Feb 28, 2024
प्रेम

माझ्या बाळाने बोललेलं पहिलं वाक्य

Read Later
माझ्या बाळाने बोललेलं पहिलं वाक्य

अश्वथ माझा चिमुकला आता पंधरा जुलैला दोन वर्षांचा झालं.त्याच्या जन्माची आणि त्याच्या बाबांच्या पहिल्या भेटीची कथाही माझ्या प्रोफाइल वर जाऊन नक्की वाचा.

आज मी तुम्हाला सांगणार आहे अश्वथने बोललेल्या पहिल्या वाक्याची कथा.मी आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे माझा गर्भसंस्कार या विषयावर मनापासून विश्वास आहे त्यामुळे मी अगदी त्यात सांगीतल्याप्रमाणे आहारापासून ते व्यायामपर्यंत सगळंच अनुसरण केले होतं. योगा,प्राणायाम,ध्यान,बाळाशी गप्पा मारणे, जणू तो माझ्यासमोर बसलाय असं समजून त्याला कथा सांगणे,अगदी माझं सुख दुःख त्याच्याशी वाटणे हा माझा दिनक्रम असे. त्याला रोज पोटावर हात ठेवून सांगायचे आम्ही किती आतुरतेने तुझी वाट बघतोय.या सगळ्याचा खूप सकारात्मक आणि चांगला परिणाम मला बघायला मिळाला.

माझं बाळ खूप हसरं आणि गुटगुटीत तर आहेच पण त्याची शारीरिक आणि बौद्धिक वाढही खूप जलद आहे. तो दीड महिन्यात पालथा पडू लागला, साडे तीन महिन्यात स्वतः उठून बसायला लागला,सहा महिन्यात रांगायला लागला आणि साडेसात महिन्यात स्वतः कसलाही आधार न घेता चालायला लागला. अपेक्षेप्रमाणे तो बोलायलाही लवकरच लागला.त्याचा पहिला शब्द होता 'बाबा'. नऊ महिन्याचा असताना तो बोलायला लागला पण साधे शब्द बोलत होता जसं बाबा, काका, मामा,दादा वगैरे.किंवा मी जे बोलायला लावेल ते एक एक शब्द माझ्यामागे बोलत होता.

मी रोज संध्याकाळी दिवा लावताना त्याला सोबत घेऊन बसते, त्याला मांडीवर घेऊन शुभं करूत्वं कल्याणम म्हणते हा आमचा नित्यक्रम अगदी तो दीड महिन्याचा होता तेव्हापासून सुरू आहे.मी जसं करेल तसं तो माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.मी पूजा झाल्यावर रोज त्याला माझ्या मागे ओम नमः शिवाय म्हणायला लावते.तो एक एक शब्द वेगळा बोलत असे. मी त्याला रोज म्हणायला सांगायचे ,"बाप्पा मला सुखी ठेव, बाप्पा मला बुद्धी दे". तो रोज हे वाक्य ऐकत होता. जसजसा मोठा होत होता तसा खूप बोलायला लागला पण पूर्ण वाक्य बोलत नव्हता.मी छोटी छोटी वाक्य शिकवायची त्याला पण तो सलग बोलत नव्हता एक एक शब्द बोलून त्याला जे पाहिजे ते बरोबर सांगायचा.

तो अकरा महिन्याचा झाला आणि एक दिवस अशीच मी माझ्या कामात गुंग होते आणि तो त्याच्या टेडी सोबत खेळत होता, तिला खोटं खोटं खाऊ घालत होता. अचानक तो काहीतरी बोलतोय असं मला वाटलं म्हणून मी कान टवकारून ऐकू लागले. तो त्याच्या टेडीला मांडीवर बसवून त्याचे हात स्वतःच्या हातात घेऊन जोडून देवासमोर बसला होता. देवाला नमस्कार करत होता आणि इतका वेळ फक्त टेडी,आई,बाबा,पप्पा,खाऊ असं बोलत असलेला अश्वथ त्याच्या बोबड्या शब्दात म्हणाला,             "बाप्पा... मला बोद्धी दे,बाप्पा मला शुथी थेव!"

मी लगबगीने त्याला कुशीत घेत त्याचा एक गोड पापा घेतला आणि त्याला पुन्हा बोलायला लावले तर तो इतका छान लाजला की आजही मला ते आठवलं तर मस्त वाटतं.

त्याचे बोबडे बोल ऐकून मन अगदी प्रसन्न होते पण त्या पहिल्या वाक्याची माजा काही औरच होती. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस,अजून दोन वर्षाचाही पूर्ण झाला नाही पण तो खूप शुद्ध मराठी बोलतो.आता अशी वेळ आलीये की तो आम्हाला काही बोलूच देत नाही दिवसभर जीभ चुरचुरू चालू असते.रोज तीन चार नवीन वाक्य बोलून आम्हाला चकित करतो पण 'बाप्पा मला बुद्धी दे,बाप्पा मला सुखी ठेव' ती भावना काही वेगळीच होती.

लेख आवडल्यास लाईक,कमेंट आणि शेयर जरूर करा.
माझे इतरही लेख वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा.

 

©®सुवर्णा राहुल बागुल

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//