Oct 26, 2020
स्पर्धा

फिरूनी नवी जन्मेन मी भाग 3

Read Later
फिरूनी नवी जन्मेन मी भाग 3

फिरूनी नवी जन्मेन मी-3

©®राधिका कुलकर्णी.

 

वेणुताईंनी नलिनीताईंना सुहासचा होकार कळवुन बॉल त्यांच्या कोर्टमधे टाकला होता.

आता नलिनीताईंचे टेन्शन वाढले होते.

सुखदाने तर निर्णयच घेऊन टाकला होता.

पुन्हा लग्नाबिग्नाच्या भानगडीत तिला पडायचेच नव्हते.

सुरवातीच्या एक दोन वर्षात बरीच स्थळे येत होती सांगुन,,नलिनीताई आणि रणजितरावांनी तिचे मन वळवायचा बराच प्रयत्न केला पण ती तिच्या निग्रहावर ठाम होती.

शेवटी त्यांनी त्या विषयाला कायमची तिलांजली दिली.

त्यामुळे आता पुन्हा त्याच विषयाची पुनरावृत्ती झाली तर सुखदा कशी रिअॅक्ट होईल हीच चिंता नलिनीताईंना खात होती.

तिचा डिव्होर्स होऊनही जवळपास तिन-चार वर्षे उलटुन गेली होती.एव्हाना परिस्थिती बदलली.सुखदाही बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य जगायला लागली होती.आत्ता कुठे तिच्या जुन्या जखमांवर खपली धरून ती पुन्हा तिच्या आवडी निवडी छंदांमधे मन रमवायला लागली होती. आणि त्याच वेळी पुन्हा तोच विषय तिच्यापुढे काढला तर जुन्या जखमा पुन्हा हिरव्या होतील की काय ही भीतीही होतीच.

 

त्यामुळे तिच्याशी हा विषय कसा काढावा हेच नलिनीताईंना समजत नव्हते.त्यांच्या मनात चाललेली ही उलघाल रणजितरावांनी बरोबर हेरली.

"काय गं,तब्येत ठिक नाहीये का?कसल्या एवढ्या चिंतेत आहेस? रणजितरावांनी  आपल्या पत्नीला विचारले.

वेणूताईं बरोबरचे बोलणे नलिनीताईंनी अजुन तरी आपले पती रणजितरावांपर्यंत पोहोचु दिले नव्हते.आज ना उद्या हा विषय त्यांच्याशी बोलायचाच होता.

थोडावेळ विचार करून नलिनीताईंनी वेणूताईंबरोबरचा सगळा फोन-संवाद इथ्यंभुत रणजितरावांना कथन केला.

आता रणजितरावांना नलिनीताईंच्या चिंतेचे खरे कारण समजले.

तेही थोडे विचाराधीन झाले.खरे पाहता हा प्रस्ताव दोघांच्याही दृष्टीने फायद्याचा होता.

दोन एकाकी जीव आयुष्याच्या अशा वळणावर एकटे पडले होते जेव्हा खऱ्या अर्थाने आयुष्य भरभरून जगायचे असते.जर ह्या निर्णयाने ते एकत्र आले तर ते दोघे आणि त्यांची मुले सगळेच परीपुर्ण आयुष्याचा आस्वाद घेऊ शकणार होते.आणि आई बापही चिंतामक्त होणार होते.

 हे सगळे मोठ्या लोकांना पटत होते आणि कळतही होते पण हे सुखदाला कसे पटवता येईल हाच विचार आई बापांना सतावु लागला.

शेवटी रणजितरावांनी नलिनीताईंना दुजोरा दिला व सांगितले की काय होईल ते पुढचे पुढे बघुन घेऊ पण हा विषय तु बोलच सुखदाशी तेही आजच."

नवऱ्याचा ह्या विषयावर भक्कम पाठिंबा आहे हे कळताच नलिनीताईंना दहा हत्तींचे बळ आले.मन खंबीर करून होणाऱ्या परीणामांसाठी मनाची पुर्वतयारी करून सुखदाशी आजच बोलायचे त्यांनी पक्के केले.

मनावरचे ओझे काकणभराने का होईना कमी झाल्याने त्या पुन्हा पुर्वस्थितीत आल्या.

         ~~~~~~~~~~~~~

सुखदा नेहमी प्रमाणे तिचे नाईटस्कूल संपवुन घरी पोहोचली.मुलांची खाणी मोठ्यांची जेवणे उरकुन जो तो आपापल्या कामात व्यग्र झाला.

सुखदा जीजाला झोपवुन दुसऱ्या दिवशीच्या कॉलेजच्या तयारीत व्यग्र होती.

तेवढ्यात नलिनीताई तिच्या खोलीत आल्या. काहीतरी सुरवात करायची म्हणुन विचारत्या झाल्या,"झोपली का जीजा?"

"हे काय आत्ताच झोपली."

त्यावर नलिनीताई बोलल्या,"आजकाल खूपच चळवळी झालीय.दिवसभर हुंदडणे चालू असते. एक मिनीट एक जागी बसेल तर शप्पथ.फार दमायला होते बाई."

"आता वयं झाली आमची आणि सवयही राहीली नाही लहान मुले संभाळायची."

"हम्मऽऽऽ...खरय तुझे." सुखदानेही आईच्या होकारात होकार मिसळला.

नलिनीताईंना अजुनही समजत नव्हते विषय कसा काढावा.त्यांच्या चेहऱ्यावरची चिंतेची लकेर बघुन सुखदानेच विचारले," काय गं एवढा कसला विचार करतेस?"

"काही नाही गं ह्याच पोरांचे कसे होणार विचार करत होते."

"कसे होणार म्हणजे?" सुखदाने नलिनीताईंचा रोख न समजुन विस्मयानेच विचारले.

"अगं म्हणजे आता काही दिवस आपण संभाळू पण हे असेच कायम स्वरूपी कसे उपयोगी पडेल?तिकडे वेणूताईं पण वय झालेल्या.सुहास कामात बिझी असतात मग मुलांची कायम देखभाल करायला घरात कोणीतरी नको का?"

"तु तरी किती दिवस संभाळणार.?तुलाही तुझी नौकरी,व्याप आहेत.आपण किती दिवस पुरणार?"

नलिनीताई हळुहळु विषयापर्यंत पोहचत होत्या.

"असं का बोलतेस आई,काय झालेय?तुला दोघांचे करताना खूप ताण पडतोय का गं?" सुखदाने काळजीनेच विचारले.

"अगं माझ्या ताणाबद्दल नाही बोलत गं मी.पण कितीही झाले तरी आई-बापाच्या प्रेमाची सर अशा उपऱ्या प्रेमात कुठुन येणार?सुहासरावांनी लग्नाचे मनावर घ्यायला हवे आता."

सुखदा आईच्या ह्या बोलण्याने चकितच झाली.आईला नेमके काय म्हणायचेय हेच तिला उमगत नव्हते.

तिला हा मुद्दाही तितकासा पटला नव्हता.

ती लगेच बोलली," हे काय बोलतेस तु आई?ताईची मुले आता जड झालीत का तुला?आणि काय गॅरेंटी सुहासने लग्न करून आणलेली दुसरी स्त्री ताईच्या मुलांना प्रेमानेच वागवेल?

"हे म्हणजे आगीतुन ऊठुन फूफाट्यात पडण्या सारखे आहे."

"मला तुझा हा विचार मुळीच पटला नाही हं आई,,,म्हणजे सुहासला लग्न करायचे तर करू दे.

"त्याबद्दल आपण बोलु शकत नाही."

"परंतु जीजा आणि आदि आपल्याकडेच राहतील.मी समर्थ आहे त्यांची काळजी घ्यायला समजले तुला?"

सुखदा जरा चिडुनच तावातावाने आपले मत मांडत होती.

 

ह्या सगळ्या संवादात एकच धागा नलिनीताईंच्या बाजुचा होता तो म्हणजे दुसरी स्त्री कशावरून मुलांना नीट वागवेल ही सुखदाची चिंता.

आता ह्याच मुद्द्याला पुढे सारून आपला विषय सुखदापर्यंत पोहोचवायचा त्यांनी मनोमन निश्चय केला.

स्वत:च्या वाक:चातुर्यावर स्वत:च स्वत:ची पाठ थोपटत नलिनीताईंनी विषय पुढे सरकवण्यास सुरवात केली.

"हो तु म्हणतेस तेही खरेच आहे.पण अशी एखादी मुलगी जिला आधाराची गरज असेल, मुलांची आवड असेल तर काय हरकत आहे.?"

"अगं आई कितीही मुलांची आवड असली तरी तिला स्वत:ची मुले झाल्यावर ती ह्या दोघांकडे दुर्लक्ष केली तर? "

"तुझ्या मनात आज अचानक हे ऊटपटांग विचार कुठुन येताहेत गं?"

जराशा वैतागातच सुखदा बोलत होती.

आता नलिनीताईंनी हुकुमी पान टाकायचे ठरवले.

"अगं काही नाही आज वेणूताईंचा फोन आला होता."

"बर मग?"

" त्याही सुहासच्या लग्नाबद्दलच बोलत होत्या."

"हंऽ.....मग.?" सुखदाला अजुनही क्लू लागत नव्हता.

"त्यांनीच एक प्रस्ताव मांडला. मला तर बाई पटलाच नाही पण म्हणले विचार करायला हरकत काय आहे?"

"कसला प्रस्ताव?"

"हाच सुहासच्या लग्नाचा?"

"कुणाशी?"

"त्यांच्या मनात एक मुलगी आहे,सुहासलाही पसंत आहे म्हणे,पण त्याची एक अट आहे?"

"कसली अट?"

सुखदा अजुनही विसमयचकित होऊन विचारत होती.

"अगं तो हेच म्हणतोय की त्याला मुलगी पसंत असली तरी ती फक्त मुलांची आई म्हणुन त्या घरात येईल.बायको म्हणुन तो तिचा स्वीकार करणार नाही ही अट मुलीला मान्य असेल तरच लग्नाला तो तयार होईल अन्यथा नाही."

"हम्मऽऽ.! मग मुलीचे काय म्हणणे आहे कळले का?"

"तेच तर नाऽऽऽ.आत्ता कुठे तिला विचारलेय,आता तिलाही विचार करायला वेळ हवाच ना.."

"हम्म..!पण मग कोण मुलगी कुणाचे स्थळ आहे काही कळले तुला?"

"आय मीन वेणूमावशींनी सांगितले का कोण मुलगी ते?"

"हो सांगितले ना.म्हणुन तर मी जास्त चिंतेत पडलेय गं."

"का?तु का चिंतेत पडलीएस? मुलगी चांगली नाहीये का?"

"अगं तसे काही नाही गंऽऽ.."आता कसे सांगुऽऽऽ….?"

दोन मिनीट पॉझ घेऊन नलिनीताईंनी गौप्यस्फोट केला,"कारण वेणूताईंना पसंत पडलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसुन तुच आहेस.आता सांग हा प्रस्ताव तु ऐकल्याबरोबर साफ नकार देणार हे माहित असताना मी त्यांना काय उत्तर देणार आहे?"

हुश्शंऽऽ! शेवटी नलिनीताईं विषय सुखदापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्याच तेही आदळआपट कुठलाही त्रागा न करता.

खूप हुशारीने नलिनीताईंनी सुखदाची बाजू घेतलीय हे भासवुन विषय तिच्यापर्यंत असा काही पोहोचवला की ती आईवर हा विषय का काढला म्हणुन चीडूही शकणार नव्हती.

आपल्याला नसलेली कॉलर ताठ करत नलिनीताई आज स्वत:वरच जाम खुश होत्या.

वरकरणी तोंडावर चिंता आेढुन सुखदा पुढे काय बोलतेय हे एेकण्यासाठी त्यांनी कान तयार ठेवले.

सुखदावर अचानक पडलेल्या ह्या  बॉम्बमुळे ती ही विचारात पडली.तिलाही हा धक्काच होता.

ह्यात आईलाही दोष देऊ शकत नव्हती ती.

एव्हाना तिला आपण आपल्याच विणलेल्या शब्दजाळात अडकलोय ह्याची पुरती जाणीव झाली.

सुखदा काहीच बोलत नाही हे पाहुन नलिनीताईंनी पुढची खेळी तयारच ठेवली होती.

त्या लगेच म्हणाल्या, " हे बघ सुखदा वेणूताई आणि सुहासचा जरी होकार असला तरी तुझ्यावर कुणाचे काही बंधन नाहीये.तुला जर हा प्रस्ताव मान्य नसेल तर तु तसे स्पष्टपणे सांगुन टाक हो.आम्ही तुझ्या निर्णयातच खुश आहोत.आधीही तुला साथ दिली आणि पुढेही तुझ्या प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्याच बाजुने राहुत.तेव्हा तुला काही बळजबरी नाहीये.तुझा निर्णय घ्यायला तु स्वतंत्र आहेस."

एवढे लफ्फेदार सेंटी भाषण ठोकुन त्यांनी सुखदाला पुरते चीत-पट केले.तिला चुकुनही ह्यात ह्या दोन बायकांचा हात आहे ह्याची पुसटशी शंकाही येऊ नये ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती.

सुखदा आईचे बोलणे ऐकुन अजुनच संभ्रमात पडली.

एकीकडे खरोखर मुलांची चिंता तिलाही भेडसावत होती.त्यात सुहासने घातलेली अट मान्य करून कोणती मुलगी लग्न करणार होती त्याच्याशी.एखादी खचितच असेल माझ्यासारखी.पण ती एखादी माझ्या ताईच्या मुलांची मावशी नसणार ना इतके प्रेमाने करायला.सुखदा खरच पेचात पडली होती.काय बोलावे काय उत्तर द्यावे तिलाही समजत नव्हते.बरं आपण नाही म्हणल्यावर जर दुसरी कोणी तयार झालीच तर पुन्हा मुलांची चिंता होतीच कशी संभाळेल,आपल्या इतक्या मायेने करेल का त्यांचे?" 

 

खूप वेळ सुखदा आपल्याच विचारात मग्न काहीच बोलत नाही पाहुन तिच्या अतंर्मनाचा अंदाज घेण्या हेतुने नलिनीताई बोलल्या," हे बघ सुखदा,तु काही ह्या सगळ्याचा फार विचार करू नकोस.आता रात्र झालीय पण उद्या सकाळीच मी तातडीने वेणूताईंना तुझा नकार कळवुन टाकते.तु झोप शांतपणे. त्या आपल्या विहीणबाई आहेत त्यामुळे त्यांचे बोलणे मला तुझ्यापर्यंत पोहोचवणे भाग होते.नाहीतर नंतर जर त्यांना कळले की मी तुला न सांगताच विषय परस्पर कटवला तर त्या उगीचच नाराज झाल्या असत्या.न जाणो रागाभरात त्यांची नातवंडे घेऊन गेल्या असत्या इकडुन.

मग बिचाऱ्या आईविना लेकरांची परवड झाली असती आपल्या मोठ्यांच्या भांडणात.

हे सगळे टळावे म्हणुन तुला सांगितले होऽऽ."

नलिनीताईनी सेंटीवर सेटी हाणुन सुखदाला पार चारी मुंड्या चीत करून सोडले होते.

आईच्या बोलण्याने तीही पुढच्या संभाव्य धोक्यांना जाणुन घाईघाईत कुठलीही कृती किती त्रासदायक होऊ शकते हे समजुन कुठलाही निर्णय घेणे लांबणीवर टाकु पहात होती.

ती लगेचच आईला म्हणाली," हे बघ आई तु काही इतकी पॅनिक होऊ नकोस आणि लगेच उद्याच नकार कळवायची घाई पण करू नकोस.त्या स्वत:हुन विचारल्याच फोनबीन करून तर तेव्हा सांगु काय सांगायचे ते.तोपर्यंत मी ही जरा विचार करते सगळ्या गोष्टींचा."

"बघ बाई आता तु म्हणतेस म्हणुन ..नाहीतर मला तर वाटते ज्या गावाला जायचे नाही तो रस्ता विचारायचाच कशाला ना?जितक्या लवकर कळवले तितके चांगले."

"नाही नको..थांब मी विचार करते ह्यावर मग बोलु पुन्हा." सुखदाने नलिनीताईंना नकार कळवण्यापासुन रोखताच मनातल्या मनात त्या आनंदुन गेल्या.आत्ता एक गरकन गिरकी घेऊन नाचावे की काय इतका आनंद झालेला नलिनीताईंना.कारण एरवी सहजपणे हाच विषय काढला असता तर घरात रणकंदन माजले असते.

सुखदाचा राग म्हणजे जमदग्नीचा अवतार.पण आज ती स्वत:च विषयाचा निदान विचार करायला तरी तयार झाली ही सकारात्मकतेच्या दिशेने एक पाऊल का होईना पुढे जाणारी घटना होती.

त्यामुळेच नलिनीताई आतुन आनंदी होत्या आज.

"बरं तु झोप आता दिवसभर काम करून मुलांचे करून थकते ग माझी लेक."

सुखदाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत नलिनीताई खोली बाहेर पडल्या.

आता कधी एकदा हे रणजितरावांना सांगते असे झालेले नलिनीताईंना.तत्पुर्वी देवघरात जाऊन त्यांनी देवाला नमस्कार केला.देवा माझ्या लेकीला योग्य निर्णय घ्यायची सुबुद्धी दे रे बाबा असे मनात म्हणतच त्या आपल्या खोलीकडे गेल्या.

इकडे आई जाताच सुखदाही बेडवर पडल्या पडल्या आईशी नुकत्याच झालेल्या सर्व विषयावर पुन्हा विचार करू लागली.

तसे पहायला गेले तर सुहास आणि तिच्यात पहिल्या पासुनच मैत्रीपुर्ण संबंध होते.जेव्हा सपुताई आणि सुहास नविनच प्रेमात पडलेले होते म्हणजे अजुन घरात कुणाला माहित नव्हते तेव्हा कित्येकवेळा सुखदानेच त्यांना चोरून भेटण्यात मदत केलेली होती.जेव्हा कधी दोघांत काही रूसवे फुगवे होत असत तेव्हा सुहास सुखदाच्याच मदतीने संपदाबरोबर समेट घडवण्यात यशस्वी व्हायचा.असे त्या तिघांमधे एक वेगळे बॉडींग होते.म्हणजे बहिणी म्हणुन संपदा सुखदा जेवढे शेअरींग होते तेवढेच शेअरींग सुहास सुखदातही होते.

एक छान मैत्री म्हणले तरी हरकत नाही असे एक वेगळेच मॅच्युअर लेव्हलचे बाँडींग होते.

 

त्यांच्या तिघांच्या वयातही फक्त दोन वर्षांचे अंतर होते.कारण सपुताई आणि सुहास तर क्लासमेट्सच होते.

संपदा आणि सुखदामधे जेवढे अंतर तेवढेच सुहास आणि सुखदामधे.म्हणजे वयाच्या अटीतही दोघे पास होत होते.

राहता राहीला स्वभाव तर सुहास सारखा समंजस मनमिळावु मुलगा शोधुनही सापडला नसता हे तर निर्विवाद सत्य होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने घातलेली विचित्र अट.त्यातही त्याचे संपदावर असलेले अनिर्बंध प्रेमच दिसुन येत होते.

ह्या सर्व आघाड्यांवर सुहास सुखदाच्या परीक्षेत आधीच पास झाला होता आणि ही त्याची अट तिच्यासाठीही सर्वार्थाने फायदेशीरच होती.

दुधाने तोंड पोळलेली सुखदा ताकही फुंकुन पिण्याच्या मन:स्थितीची बनलेली होती.तेच प्रमुख कारण होते तिच्या लग्नाला नाही म्हणण्याचे.

त्यामुळे कोणतेही वैवाहिक संबंध न जोडता जर तिला मुलांचे आईपण मिळाले तर ते तिला का चालणार नव्हते.

एकुण काय,सद्य परिस्थितीत तरी वेणूमावशींच्या प्रस्तावाला नकार देण्याचे कोणतेही सबळ कारण सुखदाकडे नव्हते.

जर मुलांकरता सुहास हा विचार करतोय तर मी ही करूच शकते ना.शेवटी आम्ही दोघेही फक्त आणि फक्त मुलांच्या भविष्याचाच विचार करत अाहोत तर मग दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहुन काळजी घेण्याऐवजी एकाच छताखाली राहुन केली तर ते सर्वार्थाने योग्य होणार होते.

 

तरीही एक प्रश्न सुखदाच्या मनाला पोखरतच होता.

मला न विचारता सुहासने परस्पर मला होकार कसा काय दिला??

त्याच्यासारखा सेन्सीबल पुरूष असे नक्कीच करणार नाही, मग ह्या मागचा खरा सुत्रधार कोण??"

तिच्या कुशाग्र बुद्धीला ही गोष्ट बरोबर खटकली जिथेच खरे पाणी मुरत होते.

पण अती विचारानी तिच्या मनावर ताण आला होता.डोकं जड झाले होते.हळुहळु झोपेने शरीराचा ताबा घ्यायला सुरवात केली होती. बाकीचा विचार उद्यावर सोपवुन सुखदा निद्रादेवीला शरण गेली.

            ~~~~~~~~~~~~~

आता पुढे ह्या प्रश्नावरून काय नविन रामायण घडणार होते हे फक्त त्या विधात्यालाच ठाऊक होते.

काही गोष्टी काळावर सोपवुन देण्यातच भलाई असते म्हणतात ते काही खोटे नाही…….

रात्रीच्या अंधारात असे उद्याचा उष:काल….

ह्या ओळी आत्तापर्यंतच्या सर्व नाट्यमय घडामोडींना अगदी चपखल जुळत होत्या...

-----------------------(क्रमश:3)-----------------------------

भाग-3

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार वाचक मंडळी.

काय वाटते,सुखदाला खऱ्या सुत्रधाराचा शोध लागेल?

हे सगळे नाटक समजल्यावर सुखदा काय निर्णय घेईल.काय घडणार पुढे? 

नक्की वाचा आणि आपल्या बहुमुल्य प्रतिक्रीया नक्की कळवा मला कमेट्सबॉक्समधे.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत ही कथा नक्की शेअर करू शकता.)

धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..