Login

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-10

लग्नानंतर फुललेल्या नात्याची सुंदर पहाट म्हणजे फिरूनी नवी.... .... कथा.

फिरूनी नवी जन्मेन मी भाग-10

©®राधिका कुलकर्णी.

लग्नानंतरचे होम,सत्यनारायण,जागरण,गोंधळ सगळे विधी उरकले.पाहुणेही जिकडचे तिकडे झाले.दोन्ही कुटुंबे दोन कार करून देवदर्शनही करून आले.सुखदा मांडवपरतणीसाठी सुद्धा निमित्ताला एक रात्र माहेरी राहुन आली.

आता खऱ्या अर्थाने लग्नघर शांत झाले आणि जो तो आपापल्या रूटीनला लागला.

सुहासने काढलेली दहा दिवसाची लिव्ह संपुन तोही उद्यापासुन ऑफीस जाॅईन करणार होता.आदिचीही शाळा उद्यापासुन.

सगळ्यांचे सगळे मार्गी लागणार होते शिवाय सुखदाच्या.

तिची सुट्टी अजुन तीन आठवडे होती.ह्या दिवसात तिला घरातली बाकीची घडी नीट बसवायची होती.जीजाला दिवसभर संभाळायला कोणाचीतरी व्यवस्था करावी लागणार होती.

तीचे कॉलेज सुरू झाल्यावर वेणूमावशींवर जीजाचा भार पडु नये म्हणुन आपण घरी असे पर्यंतच एखाद्या बाईला व्यवस्थित ट्रेंड करावे असा तिचा मानस होता.तसे तिने वत्सलाबाई म्हणजे त्यांच्या स्वैंपाकीण मावशी आणि वरकाम करणाऱ्या बाई सखूलाही कोणी गरजु असेल तर सांग असे सांगुन ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी आदिची शाळा.ती घाईनेच उठली.त्याचे आवरून तयार करून त्याचा टिफीन,रोजचा खायचा मऊ भात शिजवला.

ही सगळी कामे आता तिलाच पहावी लागणार होती.इकडे आता आई म्हणजेच नलिनीताई नव्हत्या ह्या मदतीला.तिला राहुन राहुन आईची कमी जाणवायला लागली.एरवी हे काम इतके बिनबोभाट होत असे की ह्यात काय एवढे असे सहज कोणीही म्हणावे.

एखादी व्यक्ती मग ती गृहिणी असो किंवा घरातले सेवानिवृत्त वडीलधारी मंडळी,

नकळतपणे घरातली कितीतरी कामे सहजपणे करत असतात पण त्यांची दखल कधीच घेतली जात नाही.ती तेव्हाच घेतली जाते जेव्हा काही कारणांनी त्या व्यक्ती आपल्यासाठी उपलब्ध नसतात.

एरवी त्या व्यक्तीला साधा कौतुकाचा एक शब्दही कुणाकडुन मिळत नाही.

आज ह्या सगळ्याची उजळणी करताना हा विचार सुखदाच्या मनात उगाचच बोचला, आपणही ह्या कामासाठी आईला कधी थँक्यु नाही बोललो...बोलायला हवे होते ना!!!

"थँक्यु आई!!"तिने मनातल्या मनात तिथुनच आईला थँक्यु केले आणि कामाला लागली.

आज पहिलाच दिवस इकडच्या किचनमधला.

तिची थोडी तारांबळ उडत होती,वस्तु जागेवर मिळत नव्हत्या.वत्सलाबाईंनी किचनला त्यांच्या सोयीनुसार लावले होते त्यातही वस्तु पुन्हा जागच्या जागी ठेवल्या गेल्या नसल्याने तिला बरीच शोधाशोध करावी लागत होती पण अखेरीस तिने सगळे मॅनेज केले आणि वेळेत आदिला तयारही केले.

आता त्याला शाळेत सोडायची जवाबदारीही तिचीच कारण तिकडे असताना दोघे सोबतच निघायचे.

येतानाच्या बसड्रायव्हरशी बोलुन ती सोय करावी लागणार होती.घराचा बदललेला अॅड्रेस त्यांना ईनफॉर्म करायला लागणार होता.

मनातल्या मनात कामाची योजना करतच तिने गाडी स्टार्ट केली.

इकडे सुहासही तोपर्यंत उठला.सगळीकडे नजर फिरवत सुखदा घरात नाही बघुन त्याने कुतुहलानेच वेणूताईंना विचारले,

सुहास- सुखदा दिसत नाही घरात,कुठे गेली?"

त्यावर..,

वेणूताई- अरे आदिचे स्कूल नाही का आजपासुन?त्यालाच शाळेत सोडायला गेलीय.येईल एवढ्यात."

आत्ता त्याला आठवले सगळे.स्वत:ला नकळत गिल्टी फिल करून घेतले त्याने.जे काम मी करायला हवे ते तीने किती सहज केले.कोणता त्रागा नाही की चीडचीड नाही.खरच मी लायक आहे मुलांचा बाप म्हणवुन घ्यायला.???

त्यांच्या अर्ध्या अधिक जवाबदाऱ्या तर सुखदाच पार पाडते.

मुलांसाठी लग्न करून तिच्यावर मी ह्या घराच्या जवाबदाऱ्यांचे एक्स्ट्रा आझे तर लादले नाहीये ना नकळत??

विचारांच्या ह्या ओघात असतानाच सुखदा आली.सुहासला पाहुन 

सुखदा (हसतच) - हाय सुहास.!गुड मॉर्निंग!

कधी उठलास?"

सुहास-हे काय जस्ट उठलोय.मला नाही का सांगायचे मी गेलो असतो ना आदिला सोडायला?"

सुखदा- अरे त्यात काय.असेही मला सवय आहे.रोज मीच त्याला ड्रॉप करत पुढे कॉलेजला जायचे ना,मग त्याच सवयीने जाऊन आले.

बरं तु चहा घेणारेस?

सुहास-हंऽऽम्.. चालेल.दे पटकन.मी आलोच तोवर फ्रेश होऊन.

तो फ्रेश होऊन येईपर्यंत तिने सगळ्यांसाठी चहा बनवला.वेणूताईही एव्हाना अान्हिक उरकुन देवपुजेला लागल्या होत्या.तिने त्यांचाही चहा देवघरात नेऊन दिला आणि सुहासबरोबर स्वत:चा चहा घेऊन डायनिंगपाशी आली.चहाचे सीप मारत विचार चाललेले एवढ्यात सुहास आला तसे तिने लगेच त्याला सांगितले.

सुखदा- अरे आदिच्या ह्या बाजुने जाणाऱ्या पहिल्या बसड्रायव्हरला सांगायला लागेल हं की त्याला रोज पुर्वीसारखे ह्या पत्त्यावरच ड्रॉप कर म्हणुन नाहीतर मग येताना त्याची पंचायत होईल.सुखदाने आठवण दिली तसे त्याने लगेच ड्रायव्हरचा नंबर शोधुन त्याला तसे कळवुन टाकले.आता आदिची चिंता मिटली होती.

पावलागणिक तो सुखदावरती इम्प्रेस होत होता.

किती बारीकसारीक गोष्टी हिच्या लक्षात असतात.

सगळे कसे वेळेत शिस्तबद्ध.

मला कधी जमणार आहे देव जाणे!!!

हसतच चहा संपवला आणि तो ऑफीससाठी बाकी तयारी करायला निघुन गेला.

आता सुखदा एकटीच बसुन होती.असा निवांतपणा तिला ह्या आधी कधी मिळालाच नव्हता.

वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच तिला पडतच नसे इतके तिने स्वत:ला कामात व्यस्त करून घेतले होते.पण आजचा हा रिकामा वेळ त्यात करायला काहीच नाही तिला भारी बोअर होत होते.जीजाही अजुन उठली नव्हती नाहीतर तिचे करण्यात तरी वेळ गेला असता..ती तशीच एकटी बसुन राहीली.

रिकामा वेळ आहे तर निदान आपले कपडे तरी आवरून घेऊ असे मनात येताच ती उठली.अजुनही तिच्या बॅग्ज वेणूताईंच्याच खोलीत होत्या त्या उचलुन वॉर्डरोबमधे नीट अॅरेंज करूया असा विचार करत बॅग्ज उचलुन ती सुहासच्या बेडरूममधे आली.सुहास बाथरूममधे स्नान करत होता ते लक्षात येताच ती बॅग्ज तिकडेच टेकवुन बाहेर आली.

तो गेला की आवरू हा विचार करून ती सुहास जायची वाट पहात बसली.पंधरा मिनटातच सगळे आवरून जायच्या तयारीनेच तो बाहेर डायनिगटेबलपाशी आला.

वत्सलाबाई एव्हाना स्वैयंपाकाला आल्या होत्या.

त्यांनी अगोदर सगळ्यांसाठी नाष्ट्याला सांजा बनवला. सुखदाने तोच सुहासच्या प्लेटमधे वाढला.सांजा खाऊन घाईनेच सुहास बाय करत बाहेर पडला.

आता निवांतपणे आपले कपाट आवरू हा विचार करत आत गेली तर दोन पैकी एका वॉर्डरोबला कुलूप!!!

तिला प्रश्नच पडला लॉक का लावलेय सुहासने!

वेणूताईंची पूजा आटोपली की त्यांनाच विचारू असे ठरवुन ती तिकडेच फुटकळ काम करत वेळ काढू लागली.

तेवढ्यात वेणुताई पूजा उरकुन बाहेर आल्या.

त्यांना बघुन तिने लगेच विचारले,

 सुखदा- मावशी मला किज् हव्या होत्या.

वेणूताई- कसल्या ग?

सुखदा-अहो बेडरूम मधल्या एका कपाटाला लॉक आहे ना त्याची चावी हवीय.

वेणूताईंना सगळा प्रकार लक्षात आला.पण त्या काहीच बोलल्या नाहीत.त्या तिला म्हणाल्या वेणूताई - तु असं कर माझ्या खोलीतच ठेव सध्या बॅग्ज.त्याची चावी सुहासनेच कुठेतरी ठेवलीय पण आता मला आठवत नाहीये.तो आला की देईल.

म्हणजे हे लॉक सुहासने लावलेय!!!

पण का??तिला उगीचच प्रश्न पडला.

दुसऱ्याच क्षणी एक विचार वादळासारखा अचानक घोंगावत मन:पटलावर आदळला.

म्हणजे मला अजुन त्याच्या खोलीत प्रवेश नाहीये की काय?? नुसत्या ह्या विचारानेच मन उदास झाले तिचे...

असोऽऽऽऽ.!

आता तो स्वत:हुन मला त्याच्या खोलीत हक्काची जागा देत नाही तोपर्यंत मीही त्याला काही मागणार नाही आणि सांगणारही नाही.

तिने मनाशीच निश्चय केला.

नकळत डोळ्यातुन ओघळलेले आश्रु पुसत तिने बॅगा पुन्हा वेणूताईंच्या खोलीत नेऊन ठेवल्या.

जेव्हा तडजोडींवर नाते जोडलेय तेव्हा तिकडे अशा गोष्टींचे वाईट वाटुन घेण्यात काय अर्थ आहे.तिने स्वत:च स्वत:ची समजुत घातली आणि जीजा उठलीय का बघायला गेली.

जीजाची हलकेच चुळबूळ चाललेली.

तिने तिचा गोड पापा घेतला तशी ती सुखदाला बिलगली.

ह्यावेळी तिला कधीच सुखदा घरी दिसायची नाही.नेहमी नलिनाताईच दिसायच्या नाऽऽ पण आज सुखाईला घरी आपल्या जवळ बघुन तीही खूष झाली.सुखदाच्या कुशीत शिरून ती पुन्हा झोपी गेली.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

नुकतीच पूजा आटोपून बाहेर आलेल्या वेणूताईंनी सुखदाला बॅगांसहीत आपल्या खोलीत शीरताना आणि बाहेर जातानाही पाहीले.

त्याही सुहासच्या खोलीत गेल्या.बेडवर झोपलेल्या जीजाला सुखदा उठवत होती पाहुन त्यांनी हलकेच विचारले, 

वेणूताई- सुखदाऽऽ नाष्टा केलास का गंऽऽ?"

त्यावर सुखदाने मान वळवुन वेणूताईंकडे बघत सांगितले,

सुखदा- नाही केला,तुमच्या सोबत बसु म्हणुन थांबले होते.

वेणूताई- अगंऽ मग चल की..माझेही आवरलेय.चल सांजा थंड होईल.

वेणूताई उत्तरल्या.

सुखदा- तुम्ही सुरू करा मी आलेच जीजाचे उरकुन."

वेणूमावशींना तिचा उतरलेला चेहरा दिसु नये म्हणुन ती जीजाचे कारण सांगुन टाळु पहात होती पण त्यांनी खूपच आग्रह केल्यावर त्यांचे मन मोडु नये म्हणुन ती डायनिंगटेबलवर येऊन बसली.

वेणूताईंना तिचा उदास चेहरा दिसत असुनही त्या काहीच बोलल्या नाहीत.कधीकधी काही गोष्टी आपल्याला समजुनही न समजल्यासारखे दाखवण्यातच शहाणपणा असतो.तोच पवित्रा उचलला आत्ता त्यांनी.

तिलाही बरे वाटले की मावशींना काही कळले नाही की आपण रडलो वगैरे.अज्ञानात सुख म्हणतात ते असे.

पण मनोमन वेणूताईंनी काहीतरी ठरवले होते म्हणुनच त्यांनी विषय वाढवायचे टाळले.

न बोलता ह्यातुन तोडगा काढायचा विचार करून सुखदाशी इतर गप्पा मारत त्यांनी नाष्टा उरकला. सुखदाही जीजामधे बिझी झाली.

      ~~~~~~~~~~~~~~~~~

रात्रीची वेळ सगळ्यांची जेवणे उरकुन झोपायची तयारी सुरू होती.

वेणूताई आपल्याच खोलीत पलंगावर हातापायाला मुव्ह चोळत बसल्या होत्या. 

सुहास किचनमधे पाण्याचा जग भरत होता.

रात्री झोपण्यापुर्वी एक तांब्याभांडे आईच्या उशाशी आणि दुसरा पाण्याचा जग स्वत:साठी न्यायचा हा सुहासचा गेल्या कित्येक वर्षांचा रोजचा नेम.

आजही तांब्या-भांडे ठेवायला तो वेणूताईंच्या खोलीत गेला तशी हीच संधी साधुन त्यांनी सुहासशी बोलायचे ठरवले.

 वेणूताई- झोपली का रे पोरं?.

वेणूताईंनी सुरवात म्हणुन काहीतरी विचारले.

सुहास- हो आईऽ आदि नुकताच झोपला आणि सुखदा जीजाला झोपवतेय.तुझे काही काम होते का?

सुहासच्या ह्या वाक्यावर वेणूताई म्हणाल्या,

वेणूताई- असे कर तो जग खोलीत ठेऊन परत ये.मला तुझ्याशी बोलायचेय थोडे."

त्यांनी प्रस्तावना केली.

सुहासही मनातल्या मनात विचार करत बोलला,

सुहास- मग बोल की.जग मी जाताना नेईन.

आत्ताच कुणाला पाणी लागणार आहे लगेच...तु बोल.

त्यावर वेणूताईंनी त्याला दार थोडे पुढे ढकलायला सांगितले.

सुहासला आईच्या ह्या वागण्याचे आश्चर्यच वाटले.इतके काय गहन बोलायचेय की कोणाला ऐकु जाऊ नये." 

पण काही न बोलता निमुटपणे दार पुढे करून तो पुन्हा वेणूताईंजवळ येऊन बसला.

आई काय बोलणार ह्याचा क्लु लावायचा तो प्रयत्न करत होता परंतु टोटल लागत नव्हती.शांतपणे आई काय बोलतेय हे ऐकण्यासाठी तो सज्ज झाला

वेणूताई- हे बघऽऽ सुहासऽऽ…. 

पूढे काय अन् कसे बोलावे समजत नव्हते म्हणुन त्यांनी मोठ्ठा पॉझ घेतला..

मग सुहासनेच त्यांच्या हातावर आपला हात ठेऊन आश्वासक स्पर्शाने वेणूताईंना म्हणाला, सुहास- आईऽऽ बोल नाऽऽ इतका संकोच कसला?" 

वेणूताई - हे बघ सुहासऽऽऽ,सुखदाला आपल्या घरी येऊन दहा बारा दिवस होत आलेत.तिला इकडे काय हवं नको हे बघायला हवे तु.तिला इकडे परके वाटता कामा नये.

ही काळजी आपण घ्यायला हवी आताऽऽ.

सुहास- हो आई,पण हे घर तिला कुठे परके आहे.तिला काही लागले तर ती सांगेलच की.तु इतका का विचार करतेस? 

सुहासच्या डोक्यात अजुनही प्रश्नच आई नेमके काय सुचवु पाहतेय…..?

वेणूताई- अरे हे घर जरी परके नसले तरी ज्या नात्याने ती ह्या घराशी बांधली गेलीय ते नाते नविन आहे नाऽऽ.

नवखेपणात माणूस बोलुन दाखवत नाही बऱ्याचदा,त्यालाही वाटतं की कोणीतरी आपली गरज ओळखून वागावं.

आता हेच बघ….(वेणूताईंनी आपल्या खोलीत पडलेल्या तिच्या सामानाकडे अंगुलीनिर्देश करत म्हणाल्या) हे तिचे सामान बारा दिवस झाले इथेच लोळतेय.तिला सामान ठेवायला तु जागा दिलीस का तुझ्या खोलीत?

आज वेळ मिळाला तसा सकाळी ती तिचे सामान तुझ्या खोलीत शिफ्ट करायला घेऊन गेली पण पुन्हा इकडेच ठेवले आणुन.मला कपाटाची चावी विचारत होती पण मला हेच माहीत नाही की तु कपाट लॉक करून ठेवलेस मग तिला मी काय उत्तर देणार होते?

माहीत नाही सांगुन मी वेळ मारून नेली सकाळी पण तु कपाट लॉक का करून ठेवलेस?"

वेणूताईंच्या ह्या प्रश्नावर सुहास निरूत्तर मान खाली घालुन पायाने जमीन उकरत होता.

कुठलीतरी गोष्ट अस्वस्थ करतेय त्याला हे लक्षात आले वेणूताईंच्या.

त्याच्या डोक्यावरून हात फिरवतच वेणूताई सुहासला बोलल्या,

वेणूताई - जुन्या आठवणी फक्त आनंद किंवा दु:ख देतात पण पुढे जायचे असेल ना तर ह्या आठवणींना मनाच्या एका कोपऱ्यात बंद करायला लागते रेऽऽ लेकरा.

आठवणींना कुलूप घालायचे बरं वस्तुंना नाही...

आणि दुसरी गोष्ट,,,बाईला जर तिच्या घरात तिच्या हक्काची जागा मिळाली नाही ना तर आयुष्य गेलं तरी ती त्या घराला आपलं समजु शकत नाही.तेव्हा सुखदाला तिच्या हक्काची जागा मनात नाहीतर नाही किमान तुझ्या घरात,तुझ्या खोलीत तरी दे.

सुहास- ती बोलली का तुला काही?

वेणूताई- छे रेऽऽ! ती कसली बोलतीय.पण तीला सकाळी डोळे टिपताना बघितलेय मी.तिच्या मनाला हेच वाटत असणार की तिच्या सगळ्या जुन्या जखमांवर पांघरूण घालुन ती ह्या घरात आली पण तिला ह्या घरात अजुनही तिच्या हक्काचा एक कोपराही मिळाला नाही.साधे कपडे ठेवायलाही जागा नसावी ह्या घरात..

काय वाटले असेल तिला???

हे मी समजु शकते.तेव्हा अशी चुक पुन्हा करू नकोस.ती तुझा संसार चालवायला ह्या घरात आलीय तर तिला तुझ्या खोलीचाही ताबा दे..

सुहास- आई माझे चुकले.पण हे मी मुद्दाम नाही केले.संपदा गेल्यावर रात्र रात्र तिच्या आठवणींनी वेडा होत कपाटातल्या तिच्या साड्या,वस्तु उराशी कवटाळुन ना मी त्या आठवणीत तिला शोधायचो पण एका पॉईंटवर लक्षात आले की अशाने मी वेडा होईन.मला स्वत:ला सावरायला हवे.म्हणुन मग तेव्हाच निग्रहाने त्या कपाटाला

लॉक घातले.तिच्या आठवणींपासुन दूर करण्यासाठी केलेली कृती होती गं ती.

ह्यात सुखदाला हर्ट करण्याचा माझा मुळीच मानस नव्हता.पण अनवधानाने का होईना माझ्यामुळे दुखावलीय ती.मी माझी चूक नक्की सुधारेन.

थँक्यु आईऽऽऽ.तु वेळीच माझी चूक दाखवुन दिलीस..

त्याने आईचा हात हातात घेऊन त्या सुरकुतल्या हातांवर आपले ओठ टेकवुन हलकेच त्याचे चुंबन घेतले.त्या प्रेमळ स्पर्शाने वेणूताईपण भावूक झाल्या.त्याच्या केसात हात फिरवत त्या समजावणीच्या सुरात म्हणाल्या,

वेणूताई- हे बघ आता आपल्यात काय बोलणे झाले हे तिला सांगू नकोस.तिला स्वत:हून कपाटाची चावी दे सकाळी.

म्हणजे काही न बोलता प्रश्न सुटेल आणि तिच्या मनात चुकुन काही गैरसमज उत्पन्न झाला असेल तर तोही आपोआप दूर होईल.

काय कळतेय काऽऽमी काय बोलतेय!!!"

सुहास- हो आईऽऽ कळले.नाही बोलत तिला ह्यातले काही…

वेणूताई- हम्मऽऽ बरऽऽ जा आता.उशीर झालाय खूप.उद्या पुन्हा ऑफीस असेल ना?जा वेळेत नीज."

बोलणे संपले तसे सुहासही आपल्या रूममधे आदिच्या बाजुला बेडवर येऊन झोपला.

एका कुशीवर वळुन खाली गादी अंथरून झाेपलेल्या सुखदाचा चेहरा तो बेडवरूनच न्याहाळु लागला.

तिचा तो जीजा इतकाच निरागस चेहरा बघुन क्षणभर त्याला तिच्याबद्दल माया उत्पन्न झाली.

खरच आई म्हणाली ते किती बरोबर आहे.

सुखदाच्या बाजुने मी ह्या नात्याचा कधी विचारच केला नाही.तिच्या आधीच्या लग्नानेही तिला सुख दिले नाही आणि ह्या नात्यानेही तिच्या वाट्याला फक्त आणि फक्त जवाबदाऱ्याच आल्या.काय मिळाले तिला हे लग्न करून???

त्यात ह्या घरात तिची जागा फक्त उपऱ्याची आहे असे वाटले तर हा किती मोठा अन्याय होईल तिच्यावर..!

नाही नाहीऽऽ हे तिचेही घर आहे.तिलाही ह्या घरात माझ्या एवढेच हक्क आणि अधिकार आहेत.ह्याची तिला जाणीव करून द्यायला हवी.निदान काही नाही तर एवढे तर मी तिच्याकरता नक्कीच करू शकतो..

विचारांच्या नादात झोपेने कधी ताबा घेतला समजलेच नाही.

सकाळी सुखदाच्या जोरजोरात हाका मारण्याने त्याची झोप चाळवली.सकाळचे सहा काही वाजले असतील. सुखदा वेणूमावशींना सुहासच्या बेडरूमच्या अटॅच्ड बाथरूममधुन दरवाजा किलकीला उघडून हाका मारत होती.पण दरवाजा बंद असल्याने त्यांना आवाज जात नव्हता.

मग सुहासच बेडवरून डोळे चोळत उठला.

झोपेच्या डोळ्यातच त्याने सुखदाला विचारले,

सुहास- काय गं,आईला का हाक मारतेस इतक्या काय झाले?

सुखदा आपल्यामुळे ह्याची झोपमोड झाली म्हणुन मनातुन चपापलेली थोडीशी चाचरतच म्हणाली,

सुखदा- सॉरीऽऽ सुहास तुझी झोपमोड झाली पण जरा वेणूमावशींना बोलाव नां,अर्जंट आहे.

सुहास(थोडा भांबावुन)- अगं आता मी उठलोय नाऽऽ मलाच सांग काही हवेय का तुला?

त्यावर किंचीत विचारात ह्याला कसे सांगु ह्या द्विधा मन:स्थितीत 

सुखदा- आता कसे सांगुऽऽऽ,तु प्लिज वेणूमावशींनाच बोलव ना."

वैतागुनच सुहास आईला बघायला जातो.वेणूताई कुठेच दिसत नाहीत हे पाहून तो परत येत

सुहास- मी बघुन आलो पण आई कुठेच दिसत नाहीये कदाचित वॉशरूममधे असेल मला सांग काय काम आहे मी करतो.

त्यावर नाईलाजाने तिला सांगावे लागते.

सुखदा(थोडीशी चाचरतच)- अरे वेणूमावशींच्या खोलीत माझ्या बॅग्ज आहेत दोन,त्यातल्या ब्लु कलरच्या बॅगमधे माझे सॅनिटरी नॅपकीन्स आहेत ते हवे होते..

आत्ता त्याला कळतं की ती इतकी आढेवेढे का घेत होती.तिचे पिरिएड्स सुरू झाले होते बहुतेक.

त्याला काहीतरी आठवले तसे त्याने बेडखाली हात घालुन चावी काढली आणि संपदाचा वॉर्डरोब उघडला.कपटाचा आवाज ऐकुन ती पुन्हा म्हणाली," अरे माझे सामान इथे नाहीये वेणूमावशींच्या खोलीत आहे तिकडुन आण ना पटकन..

तिला कळत नव्हते इतके सांगुनही हा इकडे काय खुडबुड करतोय.हा झोपेत तर नाहीये ना अजुन.

त्यावर सुहास जरा आवाज चढवुन बोलला,

सुहास- अगं मीऽ एेकलेयऽऽऽ.तु काय सांगीतलेस ... जरा गप्प बसतेस का?मी तुझेच काम करतोय थांब जरा.

कपाटातुन सॅनिटरी पॅड्सचे एक पॅकेट तिच्या हातात देत तो बोलला.,

सुहास- हंम्ऽऽऽहे घे.जायच्याआधी आठवड्यापुर्वीच संपदाने वर्षाचा स्टॉक आणुन ठेवला होता.कुणाला माहित होते असे काही होईल?"

त्याचा आवाज घोगरा झाला नकळत.

ती बाथरूममधुन बाहेर येऊन बेडच्या साईड कॉर्नरवर जराशी टेकली.

तिची कंबर दुखत होती पण आदिसाठी तिला काम करावेच लागणार होते.

कंबरेवर हात ठेवुन डोळे मिटुन ती दोन मिनीट तशीच बसुन राहीली.

सुहासचा आवाज ऐकुन ती भानावर आली.

सुहास- हे बघ तु आता काही करायला जाऊ नकोस आराम कर.मी बघतो आदिचं सगळं.आणि होऽऽ काहीतरी आठवल्यासारखे करत तो म्हणाला ही ह्या वॉर्डरोबची चावी.तुझे सगळे सामान ह्यातच ठेव आता.माझ्या लक्षातच नव्हते की मी संपदा गेल्यावर कपाट लॉक करून ठेवलेय ते..तुझी गैरसोय झाली नाऽऽ त्यामुळे!!सॉरीऽऽ डिअर…!

अपराधीपणानेच चावी देत तिला थोडक्यात सगळी सफाई देऊन तो मोकळा झाला.

त्याने आदिला उठवले.त्याचे ब्रश,आंघोळ उरके पर्यंत दूध बनवुन ठेवले.आज आदिला मऊ भाता ऐेेेवजी दूध-ब्रेड खाऊ घातले सुहासने.

तोवर वेणूमावशींनी पटकन दोन पोळी-जामचे रोल बनवुन डबा भरला.सुखाईला बाय म्हणतच तो बाहेर पडला.सुहासने त्याला शाळेत नेऊन सोडले.

सुखदा मात्र स्तिमित होऊन सुहासकडे बघत होती.ती त्याच्याच विचारात गुरफटली पुन्हा.

सकाळपासुन सुहासने माझी किती काळजी घेतली.त्याला काही न बोलताही कसे कळले की मला बरे वाटत नाहीये.किती पटकन सगळ्या गोष्टी बिनबोभाट करूनही टाकल्या.

आणि मी उगीचच त्याच्याविषयी किती गैरसमज करून घेतले काल.

मी समजते तसा सुहास नाहीये.मी किती चुकले ना त्याला ओळखण्यात.

जसा तो मला समजुन घेतोय तसेच मलाही त्याला,त्याच्या मानसिक अवस्थेला समजुन घ्यायला हवे.त्याला खरच मुलांइतकीच कोणाच्यातरी मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आधार मी त्याला देणार... नक्की.

समोरच लटकलेल्या सपुताईच्या फोटोकडे बघत सुखदा म्हणाली, "सपुताई,नको काळजी करूस तुझ्या हँडसम नवऱ्याची.ही जवाबदारी तु माझ्यावर सोडुन गेलीएस ना? मग आता निश्चिंत हो आणि बघ मी तुझ्या नवऱ्याला कसे पुन्हा हसरे बनवते.This is a promise to you Saputai...love you! "

आपल्या डोळ्यातले थेंब पुसत तिने संपदाला एक फ्लाईंग कीस दिला आणि जीजाला बेडवर सरकवुन स्वत:ही तिच्या बाजुलाच झोपी गेली.

----------------------(क्रमश:10)--------------------------

(क्रमश:10)

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी…

कथानक जसजसे पुढे सरकतेय छोट्या-छोट्या प्रसंगातुन तुम्ही बघतच असाल की सुखदा आणि सुहासचे नाते हळुहळु फुलतेय.ते एकमेकांना हळुहळु समजुन घेताएत.

एकमेकांसाठी त्यांच्या मनात जागा निर्माण होतेय.

माणुस कधीच वाईट नसतो,वाईट असते ती वेळ ज्यामुळे गैरसमज घडतात.पण वेळीच त्याला दूर केले तर नाती किती गोड होऊ शकतात हे आजच्या भागात तुम्हाला दिसले असेल.

आता ह्या दोघांमधील हे नाते असेच हळुवार पुढे सरकत सरकत एका पॉईंटला ते एकमेकांना अॅक्सेप्ट करतील का??काय वाटते तुम्हाला??

ते नक्की सांगा.

आजचा भाग कसा वाटला? 

तेही कमेंट्सद्वार् नक्की सांगा.

हि कथा आवडल्यास माझ्या ब्लॉगला नक्की फॉलो करा.

(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नवासहीत कथा कुठेही शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all