फिरूनी नवी जन्मेन मी अंतिम भाग - 23

लग्नानंतर फुललेल्या प्रेमाची सुंदर नवी पहाट म्हणजे फिरूनी नवी...... ....... कथा.

फिरूनी नवी जन्मेन मी 

अंतिम भाग-23

©®राधिका कुलकर्णी.

सकाळची प्रसन्न वेळ.कालची झोप पूर्ण झाल्याने आज नेहमीपेक्षा लवकरच जाग आली सुखदाला.आपल्या प्रशस्त काचेतुन दिसणाऱ्या विस्तीर्ण लांबच लांब पसरलेल्या त्या रत्नाकराच्या भाळी कुणीतरी कुंकूम तिलक करावा तसा सूर्याचा तो लाल गोळा दिसत होता.तिचे हात नकळत जोडले गेले त्या दिनकर आणि रत्नाकराच्या जोडीला.

जरावेळ त्या दृश्याला डाेळ्यात साठवुन ती आपल्या कामाला लागली.आज निघायचे होते.तिने आवरायला घेतले.नलुमावशींकडे जायचेय हे लक्षात ठेवुन त्याप्रमाणे एक छानशी साडी नेसायला वर काढुन अतिरिक्त वर पसरलेले सामान तिने व्यवस्थित बॅगमधे पॅक केले.

तिने पटकन स्वत:चे सर्व उरकुन सुहासला उठवले.सुहासही कुठलेही आढेवेढे न घेताच साळसुद मुलाप्रमाणे पटकन उठुन आपले सगळे आवरायला गेला.रोजच्या त्याच्या खोडसाळपणाची सवय झालेली सुखदा आज मात्र तसे काही न घडल्याने त्याच्या त्या खोड्या आणि सहेतुक केलेल्या शाब्दिक कोट्यांना मिस करत होती.परत सगळे प्रसंग आठवुन स्वत:शीच लाजत होती.

तिच्या मनात ह्या सगळ्या विचारांची शृंखला चित्रपट पहावा तसे डोळ्यांपुढून सरकत असतानाच सुहास तयार होऊन बाहेर आला.

साधारण सकाळचे नऊ वाजलेले.

जरा लवकरच आटोपलेय आता पुन्हा त्याचा फायदा घेऊन सुहासने काही नविन बदमाशी न करो अशी नकोशी तरीही हवीहवीशी वाटणारी शंका तिच्या मनात येऊन गेली.

वरकरणी ती शांतपणे मेसेजेस चेक करतेय असे भासवत मोबाईल स्क्रीनमधे बघत राहीली.

सुहास पटकन आवरून खाली जाऊन येतो बोलला तसे तिला आठवले त्यांचा ब्रेकफास्टही राहीला होता.मग दोघेही बरोबरच खाली गेले.

सुखदा ब्रेकफास्ट करेपर्यंत तो काऊंटरवर जाऊन बिल सेटल करून त्यांच्या सर्व पेमेंटच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या.

निघताना ह्या सगळ्यामुळे उशीर व्हायला नको होता त्याला.जितके लवकर शक्य होईल तितके लवकर निघायचा त्याचा विचार होता.

पेमेंट उरकुन त्यानेही ब्रेकफास्ट उरकला.

चेकआऊट करण्याआधी सगळी रूम व्यवस्थित चेक करून सुहास खाली आला.हॉटेल स्टाफने सर्व सामान व्यवस्थित कारच्या बूटमधे ठेवले.त्याने एक चांगला रिव्ह्यु देऊन मॅनेजरला जाताजाता खुष करतच गाडी स्टार्ट केली.

सकाळची प्रसन्न वेळ.हवेत मस्त गारवा.त्या आल्हाददायक वातावरणात त्यांच्या प्रवासाची सुरवात झाली.

साधारण तासभरातच ते सावंतवाडी बॉर्डर टच केले.एकदा लग्न घरी पोहोचले की पुन्हा त्यांना कुठेही फिरायला मिळणार नाही हे जाणून सुहासने गाडी तिथुनच जवळच्या अंबोली घाटाकडे वळवली.अंबोली घाटातला वॉटरफॉल म्हणजे भारतातल्या सगळ्यात चांगल्या हिलस्टेशन्स आणि सिनिक ब्युटीसाठी प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणुन गणले जाते.मग इतक्या जवळ येऊनही त्याचे दर्शन न घेता जाणे म्हणजे शुद्ध वेडेपणा ठरला असता.

आता त्यांची कार अंबोली घाटातुन जाऊ लागली.अतिशय शांत,रमणीय,जंगल झाडीने वेढलेल्या वळणांच्या रस्त्यावरून जाताना सहजच सुहासच्या मनात आले.शाळेत असताना इंग्रजीच्या पाठ्यक्रमात एक कविता होती

"Stopping by woods on a snowy Evening" कवी रॉबर्ट फ्रॉस्ट ह्यांच्या कवीतेतल्या काही ओळी त्याला आठवल्या…

कवितेच्या शेवटच्या ओळी अशा होत्या.

The woods are lovely dark and deep.

But I have promises to keep,

And miles to go before I sleep,

And miles to go before I sleep.

अगदी ह्या कवितेतील वर्णनाप्रमाणेच अंबोली घाटाचे वर्णन वाटले सुहासला…

नक्की रॉबर्ट फ्रॉस्टने अमेरीकेहुन भारतातल्या अंबोलीला एकदातरी व्हिजीट केली असणार असेही त्याला उपहासात्मकरित्या वाटुन गेले…

विचारांच्या नादातच दोघेही अंबोलीच्या वॉटरफॉलला पोहोचले.रस्त्याच्या साईडला गाडी पार्क करून त्यांनी दुरूनच त्या वॉटरफॉलचे विहंगम दृष्य मनात साठवुन घेतले.नुकताच पावसाळा संपुन आता ऑक्टोबरचा महिना चालू असल्याने तिथली सृष्टी पावसाळ्या नंतरच्या नव्हाळीने आपले सौंदर्य सर्वत्र मुक्त हस्ताने उधळत होती.ती हिरवाई आणि कड्यांवरून पडणारे ते पांढरे स्वच्छ दुधाळ पाणी डोळ्याचे पारणे फेडत होते..

कितीही ईच्छा असली तरी आता बदलायला कपड्यांचा सेट वर काढुन ठेवलेला नसल्याने पाण्यात मनसोक्त डुंबायचा मोह त्यांनी आवरता घेत तिथल्या सृष्टीसौदर्याला मनात आणि फोटोत कॅप्चर करत जवळपास तासभराने ते परतीच्या मार्गाला निघाले.तिथुन सावंतवाडी अवघ्या दहा पंधरा किमी अंतरावर होते.मधुन मधुन पमा दादाचा कुठे पोहोचला असा चौकशीचा फोन येतच होता.त्यामुळे किमान जेवणाच्या वेळपर्यंत तरी घरी पोहोचावे ह्या उद्देशाने त्याने कार सावंतवाडीच्या रस्त्याने फिरवली.

शहराच्या मधोमध असलेल्या मोती तलावाने 

सावंतवाडीत प्रवेश झाल्याची लगेच वर्दी दिली.पत्ता गुगलमॅपवर टाकुन कोळगाव दरवाजा ओलांडताच कौलारू शाकारलेली घरे आपल्या वेगळेपणाची साक्ष देवु लागले.सगळीकडे हिरवीगार अंबा फणस चिक्कुची झाडे.नारळी पाेफळीची डौलाने हवेत डोलणारी झाडे स्वत:कडे लक्ष वेधुन घेत होते.

ह्या सगळ्या सृष्टीसौदर्याला बघतच ते नलुमावशींच्या प्रशस्त वाडारूपी घराशी येऊन पोहोचले.वाडा जरी जूना असला तरी आता नव्या गरजांप्रमाणे काही नवे बदलही केलेले दिसत होते.पण काही गोष्टी मात्र तशाच होत्या ज्या सुहासला त्याच्या बालपणात घेऊन गेल्या.

वाडा,वाड्याच्या समोर मोठ्ठे छान शेणाने स्वच्छ सारवलेले अंगण.अंगणात एक लहान तोंडाची रहाट लावलेली विहीर.तिथेच बाहेरून आलेल्यांना हातपाय धुवायची सोय केलेली.मग पडवी..तिथे बसायला केलेले कट्टे.पडवीच्या पुढे माजघर.माजघराला लागुनच मोठ्ठेच्या मोठ्ठे स्वयंपाकघर.त्याला लागुनच देवघर.देवघरालाच आतल्या बाजूने छोटा दरवाजा जिथे सोवळ्याची खोली.इथे फक्त सोवळ्याचे वर्षभराचे सर्व जिन्नस साठवुन ठेवलेले असत.

आणि मग स्वयंपाकखोलीच्या दुसऱ्या बाजुने अशाच एक दोन छोट्या छोट्या खोल्या.

पै पाहुणा अवचित आला तर त्याची व्यवस्था इकडे केली जाई.

स्वयंपाकखोलीच्या पुढे दुसऱ्या बाजुने एक दरवाजा परसदारी उघडे.परस म्हणजे मागचे आंगण.मागच्या आंगणात मधोमध मोठे तुळशी वृंदावन.त्याला खाली दिवा ठेवायला कोनाडा. बाकीच्या जागेत मस्त छानशी छोटीशी बाग फुलवलेली.इतर अंबा फणस पपई ह्या झाडांबरोबरच वेगवेगळ्या वेलींची फुलझाडे.मोगरा,जाई,जूई,शेवंती,गुलाबाच्या व्हराईटी,बारमाही कुठेही उगवणारी कोऱ्हांटी,अबोली.इकडच्या अबोलीच्या फुलाचा आकारही आपल्या फुलापेक्षा जरा मोठा आणि रंगही नॉर्मल फूलांपेक्षा जास्त गडद असायचा.

तसेच काही वेली भाज्यांचे ताटवेही दिसत होते.कारले,दोडके,घोसाळे,वांगी डोलताना दिसत होते.

शहरातल्या सिमेंट संस्कृतीतुन अचानकपणे निसर्गाच्या इतक्या निकट फळा/फुलांच्या छायेत नीटनेटकेपणाने सजवलेले साधे पण स्वच्छ प्रसन्न घर पाहून सुखदाला मनातुन खूपच आनंद झाला.सगळ्यांना प्रथमच भेटत असल्याने थोडी बुजलेलीच होती सुखदा.पण नलुमावशींनी प्रेमाने मारलेल्या गोड मिठीने क्षणातच तिच्या मनातला दूरावा दूर झाला.

आता ती ही त्यांच्यात मिसळली.जेवणाची तयारी झालेलीच होती.सगळ्यांसाठी माजघरातच भारतीय बैठकीची पंगत मांडलेली होती.

त्यांच्या बरोबर अजुनही काही लोक लग्नघरचे वऱ्हाडी पाहुणे जेवायला होते.

नलुताईंनी दोघांनाही जेवण झाले की त्यांच्या खोलीत बोलावले.

दोघेही मावशींच्या खोलीत गेले.

इकडच्या तिकडच्या गप्पा,जुजबी चौकशा आटोपल्या तशा त्या मूळ विषयावर आल्या.जसा पमा तसाच सुहास ह्या नात्याने सुहासलाही लग्नाबद्दल काय काय ठरले कोण लोक आहेत मुलीकडचे.लग्न कसे जमले.ह्याबाबतीतली सगळी माहिती त्यांनी इथ्यंभूत कथन केली.

बहूतेक मावशीच्या सांगण्याप्रमाणे वरूण आणि आर्या म्हणजेच वरूणची होणारी बायको एकमेकांना कॉलेजपासुनच ओळखत होते.म्हणजे जवळपास हे लव्ह कम अॅरेंज मॅरेजच होते म्हणायला हरकत नव्हती.

मावशींनीच पुढाकार घेऊन हे लग्न जुळवुन आणले होते.सुखदाला नवल वाटले हे ऐकुन. कितीही जून्या विचारांना मानणारे असल्या तरी मावशी आपल्या नातवाचे लग्न स्वत: त्याच्या पसंतीने करून देण्याचा पुरोगामी दृष्टीकोनही बाळगून होत्या हे खरचच कौतुकास्पद होते.ह्या बाबतीत दोघी बहिणींमधे  किती साम्य होते नाही..!!!

सुखदाच्या मनात हे सगळे विचार तरळुन गेले तसे नकळत तिच्या मनात नलूमावशींबद्दलच्या प्रेमाची जागा आदराने घेतली.

तिला त्यांच्या विषयीचा आदर पहिल्यापेक्षा अधिकच वाढला.

       ~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळी सीमांत पुजन होते.कार्यालयही जवळच होते.दोघांचेही नातेगोते सावंतवाडीतच असल्याने उशीर वगैरे होण्याचा प्रश्नच नव्हता.तशी ही लोकं खूप वक्तशीर असतात.खूप भपका वगैरे करण्यापेक्षा रितीरिवाजांना प्राधान्य देणारी असल्याने शहरी गोंगाट उगीचच लाऊड म्युझिक,ते नाचगाणे

आणि नसलेल्या ओढून ताणुन इतरांची नक्कल करत केलेल्या संगीत वगैरे विधींचे फालतु स्तोम इकडे नसणार होते.हाताखाली भरपूर माणूसबळ असल्याने तसे काही फार काम नव्हते तिकडे.

जेवणे झाल्यावर पडवीतच लवंडण्यासाठी सतरंजी अंथरलेली होती.गाद्या लोडही येऊन पडले होते.जो तो गरजेनुसार गादी किंवा मग सतरंजीवरच अंग टेकत होता.

सुहास ड्राईव्ह करून थकला होता त्यात मस्त कोकणी चवीचे ते चविष्ट जेवण पोटात पडल्यावर त्याला ग्लानी येऊ लागली.तसा तो बाहेरच्या पडवीत जाऊन पडला.सुहास गेला तसे नलुमावशी सुखदाच्या अधिक जवळ सरकत विचारल्या 

नलुमावशी - काय गो बायऽऽ खुष असास नाऽऽ सुहास बरोबर???

त्यावर लाजुनच सुखदानेही होकार भरला.

तिच्या लाजण्यातच सारे काही आले. नलुमावशींच्या अनुभवी चाणाक्ष नजरेला ह्याशिवाय आणखी कुठल्या पुराव्याची काही गरज नव्हतीच.

त्यांनी नंतर कोणतेही प्रश्न विचारून तिला उगीच अजुन अडचणीत टाकले नाही.

त्यांनी हळुच त्यांच्या ट्रंकेमधुन एक पितळी कडीचा गोल पेढा घाटाचा डबा काढला.

डब्याच्या त्या एकंदर रचनेवरूनच कळत होते की हा कमीतकमी चाळीस पन्नास वर्ष किंवा त्याहुनही जूना डबा असावा.त्यांनी त्याची कडी उघडली.एका लालसर कापडात काही दागिने व्यवस्थित गुंडाळुन ठेवले होते.

त्यांनी ते दागिने बाहेर काढले आणि तिला दाखवले.नव्या होणाऱ्या नातसुनेकरता केलेले दागिने त्या कौतुकाने सुखदाला दाखवत होत्या.नव्या पिढीची आवड लक्षात घेऊन बहुतेक तिच्या पसंतीनेच हे दागिने घडवले होते.

सुखदाला खूपच कौतुक वाटले.त्या अतिशय व्यवहाराने आजही घरातल्या बरीक सारीक गोष्टीत किती बारकाईने लक्ष घालत होत्या वयाच्या पंच्याएैशीव्या वयालाही त्यांची बुद्धी किती जागरूक होती तिला खरचच कौतुक वाटले.

आता त्या कापडाखाली झाकलेली अजुन एक पोटली होती.नलुमावशींनी हलकेच ती दुसरी पोटली उघडून सुखदा समोर ठेवली.

नलुमावशी - हे बघ..ह्याची घडणावळ बघ.कसे वाटताहेत???

नलुमावशींनी त्यातल्या दागिन्यांना दाखवत सुखदाला प्रश्न केला.

दागिन्यांची डिझाईन जुन्या पद्धतीची तरीही खूपच सुरेख होती.विशेषत:त्यातली चींचपेटी तर कमालीची सुंदर होती.तिने सगळे दागिने पाहुन खूप छान आहेत सांगुन कौतुकही केले.

त्यावर नलुमावशींनी विचारले.

नलुमावशी - तुला ह्यातला कोणता दागिना आवडला सांग?

का एक पण पसंतीस उतरला नाहीऽऽ??

उगीच म्हातारीचे मन राखायला छान छान म्हणतीएस नाऽऽ??.

नलुमावशींनी मिश्किलपणे कोपरखळी मारली तसे ती लगेच म्हणाली.

सुखदा - अहोऽऽ नाही होऽऽ.मनापासुनच सांगितले. खरच खूप छान आहेत.जुन्या वेळची बातच अलग..आता अशी घडणावळ पहायलाही मिळत नाही.त्यातल्या त्यात ही चींचपेटी तर खूपच सुरेख आहे..

पण का विचारलेत?कुणाचे आहेत हे?

नलुमावशी - अगंऽऽ हे माझ्या लग्नातले दागिने आहेत.आता वय झालं.त्याचे वजनही सोसवत नाही आणि पमाचे वडील गेल्यावर घालणेही बंदच झाले.पमाच्या बायकोला तिच्या लग्नात ह्यातलाच एक चपलाहार दिला तिला आवडला म्हणुन.आता तुही माझी सूनच लग्नानंतर पहिल्यांदा आलीस.आता तूला ह्यातला हवा तो दागिना निवड.

ते एेकताच सुखदा भारावुन दिङ:मुढ झाली.

किती ते दातृत्व…!!!

तिचे डोळे पाणावले ते अलोट प्रेम आणि माया बघुन..कोकणातली लोकं मनानी खूप मोठी असतात हे ऐकुन माहीत होते आज त्याची प्रचितीही तिला ह्याची डोळा ह्याची देही अनुभवायला मिळत होती.

तरी त्या घे म्हणाल्या की लगेच हपाप्यासारखे घेणे तिला बरे दिसले नाही.म्हणुन ती म्हणाली.

सुखदा - अहोऽऽ मावशी ह्या सगळ्याची काय गरज आहे.तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सतत राहू देत तेवढेच पुरे आहे आम्हाला.

त्यावर नलुमावशी जराशा रागाचा आव आणुन म्हणाल्या 

नलुमावशी - म्हणजे हे दागिने आवडले नाहीएत तर…...मग तसं सांगायचं की गं पोरीऽऽऽ.

तुम्ही शहराकडच्या पोरींना हे जुनाट दागिने कसे आवडणार???

मी आशीर्वाद म्हणुनच देत होते होऽऽऽ.आता ह्या वयात बाहेर जाणे होत नाही म्हणुन ह्यातलाच एखादा तुला द्यावा लग्नाची भेट म्हणुन असा विचार केला पण…….

नलुमावशी थोड्या भावूक झाल्या. 

सुखदालाही त्यांचे मन दुखावल्याचे वाईट वाटले.ती लगेच पवित्रा बदलत म्हणाली.

सुखदा - मावशी तुम्हाला खरं सांगुऽऽऽ ही चींचपेटी मला फाऽऽऽर म्हणजे फारचऽऽ आवडलीय.

सगळेच दागिने सुरेख आहेत पण माझ्याकडे हा प्रकार नाहीये.

आता नलुमावशींची कळी खुलली.

नलुमावशी(चींचपेटी तिच्या हाती देत) - मग ही घे.तुला ठेव माझी आठवण म्हणुन.आणि होऽऽऽ आजच्या सीमांत-पुजनाला हाच दागिना घाल. मला बघु दे कसा दिसतोय तुझ्या गळ्यात..!!

आता बोलण्यासारखे काही शिल्लकच नव्हते तिने निमुटपणे तो घेतला आणि बाहेर आली.

     ~~~~~~~~~~~~~~~~~

संध्याकाळ झाली तसे सगळेच कार्यालयात जायच्या तयारीला लागले.गडद जांभळ्या रंगाची रेशमी साडी त्यावर मरून कलरच्या बुट्ट्या आणि तसाच भरजरी वेलबुट्ट्यांनी भरलेला पदर.ती छान तयार होऊन त्यावर नलुमावशींची चींचपेटी,कानात छानसे झुबे घालुन तयार झाली.

त्यावर साजेसा हलकासा मेकअप,साडीच्या किनारीला शोभणारी मरून कलरची लिपस्टीक,अंबाडा,त्यावर घरच्या अबोली मोगऱ्याचा मिक्स गजरा आणि शेवटी ट्यूलीप फ्लेवरचे मस्त परफ्यूम फवारून सगळे नीट आवरलेय ह्याची खात्री होताच ती खाली आली.नलुमावशींसमोर जाऊन उभी राहीली तशा त्या स्तिमित होऊन तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पहात राहील्या.

आपले हात मायेने तिच्या चेहऱ्यावरून फिरवुन तसेच ते कडाकडा कानशीलावर मोडले.माझ्या लेकीला कुणाची नजर न लागो असे म्हणुन तोंड भरून आशीर्वादही दिला.सुहासही तिला बघताच घायाळ झाला.त्याच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला.

इतक्या गर्दीत तिला काही जाऊन बोलणे बरे नसते दिसले म्हणुन त्याने वॉट्सअॅप मेसेज केले.

Hi gorgeous!!!! Looking very pretty.. वरती खोलीत जायचे का??? 

आणि त्यापुढे दोन तीन डोळे मारणारे खट्याळ ईमोजीज् टाकले.

तिने मेसेज वाचुन दूरूनच त्याच्याकडे पाहिले तसे त्याने तिकडुनच तिला डोळा मारून फ्लाईंग कीस तिच्या दिशेने भिरकावला..

त्याची ही सगळी कृती पाहुन सुखदा लाजेने गोरीमोरी झाली.चारचौघात त्याला हे असे बरे जमते.मनातल्या मनात विचार करूनच ती पुन्हा लाजली.

         ~~~~~~~~~~~~~~~~

सीमांत पुजनाचा कार्यक्रम वेळेतच उरकला.कार्यक्रम खूप छान आटोपशीर झाला.

जेवणही सुरेख होते.

आता सगळी निरवानिरवी होत होती.बहुतेक वऱ्हाडी कार्यालयातच मुक्कामी थांबणार होते.त्यानिमित्त गप्पाष्टकांना ऊत येणार होता.म्हणुन दूरून खूप दिवसांनी भेटलेली मंडळी आपापली कोंडाळी करून कार्यालतच जागा पकडुन निजायची तयारी करत होती.

सुहासने हळुच सुखदाला मेसेज केला.

सुहासचा मेसेज - आपण घरी जाऊ झोपायला.मावशीने विचारले तर तुही तेच सांग.

सुखदाला तसेही फार कुणाची ओळख नव्हती.नवऱ्या मुलाची आई म्हणुन पमादादा आणि वहिनी कार्यालयातच राहणार होत्या.मग ती हळुच नलुमावशींकडे जाऊन म्हणाली.

सुखदा - नलुमावशी तुम्ही रात्री घरी जाणार आहात का???

जर तुम्ही जाणार असाल तर मीही घरीच येईन.मला कार्यालयात झोप नाही येणार.

तशा नलुमावशीही गालातल्या गालात हसत बरं म्हणाल्या.सगळ्यांशी गप्पा उरकुन सुहास सुखदा आणि मावशी घरी आल्या.लग्नाचे घर.घरीही कोणीतरी मुक्कामी रहायला हवे म्हणुन नलुताई तसेही घरी येणारच होत्या.आता हे दोघेही आले त्यांना जरा बरे वाटले.

सगळे घर आता रीकामे होते.

नलुमावशींनी स्वत:हुनच दोघांना वरच्या माळवदाच्या खोलीत झोपायला जा सांगितले तसे सुहास खुष झाला.सुखदाच्या पोटात फुलपाखरे गुदगुल्या करू लागली.

उद्या लवकरचा मुहूर्त आहे तेव्हा सकाळी लवकर उठावे लागणार आहे त्यामुळे आता लवकर निजा असे सुतोवाच करत नलुताई आपल्या खोलीत गेल्या.पाण्याची एक लोटी भरून सुखदाही सुहास सोबत वर आली.

वर आल्याबरोबर सुहासने सुखदाला आपल्या कवेत घेतले.

सुहास - किती वेळचा तडफडत होतो गंऽऽ तुला कवेत घ्यायला.कसली काटाऽऽ दिसत होतीस...कधी एकदा तुला जवळुन बघतो असे झाले होते.

सुहास वेड्यासारखा तिला मिठीत घेऊन बोलत होता.

सुखदाही क्षणोक्षणी त्याच्या स्पर्शाने आणि कौतुकाने रोमांचित होत होती.

सुहासने हलकेच तिच्या ओठांचे चुंबन घेत तिला म्हणाला.

सुहास - सुखदा ही आजची शेवटची रात्र असेल जी आपल्याला एकांतात उपभोगायला मिळतेय.माझी एक शेवटची ईच्छा पूर्ण करशील प्लिजऽऽऽऽ…

सुखदा(संभ्रमित होऊन) - काय….!!

सुहासने काही न बोलता एक बॉक्स तिच्या हाती देत बोलला.

हे घालुन येशील आज रात्री?!!!!

सुहासने सुखदाला आणलेले सर्वच ड्रेस तिने घातले होते मग ह्या ड्रेस करता इतकी अार्जवं विनंती का??.सहजच तिच्या मनात प्रश्न डोकावला.

तसे तिने त्याला विचारले

सुखदा - तु दिले आणि मी नाही म्हणलेय असे झालेय का? मग आताच इतकी अजिजी का!!!

सुहास(थोडासा चाचरत) - तु आधी बॉक्स उघडून बघ तरीऽऽ…

तिने हलकेच बॉक्स उघडला.त्यात सुंदरसा नेटेड अत्यंत झीरझीरीत लाल रंगाचा थ्री-पीस नाईट वेअर होता.तिन पैकी दोन अंतर्वस्त्र आणि तिसरा फक्त मांड्यांपर्यतचा पुढून ओपन असा ओव्हरकोट. एकंदर चित्तवृत्ती फुलवणारा नितांत सेक्सी नाईटवेअरचा प्रकार बघुन ती चपापली..त्याला काय उत्तर द्यावे तिला कळेना.खूप लाजही वाटत होती.ती काहीच बोलत नाही पाहुन सुहासने तिला मागून मिठी मारत आपले ओठ तिच्या मानेवर टेकवत म्हणाला

सुहास - मला फक्त एकदा तुला ह्या वेषात बघायचेय.माझी फॅन्टसी समज हवं तरऽऽ..पण प्लिज एकदा माझी ही एवढी ईच्छा पूर्ण कर..

करशील नाऽऽ..

त्याचे मानेवर ओठ टेकवुन बोलताना ओठांच्या होणाऱ्या स्पर्शाने ती आधीच उत्तेजीत झाली होती.डोळे मिटुन ती फक्त त्या स्पर्शाचा आनंद घेत होती.पती म्हणुन एकदा त्याला समर्पित झाल्यावर त्याच्यापुढे कसली लज्जा.मनाने कौल देताच ती खुषीनेच त्याच्यापासुन दूर झाली.तिच्या लज्जेतच तिचा होकार जाणुन सुहासही खुष झाला...

त्याला खोलीबाहेर पाठवुन तिने त्याने आणलेला थ्री पीस परिधान केला.दाराची कडी उघडल्याची चाहूल लागली तसा सुहास खोलीत शिरला.

सुखदा सुहासकडे पाठ करून पाठमोरी उभी होती.सुहास हलकेच तिच्या जवळ येत पाठिमागुनच तिला आपल्या हाताचा विळखा घातला.त्याच्या स्पर्शाने ती मोहरली.

त्याने तिला पुन्हा आपल्याकडे वळवले तसे तिने चेहरा झाकुन घेतला.सुहास तिला बघुन पुतळा झाला.एखाद्या अजंता वेरूळ लेणीतलं मुर्तीमंत लेणं जीवंत होऊन आपल्या पुढ्यात साक्षात उभे राहिलेय असा त्याला भास झाला.

तो तिच्या जवळ येत गुडघे जमिनीला टेकुन खाली बसला आणि तिच्या नाभीवर आपले ओठ टेकवले.त्या अवचित स्पर्शाने तिच्या अंगांगातुन वीज सळसळत गेली.तिने डोळे मिटुन त्याच्या केसांना धरून त्याला तसेच जखडून ठेवले.

आता दोघेही उत्तेजित झाले.दोघांच्या शरीरात प्रणयज्वर उसळु लागला.

पुन्हा एकदा कौलातुन येणाऱ्या चंद्राला साक्षी ठेवुन ते एकमेकांना समर्पित होत पुढचे कितीतरी तास स्वर्गीय सुखाच्या परमोच्च स्थितीचा आनंद लुटत राहिले.बराच वेळानंतर एकमेकांना तृप्त करत अतीव समाधानात ते निद्रेच्या आधीन झाले………

        ~~~~~~~~~~~~~~~

पहाट झाली तशी कोंबड्याने बांग दिली.दूर कुठेतरी एखाद्या जवळच्या मंदिरातुन भजनाचे सूर कानी पडू लागले.

नलुमावशींनीही खालुनच मारलेली हाक ऐकुन सुखदा हडबडुन जागी झाली.स्वत:ला सुहासच्या  मिठीतुन सोडवत साडी बदलुन ती पटकन खाली गेली.

न्हाणीघरात बंबातले गरम पाणी उपसुन ठेवले होते गड्याने.तिने घाईने जाऊन स्नान उरकले.स्नान केल्या खेरीज चहा पिण्याची प्रथा नव्हती नलुमावशींकडे.

स्नान करून आल्याबरोबर तिला गरमागरम चहा मिळाला.पहाटेची थंडी आणि त्यात लवकर केलेल्या आंघोळीमुळे अंगात भरलेली हुडहूडी जायला चहाची नितांत गरज होती.चहा घेऊन ती पटकन वर गेली.सुहासलाही लवकर आवरायला सांगायचे होते म्हणुन ती त्याला हलवुन जागे करत होती.पण तो अजुनही वेरूळच्या लेणीतच अडकला होता.

आता तिला थोडी मस्करीची लहर आली.आपल्या केसांतल्या ओल्या पाण्याचा शिडकावा करून तिने त्याला जागे केले.थंड पाणी अंगावर पडताच तो पाऊस पडल्यागत खडबडून जागा झाला.

तिला असे सचैल पाहुन तो प्रसन्न हसला.तसे तिने त्याला पटकन अंघोळीला पिटाळले.

सगळ्यांचे सगळे आवरून सातच्या सुमारास तिघेही कार्यालयात पोहोचले.

नऊचा मुहूर्त होता.लग्नातले एक एक विधी उरकत आता मंगलाष्टक सुरू झाले.

मुलामुलीने तदैव लग्नंम सुदिंनम् तदैव वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या.पुढचेही बाकी विधी यथासांग पार पडत होते.सुखदा ते सगळे विधी निरखुन पहात होती.हे सगळे विधी तिच्याही लग्नात झाले होते परंतु त्यावेळी तिला त्याचे फारसे महत्त्व वाटले नसल्याने तिने ते करायचे म्हणुनच केले होते.पण आता जेव्हा प्रत्येक विधीमागचे शास्त्र पुरोहित नविन जोडप्याला समजावुन सांगत होते तेव्हा तिला कळत होते की हे फक्त विधी नसुन हा एक संस्कार आहे.लग्न म्हणजे फक्त समाजमान्य स्त्री-पुरूष  संबंधाची मान्यता इतका साधा प्रकार नसुन त्यामागे किती खोल विचार आहेत हे तिला आज कळत होतं..

ती मन लावुन ते सर्व विधी,त्यामागचे संस्कार नीट समजुन घेत ते मस्त एनजॉय करत होती.शेवटचा झाल देणे हा कार्यक्रम तर डोळ्यात पाणी आणणारा होता...सगळे सोडून एक रोपटे उपटून दुसऱ्या दारी लावण्यासारखे होते नाही का..?

पोषक वातावरण मिळो अथवा ना मिळो तिला त्या मातीशी जुळवुन रूजावेच लागते नव्या जागी..

पण सुखदा मात्र ह्याक्षणी स्वत:ला खूप भाग्यवान समजत होती कारण तिच्याही नकळत तिला ह्या नव्या मातीने किती काय काय दिले होते...नुसत्या विचारांनीच तिच्या डोळ्यात पाणी तरळले…

     ~~~~~~~~~~~~~~~~~

सगळे कार्य यथासांग उरकले तसे नव्या नवरीला घेऊन वाजत गाजत घरी आणले गेले.आता घरात जास्तच लगबग होती.उत्साह होता.नलुमावशींनी मुद्दाम आर्याची जवाबदारी सुखदावर सोपवली कारण आत्ता फक्त सुखदाच तिकडे तिच्या वयाची आणि तिला समजुन घेणारी होती.नव्या नवरीची व्यवस्थित सोय लावुन सगळेच जागा मिळेल तसे लवंडले.मुलाचे लग्न म्हणले की दुसऱ्या दिवशी पासुन बरेच विधी असतात ह्याची कल्पना होतीच सुखदाला.तिने तशी आर्याला अगोदरच कल्पना देऊन ठेवली.दोघींची लगेचच छान मैत्री झाली.पुण्याला स्थायिक झाले की आपल्या घरी येण्याचे आमंत्रण पण देऊन टाकले सुखदाने.

     ~~~~~~~~~~~~~~~~~~

बस फक्त आजची रात्र मग हे दोघे उद्या परतीच्या प्रवासाला लागणार होते.दोघांचीही लिव्ह संपत आलेली. सो त्यांना निघणे भाग होते..

रात्री सगळी निरवानिरव झाली तसे दोघेही पमादादा आणि नलुमावशीला उद्या निघतोय हे सांगायला गेले.

सुहास - मावशी,पमादादा, छान झाले लग्न.खूप मज्जा आली आम्हाला.त्यानिमित्त सगळ्यांची भेट झाली.मस्तच वाटले.पण आता उद्या निघावं म्हणतोय आम्ही.

त्यावर मावशी जराशा रागातच बोलली.

नलुमावशी - हे कायऽ रेऽऽ असंऽऽ..आला आलात म्हणे पर्यंत निघालातही.? इतक्या घाईत बसुन धड बोलणेही झाले नाही आणि तु निघालास...ते काही नाही.मी तुम्हाला अशा घाईत मुळीच जाऊ देणार नाही.त्याला पमादादानेही दुजोरा दिला.

सुहास तरीही पुढे बोललाच.

सुहास - अरेऽऽ दादा,आमच्या लिव्ह्ज संपत आल्याएत.

पमादादा - कधी जॉईन व्हायचेय सांग..?

सुहास - शनिवारी कम्पलसरी जॉईन करावे लागेल.

पमादादा(त्यावर हसतच) - अरे मगऽऽ आहे की वेळ..आता आज काय मंगळवार नाऽ.तुम्ही उद्याची पूजा सत्यनारायण उरकुन मग परवा जा.

मावशी (सुखदाला विचारत)- काय गंऽऽ तूला जायची घाई झालीय की सुहासला?

त्यावर 

सुखदा - अहोऽऽ मावशी मला तर इतके आवडलेय मला जमले असते तर मी इकडेच राहिले असते कायमचीऽऽऽ.पण काय करणार नौकरी आहे नाऽऽ..जावे लागते.त्यात मुलांनाही मावशींवर सोडुन आलोय..

नलुमावशी - तिचे कारण नको सांगु मला.वेणूकडे मी बघते.तु तुझी ईच्छा काय ते सांग???

सुखदा - तुमच्या मुलाची हरकत नसेल तर मी राहीन.माझे सोमवारी जॉइनिंग आहे.तिने खर खर सांगुन स्वत:ची सोडवणूक करून घेतली.

त्यावर खुष होऊन आपला मोर्चा सुहासकडे वळवत मावशी म्हणाल्या…

नलुमावशी - लग्नाच्या गर्दीत सुखदाला सावंतवाडी दाखवायचे राहिले.तुम्ही असे करा उद्या जरा गावात फिरा.इतक्या लांब आलाय तर एक दिवस फिरून घ्या..पुन्हा तिकडे गेल्यावर वारंवार येणे होतेय होय रेऽऽऽ…

आता मावशीचा शब्द सुहासलाही मोडवेना.तसेही तिचे बरोबरच होते.सावंतवाडी गाव पाहणे त्यांचे राहिलेच होते.मग त्यानेही दुजोरा देत होकार भरला.

दुसऱ्या दिवशी सकाळी होम वगैरे सुरू झाला.त्याला बराच वेळ जाणार होता हे बघुन तो सुखदाला घेऊन बाहेर पडला.प्रथम मेन मार्केट जवळचा शीवरामराजे भोसल्यांचा राजवाडा बघितला.मोती तलावाला लागुनच हा जुना राजवाडा आपल्या ऐतिहासिक खूणा जपत आजही उभा होता.सावंतवाडीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लाकडी खेळणी.मेन मार्केटमधे जाऊन सुखदाने जीजासाठी भातुकलीचा लाकडी सेट खरेदी केला.आदिसाठीही काही खेळणी घेतली.ती इवली इवलीशी खेळभांडी बघुन तिला आपले बालपण आठवले.ती आणि सपुताई असेच सुट्ट्यांमधे खेळ खेळ भांडी खेळत असत.

सगळे मार्केट फिरून कोकम,आगळ फणस पोळी/अंबा पोळी हे तिथले पारंपारिक पदार्थ खरेदी केले.ह्या सगळ्यात दोन-तीन तास उलटुन गेले होते.पूजा आटोपली तर सगळे जेवायला खोळंबतील म्हणुन ते परत घरी आले.

मग पुन्हा संध्याकाळी ते दोघे वेंगुर्ला बीच जो तिथुन पंचवीस एक किमी होता तिकडे जायला निघाले.रस्ता मोकळा असल्याने ते अवघ्या वीस पंचवीस मिनिटातच पोहोचले.पोहोचेपर्यंत सूर्य अस्ताला जाऊन किनारा पुर्ण निर्जन झालेला.दोघेही वाळुत बसुन कित्यकवेळ एकटक त्या समुद्राची शांतता अनुभवत होते.

सुहास आकाशाकडे बघत सुखदाला म्हणाला..

सुहास(गंभीर चेहरा भासवत)- किती सुंदर चांदण पडलयं नाही.

त्यावर सुखदा - हम्मऽऽऽ….

सुहास - मला काय वाटत माहितीय सुखीऽऽऽ..!

असाच शांत निर्मनुष्य समुद्र किनारा असावा.असेच चांदणे पडलेले असावे.अशीच सायंकाळ असावी.तु असावीस,मी असावा आणि…….

तो इतक छान काहीतरी बोलतोय हे ऐकुन ती तल्लीन झाली होती.तो मधेच बोलायचा थांबला तसे तिने विचारले - आणिऽऽऽऽ………?

त्यावर सुहास जरा वाळुत सरकत थोडा तिच्यापासुन अंतर राखत म्हणाला..

सुहास - काही नाऽऽही मी हेच म्हणत होतो की असा निर्मनुष्य किनारा असावा,तु असावीस, मी असावास आणि….. मी…... सतत स्वर्गाचे दार

उघड-झाप उघड-झाऽऽप करत रहावे.

आता मात्र ह्याने पांचटपणाचा कहर केला होता.ती अक्षरश: त्याला मारायला धावली.तसा आधी पासुनच पवित्र्यात असलेला सुहास किनाऱ्यावर धावायला लागला.तीही त्याच्या मागे धावायला लागली.कितीवेळ हा शीवाशीचा खेळ झाल्यावर अखेर दमुन तो तिला सरेंडर झाला.

तिने जोरदार एक फटका मारत लटक्या रागातच त्याला म्हणाली..

सुखदा - हा खूप वाईट्टऽऽऽ जोकऽ होता हं सुहास..! व्हेरी चीपऽऽ!!

त्यावर खट्याळ हसु तोंडावर आणुन तो म्हणाला.

सुहास(निरागसपणे) - त्यात काय..!मी कुठे कोण्या परक्या स्त्रीला बोलतोय??

माझ्या हक्काच्या बायकोला बोलतोय याऽऽर….

तिच्याबरोबर काय चीप अन् बीप…

मी फक्त माझी इच्छा बोलुन दाखवली..खरच तसे करणार आहे काऽऽ..?

अतिशय साळसुदपणाचा आव आणत सुहास बोलत होता..

सुखदा(लटक्या रागाने) - होऽऽऽ कितीऽऽ गं तो निरागसपणा..चेहरा पहा आरशात!!!

आता मनातले मांडे रचणे बंद कर आणि चल घरी.सगळे वाट पहात असतील आपली.

तसे त्याने तिला तसेच जवळ ओढुन एक किस केला आणि म्हणाला

सुहास - बसऽऽ आजचा कोटा संपला..आता निघु.. उद्या तर निघायचेय. मग पुन्हा अशी संधी कुठे मिळेल…!!!

सुखदा त्याच्याकडे लटक्या रागाने बघत मनातल्या मनात लाजतच घराकडे निघाले..

      ~~~~~~~~~~~~~~~~~~

दुसरा दिवस.सुहास सुखदा पटपट सगळे आवरून सगळ्यांना आणलेला आहेर व्यवस्थित देऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडले.दोनच दिवसात नलुताईंना सुखदाची इतकी सवय झाली की निघताना त्यांच्याही डोळ्यात पाणी आले.डोऴे टिपतच त्या म्हणाल्या

नलुमावशी - दोनच दिवसात वेडं लावलस गं पोरीऽऽ…!

आता हे जुनं खोडंऽऽ कधी कटकन मोडेल सांगता येत नाही त्याच्या आधी ह्या आईला भेटायला येत जा वेळ काढुन..

त्यावर सुखदाही भावुक झाली.त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसत ती म्हणाली

सुखदा - आता लेक म्हणता नाऽऽ मग मला माझ्या माहेरी यायला वाट पहायची काय गरज??कधीही मनात आले की मी माझ्या हक्काच्या माहेरी येईन.

आणि इतक्यात जायची गोष्ट का करताय?? अजुन तर तुम्हाला तुमच्या पणतुचे तोंड पहायचेय.हे वाक्य बोलताना तिने सहेतुक  वरूण आणि आर्याकडे तिरपा कटाक्ष टाकला त्याबरोबर आर्याही थोडी लाजली.

नलुमावशीही काही कमी नव्हत्या.

नलुमावशी - आता मला नातु आणि पणतु एकाचवेळी पहायला मिळतील असे वाटतेय...कायऽऽऽ..?मिळणार ना बातमी..??

त्यावर सुखदा गोरीमोरी झाली.आता लाजायची वेळ सुखदाची होती.

सगळी निरोपा निरोपी होत अखेरीस ते परतीच्या प्रवासाला लागले…………

      ~~~~~~~~~~~~~~~~

सईऽऽऽ…. सऽऽऽई धावु नको गं अशी...किती दमवतेस तु.!!!

चल पटकन आवर.आता हा मंमंचा शेवटचा घास,मग शंपलंऽऽ हंऽऽ…!

मग तुला आज्जीकडून काऊ-चीऊची गोष्ट एेकायचीय नाऽऽऽ…!!!!!

………………

………….

……….

……..

…...

….

..

.

 कायऽ………!!!!

काहीतरी चुकीचे वाटतेय ना.??

मी चुकुन जीजा ऐवजी "सई" लिहीले असे वाटले नाऽऽऽ तुम्हालाऽऽ……???

-

-

-

-

थांबाऽऽ…...थांबाऽऽ…

मी विसरलेच की सांगायला….

अहोऽऽऽ सुहास सुखदाच्या संसारवेलीवर चक्क दोन फूले उमललीएत आताऽऽ.

तेही जूळीऽऽऽ….!!!

आहातं कुठे..!!!!

यथावकाश सुखदाने जूळ्या मुलांना जन्म दिला.     

बरोब्बर संपदाच्या जन्म तारखेवरच सुखदा सुहासची जोडगोळी जन्माला आली.

एक मुलगा/एक मुलगी.

पहिली जीजाबाई घरात होतीच म्हणुन हिचे नाव " सई "ठेवले.संपदाची आठवण म्हणुन आणि सुहास-सुखदाच्या नावातील अद्याक्षरापासुन मुलाचे नाव "सुशांत ".

आहे ना गंम्मत..!!!!

आता आदि सगळ्यांचा दादा म्हणुन वावरत असतो घरात.तो आता चौथीत आहे आणि जीजा पहिलीत..

सई आणि सुशांत मात्र दिड वर्षांचे झालेत….

घरभर दंगा करत फिरत असतात.वेणूताईंच्या घरात आता खरचच गोकूळ नांदतेय.

एकाच ह्या जन्मीऽ जणू ;

फिरूनी नवी जन्मेन मी…..!

सुखदाचा खरचचं फिरूनी नवा जन्म झालाय.

दोन मुलांची आई होऊनही सुखदा अजुनही टकाटक दिसते तर सुहासही ग्रीक गॉड सारखाच हँडसम….

मग कायऽऽऽ…अजूनही दोघे असेच पिल्लांना घरी सोडून जीवाचा गोवा करायला गोव्याला जात असतात बरंऽऽऽ.

"फिरूनी नवी जन्मेन मी " हे वाक्य सार्थ करायला…

थोडक्यात कायऽऽऽ सुहास-सुखदाचा जीवनप्रवास आनंदाच्या वाटेवर सुखात चालू आहे…..

नांदा सौख्य भरे …….!

--------------------(समाप्त23)-------------------------

अंतिम भाग -23

©®राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी….!

आज मी काहीच बोलणार नाहीये.दरवेळी कथेच्या शेवटी मी संवाद साधायचे पण आता तो संवाद तुम्ही माझ्याशी साधावात असे मला वाटतेय…

तुमच्या कमेंट्सद्वारे काय वाटते कथेबद्दल हे नक्की सांगा..

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या,नावासहित माझी कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all