपरेचर चेक केले.आज त्याला अजिबात ताप नव्हता.तिला तेवढ्यानेच बरे वाटले.

म्हणजे हळहळु त्याला उतार पडेल असे डॉक्टर म्हणाले तसे घडत होते.

अशीच प्रगती झाली तर पुढल्या एक दोन दिवसात तो नॉर्मल सगळ्या अॅक्टिव्हीटीज करू शकेल ही शक्यता नाकारता येत नव्हती फक्त ह्याचा हट्टीपणा नडु नये..

मनातल्या मनात असे सगळे विचार करत ती रूमबाहेर पडली.

आज आईकडे जायचे होते त्यामुळे वत्सलाबाईंना फक्त सुहास पुरतेच बनवावे लागणार होते.

तिच्या मनात एक विचार आला तसे ती खुष झाली.

आज वत्सलाबाईंना सुट्टी देऊन स्वत:च काहीतरी छानसे त्याच्या आवडीचे बनवुया ह्या निमित्त त्याचा मुड जरा ठिक करता येईल ही आशा बाळगुन ती कामाला लागली.आदिची तयारी करून त्याला शाळेत सोडुन आली.दुपारी तो डायरेक्ट तिच्या घरी जाणार असे ठरलेले.तसा रिमाईंडर मेसेज तिने बाबांना केलाही.

वेणूमावशी जीजाला घेऊन जाणार होत्या म्हणुन तिने पटकन जीजाला उठवले.तिचे सगळे पटपट उरकुन तिच्या आवश्यक कपडे आणि सामानाची बॅग पॅक केली.

वेणूताई पण जायच्या तयारीने पटपट सगळे उरकत होत्या.जितके शक्य होईल तितके लवकर त्यांना हे घर सोडायचे होते.त्या दोघांना लग्नानंतर असा एकांत पहिल्यांदाच मिळणार होता.कदाचित आपल्या आसपास असण्याने जर ही दोघं संकोचुन वावरत असतील तर आजचा हा एकांत त्यांना एकत्र आणायला कामी येईल ह्या भाबड्या आशेने त्या हा सगळा प्लॅन करत होत्या.

पण नियतीने कोणते राखीव पत्ते तिच्या हातात दडवुन ठेवलेत हे कोणाला माहित होते.

दैव लेखणा कधी कुणा कळला…।

खेळ कुणाला दैवाचा चुकला….।।

जे जे होईल ते ते पहाणे इतकेच हाती उरले होते...निदान आत्तातरी…..!

-----------------------(क्रमश:13)----------------------------

(क्रमश:13)

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,

ठरल्याप्रमाणे सुहासने स्वत:च स्वत:ला एक अवघड परीक्षेकरता सज्ज केलेय.त्याची सुरवातही त्याने केलेली ह्या भागात तुम्हाला दिसतेच आहे.

ह्या सगळ्याची फलनिष्पत्ती काय असणार?

वेणूताईंच्या मनातली आशा त्यांच्या मनाप्रमाणे साकार होईल की अजुन काही नवे नाट्य ह्यातुन उदयास येणार???

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणुन घ्यायची असतील तर पुढचा भाग वाचायला विसरू नका.

हि कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका.

आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा कुठेही शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all