Login

फिरूनी नवी जन्मेन मी भाग -12

लग्नानंतर फुललेल्या प्रेमाची सुंदर नवी पहाट म्हणजेच फिरूनी नवी..... ...

फिरूनी नवी जन्मेन मी-12

©®राधिका कुलकर्णी.


 

सगळ्यांची रात्रीची जेवणे उरकली.आदिने त्याचा होमवर्क उरकुन बॅग स्टडी टेबलवर ठेवुन धावतच बेडरूममधे आला.बेडवर टुणकन उडी मारून सुहासच्या जवळ येऊन बसला.त्याच्या उडी मारण्याने बेडवरची मॅट्रेस हलली तेवढ्या धक्क्यानेही सुहासच्या ठणकणाऱ्या शरीरातुन तीव्र वेदना उठली.

तो काहीसा चिडुन पण संयमानेच आदिला म्हणाला,"पिल्लुऽऽ अशा उड्या नको ना मारूस.बाबाला त्रास होतोय ना."

आदि जरा वरमला आणि म्हणाला,"सॉरी बाबाऽऽ!! खरच खूपऽऽ पेन होतेय का तुलाऽऽ?"

हो रेऽ पिल्लु.तु लांबच रहा हं.मला धक्का लागला तर त्रास होईल."

त्यांचा चाललेला संवाद सुखदाच्या कानावर पडला.

तशी ती बेडरूममधे आली.सुहासच्या रात्रीच्या गोळ्या दिल्या.टेंपरेचर चेक केले.अजुनही ताप होता थोडा.त्याला ब्लँकेट पांघरायला घालुन व्यवस्थित झोपवले.

आता आपला मोर्चा आदिकडे वळवत ती म्हणाली,"आदि बाळऽऽऽऽ,आजच्या दिवस सुखाईची एक गोष्ट ऐकणार?"

त्यावर आदिने कुतुहलानेच विचारले,"काय गं..?आणि आदि सुखाईचं सगळंऽ सगळंऽऽ ऐकतो.होऽऽ की नाहीऽऽ?"

त्याने प्रेमाने सुखदाच्या मांडीत डोकं घुसळत विचारले.

तसे त्याला हाताला उचलुन आपल्या मांडीत बसवुन ती म्हणाली,"हो गं माझं शहाण बाळ तेऽऽ..!!"

"मग आजही एक गोष्ट ऐकणार ना पिल्लु…!!"

त्यावर सुखदाभोवती हाताच कडं करून तिच्या मांडीत झुलत त्याने विचारले,"होऽऽऽपण कायऽऽ?"

त्यावर सुखदा शब्दांची नीट जुळवणी करत म्हणाली,"हे बघ बाबाला लागलयं ना,बाऊ झालाय ना केवढा मोठ्ठा..तर त्याला बरे वाटे पर्यंत तु आज्जीजवळ झोपशील पिल्लु..?

रात्री झोपेत तुझा धक्का लागला तर त्रास होईल की नाहीऽऽऽ बाबाला..म्हणुन.."

ते ऐकले मात्र आदि थयथयाट करायला लागला.

"नाहीऽऽ नाहीऽऽ मला इकडेच तुझ्या आणि बाबाच्या मध्ये झोपायचेय.मला बाबा आणि तुच हवीस. मी नाही जाणार…अह्ह्.."

आदिने रडुन मुसमुसतच आपला नकार दर्शवला.

त्यावर मग सुखदाने वेगळीच ट्रिक लढवली.

अतिशय सौम्य स्वरात ती त्याला म्हणाली,"बरंऽऽ ठिक आहे.झोप बाबाजवळ."

"रात्री झोपेत तुझी लाथ लागली की बाबा जोरजोरात आेरडेल,त्याचा त्रास वाढेल.वाढु दे,आपल्याला काय त्याचे..!"

"मग लवकर बरे नाही वाटले तर बाबाला हॉस्पीटलला अॅडमिट करावे लागेल,करूऽऽ.मोठ मोठ्ठी इंजक्शन्स टोचावी लागतील,टाेचवु,

आपल्याला काय?त्रास झाला तर होऊ दे...

बाबाला त्रास झालेला बघुन काही फरक पडत नाही पिल्लुला..हो नाऽ!!!"

"पण आमची जीजा हुशार आहे हं दादापेक्षा ती म्हणतेय मी नाही झोपणार बाबापाशी.पण एक मुलगा वेडाचेऽऽऽ म्हणतेय...तु वेडा आहेस की शहाणाऽ सांग पाहु!?!

त्यावर लगेच गाल फुगवुन आदि म्हणाला,"नाही मी नाहीये वेडाऽऽ.मी पण बाबाजवळ नाही झोपणार.बाबा लवकर बरा होऊ दे.मग मी बाबाच्या कुशीत त्याच्या अंगावर हात टाकुन झोपणारेऽऽऽ समजलं का ईजा-बिजा-जीजा.."

जीजाला टुकटुक असे अंगठ्याने वाकुल्या दाखवत चिडवत स्वारी तयार झाली एकदाची.

सुखदाने मारलेली टोमण्यांची गोळी कामी आली होती.

मग तिने लगेच त्याचे ब्लँकेट घेऊन त्याला वेणूताईंच्या खोलीत सोडले.

ती दारातुनच मावशींना उद्देशुन म्हणाली,"आज एक शहाणं बाळं आज्जीकडे झोपणार आहे बरं का.."

त्यावर आनंदी होत खोलीत शिरणाऱ्या आदिला जवळ घेत वेणूताई म्हणाल्या,"अगं माझं लाडकं कोकरू गं तेऽऽ!!.ये नीज हो इथे."

"आज आज्जी गोष्ट सांगणार आहे बरं का आदिला.."

त्यावर आदिही उत्सुकतेनेच आज्जीच्या कुशीत शिरत विचारला,"येऽऽमज्जा...पण कोणाची गोष्ट?"

आज्जी नातवाचे गोड संवाद सुरू झाले तसे सुखदा त्याची व्यवस्था लावुन परत आपल्या बेडरूम मधे आली.

आपला बिछाना खाली घालण्याच्या विचारात ती पलंगाखालची गादी आेढायला लागली तशी सुहासची झोप चाळवली.

त्याने अर्धवट झोपेतच विचारले,"काय ग काय करतेय,कसला आवाज?"

"अरे काही नाही.पलंगाखालची गादी काढतेय.तु झोप शांत."

त्यावर तो लगेच बोलला,"गादीऽऽ??ती कशाला आता?"

"अरेऽऽऽ अस काय करतोस?तु आरामात झोप पलंगावर.आदिला वेणूमावशीकडे पाठवलेय आणि आम्ही दोघी खाली झोपतो.म्हणजे तुला त्रास नको."

त्यावर तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला,"नाहीऽऽ नाही..ते काही नाही.आदिचे ठिक आहे तो खूप लोळतो आणि लाथा पण मारतो झोपेत पण जीजा आणि तु वरच झोपा.जीजा शांत झोपते आणि आता आदिमुळे जागाही पुरेल तेव्हा तु वरच झोप.आणि मलाही आता वरती एकटं एकटं वाटेल ग तुम्ही कोणीच नसाल तरं."

"तसेही खाली झोपुन पुन्हा तुझी पाठ दुखायला लागली तर???"

"नकोच ती रिस्क.वरच झोपा तुम्ही."

त्याच्या बोलण्यात पॉईंट होता.पुन्हा तिचे दुखणे सुरू झाले तर कोण बघणार?

त्यामुळे ह्यावेऴी सुहासच्या हट्टापुढे सुखदाने नमते घेत अखेर जीजा आणि ती सुहाससह बेडवर एकत्रच झोपले.

सुहास एका कुशीवर वळुन शांत झोपलेल्या जीजाकडे बघतच झोपी गेला.सुखदा मात्र सारखी मधेमधे उठुन त्याचा ताप चेक करत होती.औषधांचा परीणाम म्हणुन ताप उतरला होता पण सारखा घाम मात्र सुटत होता.ती मधे मधे उठुन तो पुसून काढत होती.हे करता करता

पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला.

सकाळी जाग आली ते अंगावर काहीतरी जड वजन टाकल्यासारखे वाटल्याने.डोळे किलकिले

करून पाहिले तर सुहास जीजावरून तिच्यावरही हात टाकुन झाेपला होता.

तिने अलगद ताे हात उचलला.हळुच कुस वळवून सुहासच्या दिशेनी आपले तोंड फिरवले.सुहास शांत झोपलेला होता.अगदी एखाद्या लहान मुलागत निरागस चेहरा.

तिने अलगद तो हात हातात घेतला.त्याचा हात हलकेच आपल्या गालांवर टेकवुन नंतर तोच हात तिने जीजाच्या अंगावर ठेवला.त्याच्या हाताच्या विळख्यातुन आपली सोडवणुक करून ती आपल्या जागेवरून जरा सुहासच्या जवळ सरकली.घामाने चिकटलेले त्याच्या कपाळावरचे केस हलक्या हाताने बाजुला सारत ती तशीच त्याच्या निरागस चेहऱ्याकडे निरखुन बघु लागली. काय झाले माहीत नाही पण तिच्याही नकळत तिने हलकेच आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले आणि एक पुसटसे चुंबन घेतले.पुन्हा चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवुन त्याचे पांघरूण ठिक करत ती बेडवरून उठली.

आपली सकाळची सगळी कामे आवरून ती रूम बाहेर पडली.

जशी ती बाहेर गेली सुहासने टक्ककन डोळे उघडले.तिने हात हातात घेतला तेव्हाच त्याची झोप चाळवली होती तिच्या हाताच्या थंड स्पर्शाने पण तो मुद्दामहुन डोळे मिटुन पडुन राहीला.

सुखदाने आत्ता हे जे काय केले त्याचा अर्थ लावायचा तो प्रयत्न करत होता.

सुखदाने आपल्या कपाळाचा कीस घेतला???ह्याचा अर्थऽऽऽ….???

तीऽऽ मलाऽऽ….? 

तीला मी….?!?!"

छेऽऽ.डोक्याची नुसती मंडई झालेली.

सुखदाची ही कृती त्याला बेचैन करून गेली.

उलट सुलट विचारांनी मनात नुसता हैदोस घालायला सुरवात केली.

जे काही घडले घडतेय ते योग्य की अयोग्य ह्यावरही काही एकमत होत नव्हते.बुद्धी आणि मन वेगवेगळे संकेत देत होते. त्याला काहीच समजत नव्हते.कालपासुन एका वेगळ्याच कश्मकश मधे मेंदु गुंतुन पडला होता.

डोळे मिटुन तो स्वस्थ तसाच पडुन राहीला.

       ~~~~~~~~~~~~~~~~

इकडे सुखदाने नेहमीच्या रूटीन प्रमाणे आदिला शाळेत सोडले.घरी येऊन जीजाचे आवरले.

आज सुहासच्या एक्सरेचे रिपोर्ट्स मिळणार होते.ते कलेक्ट करून डॉक्टरांना दाखवायला न्यायचे कामही होते.

त्याआधी सुहासचे सगळे काम उरकुन मगच घराबाहेर पडावे अशी मनात सर्व योजना करत ती पटपट एक एक गोष्ट उरकत होती.

सुहास उठलाय का बघायला ती रूममधे गेली तर तो जागेवरच चुळबुळ करत होता.एक जागी बसुन बसुन त्याचे हातपाय आखडले होते. अजुनही पायाची जखम ठसठसत होती.

शरीराच्या वेदना औषधांच्या परिणामांमुळे जरी थोड्या कमी झाल्या तरी अजुनही हालचाल झाली की त्रासच होत होता.मदतीशिवाय कुठलेच काम त्याला आत्ता तरी शक्य नव्हते.सुखदा जवळ आली की वेगळीच काहीतरी रासायनिक प्रक्रीया घडत होती.

मनात वेगवेगळ्या संवेदना अचानक फेर धरू लागायच्या.

इकडे आड तिकडे विहीर अशी मनाची अवस्था.तिची मदत घ्यावी तरी पंचाईत न घ्यावी तरी पंचाईत असे झालेले…..

सुखदाने त्याला उठलेले पाहुन हसुन गुड मॉर्निंग विश केले.त्यानेही हसुन प्रत्युत्तर दिले.

ती जवळ येऊन बसली तसे ह्याचे ह्रदय अचानक जोरजोराने धडधडायला लागले. 

तिने त्याला तोंड धुवायला पेस्ट लावलेला ब्रश हातात दिला.व्यवस्थित तोंड धुवुन तो फ्रेश झाला.त्याचे तोंड तिने नॅपकीनने कोरडे केले.चहा बिस्कीट्स खाऊ घातले,सकाळच्या टॅबलेट्स दिल्या आणि थोड्यावेळ तशीच त्याच्याजवळ बसुन राहीली.

तिच्या चेहऱ्यावरची काळजी बघुन सुहास म्हणाला.

सुहास(सांत्वनपर)-अगंऽऽ किती काळजी करशील?मी ठिक आहे आता..

please don't get worried.Am perfectly  fine now!!!!  

आता हास बघु जरा..कालपासुन काळजीने किती काळवंडलाय बघ तुझा चेहरा..!

त्यावर अचानक सुखदाला रडु फुटले.

सुखदा (रडत रडतच)- Sorry Suhas…..

All this is happened just because of me…!!!

आपल्या मनातली सल तिने अखेर व्यक्त केलीच.

त्यावर सुहास(समजुतीच्या स्वरात)- वेडी आहेस का,काहीही काय बोलतेस?

आता तुझ्यामुळे कसे काय पडलो मी?

उगीच काहीतरी विचार करून स्वत:ला दोष देत बसु नकोस. पूस ते डोळे आधी.रडताना तु अजिबात चांगली दिसत नाहीस.

पण सुहासच्या समजावण्याचा तिच्यावर काडीमात्र फरक पडला नाही.अजुनही डोळ्यातले पाणी खंडायचे नाव घेत नव्हते.

तिने रडतच मनातले दु:ख शेवटी व्यक्त केले.

सुखदा- मी डायरेक्टली नाही तरी इनडायरेक्टली ह्या अॅक्सिडेंटला कारणीभूत आहेच.जर मी घाईने सखूला किचनमधे बोलावले नसते तर हा पुढचा अनर्थ टळला असता.पण मलाच कशी दुर्बुद्धी सुचली कोण जाणे…

आणि हे सगळे घडल्यापासुन फार अपराधी वाटतेय रे मनातऽऽ.

खरच मनापासुन सॉरी..!!

तुला किती त्रास होतोय माझ्या एवढ्याश्या चुकीमुळे.

तिचा चेहरा अजुनही रडवेलाच होता.

सुहासला समजत नव्हते तिची कशी समजुत काढावी.त्याने हलकेच तिचे डोळे पुसले आणि म्हणाला

सुहास(मस्करीत)- बरं तुला वाटतेय नाऽऽ की तुझ्यामुळे हे सगळे घडलेय.तर एक काम करूया मी पुर्ण बरा झालो की मी तुझ्याकडुन ह्याची फी वसुल करेन मग तर झाले..!!

त्याने तिला मिश्कीलपणे हसुन डोळा मारला.

तेवढ्या दुखण्यातही त्याचा तो खोडकरपणा बघुन तिच्या चेहऱ्यावर हसु फुटले.लगेच डोळे पुसत ती म्हणाली..

सुखदा- म्हणजे??काय मागणारेस ते आत्ताच सांग?

सुहास (चेष्टेतच)- ते आत्ताच कसे सांगणार?

आणि मी अजुन काही ठरवलेही नाहीये.पण तुला एक प्रॉमिस करायला लागेल?

सुखदा(विस्मयाने) - काय?

सुहास- हेच की मी जे मागेन ते द्यायचे.तेव्हा प्रॉमिस मोडायचे नाही,कबुल..?

सुखदा(मानेनेच होकार दर्शवत)- ओकेऽऽ! Done.नाही मोडणार प्रॉमिस..!!

आता तिचा मुड पुन्हा हसरा झालेला बघुन सुहासलाही बरे वाटले.

सुहास- बघ हसताना किती छान दिसतेस.आणि हे घडायचे होते म्हणुन घडले.ह्यासाठी कोणीच जवाबदार नाही अगदी सखुसुद्धा…

'जब जब जो जो होना है;तब तब सो सो होता है।'

समजतेय का वेडाबाईऽऽऽ…!!

सुखदा-हम्मऽऽऽ...पटतेय थोडे थोडे..पण थोडेच..सगळे नाही.. 

लगेच विषय बदलत सुखदा म्हणाली,"बर चल तु नाष्टा करून घे.

म्हणजे मला बाकीची कामे उरकता येतील."

तिने प्लेटमधे पोहे गरम करून आणले आणि सावकाश त्याला भरवले.खाणे झाले की चुळ भरून त्याला उशीला टेकुन बसवले.पेपर वाचायचा म्हणुन पेपरही आणुन दिला.

        

दोघांनाही आता एकमेकांची कंपनी आवडायला लागली होती.खास करून सुहासला.

त्याला तर तिची ह्या दोन तीन दिवसात इतकी सवय झाली होती की ती समोर दिसली नाही तर तो बेचैन व्हायचा.ती सतत आपल्या आसपास असावी असे वाटायचे पण तसे डायरेक्ट बोलुन दाखवता येत नव्हते हीच त्याची खंत होती.

        ~~~~~~~~~~~~~~~~

आता सकाळची जीजा आणि सुहासची घाईची कामे उरकली होती.लगेच कुणाचे काही काम नव्हते तो वेळ साधुन सुखदा डॉक्टरांकडे जायचा विचार करत होती.

पटकन साडी बदलुन ती वेणूताईंना सांगुन बाहेर पडली.एक्सरे रिपोर्ट्स कलेक्ट करून डिस्पेंन्सरीत पोहोचली.डॉक्टर अजुन आलेले नव्हते.ती तिथेच बेंचवर त्यांची वाट पहात बसली.एवढ्यात सुहासचा फोन ..

आत्ताच तर सगळे उरकुन आपण आलो आणि हा का फोन करतोय असा विचार करतच तिने फोन उचलला.

सुखदा-हाय,बाेल रे.फोन का केलास?काय झाले??

सुहास-अगं तुला दोन तीनदा आवाज दिले पण तु आली नाहीस ना म्हणुन फोन केला.कुठेस तु??

तिला आत्ता आठवले,गडबडीत निघताना सुहासला हे सांगायची विसरली होती ती की ती डॉक्टरकडे चाललीय.

तशीच जीभ चावत ती बोलली...

सुखदा- अरे मी दवाखान्यात आलेय तुझे एक्सरे रिपोर्ट्स दाखवायला.डॉक्टर अजुन आले नाहिएत म्हणुन बसलेय वाट पहात.

का रे?तुला काही हवे होते का?

सुहास-अग वॉशरूमला जायचे होते म्हणुन तुला आवाज देत होतो.मला माहितीच नाही तु बाहेर चालली आहेस..तो जराशा तक्रारीच्या सुरातच बोलला.

मुळात ती जवळ असावी म्हणुन ह्याचे सततचे काही बाही बहाणे चाललेले असत.ती बाहेर गेलीय हे कळल्यावर त्याचे मन खट्टु झाले.

इकडे ती मात्र चिंतेत पडली.आता कसे करू?? नेमके सर अजुन आले नाहीएत.

मग काही विचार करून समोरच्या रिसेप्शनिस्टला एक्सरे रिपोर्ट्स देऊन ते डॉक्टरांना दाखवायची विनंती केली.

तिनेही बर म्हणुन पेपर्स ठेवुन घेतले.सुखदा सुहासच्या काळजीत घाईने घराकडे निघाली.

वाटेत तिने डॉक्टरांशीही संपर्क साधला.त्यांना आपली घरची ईमरजन्सी सांगुन रिपोर्ट्स ठेवुन चालल्याचेही कळवले.

डॉक्टरांनी तिची अडचण लक्षात घेऊन रिपोर्ट्स बद्दल फोनद्वारे कळवतो असे अश्वासन दिले तशी ती निश्चिंत झाली.

घरी येऊन पर्स बेडवर फेकत ती धावतच सुहासपाशी आली

सुखदा-सॉरी डिअर मी गडबडीत निघताना तुला सांगुन जायला विसरले.

चल आधी वॉशरूमला नेऊन आणते तुला..

ती ज्या वेगाने धावतपळत आली तिचा ऊर अजुनही काळजीने धपापत होता.आपल्यामुळे तिला निष्कारण पडलेला हेलपाटा जाणुन सुहासलाही अपराधी वाटु लागले.

तो तिला शांतपणे बोलला

सुहास-अगं मग एवढ्या घाईत यायची काय गरज होती?आई होती ना.तिने मदत केली मला.मी जाऊन आलो बाथरूमला..

तु श्वास घे.पाणी पीऽ..

बाजुच्या साईडटेबलवरचा जग पुढे करतच तो पुढे बोलला," बघ किती दमलीएस ते…"

सुखदा- हो रेऽऽ.तुझा फोन आला की मी घाबरून रिपोर्ट्स तिथेच ठेवुन घाईने परत आले.

डॉक्टर म्हणालेत की ते वाचुन नंतर फोनवर कळवतील म्हणुन.त्यामुळे आता परत जायची चक्कर वाचली..

बरं चल आता जागा आहेस तर तुझे स्पजिंग उरकुन घेऊ...काय??

त्याने मानेनेच होकार दिला.

तिने लगेच छोट्या टबमधे डेटॉल वॉटर तयार करून स्वच्छ नॅपकीनने त्याचे अंग पुसायला सुरवात केली.तिने त्याचा हात हातात घेऊन पुसायला सुरवात करताच सुहासच्या अंगावर शीरशीरी उठली.

समोरचा भाग पुसुन जेव्हा ती पाठ पुसायला वाकली तसा तिचा पदर ढळला.वरचे दोन हुक्स निसटल्याने तिची क्लिव्हेज लाईन त्याला स्वच्छ दिसु लागली.वाकुन पुसताना छातीला होणारा तिच्या उभारांचा स्पर्श शरीर ताठर करून गेले.

त्या स्पर्शाने अंगातील रक्त गरम व्हायला लागले.

जणु धमण्यांतील रक्त उसळुन नसांमधुन व्हल्कॅनो सारखे फुटुन बाहेर पडेल की काय असे वाटु लागले त्याला.

त्याचा चेहरा तिच्या उरोजांच्या इतक्या जवळ होता की त्या उन्नत वक्षस्थळांना बघुन त्याच्यातला पुरूष जागा होऊ लागला.440 व्होल्टचा करंट शरीरभर पसरला.ह्रदय तर मेट्रोपेक्षाही तेज गतीने धडधडायला लागले.कानशीलं तापायला लागली. 

तो तिला काही आज पहिल्यांदा भेटत किंवा पहात नव्हता.परंतु स्त्री म्हणुन वाटणारे हे 

आकर्षण तो आज पहिल्यांदाच अनुभवत होता.

ह्या अगोदर त्याला तिच्याबद्दल हे असे आकर्षण वाटले नव्हते पण आजच काय होत होते कळत नव्हते.. त्याच्या ह्रदयाची तार छेडली गेली होती आज हे मात्र खरं.

असेच आपल्या मिठीत तिला घट्ट सामावुन घ्यावे असाही विचार मनात एका क्षणाकरता येऊन गेला.मती गुंग झाली होती.काय घडतेय काही समजत नव्हते.

इतक्यात बेडवरच्या पर्समधे सुखदाचा फोन वाजु लागला.

त्याच्या लयबद्ध उष्ण श्वासांचा स्पर्श सुखदालाही तिच्या क्लिव्हेज लाईनवर स्वच्छपणे जाणवु लागला.तशी ती वेगाने सुहासपासुन दूर झाली.

घाईनेच फोनचे निमित्त करून ती रूमबाहेर गेली.

आता सुहासही भानावर आला.मनाला आवर घालत स्वत:ला सावरले.स्वत:चे डोळे त्याने घट्ट मिटुन घेतले तरीही तिच्या घाटदार ऊरोजांचे चित्र डोळ्यासमोरून काही केल्या हलेना.

मनात प्रचंड द्वंद्व चाललेले.काय होतेय हे आपल्याला???काय चाललेय हे?

मन आणि मेंदुमध्ये जणु युद्ध छिडले होते.

पहिल्यांदाच मेंदुवर मनाने मात केली होती.

मेंदु सांगत होता की हे अयोग्य आहे.स्वत:ला सावर.तु अजुनही फक्त संपदावरच प्रेम करतो.तिची जागा तु ह्या जन्मात कुणालाही देऊ शकत नाहीस पण……..,

 मन मात्र आज वाऱ्याच्या गतीने धावत वेगळेच सूर आळवत होतं.

संपदा तर आठवणीत कायम राहणारच आहे पण मग जसे वेळेला भूक तहान लागते तशा ह्या शरीराच्याही काही गरजा आहेतच ना.त्याच्या तहान भुकेचे काय?? तुलाही भावना आहेत.मन मारून असा किती दिवस स्वत:लाच धोका देत जगणारेस??

आणि सुखदा कायद्याने तुझी पत्नी आहे मग तिच्या बाबतीत नैसर्गिक भावना नाही उत्पन्न होणार तर कुणासाठी होणार..?? का स्वत:ला अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे केलेस??

आता फक्त मनाला साद घाल आणि ते काय सांगतेय तेवढेच ऐक आणि तेच कर.

हे वैचारिक द्वंद्व त्याला बेचैन करत होते.

एकीकडे संपदाच्या आठवणी तर दुसरीकडे सुखदाबद्दल वाटणारे आकर्षण..

हे नेमके काय आहे..????

प्रेमऽऽकी फक्त वासना…????

शेवटचा प्रश्न विचार बनुन मेंदुवर धडकला तसा तो भानावर आला.खरच की हा विचार मी केलाच नाही.सुखदाबद्दल मला नेमके काय वाटतेय??

प्रेम की फक्त आकर्षण???

 हे जाणुन घ्यायची गरज आली आहे आता..

कारण प्रेमाशिवाय शरीराची आसक्ती म्हणजे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीच्या ऱ्हासाची सुरवात….!!!

आता मला माझ्याच कसोटीवर उतरायचे आहे.सुखदाबद्दल मला काय वाटते हे शोधुन काढायलाच हवे..

तिकडे सुहासच्या मनातल्या ह्या भावनिक कल्लोळाची सुखदाला गंधवार्ता नव्हती.

थोडेफार त्याच्यातले सुक्ष्म बदल एक स्त्री ह्या नात्याने तिलाही जाणवले असले तरीही संधी मिळुनही त्याने कुठलीही लिमिट क्रॉस केलेली नव्हती हेही तिने बारकाईने आॅब्झर्व्ह केले होते आणि ह्याच एका गोष्टीने सुहासने सुखदाच्या मनात जागा निर्माण केली होती.

आजपर्यंत बाहेरच्या जगात वावरताना कळत नकळतपणे अनेक पुरूषांचे चांगले वाईट अनुभव इतका फरक करायला तर नक्की शिकवुन गेले होते की कोणाची नियत कशी आहे??

"सगळे पुरूष सारखेच" असे आपण सहजपणे म्हणत असलो तरी सगळे पुरूष अजिबात सारखे नसतात हे तिला आत्ताच्या ताज्या प्रसंगातुन पक्के कळाले होते.

नकळत का होईना सुहासबद्दल सुखदाच्या मनात एक बीज पल्लवीत होऊ लागले होते.सध्यातरी त्याला नाव गाव आकार रूप रंग काहीच नव्हते.पण लवकरच ते बीज अंकुरेल ही आशा पुसटशी का होईना निर्माण झाली होती.

अाजच्या एकाच घटनेने दोघांच्याही मनात खळबळ आणि परस्परविरोधी बीजं अंकुरली  होती……..

सुखदा मुळीच साशंक नव्हती सुहासबद्दल तर सुहास स्वत:च्याच भावनांबद्दल साशंक होता.आता ह्या शंकेच निरसन करण्याकरता तो काय पावले उचलणार होता????

कसे स्वत:च स्वत:ला तपासणार होता?

पुढची स्वत:च स्वत:ला घातलेली परीक्षा खरच खूप अवघड होती.

ह्या परीक्षेचा अंतिम निकाल काय,हे विधात्याने सुहासपुढे घातलेले कोडेच तर नव्हते ना….???

निकालाची आणि अंतिम निर्णयाची वाट तर पहावीच लागणार होती…….!

-----------------------(क्रमश:-12)------------—--------------

क्रमश:-12

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मित्रहो,

मानवी मनाच्या नैसर्गिक भावभावनांचे दर्शन घडवताना काही प्रसंग रेखाटावे लागलेत.

व्यक्तीचा कस तेव्हाच लागतो जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते.ऑल वेल असताना तर कोणीही चारित्र्यसंपन्नतेचा टेंभा मिरवत फिरेल परंतु एखाद्या निसरड्या मोहाच्या क्षणीही तुम्ही स्वत:च स्वत:ला कसे संभाळता त्यावर त्या व्यक्तीची खरी मनुष्य म्हणुन ओळख पटते.

तसाच आपला सुहासही सर्वसाधारण मनुष्य आहे.एका निसरड्यावर पाय त्याचाही पडला परंतु स्वत:ला तो त्यातुन कसा सावरतोय संभाळतोय,कसे स्वत:ला आपल्याच नजरेत सिद्ध करतोय?हे बघणे इंटरेस्टींग असणार आहे.

त्याला त्याच्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळेल का?

हे सगळे जाणुन घ्यायचे असेल तर पुढील भाग वाचायला विसरू नका.

हा भाग कसा वाटला?

ते कमेंट्समधे जरूर कळवा.

माझी कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला नक्की फॉलो करा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all